आशियाई क्रीडा स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी दक्षिण कोरियातील इंचिऑनच्या जमिनीवरून मावळणार्या सूर्याने एक आश्वासन भारतीय क्रीडा जगताला नक्की दिलंय आणि ते म्हणजे उद्याची उज्ज्वल पहाट फक्त आणि फक्त तुमचीच आहे! सतराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेची इंचिऑनमध्ये सांगता झाली आणि सगळ्यांनीच सुरुवात केली ती जमाखर्च मांडण्याची… मला खात्री आहे प्रत्येकाची पहिली नजर गेली असेल ती मेडल टॅलीवर आणि भारताच्या मेडल टॅलीतील क्रमांकावर… आकड्यात रमणार्या सगळ्यांनाच मी थोडासा निराश करू इच्छितोय, कारण २०१०च्या चीनमधील ग्वांझावच्या आशियाई क्रीडा स्पर्धेपेक्षा आपला क्रमांक दोनने घसरून सहावरून आठवर आलाय आणि हो, गेल्यावेळच्या ६५ मेडल्सच्या तुलनेत आठ मेडल्सही यंदा कमी आलीत. त्यात तीन गोल्ड मेडल्सचाही समावेश आहे आणि तरीही मी खूप उत्साहाने म्हणतोय की चला जग जिंकूया… तर त्याचं उत्तर सोपं आहे की, दरवेळी आकडे सत्य दाखवत असतातच असं नाही…
साधं उदाहरण देतो, गेल्या ग्वांझाव येथील स्पर्धेत बुद्धिबळ आणि रोलर कोस्टर असे खेळ होते ज्यात भारताला एकूण चार मेडल्स मिळाली होती. आणि भारताचे काही हुकमी मेडल विनर खेळाडू या स्पर्धेत उतरले नाहीत. ज्यात सुशील कुमार, लिएण्डर पेस, सोमदेव देववर्मन असे तीन खेळाडू होते, ज्यांच्याकडून तीन गोल्डची अपेक्षा होती. आता गणितबरोबर झालं की नाही… पण मी या आकड्यांच्या पलीकडे जाऊन बघतोय. ज्या पद्धतीने आपले खेळाडू इंचिऑनमध्ये खेळलेत ते पाहता भारताचा येणारा काळ हा उज्ज्वल असणार आहे. साधं उदाहरण देतो, या आशियाई स्पर्धेत भारताने चार गोल्ड मेडल्स अशी जिंकलीत जी आजवर भारताने कधीच आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकली नव्हती. त्यात नेमबाजीतील ५० मीटर पिस्तुल प्रकारात शूटर जीतू राय, तसंच सौरभ घोषालचा समावेश असलेल्या स्क्वॉशमध्ये टीम गोल्ड, महिला बॉक्सिंगमध्ये मेरी कोम आणि तिरंदाजीत भारतीय पुरुष टीमने मिळवलेल्या गोल्ड मेडलचा समावेश आहे. लक्षात घ्या, ही सतरावी आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. म्हणजे गेल्या ६४ वर्षांत भारत पहिल्यांदाच या क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल जिंकत होता. हे कमी की काय भारताने हॉकीत तब्बल १६ वर्षांनंतर गोल्ड मेडल जिंकलं, तेही फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून, या गोल्डमेडलमुळे भारत आगामी रिओ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरलाय, तसंच बॅडमिंटनमध्ये भारतीय महिलांनीही सांघिक गटात ऐतिहासिक कामगिरी करत ब्राँझ मेडल जिंकलं, भारताचं महिला बॅडमिंटनमधील हे पहिलं आशियाई मेडल ठरलंय.
आता वळूया खेळातील कामगिरीकडे, तर यंदा गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तुलनेत आपण कुस्तीत दोन मेडल्स, शूटिंगमध्ये एक मेडल, तिरंदाजीत एक मेडल, स्क्वॉशमध्ये एक मेडल, अॅथलेटिक्समध्ये एक मेडल आणि हो, बॅडमिंटनमध्येही एक मेडल जास्त जिंकलंय… थोडक्यात, काय तर भारताच्या खेळातील कक्षा रुंदावतायत आणि हो, मेडलचा कलरही बदलतोय…मग तुम्ही म्हणाल एवढं सगळं चांगलं होत असतानाही मेडल्स कमी कशी?… तर त्याचं उत्तर आपल्या भारतीय क्रीडा संघटनेच्या राजकारणात आहे. सगळ्यात पहिल्यांदा वळूया अॅथलेटिक्सकडे. या खेळात भारताला गेल्या ग्वांझाव इथल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पाच गोल्ड, दोन सिल्व्हर आणि पाच ब्राँझ मेडल्स होती. यंदा इंचिऑनमध्ये भारताच्या खाती अॅथलेटिक्समध्ये होती फक्त दोन गोल्ड, सीमा पुनियाने थाळीफेकीत तर महिलांच्या ४ बाय ४०० मीटर चमूने रिलेत गोल्डन कामगिरी केली. अॅथलेटिक्सच्या कामगिरीवर परिणाम हा होणारच होता… कारण दिल्लीतील कॉमनवेल्थ घोटाळ्यामुळे अॅथलेटिक्सचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी आणि त्यांच्या सहकार्यांना तिहार जेलची हवा खावी लागली. संघटनेत बजबजपुरी माजली. कोर्टकचेर्या आणि भ्रष्टाचाराचे नवेनवे उच्चांक यातच संघटना इतकी गुंतली की या बिचार्या खेळाडूंकडे लक्ष कोण देणार? या सगळ्याचा मानसिक परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर नक्की झाला.
दुसरं उदाहरण म्हणजे बॉक्सिंगचं. या आशियाई स्पर्धेच्या फक्त १८ दिवस आधी भारतीय बॅक्सिंग संघटनेची बंदी उठली. त्यांना अधिकृतपणे संलग्नता आणि इतर सोपस्कर होण्यासाठी नोव्हेंबर उजाडणार आहे. संघटनेतील निवडणूक गैरप्रकारामुळे जागतिक संघटनेने ही बंदी ठोठावली होती. या सगळ्या गोंधळामुळे बॉक्सिंग संघटनेचा एकही पदाधिकारी आशियाई क्रीडा स्पर्धेस येऊ शकला नाही. त्याचा फटका खेळाडूंच्या मनोबलावर झालाच. सरिता देवीचं उदाहरण तर ताजं आहे. जिंकणार्या मॅचमध्ये तिला पक्षपाती निर्णय देऊन हरवलं गेलं आणि तिची बाजू मांडायला तिथे कुणीच पदाधिकारी नव्हता.
अशा सगळ्या स्थितीतही भारतीय खेळाडूंनी गोल्डन कामगिरी केलीच. कबड्डीत भारताने इराणची कडवी झुंज पुरुष आणि महिला गटातही मोडून काढत सुवर्ण लयलूट केली. हे सगळंच चित्र आशावादी आहे. ब्राझिलमधील रिओ इथे २००६ साली होणार्या ऑलिम्पिकला अजून दोन वर्षं आहेत. केंद्रात आता मोदी यांचं नवं सरकार आलंय. या आशियाई स्पर्धेत जर मोदी यांच्या सरकारने सगळ्यात पहिला निर्णय जर कोणता घेतला असेल तर खेळाडू आणि पदाधिकार्यांच्या नातेवाईकांची सरकारी खर्चात होणारी फुकट सवारी बंद केली. हा पैसा गुणी खेळाडूंवर आता खर्च केला जाईल. काँग्रेसने मणिशंकर अय्यरसारखेक्रीडामंत्री या देशाला दिले होते, ज्यांनी जाहीर वक्तव्य केलं होतं की, खेळावरील हे पैसे देशातील गरिबी हटवण्यासाठी खर्च केले गेले पाहिजेत. त्यांच्या पक्षाच्या कलमाडी आणि इतरांनी त्याचं पालन करून भ्रष्टाचाराच्या माध्यामातून गेल्या चार वर्षांत स्वतःची गरिबी दूर केली आणि तरीही आपल्या खेळाडूंनी भारताची शान आपला घाम गाळून कायम राखली. आता या खेळाडूंची आणि खेळाचीही गरिबी दूर करण्याची जबाबदारी मोदींवर आहे आणि ते ती पूर्ण करतील असा विश्वास या खेळाडूंनाही आहे हे विशेष! थोडक्यात, या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या कामगिरीमुळे जग जिंकण्याची उमेद नक्की वाढलीय… इंचिऑनमधून भारताकडे निघताना आत्मविश्वासाची ही शिदोरी भारतीय खेळाडूंमुळे मी घेऊन परततोय… तुर्तास इतकंच. जयहिंद!