महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा यावेळी चिवडा झाला आहे. पाच पक्ष आपापली ताकद आजमावण्यासाठी एकमेकांसमोर उभे आहेत. नरेंद्र मोदीभायच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला जादूची कांडी सापडली आणि गुजराती मतांच्या ध्रुवीकरणाच्या जोरावर त्यांच्या पक्षातील पोरंटोरं, ऐरेगैरे, नथ्थू खैरेही आव्हानाची, यांना तुरुंगात टाकू, त्यांना धडा शिकवू अशी भाषा वापरू लागले. शिवसेनेच्या मनात एकदा आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवून पाहू अशी खुमखुमी होतीच, पण संधी नव्हती. लोकसभेत एवढ्या मोठ्या संख्येने आपले खासदार निवडून आल्याचं पाहिल्यानंतर त्यांना आपण एकदा ‘एकला चलो रे’चा डाव खेळून पहावा अशी सुरसुरी न येती तरच नवल. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा परिणाम खरोखरी कितपत होता हेही ताडून पहाणं उद्धव ठाकरे यांना गरजेचं वाटलं असावं.

सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसला यापेक्षा अधिक काही गमावण्याची शक्यता नाही याची खातरजमा पटलेली असल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना आता शरद पवारांना धडाच शिकवूनच टाकू आणि जुना हिशेब चुकता करू अशी इच्छा झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आता नाही तर कधीच नाही अशी ही निवडणूक असल्याची जाणीव झाल्यामुळे तेही ईरेला पेटले. कुठेच काही नाही अशी स्थिती झालेल्या राज ठाकरे यांना ही निवडणूक मात्र फलदायी ठरणार असल्यामुळे ब्ल्यूप्रिंट काढण्याची संधी प्राप्त झाली आणि ठिकठिकाणी सभा घेता आल्या. काहीच झालं नाही तर शिवसेनेबरोबर जाण्याचा पर्याय त्यांच्यासाठी सदैव खुला आहे. त्यांना कोणी नाही म्हणणारच नाही, याची खात्री आहे. अतएव २०१४च्या निवडणुकीचा पार चिवडा झालेला आहे.

अशावेळी जर कोणी फोफावत असतील तर ते निवडणुकीच्या निकालाची भाकितं करणारे. या निवडणूक भाकितांची खरं तर गरज काय असा प्रश्न आपल्यासारख्या सर्वसामान्यांना पडू शकतो. परंतु थोडं बारकाईने पाहिलं तर असं लक्षात येतं की या भाकितांच्या आधाराने आपापले व्यवहार करणारे, गुंतवणुकीचा निर्णय करणारे लोक समाजात असतात. उदाहरणार्थ, २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी-म्हणजे बर्याच आधी-आयसीआयसीआय बँक या नामांकित बँकेने सी-व्होटर नावाच्या निवडणूक अंदाज काढणार्या संस्थेचे संचालक यशवंत देशमुख यांना बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडून येत्या निवडणुकीचे अंदाज काढून घेतले. ते अंदाज काढण्यासाठी त्यांनी आपल्या कंपनीची १२०० माणसं कामाला लावली आणि अंदाज काढून दिला. त्याचा परिणाम काय झाला हे आपल्याला कळू शकत नाही. परंतु त्या अंदाजानुसार या बँकेने आपल्या विविध गुंतवणुकींचा विचार केला असावा. एवढंच नाही तर त्यांनी दिलेली मोठमोठी कर्जं रिशेड्युल करण्यासाठी या अंदाजांचा खूप फायदा बँकेसारख्या संस्थेला होऊ शकतो.

सी-व्होटर ही कंपनी चालवणारे यशवंत देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख यांचे चिरंजीव. त्यांचं बालपण संघाच्या छत्रछायेत गेलं असल्यामुळे त्यांची विचारसरणी संघविचारांशी जोडली गेलेली असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांच्या निवडणूक अंदाजात भारतीय जनता पार्टीला झुकतं माप दिलं गेलं तर त्यात नवल नाही. निवडणुकांच्या तोंडावर जाहीर केल्या जाणार्या निवडणूक अंदाजांचा परिणाम त्या निवडणुकीवर होतो हे उघड सत्य आहे. कुंपणावर असलेले मतदार हे बव्हंशी सरशी, तिकडे आपली मतं देतात असा अनुभव आहे. त्या मतांची संख्या ही सामान्यतः पाच ते सात टक्के एवढीच जरी असली तरीही त्यामुळे निवडणुकीच्या निकालांवर त्यांचा परिणाम होतो आणि जिंकणारा उमेदवार हरू शकतो आणि हरणारा उमेदवार जिंकू शकतो. निवडणूक अंदाज वर्तवणं आणि त्याचा धंदा करणं हा व्यवहार १९९१ सालानंतरच्या निवडणुकांपासून सुरू झाला. देशात पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारने अर्थव्यवस्था खुली केल्यानंतर देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या भूमिकेत बदल सुरू झाले आणि खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना देशाची दारं खुली झाली. त्या वाहिन्यांच्या जन्माबरोबरच निवडणुकांचा विषय पूर्वी कधीही नव्हता एवढा चर्चेत आला. त्यात पैसे असल्याचं लक्षात येताच सेफॉलॉजिस्टांची नवी जात जन्माला आली. ते वेगवेगळे हिशेब मांडून, गणितं करून कुडमुड्या ज्योतिषांच्या थाटात निवडणूक निकालांचे अंदाज काढू लागले.

परंतु वैयक्तिक अंदाजापेक्षा एखाद्या संस्थेने त्याला शास्त्रोक्त रूप दिलं तर ते अधिक खपेल असा अंदाज करून २०००च्या दशकात अनेक नव्या कंपन्या जन्माला आल्या. त्यात सर्वात आधी निवडणूक प्रक्रिया सुरूहोण्याच्याही आधी मतदारसंघाचं सर्वेक्षण करून जनमताचा अंदाज घेण्याचं काम ए. सी. नील्सन या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या भारतीय अवतारातील कंपनीने सुरू केलं. प्रारंभी ती कंपनी आपलं काम चोखपणे करत असे. त्याचवेळी विविध वाहिन्यांनी अशा कंपन्यांच्या मदतीने संयुक्तपणे निवडणूक चाचण्या करून त्यांचा निकाल जाहीर करायला सुरुवात केली. याचा परिणाम आपल्या हवा तसा न होता, काँग्रेसलाच फायदा होतो आहे हे लक्षात येताच त्याला विरोध करणारे न्यायालयात गेले आणि निवडणूकपूर्व अंदाजांवर बंदी आणण्याची मागणी केली जाऊ लागली, न्यायालयांनी काही अटी घालून तशी बंदीही घातली.

परंतु तोपर्यंत वाहिन्यांनी चांगला धंदा करून आपल्या अंदाजांच्या आधारे आपल्याच वाहिन्यांवर चर्चा वगैरे घडवून आणण्याचा प्रघात पाडला आणि सरकार जागं होण्याच्या आत जास्तीत जास्त वेगाने आपलं घोडं कसं दामटता येईल याचा विचार त्या वाहिन्यांनी त्या काळात केला. तोपर्यंत निवडणूक अंदाज देणार्या कंपन्यांनी आपापले हातपाय पसरून वेगवेगळ्या क्षेत्रात लोकमतांचे अंदाज काढून देण्याची कामं करण्याचा धंदा सुरूही केला होता.

येऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या चिवड्याच्या पार्श्वभूमीवर विविध कंपन्यांनी जाहीर केलेले अंदाज पहाणं मनोरंजक आहे. उदाहरणार्थ, ए. सी. नील्सन या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार शिवसेनेला १०७ जागा मिळून तो सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. त्यानंतर भारतीय जनता पार्टीला ७७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात ३६ जागा मिळतील. सत्तेतून पायउतार झालेल्या काँग्रेस पक्षाला ५१ जागांवर समाधान मानावं लागेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नील्सनने ११ जागा दिल्या आहेत. अपक्ष किंवा इतर या वर्गात ६ जागा निवडून येतील असा अंदाज ए. सी. नील्सनने व्यक्त केलेला आहे. ए. सी. नील्सनच्या अशाप्रकारचा अंदाज घेण्याचं काम करणार्या विभागाचे प्रमुख बापट यांचा रा. स्व. संघाशी जवळून संबंध होता. त्यामुळे त्यांचा कल काहीसा भाजपाच्या बाजूने आहे असं म्हटलं जातं.

‘झी २४ तास’ या बातम्या देणार्या वाहिनीने आपले निवडणूक अंदाज जाहीर केलेले आहेत. ‘झी’चे मालक सुभाषचंद्र गोयल (आपलं नाव फक्त सुभाषचंद्र एवढंच लिहावं असा त्यांचा फतवा आहे पण ते आगरवाल समाजाचे आहेत हे लपून रहात नाही) हरयाणातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या मालकीच्या या वाहिनीने जाहीर केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात भाजपाला ९० जागा, शिवसेनेला ५१, काँग्रेसला ७२ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३८ जागा मिळतील असं वर्तवण्यात आलं आहे. त्यांनी मनसेला सहा जागा दिल्या आहेत. ‘झी २४ तास’ या वाहिनीच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परंतु अत्यंत खुबीने भाजपाचा प्रचार केला जातो. आता तर त्यांचे मालकच भाजपाच्या तिकिटावर उभे राहिल्याने त्यांच्या अंदाजावर भाजपाचा प्रभाव असणं अपरिहार्य आहे.

पी. कुमार नावाच्या माणसाच्या मालकीच्या ‘टुडेज् चाणक्य’ नावाच्या कंपनीने गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त केलेला होता. परंतु त्यांचा तोल भाजपाच्या बाजूचाच असतो असं म्हणून लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. नंतर जेव्हा खरोखरीच देशात भाजपाने काँग्रेसचा धुव्वा उडवला तेव्हा चाणक्यच्या अंदाजाकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं. यावेळच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत त्यांनी केलेल्या अंदाजानुसार भाजपाला १३० जागा मिळणं अपेक्षित आहे. १३० जागाच शिवसेनेने भाजपाला देऊ केलेल्या होत्या. जर तेवढ्याच जागा त्यांच्याकडे असत्या तर त्यांना १०० टक्के यश मिळाल्याचा दावा करता आला असता. शिवसेनेला चाणक्यने ५२ जागा दिलेल्या आहेत. काँग्रेसला २६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ३० जागा मिळतील असा त्यांचा अंदाज आहे. मनसेला १३, इतर या वर्गात ११ तर स्वाभिमानी पक्षाला दोन आणि रिपब्लिकनला दोन जागा मिळतील असा चाणक्यचा अंदाज आहे.

निवडणुकांचे अंदाज वर्तवणार्या कंपन्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या कंपन्या आपले अंदाज कोणत्या सँपलच्या आधारे व्यक्त केले हे जाहीर करत नाहीत. शिवाय आपण अंदाज वर्तवण्यासाठी कोणत्या कार्यपद्धतीचा अवलंब केला हेही ते जाहीर करत नाहीत. त्यामुळे हे अंदाज बव्हंशी पैसे कमवण्याचं आणि मतदारांना भुलवण्याचं साधन म्हणून सध्या तरी वापरलं जातं असं म्हणता येईल. निवडणुकीचा चिवडा वाहिन्यांच्या गल्ल्यासाठी अधिक चटकदार व्हावा यासाठीच त्याचा वापर होतो. त्यापलीकडे त्याला फार किंमत देऊ नये हेच खरं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *