भारतातील सात राज्यांत नुकत्याच झालेल्या युनिनॉर सर्वेक्षणात असं आढळून आलं की, जे शालेय विद्यार्थी इंटरनेटचा वापर करतात त्यातील ३० टक्के मुलं कुठल्या ना कुठल्या सायबर क्राइमचे बळी ठरतात. Cyber Bullying, Cyber Stalking, Hacking and Defamation यांना जाणते अजाणतेपणी त्यांना सामोरं जावं लागतं. ‘WebWise’ हा कार्यक्रम युनिनॉरने २९ शाळांमध्ये जवळजवळ १०,५०० मुलांसोबत राबवला होता. त्यातील सर्वेक्षणात हेही स्पष्ट झालं की ३४ टक्के मुलं आपल्या पालकांशी क्वचितच आपल्या ऑनलाइन activities विषयी बोलतात. या सर्वेक्षणानुसार इंटरनेट वापरणार्या मुलांना सायबर क्राईमचा किती धोका आहे हे कळून येतं. पण मुळात शालेय मुलांचा संबंध इंटरनेटबरोबर नक्की कसा आणि का येतो?

१. सर्चिंग इन्फॉर्मेशन फॉर स्कूल प्रोजेक्टः हल्ली प्रत्येक शाळेमध्ये मुलांना विविध विषयांची गोडी लागावी आणि त्यांच्या कल्पकतेचा विकास व्हावा या दृष्टीने प्रोजेक्ट दिले जातात. या प्रोजेक्टची माहिती काढायची, मिळवायची जबाबदारी पालक आणि मुलांची असते. अनेक विषयांचे प्रोजेक्ट कमी वेळेत पूर्ण करायचे असल्यामुळे यात इंटरनेटचा वापर सर्रास होतो. गुगलसारख्या सर्चइंजिनमध्ये आपल्याला हवी ती माहिती मिळते हे पालकच मुलांना शिकवतात आणि मुलांनाही त्याची सवय होते. विविध प्रकारची माहिती मिळवण्यासाठी नेट सर्फ करताना कळतनकळत मुलांना अनेक गोष्टी पाहायला मिळतात. कुठल्या लिंकवर क्लिक करावं, कुठे करू नये याची मुलांना अजिबात कल्पना नसते. सरसकट सगळ्याच लिंक, वेबसाइट खात्रीलायक असल्याप्रमाणे मुलं त्यांचा वापर करतात आणि त्याचा दुष्परिणाम त्यांना भोगावा लागतो. ‘गुगल सब जानता है!’ या विश्वासामुळे एखाद्या प्रोजेक्टविषयीची माहिती बरोबर आहे किंवा नाही याची पडताळणी होत नाही. वेबसाइटवर

ज्या जाहिराती असतात त्यांच्याकडे मुलांचं लक्ष जाताच तिथे क्लिक करायच्या नादात चुकीच्या वेबसाइटवर क्लिक करून मुलं तिकडे डायव्हर्ट होतात. नको असलेली माहिती पाहिली जाते आणि त्यातला इंटरेस्ट वाढू लागतो. प्रत्येक माहिती वाईट असते असं नव्हे पण गुगलमुळे सुतावरून स्वर्ग गाठणं फार सोपं होऊन जातं. पालक आणि शिक्षकच इंटरनेटचा वापर मुलांना शिकवतात त्यामुळे मुलं अजाणतेपणे या सायबर जाळ्यात अडकतात.

२. मनोरंजन – गेमिंग, संगीत, फिल्मी गाणी डाऊनलोडिंगः सर्वच वयोगटातील मुलांचा आवडता टाइमपास म्हणजे नेट सर्फिंग. मनोरंजन, खेळ, माहिती या सर्वच गोष्टी इंटरनेटवर ‘अ क्लिक अव्हे’ उपलब्ध असल्यामुळे मुलं नेटवर जास्त वेळ घालवतात. त्यामध्येही गेमिंग हा त्यांचा सर्वात आवडता प्रकार. अनेक गेमिंग वेबसाइटवर गेम खेळण्यासाठी आपला प्रोफाइल तयार करावा लागतो. त्यामध्ये जन्मतारीख, नाव आणि इंटरेस्ट अशी माहिती भरावी लागते. सायबर गुन्हेगाराला एखाद्याविषयी इतकी माहिती मिळणंसुद्धा खूप धोकादायक असतं. ऑनलाईन गेमवर समाधान न झाल्यामुळे गेम डाऊनलोडिंगचं प्रमाणही जास्त आहे. कुठल्या वेबसाइटवरून गेम डाऊनलोड करावा, कुठून करू नये हे काही त्यांना माहीत नसतं, तरीही अक्कलहुशारी वापरून गेम डाऊनलोड करतात. त्यात त्यांना काहीतरी अॅचिव्ह केल्याचं फीलिंग येतं. हाच प्रकार संगीत डाऊनलोडिंगविषयी असतो. मुळात गाणी डाऊनलोड करणं हा सायबर गुन्हा असतो हे मुलांना माहीत नसतं. त्याची माहितीही पालक मुलांना देत नाहीत. उलट हवी ती माहिती गुगल कशाप्रकारे देऊ शकतो हे मुलांना शिकवल्यामुळे मुलं आपली आवडती गाणी सर्चइंजिनमध्ये टाइप करतात आणि ज्या काही वेबसाइट्स समोर दिसतात त्यावर क्लिक करून अवैधरित्या ती गाणी डाऊनलोड करतात. सायबर जगतात काहीही फ्री नसतं असं म्हटलं जातं. प्रत्येक फ्री गोष्टीबरोबर काहीना काही व्हायरस, ट्रोजन, वर्म हा असतोच. नेट विषयीच्या आपल्या तोकड्या ज्ञानामुळे मुलांना या गोष्टींची माहिती नसते आणि त्यामुळेच त्याच्या दुष्परिणामांना त्यांना सामोरं जावं लागतं.

३. प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीः पालकांशी संवाद कमी असल्यामुळे किंवा अजिबात नसल्यामुळे अनेक मुलं नेटवर त्यांना पडणार्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात. एखादा प्रश्न पालकांना विचारला आणि त्यांना आवडलं नाही म्हणजे? या विचाराने घाबरून किंवा उत्तर मिळेल याची खात्री नसल्यामुळे मुलं गुगलवर यासाठी विसंबून असतात. गुगल हा नेहमीच आपल्याला पर्याय देतो कुठला निवडायचा हे आपणच ठरवायचं असतं. सर्च रिझल्ट लिस्टमध्ये नंबर एकवर येण्यासाठी वेबसाइटने मोठमोठ्या रकमा भरलेल्या असतात. त्यामुळे पहिल्या पानावर आलेल्या सर्व वेबसाइट उपयोगी असतील की नाही, व्हायरस फ्री असतील की नाही याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. याबद्दल अनभिज्ञ असलेली मुलं नको त्या माहितीला सामोरी जातात आणि त्यामधून त्यांचा माहीत नसलेल्या विषयाबद्दलचा इंटरेस्ट डेव्हलप होतो. गुगल सर्चइंजिनचं काम आपल्याला हवी ती माहिती देणं नसतं तर त्याच्याकडे जी माहिती आहे ती उपलब्ध करून देणं हे असतं. उदाहरणार्थ, जेव्हा आपण गुगल विंडोमध्ये काही टाइप करायला जातो तेव्हा एक अक्षर जरी लिहिलं तरी गुगल पुढचा शब्द सुचवतो आणि बर्याचवेळा आपण गुगलने सुचवलेला पर्याय निवडतो. हा सगळा त्या त्या सर्च इंजिनच्या व्यवहाराचा प्रश्न असतो. त्यामुळे सर्च रिझल्टवर किती आणि कशाप्रकारे विसंबून राहावं हे युझरला कळणं गरजेचं असतं, जे या लहान मुलांना कळत नाही.

४. इंटरनेट हॅकिंगः हॅकिंग हा मुलांना सर्वात आवडणारा शब्द आहे. इंटरनेटवर प्रत्येक शालेय मुला-मुलीने हॅकिंग हा शब्दप्रकार ऐकलेला असतो. हॅकिंग म्हणजे सुपरकुल गोष्ट असते असं त्यांना वाटतं. त्यामुळे आपणही हॅकिंग करावं, ते शिकावं असं त्यांना वाटतं आणि त्याबद्दल ते माहिती शोधतात. बर्याचवेळा बेसिक हॅकिंग टूल्स डाऊनलोड करून ती आजमवण्याचा प्रकार करतात. त्याही पुढे जाऊन नेटवर असलेल्या सो कॉल्ड हॅकर क्लब, फोरम यात आपलं नाव टाकतात. हॅकर कम्युनिटीज्च्या वेबसाइटला, ऑनलाइन क्लबला भेट देणं अत्यंत धोकादायक असतं. साधारणतः अशा हॅकरच्या वेबसाइट, क्लब नेटिझन्सच्या प्रोफाइलची माहिती गोळा करतात, त्यांच्या ऑनलाईन activities वर लक्ष ठेवतात आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा आपला संगणक, इ-मेल किंवा इतर काहीही हॅक करू शकतात. अशामुळे शालेय मुलं हॅकिंगसारख्या सायबर गुन्ह्याच्याही विळख्यात येऊ शकतात.

५. सोशल नेटवर्किंगः हल्ली शालेय मुला-मुलींचं कुठल्या ना कुठल्या सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर account असतंच. खरंतर अनेक वेबसाइट्सवर account उघडण्यासाठी ठरावीक असं वय असतं. मुलांची सर्वात आवडती सोशल नेटवर्किंग वेबसाइट असलेल्या फेसबुकवरही १३ वर्षं हे वय account उघडण्यासाठी आवश्यक आहे. परंतु ८-१२ वर्षांच्या अनेक मुलांची account फेसबुकवर आहेत. बर्याचवेळा पालकच अवैधरित्या जन्मतारीख बदलून account उघडून देतात किंवा स्वतः मुलंच आपलं account उघडतात. १३ वर्षांच्या मुला-मुलींनी जरी वैधरित्या account उघडलं तरी सोशल नेटवर्किंगचा उपयोग कसा करायचा, किती आणि कुठली माहिती शेअर करायची हे माहीत नसल्यामुळे Cyber Bullying आणि Defamation ला त्यांना सामोरं जावं लागतं. शाळेतील रागाचा, ईर्षेचा बदला म्हणूनही मुलं सोशल नेटवर्किंग साइटवर एखाद्याविषयी चुकीच्या अफवा पसरवणं किंवा त्यांना लाज वाटतील अशा कॉमेंट करणं असे प्रकार करतात. विकृत आणि सायबर गुन्हेगार लहान मुलांची खाती शोधून त्यांना मानसिक त्रास द्यायचे प्रकार करतात, ज्याचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. आपली फ्रेंडलिस्ट वाढवण्यासाठी account युझर्स अनोळखी व्यक्तिंना फ्रेंड बनवतात तर जास्तीत जास्त लाइक्स येण्यासाठी स्वतःचे सेल्फी सतत अपडेट करतात. लहान मुलंही या गोष्टीसाठी अपवाद नसतात फक्त त्यांना याचा जास्त गंभीर परिणाम भोगावा लागतो.

इंटरनेट काळाची गरज आहे हे खरं आहे परंतु त्याचबरोबर सायबर गुन्हेगारीचा धोका जो आपल्या मुलांपर्यंत येऊन ठेपला आहे त्याचा विचारही व्हायला पाहिजे. घरात अगदी दोन ते तीन वर्षांच्या मुलालाही पालक कौतुकाने मोबाइल हाताळायला देतात, तिथून खर्या अर्थाने संगणकाचा पहिला अनुभव मुलांना येतो. अर्थात दोन-तीन वर्षांच्या मुलाला कळत नसतं की नक्की आपण काय आणि का म्हणून पाहत आहोत ते.

उदाहरणार्थ, एक तीन वर्षांचा मुलगा नेहमीच आपले आवडते कार्टून इंटरनेटवर पहायचा. त्याची आईच त्याला laptop वर लावून द्यायची. एकदा आई पीठ मळत असल्यामुळे तिला गुगल सर्च विंडोमध्ये टाइप करता येईना. तिने मुलाला प्रसिद्ध कार्टून ‘Pooh’ चं स्पेलिंग सांगायला सुरुवात केली मुलाने Poo टाइप केलं आणि त्वरित पूनम पांडे नामक मॉडेलचे अश्लील फोटो स्क्रीनवर आले. मुलाने निरागसपणाने ‘ही कोण आहे?’ असं विचारलं. ते फोटो पाहून त्या आईची स्क्रीन बंद करण्यासाठी काय तारांबळ उडाली असेल, याची तुम्ही कल्पनाच करू शकता. जितक्या लवकर तुम्ही संगणकाची ओळख मुलाला करून द्याल तितकी तुमची जबाबदारी जास्त वाढते. बारा देशांत एक अभ्यास केला गेला. ज्यात स्पष्ट झालं की, भारतातील लहान मुलं एक कॉम्बिनेशन रिस्क फेस करतात ज्यात ‘हाय नेट अॅक्सेस आणि लो रेझिलेंस’ आहे आणि हे अत्यंत धोकादायक आहे.

पालक मुलांना शाळेतल्या घडामोडींविषयी, शिक्षकांविषयी विचारतात परंतु मुलांच्या इंटरनेट सेशनवर लक्ष ठेवत नाहीत, त्याबद्दल विचारत नाहीत. मुलं नेटवर काय पाहतात यावर सतत लक्ष ठेवण्यापेक्षा त्यांना जर सायबर जगताविषयी माहिती सांगितली, सर्च इंजिनविषयी गाइडलाइन्स दिल्या तर मुलं इंटरनेटचा योग्यप्रकारे उपयोग करू शकतात नाहीतर इंटरनेटच त्यांचा कधी उपयोग करून घेईल हे कळणार नाही.

 

सायबर अॅलर्ट

१) लहान मुलांना शालेय प्रोजेक्टसंदर्भात किंवा अन्य कुठल्या अभ्यासासंदर्भात इंटरनेट वापरायचं असल्यास पालकांच्या निदर्शनाखाली त्यांना इंटरनेट वापरू द्यावं.

२) मुलांना इंटरनेट सर्फिंगसाठी रोज ठरावीक वेळ द्यावा.

३) मुलांनी कुठल्याही प्रकारचं डाऊनलोडिंग करू नये अशी सक्त ताकीद त्यांना द्यावी.

४) गाणी डाऊनलोड करणं हा सायबर गुन्हा आहे हे मुलांना सांगावं, जेणेकरून त्यांना त्याची माहिती मिळेल.

५) इंटरनेटच्या गैरवापराने काय दुष्परिणाम होऊ शकतात याची कल्पना मुलांना द्यावी.

६) १३ वर्षांखालील मुलांना अवैधरित्या फेसबुक अकाऊंट ओपन करून देऊ नये.

७) सोशल नेटवर्किंग साइटवर खास करून लहान मुलांसाठी अनेक प्रकारची प्रायव्हसी सेटिंग असतात, त्याचा वापर करावा.

पूनम सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *