आपल्याला मोबाइलवर अनेकदा Unwanted calls येत असतात. त्यात बँक लोन किंवा नवीन उत्पादनाची माहिती देण्यासाठी टेलिमार्केटिंगवाल्यांचे कॉल्स असतात आणि आता निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी राजकीय नेत्यांचेही फोन येतात. असे कॉल्स सर्वांनाच त्रासदायक वाटतात. वेळीअवेळी हे कॉल्स येत रहातात. मोबाइल कंपन्यांकडे उपलब्ध असलेली Do Not Disturb ची सेवा घेतल्यास मार्केटिंग कॉल्स बंद होतात. मात्र कधीकधी अनोळखी व्यक्ती मुद्दाम त्रास देण्यासाठी सतत फोन करत राहतात. या प्रकारात आता वाढ झाली आहे. फोनवरून अश्लील बोलणं, अपशब्द वापरून त्रास देणं हा या कॉलर्सचा प्रमुख उद्देश असतो. प्रत्यक्षपणे काहीही करू न शकणारे अनेकजण आपली मानसिक विकृती अशाप्रकारे फोनकॉलद्वारे उघड करतात. अशा कॉलर्सना त्यांनी कोणाला फोन केलाय याच्याशी काहीही घेणंदेणं नसतं. केवळ मानसिक त्रास देणं इतकाच त्यांचा हेतू असतो. त्यात असे फोन करणारे शहराबाहेरचे असतात, त्यामुळे त्यांना पोलिसांची भीतीही नसते. ज्या लोकांना अशाप्रकारचा त्रास होतो, ते अनेकदा असा फोन नंबर Annoying Phone Number, Wrong Number अशा नावाने सेव्ह करतात आणि कॉल आला तर उचलत नाहीत. परंतु दुसर्यांना त्रास देण्यात आनंद मानणार्या व्यक्तिला अशा गोष्टींनी फरक पडत नाही. कॉल्स घेतले नाहीत तर अशा व्यक्ती मेसेजेस पाठवतात, ज्यात फोनला उत्तर द्या अशी धमकी देतात किंवा अश्लील जोक पाठवतात. आता अशावेळी पीडित व्यक्तिने नक्की काय करावं असा प्रश्न पडतोच. तरीही बहुतेकवेळी यासंदर्भात पोलिसांत तक्रार केली जात नाही आणि हीच खरी चूक ठरते.

शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या ६० वर्षांच्या कामिनीताईंना काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारचा त्रास सहन करावा लागला. गप्पा मारण्याची आवड असणार्या कामिनीताई मुलगा-सून आपापल्या कामावर गेल्यावर आपल्या लांबच्या नातेवाईकांना फोन करून त्यांच्याशी गप्पा मारत बसायच्या. फोनवर बोलण्याचा जणू त्यांना छंदच होता. असाच एकदा त्या घरात एकट्याच असताना त्यांचा मोबाइल वाजला. त्यांनी Display वर नंबर न पाहता कॉल उचलला पलीकडून कुणीतरी ‘हॅलो’ म्हटलं. कामिनीताईंनी ‘आपण कोण बोलत आहात?’ असं विचारल्यावर, ‘आप कौन?’ असं उलट त्यांनाच विचारण्यात आलं. कामिनीताई चिडल्या, ‘आप कौन, फोन क्यों किया?’ अशी त्यांनी विचारणा केली. त्या अनोळखी कॉलरला हे वागणं अपेक्षित असल्यामुळे त्याने बिनकामाच्या गप्पा मारायला सुरुवात केली. त्यावर रागावून कामिनीताईंनी फोन कट केला. मात्र तरीही त्या अनोळखी माणसाचा कॉल येतच राहिला. प्रत्येकवेळी कामिनीताई फोन उचलून तू पुन्हा फोन करू नकोस, असं बजावायच्या. परंतु तरीही त्याचा फोन येत राहिला. ५०-६० मिस कॉल्स आल्यानंतर कंटाळून त्यांनी तो नंबर Wrong Number या नावाने सेव्ह केला. पुढे तीन-चार दिवस त्याचा फोन आल्यावर नंबर पाहून त्या दुर्लक्ष करायच्या. फोन उचलत नसल्यामुळे त्याने मेसेजेस पाठवायला सुरुवात केली… ‘एक बार बात करलोगी तो क्या होगा जाना!’, तसंच ‘Darling, फोन तो उठाओ.’ अशाप्रकारचे घाणेरडे मेसेजेस जेव्हा कामिनीताईंनी वाचले तेव्हा त्या खूप अस्वस्थ झाल्या. साठ वर्षांच्या कामिनीताईंना कळेना की कुणी त्यांना असे कॉल्स का करेल? कामिनीताईंचं वय पाहता फोन करणारा नक्कीच त्यांना ओळखत नव्हता. आपल्या आईला फोनवर होणारा त्रास पाहून कामिनीताईंच्या मुलाने त्यांच्या मोबाइल कंपनीला फोन केला आणि दर महिना १०० रुपये भरून ‘कॉल फिल्टर सर्व्हिस’ अॅक्टिव्हेट केली, त्यात ज्या अनोळखी नंबरवरून कामिनीताईंना त्रास होत होता तो नंबर ब्लॉक केला. परंतु त्या सर्व्हिसमध्ये मेसेजेस ब्लॉक करण्याचा पर्याय नव्हता. कामिनीताईंना येणारे कॉल्स जरी बंद झाले तरी ते बंद करण्यासाठी त्यांना दर महिना १०० रुपये मोजावे लागत होते. तसंच अश्लील मेसेजेस येऊ शकत होते. त्यामुळे नक्की अशा कॉल्सचं काय करायचं हे त्यांना कळत नव्हतं. आपल्यालाही अनेकदा असे नकोसे कॉल्स येतात. पण त्याकडे दुर्लक्ष करू नका. इंटरनेटवर सर्च केल्यास तुम्हाला असे अनेक नंबर्स मिळतील. त्याच्यावरून लोकांना त्रास दिला जातो. दुर्लक्ष केलं किंवा कॉल फिल्टरसारखे पर्याय घेतले तर त्याने आर्थिक नुकसान आपलंच आहे.

 

कामिनीताईंनाही कॉल फिल्टर सर्व्हिस वापरणं किंवा दुर्लक्ष करणं जरी सोपा उपाय वाटत असला तरीही आपण अशा नंबरची तक्रार सायबर पोलीस स्टेशनला किंवा आपल्या लोकल पोलीस स्टेशनवर जरूर करावी. पोलीस त्यावर कारवाई करू शकतो. मुख्यतः असे नंबर उत्तर भारतातील असतात. फक्त दुर्लक्ष न करता त्यावर करेक्ट अॅक्शन घेतली पाहिजे. जर दुर्लक्ष केलं तर अशा विकृती समाजात वाढत राहतील. प्रत्यक्ष त्रास झाला तर आपण तक्रार करतोच परंतु अप्रत्यक्षरित्या फोनद्वारे कोणी त्रास देत असेल, छळत असेल तर त्रास सहन करू नका.

 सायबर अॅलर्ट ः

१) शक्यतो अनोळखी नंबर उचलू नका.

२) एखाद्या फोन नंबरवरून जर वारंवार मिस कॉल किंवा कॉल येत असल्यास तो नंबर इंटरनेटवर टाकून चेक करावा.

३) जर कुणी कॉलर मानसिक छळ होईल या दृष्टीने मेसेजेस पाठवत असेल, कॉल करत असेल तर त्वरित लोकल पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा.

४) त्रास देणारा नंबर सेव्ह करायची चूक करू नका. तुमच्याकडे चॅटिंग अॅप असल्यास शक्यता असते की तो कॉलर त्यावरही मॅसेजेस पाठवेल.

५) मोबाइल कंपन्या अनेक प्रकारच्या कॉल फिल्टरिंग सर्व्हिसेसनंतर ब्लॉक सर्व्हिस देतात परंतु त्या सर्वच पेड असतात. त्यामुळे अशा सेवा ड्डष्ह्लद्ब1द्ग करायच्याआधी याची माहिती घ्या.

पूनम सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *