डॉ. अझरा रझा या पाकिस्तानी संशोधिकेला क्लिनिकल मेडिसिनमधील संशोधनासाठी ‘डिस्टिग्नविशड् सर्व्हिसेस इन द फिल्ड ऑफ रिसर्च अॅण्ड क्लिनिकल मेडिसिन’ या पुरस्काराने फिलाडेल्फियामध्ये गौरवण्यात आलं. एक पाकिस्तानी नागरिक म्हणून त्यांना सहन कराव्या लागणार्या कोंडीची वेदना त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. त्याचाच हा सारांश. हा पुरस्कार कराचीमधील डाऊ मेडिकल कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या संस्थेने दिला आहे.

‘आयुष्यात कधीकधी असे क्षण येतात, जेव्हा तुम्ही गप्प बसणं म्हणजे केवळ अनैतिकच नव्हे तर ते मौन म्हणजे तुमची आत्महत्या ठरते. आमच्यासाठी तो क्षण आज, आता आला आहे, असं मी मानते. माझ्या कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांतर्फे दिलेला पुरस्कार स्वीकारताना काही मनोरंजक  किस्से, विनोद, डाऊ मेडिकल कॉलेजमधील हळव्या करणार्या आठवणी सांगण्यापेक्षा, मी आज आपल्या सर्वांना सतत डाचणार्या, वेदनादायक ठरणार्या सत्याचा उच्चार करण्याचं ठरवलं आहे. अर्थात, तुम्ही मला दिलेल्या या पुरस्काराने मी निश्चितच भारावून गेले आहे. मी नम्रपणे तो पुरस्कार स्वीकारत आहे. परंतु हा पुरस्कार स्वीकारतानाच मला आपलं आयुष्य पोकळ, खोटं आहे अशी भावना पोखरत आहे. मी खूप दुःखी आहे. या सभारंभात आपण अनेक डॉक्टरांना, आपल्या सहकार्यांना गौरवत आहोत. परितोषिकं प्रदान करत आहोत. पण याचवेळी पाकिस्तानातील आपल्या अनेक सहकारी डॉक्टर्सना गळ्यातील स्टेथस्कोपबरोबरच खांद्यावर गन, बंदुका वाहून नेण्यास भाग पाडलं जात आहे. आज आयुष्यात मी केलेली ही कामगिरी घेऊन पाकिस्तानात गेले असते तर मला निश्चितच एके-४७मधून झाडलेल्या गोळ्या छातीवर झेलाव्या लागल्या असत्या. मी दिवसाढवळ्या पाकिस्तानमधील रस्त्यावरून उघडपणे फिरू शकले नसते. मला कोणीतरी पळवून नेण्याचा धोका असता. कारण, मी केवळ डॉक्टर नाही तर एक ‘शिया’ डॉक्टर आहे!

मला माहीत आहे, की खरंतर मी अशा पुरस्कार स्वीकारण्याच्या समारंभात, तेही एका परक्या भूमीवर आपल्या देशातील गोष्टींवर टीका करणं, राजकीय शिष्टाचाराला धरून नाही. अशा सभेत मी ‘राजकीयदृष्ट्या सुयोग्य’ असंच भाषण करणं अपेक्षित असतं. अन्यथा माझ्या भाषणाचा (टीकेचा) देशाचे हितशत्रू गैरफायदा घेतील. परकीय शक्ती फायदा घेतील. पण माझा प्रश्न असा आहे की, या भेकड समर्थनाच्या ढाली पुढे करून आपण किती दिवस गप्प बसणार? आमच्या देशावर वार होत असताना, आमचा देश जळत असताना साधा आक्रोशही उठत नाही. आपण कशाला एवढं घाबरतो?

यह कैसा अजबसा खौफ कबिला है

क्या खून मल के भी चेहरो का रंग पिला है

ये कैसे जहर की बारिश हुयी है अब की बार

क्या मेरे सराई गुलाबों का रंग नीला है?

मित्रांनो, वंशविच्छेद बंदुका आणि गॅस चेंबरपासून सुरू होत नसतो. सर्वप्रथम वंशविच्छेद सुरू होतो शब्दांपासून. द्वेषमुलक शब्द. प्रथम एखाद्या समूहाला अमानुष ठरवतात. शत्रू ठरवतात. हे वैर इतक्या टोकाला जातं की, मग कोणतंही क्रौर्य समर्थनीयच ठरतं. मित्रांनो, सध्या पाकिस्तानात असंच विषारी वातावरण निर्माण केलं जात आहे. केवळ शिया डॉक्टरांचीच कत्तल केली जात नाहीये, तर संपूर्ण पाकिस्तानात असहिष्णुतेचं वातावरण फैलावलं जात आहे. धार्मिक छळवणुकीची पद्धत रुजवली जात आहे. दहशतवादी अल्पसंख्याकांची खुलेआम कत्तल करत आहेत. त्याविरुद्ध उघडपणे आवाज उठवणार्यांना लक्ष्य केलं जात आहे. मलाला युसुफझाई, रझा रुमी, हमीद मीर यांची नावं मी घेण्याची गरज नाही, तुम्हाला ते माहीतच आहेत! तेव्हा हा काही एका विभागातील प्रश्न आहे असं म्हणणं चुकीचं तर आहेच पण अप्रामाणिकपणाचंही आहे. खुन्यांचा एक लहान गट देशात या हत्या घडवून आणत आहे. देशाच्या सरकारने आपल्या नागरिकांचं रक्षण करणं अपेक्षित असतं. मात्र हे सरकारच गप्प बसून या खुन्यांना मदत करत आहे. आणखी किती डॉक्टर्स, वकील, स्त्रिया, मुलं मारली गेल्यावर या खुन्यांना अटक केली जाणार आहे? हे खुनी कोण आहेत याविषयी कोणतीही शंका नाही. कारण हे खुनी उघडपणे या हत्यांची जबाबदारी स्वीकारत आहेत. बिनदिक्कतपणे. किती संख्येने हा वंशविच्छेद झाल्यावर आपण जागं व्हायचं? साठ लाख? आपल्याला हे कधी समजणार आहे की आपण सर्व या वंशविच्छेदासाठी अपराधी आहोत.

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल की, मी केवळ डॉक्टरांच्या हत्येविषयीच का आवाज उठवत आहे? पाकिस्तानात आज हिंदू, ख्रिश्चन, अहमदी आणि हजारो उदारमतवादी, सुन्नी नागरिकांचीही हत्या केली जात आहे. मग मी फक्त डॉक्टरांच्या हत्येविषयीच का बोलत आहे? तुम्हाला असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. रास्तही आहे. मी डॉक्टरांच्या हत्येवर भर देत आहे, कारण आपली डॉक्टरांची संघटना आहे आणि आपले सहकारी डॉक्टर्स आज वेचून वेचून मारले जात आहेत. आपल्या डोळ्यांसमोर त्यांना संपवलं जात आहे. तेव्हा आपण आपल्याविषयी तरी बोलायला सुरुवात  करावी, असं मला वाटतं.

मला वाटतं, हे सूर्यप्रकाशाएवढं स्पष्ट आहे की, अल्पसंख्य, उदारमतवादी आणि आपल्यासारखे व्यावसायिक आज दहशतवाद्यांचं लक्ष्य ठरत आहेत. पण ते काही संख्येने कमी नाहीत. पाकिस्तानात त्यांची संख्या बरीच मोठी आहे. देशाच्या सुरुवातीपासूनच समाजाच्या सर्व क्षेत्रांत हे सर्व अस्तित्वात आहेत. या देशाच्या उभारणीतील ते महत्त्वाचे घटक आहेत. ‘अखेरचा उपाय’ म्हणून (फायनल सोल्युशन) त्यांना संपवणं अजिबात शक्य नाही. कारण याच समाजघटकांत क्रांतिची सशस्त्र उठावाची ताकदही आहे. त्यांची सतत दडपणूक आणि छळ केल्यामुळे एका क्षणी हा घटक शस्त्र हातात घेऊन नागरीयुद्धात उतरेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. ते अभूतपूर्व (फाळणीच्यावेळी झालेल्या हिंसाचारापेक्षाही तीव्र असंतोष उभा राहील!) असं युद्ध असेल, अशी माझी खात्री असेल.

या समारंभाला येण्यापूर्वी मी जेव्हा माझ्या मुलीला सांगितलं की, मी आज हे मुद्दे भाषणात मांडणार आहे, तेव्हा ती प्रचंड घाबरली. तिला माझ्या जीवाची काळजी वाटत होती. ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर येणार आणि तुझ्या शेजारी उभी राहणार आहे. हे ऐकून मला अतिशय शरम वाटली. आपण काय प्रकारचं जग निर्माण करून ठेवलं आहे, या पुढल्या पिढीसाठी? एका १९ वर्षांच्या मुलीला या फिलाडेल्फिया शहरात आईच्या स्पष्ट वक्तव्यासाठी आपल्या शरीराची ढाल करावीशी वाटतेय. तिची भीती पूर्णपणे खरी आहे, असं मलाही वाटत नाही. पण पाकिस्तानातील निव्वळ वेडाचारातून उसळलेल्या खुनी हिंसाचारातून संपूर्ण समाज (विशेषतः तरुणपिढी) चित्तभ्रमित झाला आहे. यातून आपली आणि पाकिस्तानची प्रतिमा आज कशी बनली आहे? आज तुम्ही मुस्लीम आहात हे अमेरिकेत सांगणंही लाजिरवाणं झालं आहे का? नाही, आपल्याला ते अभिमानाने सांगता यायला हवं. पण आज माझी मुलगी आपल्या देशातील स्वतःच्या लोकांनाच घाबरत आहे. कदाचित मी या हिंसाचाराविरुद्ध, धार्मिक अत्याचाराविरुद्ध बोलत आहे म्हणून मला दोषी ठरवलं जाईल.

आपल्यापैकी अनेकांना मुशायरा आवडतो. सुंदर प्रेमकविता, शेरोशायरी ऐकायला आवडते. पण मुस्तफा झैदीचा हा शेर ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं?

मैं किसके हातों पे अपना लहू तलाश करूँ?

तमाम शहरने पहने है दास्ताँने!

माझी तुम्हा सर्वांना कळकळीची प्रार्थना आहे. प्लीज, आपण सर्वांनी हे हातमोजे काढून टाकूया. आपण सर्व बुद्धिजीवी डॉक्टरमंडळी, पाकिस्तानातील समस्त बुद्धिजीवींमधील एक टक्का इतके आहोत. मुक्त मतस्वातंत्र्यासाठी आवाज उठवणं आपलं कर्तव्य आहे. आपल्या समाजातील सहिष्णुता वृद्धिंगत व्हवी, आपल्या देशातील मुलींना शिक्षण घेण्याचा हक्क मिळावा यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे. आपण अमेरिकेत राहत आहोत, आपण नवा इतिहास घडवायला हवा. उदाहरण घालून द्यायला हवं. या अमेरिकेत ‘कू क्लक्स क्लॅन’ या दहशतवादी संघटनेच्या आंदोलनाच्यावेळेस, काळ्या समाजाविरुद्ध ते आंदोलन करत असूनही काळे पोलीस त्यांच्या लोकशाही हक्कांसाठी, आंदोलनाच्या अधिकारासाठी उभे राहिले होते. त्यावेळेस ‘कू क्लक्स क्लॅन’चे लोक काळ्या लोकांच्या, नेत्यांच्या प्रतिमा जाळत होते. ‘निग्रो समाज नष्ट करा!’ अशा घोषणा देत होते. पण तरी काळे पोलीस निष्ठेने लोकशाही हक्कांसाठी त्यांना संरक्षण देत होते! लोकशाही स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्यरक्षणाचं ते ज्वलंत उदाहरण होतं. तुमच्यापैकी प्रत्येकजण सुजाण आहात, सुशिक्षित आहात. कारण तुम्ही पाकिस्तानातील सर्वात उच्चस्तरातील आहात. म्हणूनच माझी विनंती आहे कृतीत उतरा!’

वरील संपूर्ण भाषण www.3quarksdaily.com या संकेतस्थळावर ‘Our Collective Spiritual Suicide’ या शीर्षकाखाली वाचता येईल. भाषणाचा स्रोत डॉ. अमर जेसानींमुळे उपलब्ध. त्यांचे मनःपूर्वक आभार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *