नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन करत सत्तेच्या खुर्चीत विराजमान झालेले नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्रं सांभाळताच येणार्या भविष्यकाळात अडसर ठरू शकणार्या एकेकाला दूर करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. याचे पहिले बळी ठरले ते खुद्द त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मुरली मनोहर जोशी. तांदळातून खडा बाजूला सारावा तसं या दिग्गज नेत्यांना मोदी यांनी अतिशय अपमानास्पद पद्धतीने पक्षातून रिटायर्ड हर्ट म्हणून घोषित केलं. लगोलग अंबानी समूहाला हाताशी धरून गोधराचं भूत मानगुटीवर बसवून ठेवणार्या राजदीप सरदेसाई यांच्या नेतृत्वात चालणार्या आयबीएन वृत्तसमूहाला ताब्यात घेतलं. राजदीप सरदेसाई, सागरिका घोष, निखिल वागळेंसारख्या धोका ठरू शकणार्या पत्रकारांचे पंख छाटायला मोदींनी जराही वेळ लावला नाही.

भारतीय पत्रकारितेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला लगाम घालण्याचं पहिलं उदाहरण राजदीप सरदेसाईंच्याच रूपाने आपल्याला पहायला मिळालं. खरंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील प्रत्येक हल्ला कायम निंदनीयच असला पाहिजे. परंतु अमेरिकेतील मॅडिसन स्क्वेअरच्या आवारात जे काही घडलं ती स्पष्ट अशी मुजोर मुस्कटदाबीच होती. लोकशाही राष्ट्राचे अप्रवासी नागरिक असलेल्यांकडून अशाप्रकारचं वर्तन अजिबातच अपेक्षित नव्हतं. निवडणुकीआधी मोदींना झालेला विरोधाचा पॅटर्न हा केवळ त्यांच्या अतिकडव्या हिंदुत्ववादी इमेजला धरून होता. त्याच्या जोडीला गोधरा कांडाचं पापदेखील होतंच. परंतु अनियंत्रित सत्तेत विराजमान होताच मोदींचे अनेक नवे रंग या देशाला पहायला मिळू लागले. मोदी हे कॉर्पोरेट घराण्यांचेच प्रधानसेवक असून त्यांच्या हितसंबंधांना कुठेही धक्का पोहोचणार नसल्याची काळजी घेणारे संवैधानिक सीईओ आहेत की काय असंच वाटू लागलं आहे. त्यांना चिकित्सा, लोकशाही, विचार स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य मान्यच नाही असाच आविर्भाव कायम अधोरेखित होतो आहे. साहजिकच त्यांच्या अंधभक्तांमध्येसुद्धा या सुप्त गुणांचा भलताच चेव चढलेला दिसून येतो आहे. त्याचंच सर्वात मोठं उदाहरण हे राजदीप सरदेसाईंवर लोकांनी केलेल्या शाब्दिक हिंसाचारात दिसून येतं.

आता या प्रकरणाचा नेमका घटनाक्रम आपण तपासून पाहू. तो तपासत असताना सोशल मीडियावरचे अनेक पुरावे इथे सादर करत आहे. त्यांचं आपण बारकाईने निरीक्षण केल्यावर आपल्याला अनेक गोष्टी सहजपणे उलगडून पाहता येतील.

१. अमेरिकेने गेल्या बारा वर्षांपासून नरेंद्र मोदी यांना ह्युमन राईट्स व्हायोलेशनचा ठपका ठेवून व्हिसा नाकारला आहे. अमेरिकेतील अनेक वृत्तपत्रांत मोदींच्या दौर्यापूर्वी यासंबंधीच्या बातम्यासुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत. या वृत्तात मोदींनी बराक ओबामा यांच्या सोबत डिनरला दिलेला नकार ही क्षुल्लक गोष्ट असल्याचं म्हणत हा दौरा केवळ सदिच्छा भेट असून या भेटीत कोणत्याही धोरणात्मक मुद्यांवर चर्चा केली जाणार नसल्याचंदेखील म्हटलं आहे.

२. भारतीय माध्यमांत या दौर्याबाबत कमालीची उत्सुकता होती. जवळपास प्रत्येक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीने आपापले प्रतिनिधी अमेरिकेत डेरेदाखल केले आहेत. मोदींच्या एकूण एका पावलाचं वृत्तांकन भारतीय माध्यमांत सातत्याने होत आहे. राजदीप सरदेसाई हे ‘इंडिया टुडे’ या वृत्तसमूहाच्या ‘हेडलाइन्स टुडे’चे प्रतिनिधी म्हणून तिथे हजर होते.

३. मोदींच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील इव्हेंटपूर्वी राजदीप यांनी सेंटर बाहेर उपस्थित असलेल्या अप्रवासी भारतीयांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे जमलेल्या जमावाने राजदीप मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. राजदीप यांनी गोधरा कांडाचा लावून धरलेला विषय, मोदींनी करण थापर यांच्या मुलाखतीतून काढलेला पळ आणि आयबीएन ग्रूपमधून त्यांनी दिलेला राजीनामा ही कारणं लोकांच्या रोषाला पुरेशी होतीच. परंतु राजदीप यांनी सकाळी मोदींबाबत केलेला ट्वीट मात्र तत्कालिक कारण ठरलं.

४. चेकाळलेल्या मोदीभक्तांनी राजदीप यांना भडकावलं. धक्काबुक्की केली. त्याचं तिथे जमलेल्यांनी रितसरपणे शूटिंग केलंच होतं. ही घटना घडल्यानंतर तात्काळ २७ सेकंदाचं एक फुटेज ट्विटर आणि फेसबुकवर अपलोड करण्यात आलं. या फुटेजमध्ये राजदीपच जमावातील काही लोकांच्या अंगावर धावून जात मारहाण करत असल्याचं दाखवण्यात आलं.

५. घटनास्थळी उपस्थित असलेल्या हर्षवर्धन यांनी या प्रकरणामागील हकीकत उलगडणारी पोस्ट फेसबुकवर अपडेट केली. जमावाने राजदीप यांना ट्वीटबद्दल विचारणा करत मुर्दाबादच्या घोषणा देणं सुरू केलं. परंतु राजदीप यांनी त्यांच्या विरोधाला हसून टाळल्याने चिडलेले मोदीभक्त सरळसरळ त्यांच्या अंगावरच धावून गेले होते. तेव्हा आत्मसंरक्षणासाठी राजदीप यांनीदेखील प्रतिकार केलाच.

नरेंद्र मोदींनी मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या भाषणात इतिहासातील अनेक घटनांचा चुकीचा संदर्भ देण्यात पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांच्या बॅक ऑफिसचाच गृहपाठ कमी पडत असावा. या भाषणाच्या इव्हेंटला जे अप्रवासी भारतीय जमले होते, त्यात अर्ध्याहून अधिक गुजरातीच होते. अधूनमधून कॅमेर्याच्या क्लोजअप शॉटमध्ये दाखवले जाणारे टोपी घातलेले मुस्लीम समाजाचे लोक हे बोहरी मुसलमान होते. देशातील बोहरी मुसलमानांचा बहुतांश समाज उद्योगधंद्यात असून त्यांचे बरेचसे उद्योग हे गुजरात, राजस्थान, मुंबईच्या किनारपट्टीतील भागांशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांची तिथे उपस्थिती असणं आश्चर्यकारक नव्हतंच. थोडक्यात काय तर मोदींच्या वाक्यावाक्याला टाळ्या वाजवणारे लोक व्यापारी वर्गातीलच होते. या व्यापारी वर्गाकडूनच संघपरिवार आणि भाजपाला मोठ्या प्रमाणात फंडिंग होत असतं.

अमेरिकेतील ज्या गुजराती समाजाचा मोदी यांनी कैवार घेतला आहे. त्याच लोकांना आज देशभक्तिचे उमाळे फुटू लागले आहेत. तसंही आपल्या माध्यमांत परदेशात अतिसुखासीन आयुष्यासाठी जाऊन वसणार्या अनेक आयआयटीयन्स् आणि आयआयएमच्या माजी सदस्यांच्या बेगडी देशप्रेमाचं भलतंच अप्रूप असतं. त्यांना गोंजारण्यात भारतीय माध्यमं कधीच मागे पडत नाहीत. मीडिया प्रॉडक्ट असलेले मोदीसुद्धा या गोष्टीला एका पॉलिटिकल डीलसारखंच पुढे रेटत आहेत.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून फक्त उद्घाटनांच्याच कार्यक्रमात मश्गूल आहेत. मंगळ मोहिमेचं श्रेय लाटण्यातदेखील ते अग्रेसर राहिले. OCI आणि PIO कार्ड्सच्याबाबतीत डॉ. सिंग यांनी केलेली घोषणा आणि पूर्तिसुद्धा मोदींनी भर सभेत आपल्या नावावर खपवली.

बरं मॅडिसन स्क्वेअर हे मोठमोठ्या इंटरनॅशनल रॉकस्टारच्या इव्हेंटसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. मोदींच्या टाळ्या खाणार्या संवादांवर लो अँगल सीन, लार्जर दॅन लाइफ इमेज क्रिएट करता येईल अशी प्रॉपर सिनेमॅटोग्राफीची चोख व्यवस्था केलेली जाणवत होती.

या भाषणादरम्यान टाळ्यांचा आवाज येताच सेंटरमधल्या त्या त्या ठिकाणचा कॅमेरा ऑनलाइन आणून एकूण उत्तम व्यवस्था पार पाडली जात होती. जवळपास सर्वच न्यूज चॅनेल्सवर मोदीनामाचा गजर चालू असताना मात्र सोशल मीडिया आपलं काम उत्तमप्रकारे निभावत होतं. ट्विटरवर #ModiAtMadison आणि #IStandWithRajdeep हे दोन ट्रेंड तुफान फॉर्मात होते. त्यापैकी #IStandWithRajdeep हा ट्रेंड मोदींपेक्षाही अधिक लोकप्रिय होता हे विशेष.

मोदींचा निषेध करणार्या आंदोलकांची एकही बातमी कोणत्याच वृत्तवाहिनीवर झळकत नसताना अनेक आंदोलकांनी सोशल मीडियावर फोटोंची भरमार सुरू केली.

मोदीभक्तांच्या फोटोशॉप स्किलला आपण याआधीच अनुभवलेलं आहे. हाँगकाँग, बिजींगमधले रस्ते, बससेवा, गुजरातच्या नावाने खपवणार्यांनी या खेपेला ‘इंडिया टिव्ही’चे सर्वेसर्वा रजत शर्मा यांनाच टार्गेट केलं.

भारताचे प्रधानमंत्री ऊर्फ प्रधानसेवक यांच्या भाषणात ज्या पद्धतीने ‘मैं’, ‘मेरा’च्याच वल्गना असतात त्याचपद्धतीने अथवा कमी-अधिक फरकाने मोदीभक्तांच्या वागण्यात मुजोरी भरलेली कायमच आढळून आली आहे. मोदींचा अमेरिका दौरा हा फक्त त्यांनी त्यांचं उट्टं काढण्यासाठीच आयोजित केलेला असल्याचं वारंवार जाणवून आलं आहे, यात तिळमात्र शंका नाही. खरं तर आपण एखाद्या देशात पाहुणे म्हणून जातो तेव्हा त्या ठिकाणी आपले अनावश्यक राष्ट्रवादीप्रेम आक्रस्ताळपणाने व्यक्त न करण्याचा एक संकेत असतो.

मोदींनी हा संकेतसुद्धा पाळलेला नाही. याबद्दल कालांतराने अनेक जाणकार मत व्यक्त करतीलच. परंतु तूर्तास मोदींचा अमेरिका दौरा हा भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्याऐवजी भारताची प्रतिष्ठा पणाला लावणारा ठरत आहे. भारतीय लोकशाहीचं यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं…???

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *