१. आज जगात आपापल्या नावांनी ओळखले जाणारे, आपण दुसर्यांपेक्षा वेगळे आहोत म्हणणारे आणि हयात असलेले जे धर्म आहेत, त्यातल्या एकाही धर्माचा मी नाही. त्यातला एकही धर्म मी मानत नाही. पण मी धर्म हा शब्द मानतो. धर्म या शब्दाचा साधा अर्थ आहे आचरण. आपली नेहमीची वागायची पद्धत किंवा वर्तणूक म्हणजे धर्म. त्यानुसार माझी स्वतःची या जगात जगण्याचीवागण्याची एक पद्धत आहे, ती पद्धत म्हणजेच माझा धर्म आहे. त्या अर्थाने इतर माणसांसारखाच मीही धार्मिक माणूस आहे. माझी जगण्यावागण्याची जी पद्धत आहे ती माणसाची आहे. मी फक्त माणसासारखं जगतो. त्यामुळे माझा धर्म माणसाचा आहे. पण माझ्या या धर्माला मला काहीही वेगळं नाव द्यावं किंवा कुठल्या तरी नावाने तो ओळखला जावा असं वाटत नाही. जगात आज वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणार्या धर्मांची संख्या खूप मोठी आहे. जैन, ज्यू, बौद्ध, ख्रिश्चन, मुसलमान, हिंदू, शीख अशी आपणा भारतीयांना माहीत असलेली काही ठळक ठळक नावं आहेत! जगातला प्रत्येक माणूस यातल्या कुठल्या ना कुठल्या धर्माचा असतोच. या धर्मांपैकी एकही धर्म पाळत नाही असा माणूस जगात दिसणं दुर्मीळ आहे. मला दिसतं की, या सगळ्या धर्मांमध्ये माझ्यासारखीच माणसं आहेत. पण ती केवळ माणसांसारखीच वागतात-जगतात असं मात्र मला दिसत नाही. त्यांना जगायला-वागायला नुसत्या माणसांसारखं आचरण पुरत नाही, तर आपापल्या धर्मांचे नियम लागतात. ते नियम गृहीत धरून हे लोक आपल्याला इतर माणसांपासून आपण वेगळे आहोत असंही मानतात. या सर्वच धर्मांचं वैशिष्ट्य आहे की, त्या त्या धर्मांचे लोक इतर माणसांना आपल्यापेक्षा वेगळं समजतात. कित्येकदा तर आपल्यापेक्षा खालचंच समजतात. आजचं चित्र तर एवढं भयानक आहे की, आपल्या धर्माशिवाय दुसर्या धर्मात माणसंच असतात असंही कुणी मानायला तयार नाही आणि सर्वात मोठी गंमत अशी की, हे जे एवढे धर्म आहेत आणि त्या त्या धर्मांचा अभिमान मिरवणारे जे लोक आहेत, ते लोकही आपापला धर्म खर्या अर्थाने पाळताना दिसत नाहीत. म्हणजे एक तर आजची माणसं नुसतं माणूस म्हणून तर जगत नाहीतच, पण ती स्वतःला या धर्माचे आपण आहोत असं मानतात, त्या धर्मानुसारही जगत नाहीत. नुसतं माणूस असणं किंवा कुठल्या तरी धर्माचा माणूस असणं यापैकी जगातले बहुतेक लोक आज काहीच पाळताना दिसत नाहीत, एवढं हे सध्याचं जग विचित्र आहे. एक गोष्ट आधीच सांगतो, जगात आज जेवढे धर्म आहेत आणि ते धर्म जन्माला घालणारे जेवढे लोक आहेत, त्यांना माझा अजिबात विरोध नाही. धर्म जन्माला घालणारी माणसं ही जगाची दुश्मन होती असं मी मानत नाही. मी सगळ्याच नाही, पण काही धर्मांचा थोडा थोडा अभ्यास केला आहे. या धर्मांबद्दल आणि त्यांच्या संस्थापकांबद्दल जमेल तेवढं वाचलं आहे. हे धर्म ज्या ज्या काळात, ज्या ज्या परिस्थितीत आणि ज्या ज्या लोकांनी जन्माला घातले, त्यातल्या कशाबद्दलच माझी तक्रार नाही. मी असं मानतो की, प्रत्येक धर्मसंस्थापकाने आपापल्यापरीने माणसाची जात सुखी व्हावी, चांगली जगावी याचीच स्वप्नं पाहिली. ती स्वप्नं अंमलात यावीत म्हणूनच काही नियम सांगितले, काही आचरण पद्धती सांगितल्या. आपण सांगितलेल्या नियमांनी माणसं जगली तर त्यांचं जगणं आदर्श होईल असं ते समजले, यात ते चुकले असं मला वाटत नाही. पण त्यांनी सांगितलेल्या नियमांनी त्यांच्या धर्मांचे लोक आज अजिबातच वागत नाहीत, असं जेव्हा दिसतं, तेव्हा त्या धर्मसंस्थापकांचे आत्मे जिथे कुठे असतील तिथे प्रचंड तळतळत असतील असं मला वाटतं. माझा स्पष्ट आरोप आहे की, धर्मसंस्थापकांनी सांगितलेले धर्म आणि त्यांचेच अनुयायी पाळत असलेले धर्म यांत जबरदस्त तफावत पडलेली आहे. त्या त्या धर्मांच्या आजच्या हयात अनुयायांनीच आपापल्या धर्मांची वाताहात करून टाकली आहे. म्हणजे वाईट गोष्ट अशी आहे की, आज प्रत्येक धर्म दुसर्या धर्माला छळतो आहे हे जितकं सत्य आहे, तितकंच प्रत्येक धर्माचा माणूस स्वतःच्या धर्मालाही छळतो आहे हेही सत्य आहे. म्हणजे असं की, आजचा माणूस नुसता माणूस म्हणून जगायला तयार नाही, जगण्यासाठी त्याला कुठल्या तरी एका धर्माचा छाप स्वतःच्या कपाळावर लागतोच. पण कमाल अशी की, तो त्या कपाळावरच्या धर्माच्या छापाशी प्रामाणिक राहून जगायलाही तयार नाही. प्रत्येक जण काही तरी स्वतःला हवं तसं विकृतच जगतो आहे. आणि आपल्या विकृत जगण्यालाच तो स्वतःचा धर्म मानतो आहे. त्या अर्थाने आजच्या माणसांनीच आपापले धर्म विकृत करून टाकले आहेत. सडवून टाकले आहेत आणि अशा सडक्या बजबजपुरीत सगळं जग एकमेकांचे गळे चिरत जगत आहे. माणूस नुसता माणूसही राहिलेला नाही. आज आणि खरा धार्मिकही राहिलेला नाही. आपण पाहतो, आज जग सगळ्याच आघाड्यांवर अशांत आहे. प्रत्येक जण दुसर्याचा कट्टर शत्रू असल्यासारखंच वागतो आहे. धिंगाणा माजलाय निव्वळ सगळीकडे. कशालाच कशाचा मेळ नाही. प्रत्येक जण अस्वस्थ आहे. कुणीही इथे सुखी नाही. एखादा माणूस जन्माला आल्याच्या पहिल्या श्वासापासून, शंभर वर्षं जगून, शेवटच्या श्वासापर्यंत सुखाने जगलाय असं अजिबातच दिसत नाही. वेदनेशिवाय आजच्या माणसाचं जगणं अबाधित नाही आणि या वेदनेला सर्वात जास्त कारणीभूत आहेत आज आपापले धर्म विकृतपणे पाळणारे लोक. या लोकांमुळेच आज जग भयंकर अशांत आणि अस्वस्थ आहे. एकमेकांत मारामार्या करतं आहे, एकमेकांना ओरबाडतं आहे, युद्धखोर झालं आहे. पण मला या जगात शांती आणण्याचा एक मार्ग सुचतो. तो मार्ग जर अंमलात आणला तर आजचं जग खर्या अर्थाने सुखी, शांत होऊन जाईल असं मला वाटतं. सगळीकडे आनंदीआनंद पसरेल. जगात मग एकही मारामारी होणार नाही. खालचंवरचं होणार नाही. एकही भेद राहणार नाही. एकही युद्ध होणार नाही. दंगलीबिंगली तर अजिबातच होणार नाहीत. सगळीकडे जगण्याचं चैतन्य बहरेल. पुन्हा सांगतो, सगळं जगच खर्या अर्थाने शांत होईल. काय आहे तो शांतीचा मार्ग? तर मला वाटतं, जगातल्या प्रत्येक माणसाने आपल्या स्वतःचा जो कुठला धर्म असेल तो अगदी कट्टरपणे मुळाबरहुकूम पाळायचा. जास्त करायचं काहीच नाही, फक्त आपण आज या धर्मात आहोत, तो धर्म यावेळी जसा सांगितला गेला, अगदी तसाच्या तसाच आजही पाळायचा. त्याचे त्यावेळी सांगितलेले गेलेले जे जे मूळ नियम आहेत, ते ते मूळ नियम फक्त जसेच्या तसे, अगदी कट्टरपणे पाळायचे. त्यात हयगय करायची नाही. नियम अजिबात मोडायचे-तोडायचे नाहीत. फक्त जसे सांगितले गेलेत तसे कडकपणे पाळायचे. असं जर प्रत्येक माणूस आपल्या धर्माने सांगितलेले सगळे नियम जन्मापासून मरेपर्यंत ठामपणे पाळत राहिला तर मी दावे के साथ सांगतो, जगात हमखास शांती येईल. सगळं शांत शांत आणि स्वस्थ स्वस्थ होऊन जाईल. कुठे कसलं वैर नाही, कुठे कसला भेद नाही. कुठे कसला तंटा नाही. सगळं आबादीआबाद. ते होण्यासाठी अट फक्त एवढीच की, प्रत्येकाने आपला मूळ धर्म अगदी प्रामाणिकपणे पाळायचा. प्रत्येकाला जर आपला मूळ धर्म पाळणं जमलं तर या जगात खरी शांती यायला तुटवडा राहणार नाही. माझं असं स्पष्ट मत आहे की, आजच्या जगातल्या कोणत्याही धर्माचा कोणताही माणूस आपला अस्सल आणि मूळ धर्म पाळत नाही. प्रत्येक जण धर्म पाळल्याचं सोंग मात्र निश्चितच करतो. म्हणजे हिंदू हिंदू असल्याचं सोंग करतो. मुसलमान मुसलमान असल्याचं सोंग करतो. बौद्ध बौद्ध असल्याचं सोंग करतो. ख्रिश्चन ख्रिश्चन असल्याचं सोंग करतो. जैन जैन असल्याचं सोंग करतो. शीख शीख असल्याचं सोंग करतो. असा सगळा सोंगाढोंगांचाच बाजार आहे. सगळीकडे धर्माचे निव्वळ भोत आहेत. कुणीही अस्सल आणि जातिवंत धार्मिक नाही. सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे, आपापले मूळ धर्म काय आहेत आणि धर्माचे नियम काय आहेत, हेच त्या त्या धर्मांचा अभिमान बाळगणार्या लोकांना माहीत नाही. लोक स्वतःच्याच धर्मांबद्दल अडाणी आहेत आणि कमाल म्हणजे हेच लोक स्वतःच्या धर्मांचे टेंभे मिरवतात. हेच लोक आपल्याच धर्मांतर्गत तर झगडे करत बसतातच आणि दुसर्या धर्मांशीही झगडे मांडत बसतात. याच ढोंगी धार्मिक लोकांचं आपापसातही पटत नाही न् दुसर्यांशी तर अजिबातच पटत नाही. पण यांची सोंगंढोंगं आणि झगडाझगडी म्हणजे खरे धर्म नव्हेतच. माझं हे म्हणणं खरं वाटत नसेल तर, एक साधी गोष्ट करता येईल. आम्ही अमक्या तमक्या धर्माचे लोक आहोत आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असं म्हणणारे जे लोक आहेत, त्यांच्यासाठी आपण त्यांच्याच धर्मावर आधारित एक प्रश्नपत्रिका काढायची आणि त्यांना ती सोडवायला द्यायची. त्यांची परीक्षा घ्यायची. त्यांच्या धर्माशिवाय एकही दुसरा प्रश्न अजिबात विचारायचा नाही. काय होईल? मी पुन्हा दावे के साथ सांगतो, सगळे परीक्षा देणारे प्राणी हमखास नापास होतील. चक्क नापास. कारण काय? तर एकाही आत्म्याचा आपल्याच धर्माचा परिपूर्ण अभ्यास नाही. आपलाच मूळ धर्म आपल्यालाच माहीत नाही. आपल्याच धर्माचे काटेकोर नियम आपल्यालाच माहीत नाहीत. आपण सगळेच आपल्याच धर्माच्या बाबतीत भोंदू आहोत. असे भोंदू लोक परीक्षेत नापास होणार नाहीत तर काय? मला इथे मूळ धर्म म्हणजे मानवी धर्म वगैरे काहीच म्हणायचं नाही. मानवी धर्म, माणूस धर्म या गोष्टी आपण बाजूलाच ठेवू. आपण फक्त ज्यांना स्वतःची नावं आहेत, तेवढ्याच धर्मांचं बोलू. म्हणजे हेच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, वगैरे. मूळ मानवी धर्म, माणूस धर्म यांचा आपला आवाकाच राहिलेला नाही. सगळं जग धर्मांच्या ढोंगांनी एवढं बरबटलंय की, त्या खातेर्यातून मूळ मानवी धर्मापर्यंत जायला शतकानुशतकं लागतील. तो विषय आपण दूरच सारू. फक्त आज हयात असलेल्या नामधारी धर्मांचंच बोलू. किती भयानक चित्र आहे? कुणाही हिंदूला आपण हिंदू आहोत म्हणजे काय ते कळत नाही. कुणाही मुसलमानाला आपण मुसलमान आहोत म्हणजे काय ते कळत नाही. असं सगळ्याच लोकांचं आणि सगळ्याच धर्मांचं धार्मिक भरीत झालं आहे. आणि तरीही हे लोक स्वतःला धार्मिक म्हणवतात? धर्मांचा फुकटचा अभिमान बाळगत एकमेकांवर तुटून पडतात? मी ठामपणे सांगतो, ज्याला स्वतःचा धर्म नीट माहीत आहे, ज्याचा स्वतःच्या धर्माचा बारकाईने अभ्यास आहे आणि जो स्वतःच्याच धर्माचे नियम काटेकोरपणे पाळतो, तो माणूस कधीही दुसर्याशी वैर बाळगणार नाही. कुणाशीही दंगल करायला जाणार नाही. कुणाचाही द्वेष करणार नाही. तो स्वतः शांत जगेल आणि दुसर्यालाही शांततेने जगू देईल. आजचं जग अशांत राहायला, अस्वस्थ राहायला हे स्वतःच्याच धर्मांबाबत अडाणी असलेले लोक कारणीभूत आहेत हे मी इथे पुन्हा सांगतो. यांची स्वतःचेच धर्म पाळायची लायकी नाही, तर हे या धर्मांच्या चौकटीबाहेर असणारा उदात्त आणि मूलभूत मानवी धर्म काय पाळणार आहेत? मला वाटतं, आजच्या जगातल्या प्रत्येक माणसाने आपला मूळ धर्म काय होता, याचा नीट अभ्यास करावा. आपल्या धर्माचे मूळ नियम काय आहेत ते अगदी काटेकोरपणे आणि कट्टरपणे पाळावेत. आधी आपलाच धर्म आपणच नीट जाणून घ्यावा, तो अंगात भिनवावा आणि त्याचं पालन करावं. बघा, एका झटक्यात शांती आणि सुख येतं की नाही या जगात. थोडक्यात याचा मतितार्थ असा की, प्रत्येक धर्माचे जे मूळ नियम आहेत ते माणसाचं आदर्श आचरण, शांती, मानवता, नैतिकता, सुख यांचीच शिकवण देतात. ही शिकवण देण्यासाठीच प्रत्येक धर्मसंस्थापक मनापासून झटला, राबला असं मला वाटतं. पण आजचे लोक आपल्याच धर्मसंस्थापकांचा अपमान होईल असं वागतात आणि मग त्या धर्मसंस्थापकांसह त्यांचे धर्मही झूट ठरतात, हे एकूण जगाला मारकच आहे. क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *