भाजपचे खंदे नेते आणि मराठवाड्याचं खंबीर नेतृत्व अशी ज्यांची संपूर्ण राजकारणात ओळख होती त्या भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं होतं. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचं तेव्हा म्हटलं  गेलं. इतकंच नाही तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही मुंडे यांच्या अपघाताची सखोच चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. यामुळेच केंद्र सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं. सीबीआयने गोपीनाथ मुंडे यांच्या अपघातप्रकरणीचा अहवाल सादर केलाय. या अहवालात मुंडे यांचा अपघातामुळेच मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूमागे घातपात नाही, तर तो अपघात होता असा निर्वाळा चौकशी अहवालात देण्यात आलाय. गोपीनाथ मुंडेंच्या अपघाताची सीबीआयमार्फेत चौकशी करण्यात आली. पण, तो अपघातच होता, असं सीबीआयच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांची मुलगी आणि भाजप आमदार पंकजा मुंडे यांनीही हा अहवाल आपल्याला मान्य असल्याचं म्हटलंय.

३ जून रोजी नवी दिल्लीत सकाळी गोपीनाथ मुंडे यांच्या कारला एका इंडिका कारने धडक दिली होती. त्यात मुंडे यांचा मृत्यू ओढावला. पण, हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचं सांगत शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या घटनेची संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी केली होती. तर राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आणि गोपीनाथ मुंडेंचे पुतणे, आमदार धनंजय मुंडे यांनीही आता अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. भाजपच्या नेत्यांनीही केद्रीय गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी लावून धरली होती. अखेरीस सीबीआयने या प्रकरणाची चौकशी केली असून त्यांनी मुंडेंचा मृत्यू अपघातामुळेच झाल्याचा निर्वाळा दिलाय.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सीबीआयचा हा अहवाला आला आहे. यामुळे आता या अहवालाबाबतही कोणकोणत्या प्रतिक्रिया उमटतात हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच या घटनेबाबत भाजप नेते नितीन गडकरी यांच्यावरही संशय व्यक्त केला गेला होता. गडकरी यांना मराठवाड्याच्या जनतेच्या रोषालाही त्यावेळेस सामोरं जावं लागलं होतं. निवडणुकीच्या प्रचारासाठीही नितीन गडकरी यांना मराठवाड्यात कार्यकर्त्यांनी प्रवेशबंदी केली आहे. यामुळेही सीबीआयने सादर केलेला हा अहवाला अत्यंत महत्त्वाचा आहे.

 

 

पाकचा सीमेवर धुमाकूळ सुरूच

देशात बकरी ईद साजरी केली जात असतानाच पाकिस्तानने मात्र प्रत्यक्ष ताबारेषा आणि सीमेला लक्ष्य करत हल्ले चढवले आहेत. पूँछ आणि जम्मूच्या परिसरात पाक सैन्याने केलेल्या उखळी तोफांचा मारा आणि अंदाधुंद गोळीबारात ५ भारतीयांचा मृत्यू झाला असून, ३४ जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

भारतीय लष्करानेही या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं असून, आपल्या बाजूकडे चारजणांचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांतच दहाहून अधिकवेळा पाकने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. यामुळेच सीमेवरील हा धुमाकूळ तातडीने थांबवावा, असा इशारा आता केंद्र सरकारने पाकिस्तानला दिला आहे.

प्रत्यक्ष ताबारेषा आणि जम्मू जिल्ह्यातील अरणिया पट्ट्यातील १० चौक्या आणि नागरी वस्तीवर पाकिस्तानच्या सैन्याने मोठ्या प्रमाणावर गोळीबार तसंच तोफगोळ्यांचा मारा केला. ताबारेषेवरील भिंबर गली इथेही पाकिस्तानने तोफगोळ्यांचा मारा केल्याचं संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितलंय. गोळीबाराच्या फैरीत निष्पाप गावकर्यांचा जीव तर गेलाच, पण अनेकजण जखमीही झालेत. घरांच्या भिंतींमध्येही गोळ्या घुसल्या आहेत. काहींची दुभती जनावरं मारली गेलीत. गोळीबाराने भयभीत झालेल्या काही गावकर्यांनी सीमेवरील घरं सोडून अन्यत्र आश्रय घेतला आहे.

पाकिस्तानकडून अशाचप्रकारे शस्रसंधीच उल्लंघन होणार असेल, तर त्याला चोख प्रत्युत्तर द्यायला भारतीय लष्कर सज्ज आहे, असं संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलंय. तर, पाकिस्तानने अशा कारवाया तातडीने थांबवाव्यात. भारत आता बदलला असल्याने यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा दम केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलाय.  जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

तसंच सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीच्या प्रथेनुसार यंदा बकरी ईदनिमित्त दोन्ही देशांच्या सैन्यांत मिठाईची देवघेव झाली नाही. ईदच्या दिवशी पंजाब प्रांतातील पाकिस्तानच्या सैन्याने मिठाई स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर भारतीय लष्करानेही आग्रह न करता आपल्या बाजूकडील गेट बंदच ठेवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *