आपल्यापैकी कितीजणांना श्यामराव साबळे माहिती आहेत? माझ्याही जन्माच्याआधी म्हणजे आजपासून ४८ वर्षांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचा झेंडा आशियाई क्रीडा स्पर्धेत फडकावला होता. थायलंडला झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी ५२ किलो वजनी गटात कुस्तीत ब्राँझ मेडल मिळवलं होतं. महाराष्ट्राच्या मातीत बहरलेला तो शेवटचा मल्ल… त्यानंतर दोहा इथल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ग्रीको रोमन प्रकारात विनायक दळवीने ब्राँझ मेडल जिंकलं होतं. पण तो आर्मीचा मल्ल होता. एकूणच काय गेली ४८ वर्षं महाराष्ट्राची माती आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकासाठी आसुसली होती. आज महाराष्ट्राच्या नरसिंग यादवने ही कमी भरून काढली. श्यामराव साबळे ते नरसिंग राव यादव दरम्यान महाराष्ट्राच्या मातीत करोडो रुपये बरबाद केले गेले. नरसिंगच्या मेडलने पुन्हा या कडवट वास्तवावर शिक्कामोर्तब झालं. होय, म्हणूनच या पदकाचं फलित काय असेल तर आता तरी बाळासाहेब लांडगेंच्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला जाग येणार आहे का? महाराष्ट्राला कुस्तीची वैभवशाली परंपरा आहे. श्यामराव साबळे यांच्या आधीच्याच म्हणजे १९६२च्या जकार्तामधील आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या मारुती माने आणि गणपतराव आंदळकर यांनी गोल्ड मेडल जिंकलं होतं. पण त्यानंतर महाराष्ट्राची कुस्ती जणू आंतरराष्ट्रीय पातळीवरून हद्दपार झाली होती. नरसिंग यादवने तिला पुन्हा एकदा जीवदान दिलं…

असं का घडलं?

आंतरराष्ट्रीय पातळीवर देशातील इतर मल्ल मेडलची लयलूट करत असताना महाराष्ट्र मात्र मातीतल्या कुस्तीत रमला होता… अवघं जग मॅटवरच्या कुस्तीवर घाम गाळत असताना महाराष्ट्राचे कुस्ती संघटक आपल्या मल्लांचा घाम आणि सरकारचा पैसा महाराष्ट्राच्या मातीत वाया घालवत होते. आजही महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा माती आणि मॅट अशा दोन्ही गटात खेळवली जाते आणि महाराष्ट्र केसरी किताबासाठी मातीतील विजेता अखेर मॅटवरच्या फायनलमध्ये मॅटवरच्या विजेत्या कुस्तीपटूला आव्हान देतो. साहजिकच मॅटवरचा कुस्तीगीर जिंकणार हे शेंबडं पोरही सांगू शकतं. पण आपल्या कुस्ती संघटकांना मात्र हे कधी उमगणार?

हेच कारण आहे गेली तीन वर्षं नरसिंग यादव महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब जिंकतोय. हे बरं झालंय की, नरसिंग यादव मुंबईत जन्मला आणि या महाराष्ट्राच्या कुस्ती संघटकांच्या तावडीतून सुटला. कांदिवली इथल्या स्पोर्टस् अॅथॉरिटी ऑफ इंडिया (साई)मध्ये मॅटवर त्याने कबड्डीचे धडे गिरवले आणि आज महाराष्ट्राच्या कुस्तीची लाज राखली. महाराष्ट्रात क्रिकेटनंतर सर्वाधिक पारितोषिकं मिळतात ती कुस्तीत. पण ही सारी रक्कम दिली जाते ती मातीतील कुस्तीला. नरसिंग यादवच्या या आशियाई क्रीडा स्पर्धेतील मेडलमुळे तरी महाराष्ट्राच्या कुस्ती संघटकांचे डोळे उघडो हीच काय ती अपेक्षा…!

नरसिंगची नियतीशीही झुंज…

नरसिंगच्या अंगी गुणवत्ता असूनही त्याला नेहमी नियतीच्या खडतर परीक्षेला सामोरं जावं लागलंय. भारतात झालेल्या कॉमनवेल्थ कुस्ती स्पर्धेतही सुमित कुमार उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे नरसिंगचा शेवटच्याक्षणी भारतीय संघात समावेश झाला होता आणि तिथे गोल्ड जिंकत त्याने आपलं कौशल्य दाखवून दिलं होतं. या आशियाई क्रीडा स्पर्धेतही जागतिक कुस्ती संघटनेने वजनी गटात बदल केल्याने सुशील कुमार हा ७४ किलो वजनी गटात खेळणार हे नक्की झालं होतं. दोन वेळचा ऑलिम्पिक विजेता असल्याने कोणतीही निवड चाचणी न घेता कॉमनवेल्थला सुशीलला पाठवण्यात आलं. सुशीलने गोल्ड मेडल जिंकल्यामुळे साहजिकच तो या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. पण ऐनवेळी सुशीलकुमारने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी येणं टाळल्यामुळे पुन्हा एकदा नरसिंगला शेवटच्याक्षणी भारतीय संघात संधी मिळाली आणि त्याने ती संधी साधत ब्राँझ मेडलची कमाई केली. नरसिंगच्या या जिद्दीला सलामच ठोकला पाहिजे…

गुरुदक्षिणा… आणि आदरांजली

कुस्ती हा तसा भारताचा प्राचीन खेळ. आपल्या महाभारतातसुद्धा त्याचे दाखले मिळतात. एवढ्या प्राचीन खेळात आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचं शेवटचं गोल्ड मेडल आठवण्यासाठीही तसं प्राचीन काळात जावं लागतं. भारताने १९८६ साली याच दक्षिण कोरियात शेवटचं आशियाई क्रीडा स्पर्धेतील गोल्ड मेडल जिंकलं होतं. करतार सिंगने भारताला १०० किलो वजनी गटात भारताला शेवटचं गोल्ड मेडल जिंकून दिलं होतं. भारताचं ते आशियाई क्रीडा स्पर्धेतील आठवं गोल्ड होतं. पण त्यानंतर गेली २८ वर्षं गोल्ड मेडलचा दुष्काळ होता. २८ वर्षांपूर्वीच्या त्या सोन्याला आज योगेश्वर दत्तने पुन्हा एकदा सुवर्ण झळाळी मिळवून दिली आणि इतकंच नव्हे तर आपले गुरू महाबली सतपाल सिंग यांनाही अनोखी गुरुदक्षिणा दिली. याच सतपाल सिंग यांनी दिल्लीत १९८२ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला एकमेव गोल्ड जिंकून दिलं होतं. एक चक्र आज पूर्ण झालं. पण त्यासाठी २८ वर्षं भारताला वाट पहावी लागली.

लंडन ऑलिम्पिकमध्येही योगेश्वर दत्तने भारताला ब्राँझ मेडल जिंकून दिलं होतं. आता त्याला वेध लागलेत ते रिओ इथे होणार्या ऑलिम्पिकचे… कॉमनवेल्थ, आशियाई कुस्ती आणि आता आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकल्यामुळे योगेश्वरचा आत्मविश्वास दुणावलाय.

यश हे योगेश्वरला कधीच सहजासहजी मिळालं नाही. २००८ सालच्या दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी विमानात चढत असतानाच वडिलांच्या निधनाची बातमी त्याला मिळाली. देशाचा गौरव की वडिलांचे अंत्यसंस्कार या दोघांपैकी योगेश्वरला एकाची निवड करायची होती. त्याने देशगौरवाची निवड केली. त्याला मी याबाबत विचारलं. त्यावेळी त्याचे डोळे भरून आले… पण दुसर्याच क्षणाला तो म्हणाला, ‘माझ्या वडिलांनीही मला अशा अवघड स्थितीत देशगौरवाची निवड करायला सांगितलं असतं.’ अशा या संकटाचा मुकाबला करून योगेश्वरने त्या दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्राँझ मेडल जिंकलं होतं. आज त्या ब्राँझ मेडलचा कलर त्याने सोनेरी केला. खर्या अर्थाने योगेश्वरने आपल्या वडिलांना सोनेरी आदरांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *