शेक्सपिअर म्हणतो, ‘नावात काय आहे?’ पण काही व्यक्ती, काही कलाकृतीच अशा असतात की त्यांच्याबाबतीत शेक्सपिअरचं हे म्हणणं कमकुवत ठरतं. आपल्या मराठी रंगभूमीवर अशा काही कलाकृती होऊन गेल्यात की, ज्यांचं केवळ नाव उच्चारलं तरी त्या कलाकृती, ती नाटकं आपल्यासमोर उभी ठाकतात. त्या नाटकांची भव्यताही आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते… ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे चार शब्द उच्चारले तरी डोळ्यांपुढे उभे राहतात ते बहुआयामी ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल… उर्जेचा महास्रोत असंच प्रा. तोरडमल यांचं वर्णन करावं लागेल…

नुकताच ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचा पाच हजारावा प्रयोग सादर झाला. प्रयोग रंगमंच, मुंबई या नाट्यसंस्थेने हा प्रयोग सादर केला. पण या नाटकाच्या प्रयोगाचा इतिहास असा की, मुंबईबाहेर या नाटकाचे १० प्रयोग झाले आणि मुंबईत पहिला प्रयोग झाला तो ५ ऑक्टोबर १९७२ या दिवशी… प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरात हा मुंबईतील पहिला प्रयोग पार पडला होता. तिथून पुढे या नाटकाची घोडदौड यशस्वीरित्या सुरू झाली. या ४२ वर्षांत ‘नाट्यमंदार’, ‘चंद्रलेखा’, ‘रसिकरंजन’, ‘सुयोग’ आणि ‘रंगमंच’ अशा विविध महत्त्वाच्या नाट्यसंस्थांनी आजवर ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’चे प्रयोग सादर केलेत. पिढ्या बदलल्या, जीवनपद्धती बदलली, शिक्षणपद्धती बदलली तरीही आजच्या तरुण तुर्कांना आणि म्हातार्या अर्कांनाही ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे नाटक तितकंच आवडतंय. कारण वेगवेगळ्या वयोगटातील स्त्री-पुरुषांना परस्परांबद्दल वाटणारं सर्वकालीन आकर्षण हा या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. ‘प्रेम’ यासाठी काही निश्चित वयोगट नसतोच. प्रेमासाठी धाडस करायला कुणाला नाही आवडत? पण सगळ्यांनाच प्रेमात धाडस करणं जमतंच असं नाही. मात्र यार-दोस्तांची साथ लाभली तर न करू म्हणणारं मनही प्रेमाचं ते धाडस करायला सज्ज होतं.

हॉस्टेल लाइफ, हॉस्टेलमध्ये राहणारी मुलंमुली, आपापसांतील भांडणं, रेक्टर मॅडम नि सरांवर असणारा रोष… त्यातूनच लावल्या गेलेल्या पैजा… ती पैज जिंकण्यासाठीचं धाडस… यातून फुलत जाणारं प्रेम… पण हे प्रेम वयाची अट लादत नाही आणि म्हणूनच तुर्काकडून पार्वती काकू नि थत्ते चाचा या म्हातार्या अर्कांचं लावून देण्यात आलेलं लग्न प्रेक्षकांची दाद मिळवून जातं… ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकातील प्रा. बारटक्के यांचं हा… ही… हे… तर अफलातूनच आहे. आपलं अधुरं प्रेम मिळवण्यासाठी थत्ते चाचा वयाच्या ५०व्या वर्षी एफवायला अॅडमिशन घेतात नि बॉईज हॉस्टेलवर रहायला येतात. बंडा, प्यारेलाल, कुंदा (मुकुंदा) यांच्यासोबत थत्ते चाचा रूम शेअर करतात. बंडा, प्यारेलाल जरा गुंडप्रवृत्तीचे पण मनाने चांगले असलेले हे दोघं कुंदा या बायकी वाटणार्या रूमपार्टनरचा छळ मांडतात. थत्ते चाचा येतात नि बंडा, प्यारेलालला त्यांच्याच सारखं वागून मुकुंदाच्या मदतीने वठणीवर आणतात. पुढे या मुलांनाही थत्ते चाचा नि गर्ल्स हॉस्टेलच्या रेक्टर पार्वती देशपांडे यांच्या प्रेमाबद्दल कळतं. तेव्हा निसटलेलं ते प्रेम आता पुन्हा मिळवण्यासाठी थत्ते चाचांनी कॉलेजला अॅडमिशन घेतली असल्याचंही मुलांना कळतं आणि मग ही मुलंच थत्ते चाचा नि पार्वती काकूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू करतात. पण प्रा. बारटक्के यांचंही पार्वती काकूंवर प्रेम आहे, ही गोष्ट समोर येते नि जो काही गोंधळ उडतो त्याने प्रेक्षकांचं भन्नाटच मनोरंजन होतं… या नाटकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे नाटक सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठीचं नाटक आहे. तरुण तुर्कांचं जसं हे नाटक आहे तसंच म्हातार्या अर्कांचंही ते आहे. त्यामुळेच कॉलेजात जाणारा विद्यार्थी आणि कॉलेज पूर्ण करून संसाराला लागलेला नि त्याही पुढे निवृत्तीकडे झुकलेला अशा हरेक वयोगटातील प्रेक्षकाचं हे नाटक आहे आणि म्हणूनच ‘एव्हरग्रीन’ असंच या नाटकाचं वर्णन करावं लागेल.

‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचा हा संयुक्त असा ५००० वा प्रयोग सादर होताना त्यानिमित्ताने रंगमंच मुंबई, सहरंग आणि अमेय प्रकाशित ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क ५००० एक हास्ययात्रा’ ही स्मरणिकाही प्रकाशित करण्यात आली. या नाटकात गेल्या ४२ वर्षांत ज्यांनी वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्यात अशा प्रा. मधुकर तोरडमल, उपेंद्र दाते, मोहन मुंगी, राजन पाटील, मोहन साटम, डॉ. अपर्णा प्रभू या कलावंतांच्या नजरेतून ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाविषयीचे लेख या स्मरणिकेत प्रकाशित करण्यात आले आहेत. प्रा. मधुकर तोरडमल या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित होते. प्रा. बारटक्के ही भूमिका अजरामर करणारा हा ज्येष्ठ कलावंत या वयातही रंगमंचावर आला होता. यावेळी सचिन-सुप्रिया पिळगावकर, अशोक-निवेदिता सराफ या कलावंत जोड्यांनीही प्रा. मधुकर तोरडमल यांच्यासंबंधीच्या आठवणी जागवल्या. उपेंद्र दाते कठीण परिस्थितीत आणि आर्थिक संकटांना तोंड देत देतच हे मराठी रंगभूमीवरचं उत्तम नाटक आजही सादर करताहेत… याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *