पहचान कफन से नही होती है दोस्तों…
लाश के पिछे काफिला बयाँ कर देता है
रुतबा किसी हस्ती का है…
विक्रोळी येथील टागोरनगर स्मशानभूमितून बाहेर पडताना मला या वाक्यांचा खरा अर्थ उमगत होता. चंद्रशेखर संत यांचं पार्थिव स्मशानभूमितील विद्युतदाहिनीच्या स्वाधीन करून जड पावलांनी आम्ही माघारी परतलो होतो. अश्रुंनी डोळ्यांच्या कडांचा बांध केव्हाच ओलांडला होता. आठवणींचा कल्लोळ उठला होता. डॉक्टरी भाषेत आमचे क्रीडा पत्रकार चंद्रशेखर संत यांचा हृदयविकाराने मृत्यू अशी नोंद झाली होती. पण आम्हा मित्रपरिवारात त्यांच्या जाण्याने हृदयावर एक ओरखडा नक्की उमटवलाय.
संत तसा जिंदादिल माणूस. हा माणूस तुम्हाला भेटलाय आणि त्याने तुम्हाला हसवलं नाही असं कधी झालंच नाही. त्यांचं ते ठेवणीतलं हास्य ही जणू त्यांची ओळखच झाली होती. त्यांचा तो टिपिकल काळा गॉगल. केसांची मस्त स्टाईल. आमच्या भाषेत टकाटक ड्रेस ही संतांची प्रथमदर्शनी ओळख. बैठकीत बघता बघता आपल्या बोलण्याने बैठक ताब्यत घेणं ही त्यांची हातोटी. विषय कोणताही हसो, त्याला अनुषंगून हास्याचा खजिना संतांकडे तयार. पण एक तत्त्व त्यांनी पाळलं, या बैठकीत कधीही संतांनी विनोद करताना कुणाच्याही कमरेखाली वार केले नाहीत. त्यांच्या विनोदाची शैली इतकी खुमासदार असायची की ज्यांच्यावर ते विनोद करायचे तेही त्याला मनमुराद दाद द्यायचे. मनमिळाऊ वगैरे पुस्तकी विशेषणं मी संतांबाबत वापरणार नाही. कारण संत अशा कोणत्याच चौकडीत स्वतः अडकले नाहीत आणि त्यांनी स्वतःला अडकवून घेतलं नाही. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे पत्रकार म्हणजे काहीसे जमिनीवरून दोन पावलं वर चालणारे अशी ओळख असणार्या त्या काळातही संतांचे पाय जमिनीला अगदी घट्ट बिलगलेले…
माझी आणि त्यांची गाठभेट झाली त्याला आता १९ वर्षं उलटली. माझ्यासाठी ती गमतीशिर आठवण होती. मी ‘दै. मुंबई तरुण भारत’मधून माझ्या क्रीडा पत्रकारितेस १९९५ साली सुरुवात केली. माझे बॉस सुहास जोशी यांनी माझ्या जॉयनिंगच्या पहिल्याच आठवड्यात मला पद्माकर शिवलकर यांची मुलाखत घ्यायला शिवाजीपार्कवर पाठवलं. मी अगदी नवा कोरा. पत्रकार म्हणून माझी ओळख माझे ऑफिसमधील दोन-चार सहकारी आणि माझे घरचे एवढीच मर्यादित. असा ज्युनिअर नवा कोरा पत्रकार म्हणून मी पद्माकर शिवलकर यांच्याकडून मुलाखतीसाठी आदल्या दिवशीच फोन करून वेळ निश्चित केली होती. लक्षात घ्या, तेव्हा मोबाइल वगैरे नव्हते. दुसर्या दिवशी मी शिवाजीपार्कवर त्यांच्या ग्राऊंडवर मुलाखतीसाठी साडेचार वाजता हजर झालो. पाहतो तर तिथे एक मस्त रुबाबदार व्यक्ती डोळ्यांवर काळा गॉगल लावून माझ्या आधीच हजर होता. मी पद्माकर शिवलकर यांना माझी ओळख दिली आणि त्या दुसर्या व्यक्तिची दखल न घेताच मुलाखत सुरूकरूया का? असा थेट सवाल केला. पद्माकर शिवलकर यांनी त्या दुसर्या व्यक्तिकडे पाहिलं. त्यांनी मस्त ठेवणीतील हास्याची फेक करत मानेनेच होकार दिला. मला हे गौडबंगाल काही केल्या कळेना. मीही मग इंटरव्ह्यू रेटून नेला. बरं, मी ‘मुंबई तरुण भारत’मध्ये नवशिका पत्रकार म्हणून महिना ७५० रुपये पगारावर लागलेलो. साहजिकच मुलाखतीसाठीचा टेपरेकॉर्डर वगैरे सोबत नेण्याचा काही प्रश्नच नव्हता. आमची पत्रकारितेची साधनं म्हणजे एक रेनॉल्डचं पेन आणि ऑफिसने दिलेलं फुकटचं पॅड. तब्बल एक तास मुलाखत झाल्यनंतर मी निघतो असं पद्माकर शिवलकर यांना म्हटलं. अखेर न राहवून पद्माकर शिवलकर यांनीच सांगितलं, यांना ओळखतोस का? मी प्रामाणिकपणे नाही म्हटलं. कारण त्यावेळी आजच्यासारखेपत्रकारांचे कॉलमला फोटो छापून येत नसत. यावर हे चंद्रशेखर संत ‘महाराष्ट्र टाइम्स’चे क्रीडा पत्रकार अशी त्यांनी मला त्यांची ओळख करून दिली आणि मी सर्दच झालो. त्यांनाही पद्माकर शिवलकरांची मुलाखत घ्यायची होती. पण मी आदल्यादिवशीच शिवलकर यांच्याशी बोललो असल्याने ज्येष्ठ आणि त्यातही ‘मटा’चे पत्रकार असतानाही संत यांनी चक्क एक तास माझा जाच सहन केला होता. विश्वास ठेवा दुसर्या दिवशी या संतांचा मला फोन. मुलाखत छान झालीय. मी चक्क उडालोच. एकतर त्यांनी माझ्यासारख्या नवख्या पत्रकाराने केलेला इंटरव्ह्यू वाचण्याचं काहीच कारण नव्हतं. तरीही त्यांनी ते कष्ट घेतले. मला काही सूचना केल्या आणि मग काय आमच्यात सुरू झाली ती दोस्ती. वयाने ते मोठे असले तरी आमच्यात मिसूळन जायचे. त्यानंतर मी चॅनेलला गेलो, संतांनीही ‘मटा’तून निवृत्ती घेतली आणि ते ‘झी २४ तास’वर विश्लेषक म्हणू दिसू लागले. मला या माणसाचं कौतुक अशासाठी की, कोणत्याही बदलाला या माणसाने कधी नाकं मुरडली नाहीत. उलट त्या बदलास हसत मुखाने सामोरे गेले. पूर्वी पत्रकाराने बातमी टाइप करावी अशी पद्धत नव्हती. आम्ही कागदावर बातमी लिहून ऑपरेटरला द्यायचो. माझ्या माहितीप्रमाणे संतांनी कधीही बातमी ऑपरेट केली नाही पण त्यामुळे त्यांचं काम कधी अडलं नाही. त्यांच्यासाठी ‘मटा’त खास ऑपरेटर असायचे. संत कसे काय हे मॅनेज करायचे देव जाणो. बदलाशी जुळवून घेण्यात संतांचा हातखंडा होता. आवाजाची त्यांना दैवी देणगी लाभली होती. क्रिकेट कॉमेंट्रीपासून ते व्हॉइस ओव्हरपर्यंत संत यत्रतत्रसर्वत्र असायचे. न कंटाळता, न थकता संत सगळं मॅनेज करायचे… मृत्युला मात्र ते मॅनेज करू शकले नाहीत. शेवटी या मृत्युलाही त्यांनी दोस्त बनवलं. स्मशानात त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेताना त्यांच्या चेहर्यावरील तेच समाधानी हास्य माझ्या डोळ्यासमोरून अजून जात नाही.
संतांची आणखीन एक ओळख म्हणजे पत्रकार संघटनेतील त्यांचं योगदान. इंग्रजी क्रीडा पत्रकारांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी आणि विश्वनाथने क्रीडा पत्रकार संघटना चालवली. ज्युनिअर सीनिअर पत्रकार असा भेदभाव त्यांनी कधी केला नाही. येणार्या प्रत्येक पत्रकारासाठी त्यांच्याकडे असायचं ते त्यांचं ठेवणीतलं हास्य. या व्यक्तिला मी कधी रागावताना पाहिलं नाही. संतांना मी नेहमी म्हणायचो संत याचं रहस्य काय? त्यावर त्यांचं उत्तर ठरलेलं. अरे, जी गोष्ट आपण बदलू शकत नाही तिला सामोरं जाण्याची ताकद तुमच्यात आली की मग त्या गोष्टीचा राग येत नाही. संतांकडे नावाप्रमाणे अशी अफाट ताकद होती. याच ताकदीच्या जोरावर त्यांनी बहुदा मृत्युला हसत आलिंगन दिलं असेल. संत तुमची उणीव भासेल अशी पोकळ विधानं मी करणार नाही पण हास्याचा आणि सळसळत्या उत्साहाचा तो झरा तुमच्या रूपाने आटला एवढं मात्र नक्की.