एका भावाने टाळीसाठी हात पुढे केला. दुसरा भाऊ म्हणाला वर्तमानपत्रातून आवाहन करून टाळी कसली मागता? प्रत्यक्ष काय ते बोला ना? गेल्या निवडणुकीत हे टाळी प्रकरण गाजलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यातील टीकाटिप्पणी म्हणजे मोठ्या बातमीचा विषय. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही भावांना एकत्र करण्याची धडपड नितीन गडकरी यांनी केली होती. मात्र तेच अडचणीत आले. हे दोन्ही भाऊ लोकसभेत एकत्र येऊ शकले नाहीत. यापुढेही ते एकत्र येणार नाहीत अशी लोकांची अटकळ असताना विधानसभेत मात्र दोघांतील दरी अचानक कमी होत आहे. प्रचारात दोघांनीही एकमेकांना टार्गेट न करता टीकेची झोड उठवलीय ती भाजपवर. एका मुलाखतीत तर राज ठाकरेच म्हणालेत की मुंबई आणि महाराष्ट्राच्या मुद्यावर वेळ पडली तर शिवसेनेशी हातमिळवणी करेन. हे विधान पुढच्या राजकारणाचं निदर्शक आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचाराचं वातावरण तापलेलं आहे. या निवडणुकीत कधी नव्हे ती पंचरंगी लढत होत आहे. गेली पंचवीस वर्षं या राज्यात शिवसेना-भाजप युती आहे. १९९० पासून दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. तर काँगे्रसपासून फुटून शरद पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँगे्रसची स्थापना केली. दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले मात्र सत्तेसाठी एकत्र आले. २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत मात्र दोघांनीही शहाणपणा दाखवत आघाडी कायम ठेवली आणि सत्ताही भोगली. या निवडणुकीत मात्र सगळेच बिछडले. लोकसभेत महायुतीच्या प्रयोगाला यश मिळालं आणि देशात काँगे्रसविरोधी वातावरण तयार झालं. केंद्रात सत्ता हाती आल्याने भाजपने महाराष्ट्रातील सत्तेचंही मोठं स्वप्न पाहिलं. महायुती फुटली आणि आघाडीतही बिघाडी झाली. तिसरी आघाडी महाराष्ट्रात फारशी प्रभावीपणे तयार होऊ शकली नाही. त्यामुळे मनसे हा घटक रिंगणात असल्याने निवडणुकीत पंचरंगी लढत रंगते आहे.

या प्रचारात भाजपने आक्रमकपणे आपला प्रचार चालवला आहे. खरंतर आपल्या प्रचाराची तयारी भाजपने आधीच करून ठेवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याभोवतीच या प्रचाराची मोहीम फिरते आहे. मोदी अमेरिकेच्या दौर्याहून आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रचारात ठाण मांडून आहेत. राज्याच्या गल्लोगल्ली फिरून ते प्रचार करत आहेत. आपल्या या जुन्या मित्राचं राजकारण आधी उद्धव ठाकरे यांच्या उशिराच लक्षात आलं. मात्र त्यांनी स्वतःला सावरलं. मात्र आधी काय करायचं याबाबत त्यांना नीट भूमिका घेता आली नाही. निवडणुकीला उमेदवार म्हणून उभं रहाणं, मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित करणं, केंद्रातून मंत्रिपदाचा राजीनामा देणं याविषयी वेळीच भूमिका ठरत नव्हती. या सार्या गोंधळातच प्रचाराची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी आक्रमक होत प्रत्येक सभेत बाळासाहेब आणि बाबासाहेब हा मंत्र मांडणं सुरू केलं. भाजपसोबतची युती का तोडली हे सांगत त्यांनी आपल्या बाजूने सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही येत आहे.

हे सगळं सुरू असतानाच राज ठाकरे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करायला सुरुवात केली. राज ठाकरे आणि उद्धव यांनी मग हा टीकेचा सूर अधिक तीव्र केला. दोन्ही भावांनी हे ठरवून केलं की अनाहूतपणे भाजपला लक्ष्य केलं याबाबत सगळ्यांनाच कुतूहल आहे. महाराष्ट्र तोडण्याचा भाजपचा डाव आहे, हे दोघंही भाऊ आक्रमकपणे मांडत आहेत. महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असाच सगळा प्रचाराचा रोख आहे. मात्र यामुळे मराठी आणि गुजराती मतांत फूट पडली तर त्याचा दोन्ही भावांना फटका बसणार आहे. पण आता दोन्ही बाजूंनी वास्तविकता स्वीकारली जातेय असं चित्र आहे.

या निवडणुकीचा निकाल काय लागणार याचे अंदाज व्यक्त केले जातायत. यात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असं भाकीत केलं जात आहे. मात्र बहुमत पाचापैकी कोणत्याच पक्षाला मिळणार नाही हे सांगायला वेगळं गणित मांडायची गरज नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर समझोता करूनच सत्ता स्थापन करावी लागणार आहे. या सगळ्या परिस्थितीत दोन्ही भावांना हातमिळवणी करावी लागेल. या सगळ्याची मानसिकता आता ते तयार करत आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच राज ठाकरे जेव्हा निवडणुकीच्या काळात आजारी पडले तेव्हा उद्धवदादूने फोन करून राज यांची चौकशी केली. तर राजनेही आता महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेनेसोबत जाऊ असं जाहीरपणे म्हटलंय. महाराष्ट्राचं भलं काय व्हायचं ते होवो. पण एकत्र येण्यातच दोघांचं राजकीय भलं आहे, हे महाराष्ट्रातल्या माणसामाणसाला कळतं…

ते ?हणाले…

मुख्यमंत्री कुणीही होऊ द्या, सरतेशेवटी आपल्या जनसामान्यांचं एकच मत आहे. तुम्ही कुणीही काहीही करा पण आमचं भलं करा, आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करा पण जर तुम्ही त्या पूर्ण करत नसाल तर मग कशासाठी आहात तुम्ही तिथे?, सरतेशेवटी हे जे सगळं करणार आहात ते आमच्यासाठीच ना? आणि मग आमच्यासाठी करणार आहात तर त्याचा आमचाचं लिलाव चालल्यासारखं आम्हाला वाटतं, ते पाहिल्यानंतरआम्हाला हतबल होऊन नुसतं बघण्याच्या पलीकडे आमच्याकडे काहीच नाहीये असं वाटतं. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा आजपर्यंतच्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे त्यांच्यावर कुणी टीका करत असेल तर ती चुकीची आणि दुर्देवी आहे.

 – नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेते

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *