राज्यात भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केलंय. मिनीमंत्रीमंडळही कार्यरत झालंय. पण ज्यांच्या जोरावर भाजपने हे यश मिळवलं त्यांना अजून त्यांचा सत्तेतला वाटा मिळालेला नाही. त्यामुळे भाजप घटकपक्ष असलेल्या महायुतीत प्रचंड धुसफूस सुरू आहे. अशीच धुसफूस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षातही सुरू आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना भाजपने महायुतीत राहण्यासाठी काही आश्वासनं दिली होती. मात्र सरकार स्थापन होऊनही या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही… यामुळे रामदास आठवले भारतीय जनता पक्षावर कमालीचे नाराज झालेत. भाजपने फसवल्याची भावना त्यांनी या मुलाखतीत बोलून दाखवली. तसंच विधानसभा निवडणुकीत आठवलेंनाकोणकोणती आश्वासनं दिली गेली होती त्याचा भांडाफोडही रामदास आठवले यांनी या मुलाखतीत केलाय…

 

विधानसभा निवडणुकीत महायुतीतून भाजपसोबत निवडणूक लढलात. पण आता भाजप तुमच्याकडे लक्ष देतंय का?

– विधानसभा निवडणुकीमध्ये आपण भाजपसोबत होतो आणि नक्कीच भाजपला आरपीआयचा फायदा झालेला आहे. जर आरपीआय भाजपसोबत नसता तर भाजप ९०-९५ जागांपर्यंतच जाऊ शकला असता. आणि जर आपण शिवसेनेला पाठिंबा दिला असता तर शिवसेनाही ९०-९५ पर्यंत जाऊ शकली असती. त्यामुळे आरपीआयच्या मतांचा, दलित मतांचा भाजप एकटी लढूनसुद्धा त्यांना फायदा झाला. त्यांना जरी पूर्ण मेजॉरिटी मिळाली नसली तरीही त्यांनी १२२ जागा निवडून आणल्या आहेत.

युती तुटताना तुमचं भाजपसोबत नेमकं काय काय बोलणं झालं होतं? कारण तुमची शिवसेनेशी आधी महायुती होती आणि मग तुम्ही भाजपसोबत गेलात…

– फक्त शिवसेनेसोबत आमची युती नव्हती. कारण बाळासाहेब ठाकरेंना मी २५ जानेवारी २०११ ला भेटलो होतो. आणि त्यांचा वाढदिवस २३ तारखेला होता. म्हणून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला मी त्यांना २५ तारखेला भेटलो होतो. त्यांच्यासोबत युती करायची म्हणून भेटलो नव्हतो. त्यावेळेस बाळासाहेबांनी आमच्यासमोर प्रस्ताव ठेवला की, शिवशक्ती आणि भीमशक्ती जर एकत्र आली तर महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होऊ शकतं. सत्ता परिवर्तनातून समाज परिवर्तन होऊ शकतं. दलित आणि सवर्णांमध्ये जो काही वाद आहे तो बर्याच प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो. आणि बाबासाहेबांच्याबद्दल मला प्रेम आहे. म्हणूनच ही जी भीमशक्ती आहे ती महाराष्ट्रामधली निर्णायक शक्ती आहे. ही भीमशक्ती नेहमीच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहिल्यामुळे त्यांना सत्ता मिळत गेली. आणि आम्हाला सत्तेच्या बाहेर रहावं लागलं. त्यामुळे माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती की, शिवशक्ती बरोबर भीमशक्ती आली पाहिजे…! बाळासाहेबांना मी भेटून आल्यानंतर या विषयाची चर्चा जोरदारपणे राज्यभरात सुरू झाली. वैचारिक लोकांकडून, कार्यकर्त्यांकडून मला फोन येऊ लागले. समाजातील शिक्षित लोकांकडून माझ्याशी संपर्क होऊ लागला. समाजातील सर्वसामान्य जनतेकडूनही सातत्याने संपर्क साधला जाऊ लागला… आणि मी काही बाळासाहेबांना तुमच्या सोबत युती केली असं सांगून आलो नव्हतो! त्यामुळे मग मी जवळजवळ सहा महिने महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. विचारवंतांच्या जवळजवळ ४-५ बैठका घेतल्या. आणि मग मला हा फिडबॅक मिळाला की, शिवसेना-भाजपसोबत जायला काही हरकत नाही… मग आम्ही निर्णय घेतला. तेव्हा ९ जून २०११ ला एक भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळेला त्या मोर्चामध्ये तीन विषय होते… महागाई, भ्रष्टाचार आणि दलित अत्याचार… या मोर्चानंतर मग आम्ही युती जाहीर केली ती मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये… ही युती केवळ शिवसेनेसोबतची युती नव्हती तर शिवसेना-भाजपच्या युतीसोबत केलेली महायुती होती. त्यामुळे आम्ही केवळ शिवसेनेसोबत गेलो असं नाही… तसंच बाळासाहेबांचंही म्हणणं शिवसेनेसोबत या असं नव्हतं तर युतीसोबत या असंच त्यांचंही म्हणणं होतं… म्हणून मग पालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेना-भाजप सोबत गेलो. त्यावेळेस शिवसेना-भाजप समोर मनसेचं आव्हान असताना आरपीआय महायुतीत गेल्यामुळे या महायुतीला सत्तेत येण्याची संधी मिळाली. त्यामुळे दलित मतं जी आहेत, जी शिवसेना-भाजपला कधीही न मिळणारी मतं आहेत ती मतं पालिका निवडणुकीमध्ये, ठाण्याच्या पालिका निवडणुकीमध्ये सेना-भाजपच्या उमेदवारांना मिळाली. आणि मुंबई महानगर पालिकेची सत्ता महायुतीने हस्तगत केली. त्यानंतर आलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींची लाट तर होतीच होती परंतु महाराष्ट्रामध्ये भाजपसोबत शिवसेना होती… आणि कधीही न मिळणारी दलितांची मतंही या भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना मिळाली. मोठ्या मताधिक्याने सेना-भाजपच्या उमेदवारांना दलितांची मतं मिळाली.

पण आता जेव्हा विधानसभेची निवडणूक आली तेव्हा भाजपसोबत जाताना काय ठरलं होतं?

– या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला अचानकपणे २४ तारखेला सेना-भाजपची युती तुटली. २५ तारखेला दुपारी मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आणि उद्धवजींनी आमच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता की, जर शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा मजबूत करायचा असेल, बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर आरपीआयने आमच्यासोबत यावं… आणि त्याबदल्यात आम्ही उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर तुम्हाला देतो, तसंच केंद्रामध्ये आत्ताच अनंत गितेंचा राजीनामा घेतो आणि तुम्हाला जर केंद्रात जायचं असेल तर निवडणूक झाल्याबरोबर लगेचच केंद्रामध्ये सेनेच्या कोट्यातलं कॅबिनेट मंत्रीपदही देतो, असंही आश्वासन उद्धवजींनी मला दिलं होतं. तसंच १५ विधानसभेच्या जागा देतो आणि त्यातल्या ७-८ जागा निवडून आणण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू, सत्तेतही चांगला सहभाग आपण देऊ, असंही उद्धवजींनी मला सांगितलं होतं.

मग भाजपसोबत का गेलात?

– भाजपसोबतही चर्चा करणं आवश्यक होतं. कारण भाजपही महायुतीतील आमचा मित्रपक्ष होता. म्हणून मग भाजपसोबत २५ तारखेच्या रात्री विनोद तावडेंच्या घरी बैठक झाली. तेव्हा देवेंद्र फडणवीस, प्रकाश जावडेकर, राजीव प्रताप रुडी असे नेते त्या बैठकीला होते. त्यांना आरपीआयचं शिष्टमंडळ भेटलं आणि त्यांच्यासोबत जी चर्चा झाली, त्यात अमित शहा यांचा मला फोन आला. त्यांच्याशी प्रायमरीच चर्चा झाली. पण त्या चर्चेत आरपीआयला १० टक्के सत्तेत सहभाग मिळाला पाहिजे, २ एमएलसी मिळाली पाहिजे, ६-७ महामंडळांचं अध्यक्षपद मिळालं पाहिजे आणि केंद्रात एक मंत्रीपद… यातही मंत्रीपदावर चर्चा होताना मंत्रीपद म्हणजे नेमकं काय? कॅबिनेट मंत्रीपद की राज्यमंत्रीपद? तर अमित शहा म्हणाले, मंत्रीपद म्हणजेच कॅबिनेट मंत्रीपद… असं स्पष्ट बोलणं माझं आणि अमित शहा यांचं झालं. इतकंच नाही तर हा सगळा ड्राफ्ट अमित शहा यांच्याशी चर्चा करून तयार करण्यात आला. या लेखी ड्राफ्टवर देवेंद्र फडणवीस, भुपेश थुलकर यांची सही आहे. खरंतर मंत्रीपद मिळाल्यामुळे मी काही मोठा होणार नाही. मंत्रीपद नसलं तरीही काम करण्याची हिंमत माझ्यात आहे. परंतु जर आमच्या मदतीने तुम्ही सत्तेत येणार असाल तर आम्हालाही तुम्हाला सत्तेत घ्यावंच लागेल, असं मी त्यांना सांगितलं.

त्यानंतर, नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी २४ मेला गुजरात भवनमध्ये माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली. ही चर्चा तशी फॉरमलच झाली. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी मला बोलावून सांगितलं की, ‘रामदासजी आपकी महाराष्ट्र में, गुजरात में, यूपी में बहुत मदद हुई है… लेकीन अभी आपको मंत्रीमंडल में लेने के लिए मुझे थोडा प्रॉब्लेम है… इसलिए २६ मई के दिन आप को मंत्रीपद नहीं दे सकता… लेकीन दो महिने के बाद जब मंत्रीमंडल का विस्तार होगा तब मैं आप को मंत्रीमंडल में ले लूंगा…’ यावर मी त्यांना म्हटलं की, ‘दो महिने बाद महाराष्ट्र में हमारा विधानसभा का इलेक्शन है…’ तेव्हा मोदी म्हणाले की, ‘आप बेफिकीर रहे… इलेक्शन के पहले ही विस्तार होगा और आप को मंत्रीमंडल में लिया जायेगा…’ म्हणून मग कार्यकर्त्यांचीही अशी एक भावना होती की, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. त्यामुळे काही लोकांची कामं करायची असतील तर आता भाजपसोबत जाणंच योग्य आहे. राज्यसभाही त्यांनी आम्हाला दिलेली आहे. म्हणून मग शेवटी आम्ही भाजपसोबत गेलो. तसं लेखी अॅग्रीमेंटही माझ्याकडे आहे.

याचाच अर्थ भाजपने तुमची फसवणूक केली?

– फसवणूक केली असं म्हणता येणार नाही. परंतु त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे तो देशाच्या सर्व राज्यांमध्ये आहे. तो छोटा पक्ष असला तरी सर्व राज्यांमध्ये या पक्षाच्या शाखा आहेत. महाराष्ट्रात आमची मतं कमी असली तरीही दुसर्याला निवडून आणण्यामध्ये आमचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आरपीआयचा कुणीच निवडून येत नाही, ही खरी गोष्ट आहे. आम्ही यामध्ये कमी पडलो… परंतु आमच्यासोबत मतं नाहीत असं नाही.

भाजपने लेखी अॅग्रीमेंट करूनही त्या अॅग्रीमेंटचा अद्याप काहीच विचार केलेला नाही?

– लेखी अॅग्रीमेंटच्या संदर्भात दिल्लीत काही विचार झाला नाही. पण आता इथे महाराष्ट्रात सीएम म्हणालेत की, नाराजी दूर करू… इथल्या सत्तेमध्ये सहभाग देऊ…! त्यामुळे आता त्यांच्यासोबत चर्चा होणार आहे. तेव्हा बघू ते काय करतात…

म्हणजेच केंद्र आणि राज्य अशा दोन्ही पातळ्यांवर आत्ता तरी फसवणुकच केल्यासारखं आहे ना?

– राज्यपातळीवर अजून तरी फसवणूक झालीय, असं म्हणता येणार नाही. कारण राज्यात विस्तारावेळी ते संधी देतील. पण एमएलसी कुठून आणि कशी मिळणार, हे सारं प्लॅनिंग करूनच ते विचार करतील. यातही १० टक्क्यांप्रमाणे ४ मंत्रीपदं मिळण्याची आमची मागणी होती. पण आता आमचा एकही आमदार निवडून न आल्यामुळे ते आम्हाला मंत्रीपद देतील असं वाटत नाही. पण आम्ही आधीच मागणी केलीय की, आम्हाला एक तरी मंत्रीपद आणि राज्यमंत्री पद मिळावं… त्यामुळे बघूयात आता काय होतंय ते… कारण कार्यकर्त्यांमध्ये नाराजी तर आहेच.

केंद्रात जेव्हा काँग्रेसने आम्हाला फसवलं तेव्हा महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं होतं की, काँग्रेसने तुम्हाला फसवलं पण आम्ही अजिबात तुम्हाला फसवणार नाही. अनेक जण तर सांगत होते की, आठवलेंचा मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शपथविधी होईल… अनेक सभांमधूनही भाजपचे नेते सांगत होते… त्यामुळे आमच्या लोकांची अशी एक भावना आहे की, बाबासाहेबांच्यानंतर आरपीआयला केंद्रामध्ये कधीच मंत्रीपद मिळालेलं नाही. आमच्या समाजाचे मंत्री झालेत पण आरपीआयचा मंत्री नाही झालाय अद्याप… त्यामुळे यानिमित्ताने ते मंत्रीपद देऊन भाजपला आपली इमेज अजूनच सुधारण्याची चांगली संधी होती. परंतु का माझं नाव गाळण्यात आलं ते माझ्या अद्याप लक्षात आलेलं नाही. त्यामुळे राज्याचे नेते मोदींना कनव्हिन्स नाही करू शकले की त्यांनी मोदींना कनव्हिन्सच केलं नाही, हेही काही मला कळलेलं नाही…!

पण मोदीही प्रत्यक्ष तुमच्याशी बोलले होते ना…?

– ते तर अगोदर बोललेलेच होते. पण आता पुन्हा हे लिखित अॅग्रीमेंट जे आहे त्यावरही अद्याप चर्चा व्हायची आहे. युतीतूनही मला सांगण्यात आलं होतं. खरंतर काँग्रेसने जसं राष्ट्रवादीच्या कोट्यात मला टाकून माझ्यावर अन्याय केला, तशी भाजपच्या गोटातही सेना-भाजप एकत्र असताना चर्चा असायचीच की, आम्ही राज्यसभा दिलेली आहे. आता शिवसेनेच्याकोट्यातून तुम्ही राज्यमंत्रीपद घेतलं पाहिजे.,, माझ्या राज्यसभेसाठी उद्धवजींनी नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंग यांना भेटून (ते कधी दिल्लीला जात नाहीत पण ते माझ्यासाठी दिल्लीला गेले…) आमची थोडी अडचण आहे. त्यामुळे तुमच्या कोट्यातून देशभरातून तुम्हाला कुठूनही आठवलेंना मंत्रीमंडळात घेता येईल. म्हणून मित्रपक्ष म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की, यावेळी आठवलेंचा विचार तुमच्या कोट्यातून करावा… यानंतर गोपीनाथ मुंडे, गडकरी, फडणवीस, तावडे सर्वच नेत्यांनी प्रकाश जावडेकरांची राज्यसभा डावलून मला तिथे घेतलं.

या सगळ्या प्रकारानंतर भाजप आणि शिवसेनेला तुम्ही काही खडेबोल सुनावले नाहीत का? आता तरी काही कडक भूमिका घेणार आहात का?

– आत्ताचं जे आमचं अॅग्रीमेंट आहे ते भाजपसोबतचंच आहे. त्यामुळे त्यांना खडेबोल सुनावण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांकडे मी नाराजी व्यक्त केलीय. त्यावर ते म्हणालेत की, मी वरती बोललो आहे…! पण ते असं फसवतील असं मला वाटलं नव्हतं. कारण यावेळेलाही त्यांना आमची मदत मिळालेली आहे. मदत मिळाली नसती तर ठीक होतं. पालिकेच्या निवडणुकीपासून त्यांनी पाहिलेलं आहे की, मी निर्णय घेतला किंवा माझ्या पक्षाने निर्णय घेतला की मतं मिळतात. हा अनुभव काँग्रेसनेही घेतलाय. १९९० मध्ये आरपीआयचे सगळे नेते जरी काँग्रेससोबत नव्हते तरी माझ्या एकट्या ग्रूपने काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांनी जाहीर केलं की, आठवले आणि आरपीआयचा पाठिंबा नसता तर आम्ही सत्तेत आलो नसतो. जवळजवळ ३७ जागा या आरपीआयच्या पाठिंब्यामुळे निवडून आलेल्या आहेत. आणि त्यावेळेला काँग्रेस १४१ जागांवर निवडून आलेली होती. त्यामुळे लोकांच्या मनातले निर्णय आम्ही आत्तापर्यंत घेतलेले आहेत. कालपर्यंत सेना-भाजपला डेडली विरोध करण्याचीच आमच्या समाजाची भूमिका असायची आणि काँग्रेसलाच आमची मतं मिळायची.

पण माझ्या एकट्या ग्रूपने काँगेसला पाठिंबा दिला. त्याचवेळेला जर प्रकाश आंबेडकर, गवई, कवाडे, खोब्रागडे किंवा युनायटेड आरपीआयने जर शरद पवारांशी चर्चा केली असती आणि सांगितलं असतं की, आम्हाला २८८ जागांपैकी ६०-७० जागा पाहिजेत. तरी शरद पवारांनी तेवढ्या जागा सोडल्या असत्या… आणि जर त्यांच्याकडे मागणी केली असती की आम्हाला सत्तेत एक तृतीयांश सहभाग पाहिजे तरीसुद्धा शरद पवारांनी ते मान्य केलं असतं. आणि उपमुख्यमंत्रीपद आम्हाला द्या, अशी मागणी युनायटेड आरपीआयने केली असती तर तीही मागणी शरद पवारांनी मान्य केली असती. आणि मग त्यावेळेला आमचे तिथे १५-२० मंत्री झाले असते… १४ मंत्री तरी ४२च्या कोट्याप्रमाणे हमखास झाले असते. त्यामुळे ही एक आमच्या आरपीआयच्या जीवनामध्ये खूप मोठी चूक झालेली आहे. आणि मी एकटाच तिकडे गेल्यामुळे माझ्या एकट्यालाच त्यांनी मंत्री केलं. आणि जर युनायटेड आरपीआय तिथे असता तर आम्हाला एक ताकद तिथे वापरता आली असती…

आता महायुती तुटली तेव्हा भाजपसोबत जाणं हीदेखील चूक ठरली का?

– भाजपसोबत जाणं ही चूक ठरलीय असं मी म्हणणार नाही. परंतु भाजप-सेनेमध्ये फूट झाली ही फार मोठी चूक झाली. सेना-भाजपने एकत्र रहावं हा प्रयत्न मी केला होता. मी उद्धवजींकडे प्रस्ताव दिला होता की, १४४-१३० आणि बाकीच्या जागा मित्रपक्षांना… पण त्या दोघांकडूनही तेवढी लवचिक भूमिका घेतली गेली नाही. दोघांनीही ताठर भूमिका घेतली.

पण तुम्ही शिवसेनेसोबत गेला असता तर तुमचा फायदा झाला असता…?

– शिवसेनेसोबत गेलो असतो तर कदाचित उद्धवजींनी शब्द पाळला असता…! अनिल देसाईंना ज्यावेळी राज्यसभा देण्यात आली आणि आम्ही जेव्हा युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस राज्यसभा देण्याबाबत काही बोलणी झाली नव्हती. किंवा अशी अट टाकून काही आम्ही युतीत आलो नव्हतो… उद्धवजी म्हणताहेत ते खरंय की, आम्हाला राज्यसभा देण्याचा शब्द त्यांनी दिला नव्हता. आणि त्यांचं म्हणणं आहे की, मी शब्द दिला की तो पाळतो… आणि ही गोष्ट खरी आहे. त्यामुळेच आम्ही शिवसेनेसोबत गेलो असतो तर २५-३० जागांचा फरक पडला असता… भाजपच्या जागा कमी आल्या असत्या…

पण मग सेनेसोबत न राहण्याचं काय कारण झालं?

– कारण म्हणजे, एकतर केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. राज्यामध्ये सेनेपेक्षा भाजपची हवा अधिक आहे. त्यामुळे काही प्रश्न सोडवायचे असतील तर भाजपसोबत जाणं हे समाजाच्या हिताचं आहे, असं आमचं ठरलं. तसंच केंद्रातील आमचं मंत्रीपद गेले ५/६ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे लोकांना कुठेतरी अशी आशा आहे की, आपल्या नेत्याला ते पद मिळावं… म्हणून कार्यकर्त्यांनाही वाटत होतं की, भाजपसोबतच जायला हवं… तसंच भाजपसोबत गेल्यामुळे आपला फायदा होईल, ते शब्द पाळतील असा एक विश्वास कार्यकर्त्यांना होता. पण…

म्हणजेच नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसर या दोघांनीही तुमची फसवणूक केली?

– मी यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांची नेमकी अडचण काय आहे ते विचारणार आहे. खरंतर आता आम्ही त्यांच्यासोबत राहिलो तरी त्यांना काही फायदा नाहीय आणि नाही राहिलो तरी काही तोटा नाहीय… कारण आता ५ वर्षे त्यांना सत्ता मिळालेलीच आहे.

ही जी तुमची सततच फरफट होते ही फरफट कशी थांबवणार आहात?

– ही चूक जर दुरूस्त करायची असेल तर आरपीआयने व्यापक पक्षाची उभारणी केली पाहिजे. सामाजिक आंदोलनाबरोबरच पॉलिटिकल बांधणीही आरपीआयला करावी लागेल. सगळ्या जातीजमातीच्या लोकांना पक्षात आणावं लागेल. तसंच फक्त बौद्ध समाजाला एकत्र करून काही यश मिळणार नाही. तर सर्व दलितांना कसं एकत्र आणायचं ते पहावं लागेल. तसंच ओबीसी आणि अल्पसंख्याक यांच्या मदतीने कशी सत्ता मिळवायची हा प्रयोग जसा कांशिराम, मायावती यांनी जसा यूपीमध्ये केलेला आहे तशाच पद्धतीने महाराष्ट्रातही प्रयोग करावा लागेल. त्यामुळे आता आरपीआयला इमेज बदलवावी लागेल… प्रत्येक समाजातील अॅक्टिव्ह कार्यकर्ते शोधले पाहिजे. त्यांना तयार केलं पाहिजे. जसं एमआयएमने स्वतःची मतं एकत्र केली आणि स्वतःच्या २ जागा निवडून आणल्या. तसाच प्रयत्न आम्हालाही करावा लागेल…

जय भिम आणि जय मिम एकत्र येण्यासंदर्भातील चर्चा सोशल मीडियातून सुरू झाली आहे. तुम्हाला काय वाटतं याबाबत…?

– एमआयएमची भूमिका हार्ड आहे. ती सेक्युलर आणि सॉफ्ट असायला हवी. हिंदूसोबत झगडा करण्याची भूमिका मांडून काही यश मिळणार नाही. तर त्यांच्यासोबत दोस्ती करून राजकारण कसं करता येईल याचा विचार एमआयएमने केला पाहिजे.

तुम्ही ओवैसींसोबत यासंदर्भात बोलणी करणार का?

– ओवैसींसोबत बोलणी करण्यासाठी आता निवडणुकाच नाहीत. पण मुस्लिमांनाच आरपीआयमध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करणार आहोत. सध्या तरी आम्ही भाजपसोबत आहोतच. त्यामुळे पुढच्या निवडणुकीदरम्यान आम्ही हा विचार करू. तोवर या ५ वर्षांत पक्ष बांधणीचं काम सुरू असेलच.

अर्जुन डांगळेंनी जो शिवसेनेसोबतच राहण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल तुमचं मत काय?

– अर्जुन डांगळे हे आमचे चांगले मित्र होते. ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते होते. त्यांना विचारूनच आम्ही भाजपसोबतचा निर्णय घेतला होता. परंतु शेवटी शिवसेनेला शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग करायचा होता. त्यामुळे त्यांनी अर्जुन डांगेळेंना विचारलं असेल म्हणून ते तिकडे गेले असावेत. प्रत्यक्षात आमच्या पक्षामध्ये प्रत्येक निर्णय हा खेळीमेळीत होतो. चर्चा करून होतो. अशाप्रकारे आमच्या पक्षातील माणूस फुटत नाही. आमच्या पक्षात कोणताही निर्णय हा लोकशाही पद्धतीनेच घेतला जातो. त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा निर्णय आम्ही चर्चा करूनच घेतला होता. अर्जुन डांगळेंचीही आग्रही भूमिका होती आम्ही भाजपसोबत जाण्याबाबत… तसंच आमच्यातला एखादा माणूस फोडून काही सस्पेन्स क्रिएट करता येतो का, असा विचार शिवसेनेने केला पण त्यात त्यांना काही यश नाही आलं.

असो… आमची चूक आम्हाला मान्य आहे. आम्ही लोक निवडून आणू शकलेलो नाही. त्यामुळे आता आत्मसंशोधन करण्याची आम्हाला गरज आहे. पक्षाची व्यापक बांधणी करण्याची गरज आहे. पुढच्या काळात आम्ही हे सर्व प्रयत्न करण्याचं ठरवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *