अॅलिसन वॉयीवॉर्ड. साठ वर्षांची निवृत्त झालेली संगीत शिक्षिका. आपलं आयुष्य शांतपणे व्यतीत करत होती. २०११ सालच्या उन्हाळ्यामधील गोष्ट. एकाऐकी तिला कुजलेल्या कचर्याचा वास यायला लागला. भोवतालचा सर्व परिसर स्वच्छ असताना ही जीवघेणी दुर्गंधी कुठून येते, हेच तिला समजेना. तिने संगणक उघडला आणि आपल्या व्यथेबद्दल काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. दोन शक्यता होत्या, असं तिने निष्कर्षाप्रत ठरवलं. पार्किन्सनचा आजार किंवा तिच्या मेंदूत गाठ आली असून त्याचं इन्फेक्शन झालं असावं. तिच्या फॅमिली डॉक्टरने ताबडतोब हॉस्पिटलमध्ये मेंदूचा स्कॅन करण्यासाठी तिला पाठवलं. नाताळला फक्त एक आठवडा उरला होता. हॉस्पिटलमधून फोन आला. मेंदूमधील एका रक्तवाहिनीवर खूप मोठा फुगवटा (Aneurysm) सापडला होता. अडीच सेंटीमीटर बाय तीन सेंटीमीटर एवढी मोठी त्याची व्याप्ती होती! डॉ. हॉवर्ड ल्युसिक हे नामवंत न्युरोसर्जन. त्यांनी अॅलिसनला काय घडू शकेल याची संपूर्ण माहिती दिली. तिने काहीही न करण्याचं ठरवलं तर तो फुगवटा पाच वर्षांत फुटेल, याची शक्यता ४० टक्के होती. जर तिने शस्त्रक्रिया करण्यास होकार दिला तर २० टक्के शक्यता होती. हृदयविकाराचा झटका तरी येईल किंवा उपचार अयशस्वी ठरून तिचा मृत्युही ओढवेल. शस्त्रक्रिया मेंदूसारख्या अत्यंत नाजूक अवयवावर आणि तीदेखील गुंतागुंतीची असल्याने यशस्वी होईल याची खात्री देणं शक्य नव्हतं.

जानेवारी २०, २०१२, अॅलिसनने ठरवलं-शस्त्रक्रिया करून घ्यायची, हा फुगवटा माझं जीणं हराम करतो आहे. त्याचा तरी मी नाश करेन किंवा तो मला संपवून टाकेल. तिने आपली मुलगी, मार्या हिला पत्राने कळवलं. अशा प्रकारची मेंदूवरची शस्त्रक्रिया कॅनडामध्ये फक्त दुसर्यांदाच होणार होती! त्यामुळे सर्जन्सना अनुभवाचा फायदा नव्हताच. अॅलिसनच्या रक्ताचं तापमान खाली आणावं लागणार होतं आणि तिचं हृदय काही काळाकरता बंद करावं लागणार होतं-थोडक्यात Clinically Dead! आणि इतकं करून पूर्वीची खेळकर, बोलकी, विनोदी अॅलिसन परतेल याविषयी गॅरेंटी नव्हतीच. तरीही अॅलिसनने डॉक्टर्स आणि त्यांच्या कुशलतेवर विश्वास ठेवून होकार दिला होता. फक्त त्यांना एकाच गोष्टीबद्दल खात्री वाटत होती. अॅलिसनला जर कोणी पूर्ववत करू शकत असेल, तर फक्त तिचं संगीतप्रेमच. शाळेत असताना तिने संगीतात प्राविण्य मिळवलं होतं. त्यानंतर चार वर्षं युनिव्हर्सिटीत संगीत याच विषयाचा सांगोपांग अभ्यास केला होता. जीवनात तिला सर्वात प्रिय गोष्ट होती-तिचं संगीत. तिने ऑपेरामध्ये गायलं होतं इतकंच नव्हे तर ज्या वकिलाबरोबर लग्न केलं होतं- त्याला संगीताची भरपूर आवड आहे, याची खातरजमा करून घेतल्यानंतरच. ज्या शाळेत ती शिक्षिका होती, तिथे ती विद्यार्थ्यांत एवढी लोकप्रिय होती की शाळेची संगीतखोली तिच्या नावाने सुशोभित केली गेली होती. आता मात्र उठसूठ येणारा कचर्याचा दुर्गंध तिला अक्षरशः वेडं करून सोडत होता.

शस्त्रक्रियेसाठी मुक्रर केलेल्या दोन तारखा काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द करायला लागल्या आणि शेवटी मे २८, २०१२ रोजी सकाळी आठ वाजता शस्त्रक्रिया करण्याचं निश्चित झालं. सकाळी इतक्या लवकर ती सुरू करण्याचं कारण ती शस्त्रक्रिया दिवसभर चालेल, अशी अपेक्षा होती! त्यात बर्याच गुंतागुंती होणार होत्या. अॅलिसनचं हृदय आणि फुप्फुसं यांचं काम मशिनवर सोपवलं जाणार होतं. तिच्या शरीरातल्या रक्ताचं तापमान खाली आणून (Hypothermia) एका विशिष्टवेळी, रुधिराभिसरण पूर्णपणे थांबवलं जाणार होतं, तेव्हा तिचा अॅन्युरिझम बाहेर काढला जाणार होता आणि रक्तवाहिन्या दुरूस्त केल्या जाणार होत्या. मग तिच्या रक्ताचं तापमान हळूहळू वाढवत नेऊन, शेवटी रक्ताचं सर्क्युलेशन नेहमीसारखं केलं जाणार होतं. त्यावेळी रक्तस्राव होणं अपरिहार्य होतं. तिला झालेल्या रोगाचं नाव Phantosmia होतं आणि तिच्यावर जी शस्त्रक्रिया केली जाणार होती, तिचं नाव होतं Deep Hypothermic Circulatory Arrest Surgery. त्यामुळे दोन महत्त्वाचे फायदे अपेक्षित होते. मेंदूचा रक्तपुरवठाच थांबवल्याने तिथल्या रक्तवाहिन्या दुरूस्त करण्यासाठी सर्जन्सना अल्पकाळ का होईना, मिळणार होता आणि दुसरा फायदा म्हणजे रक्ताचंच तापमान कमी केल्याने, त्यामधील पेशी मरण्याची क्रियाही मंदावणार होती. मेंदूला ऑक्सिजन मिळाला नाही तर चार मिनिटांत मृत्यू ओढवतो पण कमी तापमानाचा रक्तपुरवठा असेल तर मेंदूचा मृत्यू घडण्याची प्रक्रिया बरीच लांबते.

ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना अॅलिसन अगदी निर्भय होती. सर्जन्स त्यांचं काम चोखपणे करतील, त्याबद्दल तिच्या मनात जराही संदेह नव्हता. ‘ओटावा हार्ट इन्स्टिट्यूट’ ही जगातली अग्रगण्य संस्था आहे. तेथील रॉय मास्टर्स हे सर्जन त्यांच्या कौशल्याबद्दल अत्यंत नामवंत आहेत. मांड्यांमध्ये फिमोरल रोहिणी आणि नीला या दोन रक्तवाहिन्यांमधून डॉ. मास्टर्सनी ट्यूब सरकवली. आता अॅलिसनची रक्ताभिसरण व्यवस्था मशिनच्या ताब्यात दिली गेली होती. तिच्या रक्ताचं तापमान ३७० वरून १६.५० पर्यंत कमी करण्यात आलं. आता डॉ. ल्युसिक, त्यांचे सहकारी डॉ. अमीन कासम यांच्यासह पुढे सरसावले. त्यांनी अॅलिसनची कवटी (Skull) उघडली आणि मेंदू उघड्यावर आला. आता ते एका क्षणाची वाट पहात होते, अॅलिसनच्या शरीरातला रक्तपुरवठा गोठण्याची. तो थांबला की त्यांना फक्त अर्धा तास मिळणार होता. तेवढ्या अवधित त्यांना तो फुगवटा नष्ट करायचा होता. रक्तवाहिन्याही दुरूस्त करायच्या होत्या. कारण अर्ध्या तासाहून जास्त वेळ मेंदूचा रक्तपुरवठा थांबवला तर अॅलिसनवर त्याचे कायमचे दुष्परिणाम होण्याचा धोका अटळ होता!

हार्ट-लंग मशिन बंद झालं आणि डॉ. ल्युसिक त्यांच्या सहकार्यांसह झपाट्याने कामाला लागले. घड्याळाचे काटे पुढे सरकत होतेच. डॉ. ल्युसिकला जगाचं भान उरलं नव्हतं. त्यांच्या समोरचा शत्रू-तो मेंदूमधला फुगवटा कायमचा नष्ट करायचा होता. २९ मिनिटं झाली. सर्जन्सनी टायटॅनियम धातूच्या क्लिप्स त्या अॅन्युरिझमच्या तळाशी-ज्याला Neck म्हणतात-लावून, त्याचं तोंडच बंद केलं! आता अॅलिसनच्या शरीरातला रक्तपुरवठा जो मशिनने सुरू होता, तो थांबला आणि तिच्या शरीरावर ही कामगिरी सोपवण्यात आली. रक्ताचं तापमानही हळूहळू वाढवण्यात आलं कारण ते एकदम वाढवलं असतं तर शरीरातल्या इतर अवयवांना शॉक बसला असता आणि ते काम करण्याचं थांबवण्याची शक्यता अधिक होती! रक्तदाब वाढवत नेला. त्यांनी कवटी तशीच उघडी ठेवली पण त्यात जमणारे द्रव्यपदार्थ बाहेर टाकण्यासाठी काही Drains लावले. या सर्वांचा परिणाम अॅलिसनचं डोकं भप्पपणे सुजण्यामध्ये होणार होता. पण ते टाळण्यासारखं नव्हतं. ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते. म्हणजेच सलग १३ तास शस्त्रक्रिया चालली होती! अॅलिसनचे पतिराज आपल्या घरीच काहीतरी थातूरमातूर काम करत वेळ व्यतीत करत बसले होते. अपेक्षित फोनची घंटा वाजली. स्वतः डॉ. ल्युसिक बोलत होते. त्यांच्यामते, शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. अॅलिसन अक्षरशः मरणाच्या दारातून परतली होती. पण या गोष्टीत ‘सावित्रीचे प्राण’ डॉ. ल्युसिक या आधुनिक ‘सत्यवानाने’ यमाच्या तावडीतून सोडवून आणले होते! ऑपरेशननंतर झटके (Seizures) येऊ नयेत म्हणून अॅलिसनला दोन आठवडे कोमामध्येच ठेवलं गेलं होतं. तिच्या जखमेत इन्फेक्शन झाल्याने पुन्हा दुसरी सर्जरी करावी लागली होती. २०१२चा ऑगस्ट महिना उजाडला. तरी अॅलिसनला बोलण्यात खूप त्रास होत होता. शब्द अस्पष्ट उमटायचे. ते अनेकदा निरर्थक असायचे. तिला वाक्यं जुळवता येत नव्हती. तिचा मेंदू दोन वर्षांच्या मुलाइतकाच कार्यक्षम होता. असे तीन महिने गेले. अचानक मार्याला सुखद धक्का बसला. तिची आई बीटल्सचं एक पद गुणगुणत होती! व्हीलचेअरमधूनच तिला हॉस्पिटलमधील पियानोजवळ नेण्यात आलं. अॅलिसनने लहान मुलीच्या उत्साहाने पियानोकडे झेप घेतली आणि त्यावर बीथोवेनची एक ट्यून बिनचूकवाजवून दाखवली! तिच्या डोक्यावर कवटीची जखम झाकण्याकरता हेल्मेट बसवलं होतं. मार्या आणि भोवताली जमलेला स्टाफ यांच्या डोळ्यांत पाणी तरारलं. जुनी संगीत शिक्षिका अॅलिसन, मेंदूच्या आतमध्ये कुठेतरी जागृतावस्थेत होती तर! अॅलिसनला त्या एकाच क्षणामुळे प्रचंड आत्मविश्वास मिळाला असला पाहिजे. त्यावेळी तर ती काही भावना प्रदर्शित करू शकत नव्हतीच.

शेरल जोन्स ही एखाद्या देवदुताप्रमाणे धावून आली. Music Therapy हाच तिचा विषय. त्यात तिने डॉक्टरेट मिळवली आहे. माणूस सुशिक्षित असो वा नसो-संगीत त्याच्या जीवनात महत्त्वाचा भाग असतंच यावर त्या बाईंचा विश्वास आहे. कारण लहान मुलास अंगाईगीत गाताना ते त्या मुलाच्या मेंदूत कुठेतरी खोलवर रूतून बसलेलं असतंच, ते कायमसाठीच. अल्झायमरचा किंवा पार्किन्सनचा पेशंट असो अथवा डिमेन्शियाचा-स्मृतीभ्रम असो वा स्मृतीभ्रष्टता पेशंट संगीत कधीच विसरत नाही-त्यावर संगीत थेरपी आधारलेली आहे. पाश्चात्य देशांत यावर सखोल संशोधन सुरू आहे. म्हणजेच लतादीदी किंवा भीमसेन जोशी हे आपल्याला जागृतावस्थेतच स्वर्गीय आनंद देतात असं नाही, तर त्यांचा प्रभाव स्मृती हरवलेल्यांवरदेखील कायम रहातो, हेच ते संशोधन सिद्ध करतं! त्याचं मुख्य कारण बोलणं आणि संगीत यामध्ये कित्येक गोष्टी समान आहेत. Melody, Rhythm And Tempo. म्हणून तर लाखो लोकांना मंत्रमुग्ध किंवा संमोहित करणारा वक्ता Orator हा अफाट लोकप्रिय ठरतो! लोक त्याच्या भाषणांना लाखोंनी गर्दी करतात, कारण त्याच्या भाषणात जनतेला सूर सापडतो, नाद आढळतो, वेग दिसतो.

काही पेशंटस् असेही आढळतात की, ज्यांची वाचाशक्ती हतबल झाली आहे, पण ते गाऊ शकतात. विशेषतः त्यांनी लहानपणी ऐकलेली लोकप्रिय गाणी. ज्यांना Dementia आहे, अशा वृद्ध पेशंटस्ना चार वाक्यं धडपणे जुळवून बोलताना घाम निघतो परंतु त्यांना लोकप्रिय गाण्यांचे शब्द चपखलपणे आठवत असतात! अॅलिसनबरोबर शॅरेल जोन्सने काम सुरू केलं, तेव्हा अॅलिसनची शब्दसंपदा अतिशय तोकडी होती. तिला चहाचा कप दिला की त्याला अॅलिसन दवबिंदू म्हणायची! लिहिण्याच्या पेनला सिंह म्हणून संबोधायची तर खुर्चीला पुस्तक म्हणून हाक मारायची! शब्दांचा प्रचंड तुडवडा अॅलिसनच्या मेंदूत निर्माण झाला असल्याने प्रथम त्यावर मात करण्याचं शिक्षक जोन्सने ठरवलं. ‘मी दमले आहे’ हे साधं तीन शब्दांचं वाक्य. पण त्याला चाल लावून अॅलिसनला म्हणायला शिकवलं. कारण मेंदूच्या Left Hemisphere मध्ये बोलण्याचं सेंटर असतं ते दुखावलं होतं, त्याला जागृत करायला हवं होतं. अॅलिसनला हळूहळू पाच-सहा शब्द असलेली वाक्यं बोलता यायला लागली. त्यातला एखादा शब्द आठवला नाही तर तो शब्द ती चक्क गुणगुणत असे. म्हणजे बोलणं आणि गाणं हे एकमेकांच्या हातात हात घालून चालत होतं.

‘मी आणि माझा नवरा लॉस एंजेलिसला सुट्टीकरता जाणार आहोत. पासपोर्ट आणि तिकीट आताच काढायला हवं.’ इतकं अर्थवाही आणि मोठं वाक्य एका दमात बोलण्यासाठी अॅलिसनला वर्षभर तपस्या करावी लागली! तिच्या डोक्यात हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्सची आणि नर्सेसची नावं बसली होती कारण प्रत्येक नावाला एक म्युझिकल नोट जोडली होती. शेरल जोन्सला वाटतं, अॅलिसनच्या मेंदूत Neuroplastic Responses अथवा Structural Changes तिच्या संगीतप्रेमामुळे तयार झाले होते आणि त्याच्याच साहाय्याने ती आपलं शब्दसामर्थ्य पुन्हा मिळवू शकली. २०१३ची नाताळ मेहफिल. त्यामध्ये अॅलिसनने इंग्लिश, फें्रच आणि जर्मनमध्ये एकच गाणं गाऊन आणि पियानोवर वाजवून दाखवलं, तेव्हा तिचं उपस्थितांनी अमाप कौतुक केलं. अॅलिसन शब्दकोडी सोडवते. पियानो प्रॅक्टिस करते तसंच आयपॅडवर खेळही खेळते. थोडक्यात, मेंदूला सतत काम देते! माझ्या मेंदूला जे धडे गिरवायला मिळाले, त्याचा इतरांना फायदा व्हावा या हेतूने मी आत्मकथन करणार आहे असं जाहीर करून तिने ‘Allison’s Brain’ हे पुस्तक लिहिलं. ते ऑनलाइनवर वाचता येतं.

‘सुरुवातीला मला वाटायचं, डॉक्टर्स त्यांचं काम करतील आणि मी पूर्वीसारखी बनेन. तसं होत नसतं. तुमचा विकास तुम्हालाच करावा लागतो. पियानोमुळे मला स्वातंत्र्य मिळालं. त्याने मेंदूला वारेमाप शिकवलं. चालना दिली. सर्वात भीतीदायक गोष्ट होती ती ही की, मला वाटायचं-अमुक एक भावना आणि इच्छा प्रगट करावी, पण शब्दच तोकडे, उलटे वा चुकीचे तोंडावाटे बाहेर यायचे. मग माझी मलाच लाज वाटायची. ती अवस्था गेली शेरल जोन्सच्या थेरपीमुळे. माझा संगीत थेरपीवर अतोनात विश्वास आहे. ती माझ्यासाठी संजीवनी होती. मला ठेचा लागल्या पण त्यामुळे दुसरे लोक तरी शहाणे व्हावेत हीच उत्कट इच्छा.’

तिचे विचार प्रशंसनीय नाहीत, असं कोण म्हणेल?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *