राज्यात निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. सगळीकडचं राजकीय वातावरण तापलंय. ऑक्टोबर हीटपेक्षाही ही निवडणुकीची गर्मी तीव्र आहे. प्रत्येक पक्ष नि उमेदवार विधानसभेची ही निवडणूक जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतोय. भर उन्हात उमेदवार प्रचारयात्रांमधून मतदारराजाच्या भेटीला येतोय. त्यांच्याकडे मतांचा जोगवा मागतोय. निवडणुकीचं हे चित्र महाराष्ट्रातील हरेक जिल्ह्यात, तालुक्यात, गावागावांत पहायला मिळतंय. यातच ही विधानसभा निवडणूक चार महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आलेली आहे आणि लोकसभेचे देशभरातील निकाल पाहता ही विधानसभा निवडणूक जिंकणं भाजप वगळता सर्वच पक्षांसाठी आव्हानात्मक आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने देशभरातील सर्वच पक्षांना मागे टाकत एक हाती सत्ता मिळवली. यामुळे या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा आत्मविश्वास वाढलेला असणं स्वाभाविक आहे. मात्र अन्य पक्षांसाठी ही निवडणूक फारच जिकरीची आणि अस्तित्वाच्या लढाईची आहे. अशातच अनेक वर्षांनंतर यंदाची विधानसभेची निवडणुकही सर्वच पक्ष स्वबळावर लढवत आहेत. कोणतीही आघाडी, युती नसलेली ही निवडणूक म्हणूनच आता पंचरंगी निवडणूक बनली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली घराणेशाहीची कीड अद्याप जिवंत आहेच. त्यामुळे याही निवडणुकीत अनेक राजकीय वारसाहक्क सांगणारेच उमेदवार रिंगणात आहेत. असाच एक घराणेशाहीचा वारसा सांगणारा परिवार कोकणातून निवडणुकीच्या मैदानात उतरलाय… अर्थातच हे कुटुंब म्हणजे राणे कुटुंब…

कोकण हे जागतिक पातळीवरचं पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं एक ठिकाण आहे. जगभरातील पर्यटक कोकणात येत असतात. कोकणचं सौंदर्यही तितकंच देखणं आहे. कोकणला लाभलेले सागरी किनारे या पर्यटनात अधिकच भर घालतात. मात्र कोकण म्हणजे केवळ समुद्रकिनारे किंवा मासे नाही… तर कोकणाचा बराचसा भाग सह्याद्रीच्या कुशीत विराजमान आहे. डोंगरमाथ्यांनी नटलेला हा कोकण अद्याप नावारूपाला आलेला नाहीय, याचं कारणच मुळात अपुरी राजकीय इच्छाशक्ती आहे, असंच म्हणावं लागेल… रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन बड्या जिल्ह्यांनी व्यापलेला हा कोकण आहे. अशा या कोकणातील कणकवली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर नितेश राणे निवडणूक लढवत आहेत. नितेश यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान जो कोकण पहायाला मिळाला तो अतिशय दुर्गम कोकण म्हणूनच आजही ओळखला जातोय.

सध्या कणकवली, कुडाळ नि एकूणच कोकणची लाल माती निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे भलतीच तापली आहे. संपूर्ण सिंधूदुर्ग जिल्हा ताब्यात असलेल्या नारायण राणेंनी यंदाची विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. लोकसभा निवडणुकीत चिरंजीव निलेश राणे यांचा झालेला पराभव राणेंच्या जिव्हारी लागला नसता तरच नवल… या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि सिंधुदुर्गासारखा तळकोकणाचा आपला बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी म्हणूनच आता ‘राणे’सेना शर्थीचे प्रयत्न करतेय. काँग्रेस पक्षाचे विधानसभा निवडणुकीचे प्रचारप्रमुख नारायण राणे स्वतः कुडाळमधून निवडणूक लढवत आहेत तर चिरंजीव नितेश राणे याला त्यांनी कणकवली मतदारसंघातून मैदानात उतरवलंय. कुडाळ मतदारसंघाची तशी फारशी तमा नारायण राणेंना वाटत नाहीय. त्यामुळे त्यांचंही लक्ष कणकवलीतील लढतीकडेच अधिक आहे. दुसरीकडे नितेश राणेंनी काँग्रेसच्या तिकिटावर कणकवलीतून उमेदवारी मिळवून लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कसर भरून काढण्यासाठी कंबर कसली आहे.

वडील नारायण राणे यांच्या पावलांवर पाऊल टाकत राजकारणात पाय रोवू पाहणारे नितेश राणे हे निलेश राणेंपेक्षा दोन पावलं पुढे आहेत, असं म्हणायला हरकत नाही. कारण वडील जरी संपूर्ण काँग्रेस पक्षाचे प्रचारप्रमुख असले तरीही नितेश यांनी स्वतःच्या स्टाईलने आपली प्रचाराची यंत्रणा राबवायला सुरुवात केलीय. नितेश राणे यांच्या कणकवली मतदारसंघातील बराचसा भाग हा डोंगराळ प्रदेश आहे. भैरवगडाच्या कुशीत अनेक गावं वसलेली आहेत. मतदारांची खूप मोठी मोट या दुर्गम अशा डोंगराळ भागात आहे, याचा संपूर्ण अभ्यास करूनच नितेश राणे स्वतःचा प्रचार करत आहेत. नितेश यांनी स्वतःच्या स्टाईलची प्रचारयंत्रणा अंमलात आणताना त्यांनी सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाच्या पारंपरिक जाहीरसभांनाच फाटा दिला आहे. कणकवली मतदारसंघात बड्या नेत्यांच्या जाहीर प्रचारसभा न घेता नितेश यांनी वेगळाच मार्ग अवलंबला आहे. नितेश वाडीवस्तीवर जाऊन प्रत्येक गावातील प्रत्येक वाडीतील लोकांशी थेट संपर्क साधत आहेत. मोठ्या सभा न घेता अशाप्रकारे छोट्या छोट्या गावसभा घेण्यावर नितेश राणे अधिक भर देत आहेत. यामुळे त्यांना लोकसभेत राणे कुटुंबाकडून नेमक्या कोणत्या चुका झाल्यात, मतदार का नाराज झालाय हे जाणून घेणं अधिक सोपं जातंय… इतकंच नाही तर आपला विजय निश्चित करण्यासाठी आणि लोकसभेला फुटलेली मतं पुन्हा मिळवण्यासाठी नितेश राणे लोकसभा निवडणुकीची मतदारयादीच सोबत घेऊन फिरताहेत. या यादीत कुठल्या गावातून किती मतं लोकसभा निवडणुकीत फुटली त्याची आकडेवारी नमूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे नितेश राणे जेव्हा त्या त्या गावात जातात तेव्हा ते तिथल्या मतदारांना थेट आकडा सांगूनच ही मतं का फुटली? आमचं काय चुकलं? असा थेट प्रश्न विचारताहेत. नितेश राणेंची ही नवी प्रचाराची स्टाईल त्यांच्या कितपत पथ्यावर पडतेय हे निकाल लागल्यानंतरच कळेल…

कणकवली मतदारसंघात नरडवे नावाचं जवळपास सहा-सव्वासहा हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे. नरडवे धरणग्रस्तांचं हे गाव आहे. डोंगराच्या कुशीत नरडवे धरण बांधलं जात आहे. यामुळे या गावात येण्याजाण्यासाठीचा रस्ता अतिशय बिकट आहे. जंगलातून खडकाळ वाट काढत या गावात आजही ये-जा करावी लागतेय. पावसाळ्यात तर इथलं एकूणच जीवनमान विस्कळीत होतं. हा नरडवे धरणाचा गाव जवळपास १५० घरांचा गाव आहे. २००१ साली या धरणाचं काम सुरू झालंय. मात्र अद्यापही ना धरण बांधून झालंय आणि नाही तिथल्या धरणग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात आलंय. याबाबत इथल्या ग्रामस्थांचा प्रचंड रोष राणे कुटुंबाला सहन करावा लागतोय. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं हे पहिलं कारण होतं… कारण धरणग्रस्तांना पर्यायी जमीन म्हणून केवळ ४ गुंठे जागा देण्यात आलीय. मात्र त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन असलेली शेतजमीन अद्याप त्यांना मिळालेली नाही. ही शेतजमिनीची मागणी लोकसभा निवडणुकीतही केली गेली होती. मात्र तेव्हाही त्याची पूर्तता झाली नाही. नितेश राणेंनी मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने नरडवे धरणग्रस्तांना तसं आश्वासन दिलंय खरं…

याच नरडवे गावात भैरवगाव, महमद वाडी, गावठाणवाडी अशा वाड्याही आहेत. या सर्वच वाड्यांमध्ये डोंगरवाटा तुडवतच आजही जावं लागतंय. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत ताब्यात असलेल्या राणेंच्या मतदारसंघात आजही रस्त्यांचा प्रश्न पेंड खात पडलाय. केवळ मुंबई-गोवा महामार्ग विकसित करून कोकण विकासाचं दर्शन घडवणार्या राणेंनी या डोंगरदरीत वसलेल्या गावांच्या रस्ता, पाणी, शेती प्रश्नांकडे पाहिजे तितक्या गंभीरपणे लक्ष दिलं नाही… लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं हे दुसरं कारण होतं… कारण

ज्या गावठाणवाडीला राणेंनी तीन वेळा सभापतीपद बहाल केलं त्याच गावठाणवाडीतून लोकसभेच्या निवडणुकीत २०० मतं विरोधी उमेदवाराला मिळालीत. ही आकडेवारी खुद्द नितेश राणेंनीच दिलीय… पिंपळवाडी, दिगवळे ही गावंदेखील या भागात आहेत. या गावांमध्येही पाणीप्रश्न, वीजप्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न ग्रामपंचायत नि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडवता येऊ शकले असते. मात्र तसे प्रयत्न झाले नसल्याचं गावकर्यांचं म्हणणं आहे. स्थानिक पदाधिकार्यांचं आणि जिल्हा परिषद तसंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या ग्रामस्थांशी असलेल्या नात्यातली दरी हे राणेंच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं तिसरं कारण होतं…

नितेश राणेंनी या तिसर्या आणि चौथ्या फळीतील पदाधिकार्यांची आणि कार्यकर्त्यांची झाडाझडती घेतली तर यंदाची विधानसभा निवडणूक जिंकणं त्यांच्यासाठी फारसं जिकरीचं ठरणार नाही. गावसभा घेऊन नितेश राणेंनी नेमकं तेच केलंय. त्यांनी मतदार आणि उमेदवार यांच्यातील हा पदाधिकार्यांचा पूलच काढून टाकलाय. स्वतः नितेश राणे कणकवलीतील मतदारांना प्रत्यक्ष भेटत आहेत. आणि आमचं काय चुकलं ते सांगा, अशी आर्जवं करत आहेत.

प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून नितेश राणेंना तशा अर्थाने तगडं आव्हान नाहीय. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार प्रमोद जठार आणि नितेश राणे यांच्यात थेट भिडत होईल हे उघड आहे. कारण शिवसेनेकडून सुभाष मयेकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अतुल रावराणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे दोन्ही उमेदवार मोठ्या पक्षांचे उमेदवार आहेत याउपर या उमेदवारांचीकोणतीच धास्ती नितेश राणे यांना वाटत नाहीय. मात्र काँग्रेसचे नाराज बंडखोर नेते विजय सावंत अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. नितेश राणेंना तिकीट मिळाल्यामुळे नाराज होऊन सावंतांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. विजय सावंत हे नारायण राणे काँग्रेसमध्ये येण्याआधीपासूनचे काँग्रेसचे कोकणातील नेते आहेत. मात्र राणेंनी कोकणात साम्राज्य उभं केलं नि सावंतांचं नामोनिशाणच तिथून गायब झालंय. यावेळी नितेश राणेंना फटका बसला तर तो केवळ विजय सावंतांकडूनच बसेल. तसंच काँग्रेस पक्ष आणि स्वाभिमानी संघटना यांच्यातही अद्याप हवा तसा ताळमेळ बसलेला नाही. या दोघांमध्येही अद्याप छोट्यामोठ्या कुरबुरी होतच आहेत. हा ताळमेळ बसवणं हेही नितेश राणेंसमोरचं मोठं आव्हान आहे. पण त्याचवेळेला स्वतःच्या प्रचारात हायकमांडचा साधा उल्लेखही न करता राणेंच्या विचारांचे मतदार, नारायण राणे साहेबांच्या विचारांचे कार्यकर्ते निवडणूक प्रचारात सहभागी होताहेत, असं नितेश राणे सांगताहेत.

नितेश राणेंवर राणेंचा हा बालेकिल्ला अबाधित राखण्याची मोठीच जबाबदारी नारायण राणेंनी टाकलीय. या मोहिमेत नितेश राणे यशस्वी होतात का हे पाहणंच आता अंतिम ठरणार आहे. राणे कुटुंबीयांना विजयासाठी गावोगावी जाऊन हा मतांचा जोगवा मागावा लागतोय, त्याचं मुख्य कारण या डोंगरावाटांमध्ये खितपत पडलेल्या मतदारांची नाराजी हेच आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *