भाजपा-शिवसेना युती तुटणारच होती. त्याचं सूतोवाच नरेंद्र भाय मोदी यांनी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सभेतच शिवसेनेला अनुल्लेखाने मारलं तेव्हाच झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातली धुसफूसही लपून राहिलेली नव्हती. पृथ्वीराज चव्हाण यांची मानसिकता आघाडीचं सरकार चालवण्याची नाही, हे ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आले तेव्हाच स्पष्ट झालेलं होतं. या पार्श्वभूमीवर भाजपाला या निवडणुकीत आपल्या स्वबळावर राज्यात सरकार स्थापन करण्याची स्वप्नं पडू लागलेली आहेत. तर दुसर्या बाजूला शिवसेनेची ही लढाई अस्तित्वाची आहे. शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची संधी उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभी ठाकली आहे. ते हे आव्हान स्वीकारतात की नाकारतात असा प्रश्न होता, तो त्यांनी आपण मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचं जाहीर करून संपुष्टात आणला आहे. परंतु खरा प्रश्न असा आहे की निवडणुकीनंतर ते भाजपाबरोबर सरकार स्थापन करणार का? जर भाजपाबरोबरच सरकार स्थापन करायचं तर मग आताचं हे भांडण कशासाठी? की हा केवळ देखावा? गुजरातमध्ये नरेंद्रभाई मोदी सत्तेवर असताना तीन दाढ्यांचं राज्य असल्याची चर्चा सामान्य गुजराती माणूस करत असे. काली दाढी, सफेद दाढी आणि मेहेंदीवाली दाढी. म्हणजे अमित शहा – त्यावेळी अमितभाय शहांची दाढी काळी होती. सफेद दाढी म्हणजे नरेंद्र भाय मोदी आणि मेहेंदीवाली दाढी म्हणजे कुख्यात पोलीस अधिकारी वंजारा. गुजरातेत कुणाही माणसाचं जीवन या तीन लोकांवर अवलंबून आहे असं म्हटलं जात असे. आज महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं जीवन दोन दाढ्यांच्या मर्जीवर अवलंबून असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. कालपरवापर्यंत राज्यातील भाजपाची सूत्रं महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या नेत्यांच्या हाती होती, ती अचानक दुसर्यांच्या हाती गेल्याचं वैषम्य यातील एकाही भाजपा नेत्याला नाही, कारण सर्वांना आता सत्ता हातातोंडाशी आल्याची भावना झालेली असून हा घास कधी एकदा आपल्या मुखात पडतो अशी घाई लागलेली आहे. केंद्रात सत्ता आणण्यात नरेंद्रभाय मोदींना जे अभूतपूर्व यश मिळालं त्यामुळे राज्यातील भाजपा नेत्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटलेले आहेत. हे महाराष्ट्रातील जनतेला फारसं मान्य होण्याची शक्यता नाही. याचं कारण शोधण्यासाठी थोडंसं इतिहासात डोकावून पहावं लागेल.

गिरगाव चौपाटीवर विठ्ठलभाई पटेल यांचा पुतळा रस्त्याच्या जवळच उभा आहे. हे कोण विठ्ठलभाई पटेल असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडू शकतो. हे विठ्ठलभाई पटेल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य-चळवळीतील एक मोठे नेते होते, याचं अनेकांना विस्मरण होणं स्वाभाविक आहे. कारण त्यांचा मुंबई शहराशी तसा दूरान्वयानेच संबंध होता. एक ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांचं मुंबईत सरदारगृहात निधन झालं. त्या आधी त्यांना काही दिवस ताप येत होता. परंतु त्यांचं असं पटकन निधन होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. त्यांच्या निधनाचा आघात सर्वात जास्त मुंबईच्या गिरणगावावर झाला आणि गिरणगावातील चाकरमानी हजारोंच्या संख्येने टिळकबाबांच्या अंत्ययात्रेला आले. अखंड पावसात निघालेली ही अंत्ययात्रा गिरगावच्या चौपाटीवर आली आणि तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. त्याच जागेवर त्यांचा पुतळाही उभारण्यात आला. लोकमान्य टिळकांचा स्वातंत्र्य चळवळीतला वाटा, त्यांनी काँग्रेसच्या उभारणीसाठी केलेले कष्ट आणि भोगलेला तुरुंगवास याचा विठ्ठलभाई पटेल यांच्याशी संबंध आहे. तो असा की, १९१५ साली भारतात परतलेल्या मोहनदास करमचंद गांधी या तरुण गृहस्थाला भारतातल्या स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दल प्रेम, आस्था आणि आपुलकी होती. त्यांना मुंबईतल्या काँग्रेसच्या नेत्यांना भेटवणं आणि इथल्या चळवळीची माहिती देण्याचं काम विठ्ठलभाई पटेल यांनी केलं. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर काँग्रेसची सूत्रं आपल्या हाती घेण्यासाठी गांधींनी विठ्ठलभाईंचा आणि त्यांच्या नडियाद-खेडा इथल्या कार्यकर्त्यांच्या ताकदीचा खुबीने वापर करून घेतला. परंतु नंतर गांधींची लोकप्रियता खूप वाढली आणि विठ्ठलभाई बाजूला पडले. पण विठ्ठलभाईंनी गांधींची साथ सोडली. ते तेव्हा आपला वकिलीचा व्यवसाय सोडून पूर्णवेळ राजकारणात आलेले होते. त्यावेळच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे ते सभापती झाले होते. विठ्ठलभाई हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे ज्येष्ठ बंधू होते. सरदार पटेल यांना बॅरिस्ट्रीसाठी जेव्हा प्रवेश मिळाला तेव्हा त्याबाबतचं पत्र विठ्ठलभाई यांच्या पत्त्यावर पोहोचलं आणि त्यावरची नावाची आद्याक्षरं सारखीच होती. परंतु ते पत्र आणि पारपत्र वल्लभभाई पटेलांचं होतं. विठ्ठलभाई पटेल यांनी वल्लभभाईंना सांगितलं की, छोटा भाऊ आधी शिकायला जाणार आणि नंतर मोठा भाऊ जाणार हे ठीक दिसणार नाही, तेव्हा या पत्रावर मीच लंडनला जातो. वल्लभभाईंनी त्यांच्या अंगभूत चांगुलपणामुळे विठ्ठलभाईंच्या या प्रस्तावाला होकार दिला. महात्मा गांधींनी संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीची घोषणा केली तेव्हा काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन गेलेले विठ्ठलभाई परत काँग्रेसमध्ये आले. परंतु त्यानंतर ते १९३३ साली जिनिव्हा येथे निधन पावले. त्यांचा मृतदेह मुंबईत आणला गेला आणि इथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढे मोरारजी देसाई द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री झाल्यावर मुंबईतील गुजराती समाजाला जाग आली आणि त्यांनी विठ्ठलभाई पटेल यांचा पुतळा गिरगाव चौपाटीवर उभारण्याची टूम काढली. जर टिळकांचा पुतळा गिरगाव चौपाटीवर बसवला जातो तर मग विठ्ठलभाई पटेलांचा का नाही असा त्यांचा हेका होता. मुख्यमंत्री गुजरातचा असल्यामुळे त्यांचं म्हणणं पुढे दामटलं गेलं आणि तिथे विठ्ठलभाईंचा पुतळा बसवला गेला. परंतु त्याकाळात मराठी आणि गुजराती समाजात जी तेढ निर्माण झाली ती दीर्घ काळ टिकली. नंतर विठ्ठलभाईंचा एक पुतळा अहमदाबादेत गुजरात सरकारच्या पुढाकाराने बसवला गेला.

मराठी आणि गुजराती समाज मुंबईत एकत्र नांदतो. परंतु कुणीही कुणावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार नाही याची खबरदारी घेतली जाते. जो तो आपली अस्मिता जपण्याचा कसोशीने प्रयत्न करतो.

शिवसेना भाजपाची युती प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा घडवून आणली तेव्हा गुजराती फॅक्टर नव्हता. लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरातची निवड आपल्या स्वतःच्या निवडणुकीसाठी केली तेव्हाही हा फॅक्टर नव्हता. तो २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जाणवू लागला. मोदी यांच्या बीकेसीवर झालेल्या प्रचारसभेला जी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती, त्यासाठी मंडपातील आसनव्यवस्था मुंबई शहरातील गुजराती समाजाच्या व्यापारी वर्गासाठी आणि जे पैसे देतील अशा गुजराती समाजबांधवांसाठी करण्यात आलेली होती. सभेत मोदी यांनी आपल्या भाषणात शिवसेनेचा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नामोल्लेख टाळला होता. तरीही शिवसेनेच्या लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही.

या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मुंबईत भाजपाचे निरीक्षक राजीव प्रताप रुडी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा ज्या ज्या वेळी पत्रकारांशी संवाद साधतात तेव्हा जाणिवपूर्वक ‘भाजपा गठबंधन का सरकार’ असा उल्लेख करतात. त्यात शिवेसेना युतीचं सरकार असा उल्लेख करण्याचं ते टाळतात. अगदी पंकजा मुंडे-पालवे यांच्या संघर्षयात्रेच्या सांगता समारंभाच्या भाषणातही अमित शहा यांनी आपला हा प्रघात पाळला. हा त्यांचा प्रयोग भविष्यात आपल्याला आपल्या जीवावर सत्ता काबीज करायची आहे या हेतुने असेल, यात काही शंका नाही. परंतु ते एवढ्या लवकर आणि एवढ्या बटबटीतपणे करण्याची गरज नव्हती.

गोपीनाथ मुंडे जिवंत असते तर त्यांच्या उपस्थितीत भाजपाच्या केंद्रीय नेत्यांची ही हिंमत कदाचित झाली नसती. त्यांच्याकडे प्रसंगी त्यांचे कान उपटण्याची क्षमता होती. परंतु आता भाजपाकडे उरलेले आणि ज्यांना नेते म्हटलं जातं असे फडणवीस आणि मुनगंटीवार यांना आपण आताच राष्ट्रीय पातळीवरचे नेते झाल्यासारखं वाटू लागलेलं आहे. नाथाभाऊ खडसे यांचे पाय जमिनीवर असल्यामुळे त्यांना भाजपाच्या मर्यादांची जाणीव आहे. त्यांची भाषा सामंजस्याची आणि सबुरीची होती. परंतु युती होत नाही असं वाटताक्षणी त्यात बदल होऊन त्यांनी शिवसेना शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा भाजपास्टाइल गौप्यस्फोट करून टाकला. विनोद तावडे यांनी आपल्या निवडणुकीसाठी रसद गोळा करण्याची सुरुवात केली होती आणि त्यात ही जागावाटपाची भानगड उभी राहिली. त्यांच्यासमोर असा प्रश्न पडला की संयम दाखवायचा, दाखवायचा तो तरी किती?

निवडणूक आयोगाने या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची गोची करून टाकलेली आहे. ज्या मोदी-शहा भायच्या नावावर निवडणूक लढवण्याची आशा भाजपा बाळगून आहे, त्या मोदी-शहा भाय यांना महाराष्ट्रात येऊन प्रचार करण्याची फारशी संधीच आयोगाने दिलेली नाही. सगळे मिळून प्रचारासाठी १२ दिवसच मिळतील अशाप्रकारे निवडणूक आयोगाने निवडणूक अधिसूचना जारी करून उमेदवारांची भंबेरी उडवली आहे. ज्यांनी आपापले मतदारसंघ बांधलेले आहेत, त्या जुन्या आणि जाणत्यांना फारशी अडचण नाही. परंतु नवागतांना त्याचा फटका बसणार आहे. अजून त्यांच्या जागा त्यांच्या पक्षाला मिळणार की दुसर्याच पक्षाला जाणार अशा दुविधेत ते उमेदवार आहेत. त्यातूनही जागा आपल्या वाट्याला आलीच तर बॅनर, पोस्टर लावणार कधी, गावागावात पोहोचणार कधी असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. एक गोष्ट यातून साध्य होणार आहे ती म्हणजे या वेळच्या निवडणुका कमीत कमी खर्चात पार पडणार आहेत. याबद्दल सर्व उमेदवारांनी घोळ घालणार्या शिवसेना नेत्यांचे आणि भाजपाच्या मोदी-शहा भाय यांचे आभार मानले पाहिजेत. निवडून येणार नाही याची खात्री असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण स्वतःची भलामण करण्यात मश्गूल आहेत. त्यांनी म्हणे त्यांच्या कारकिर्दीचा प्रत्येक तास, मिनीट, दिवस राज्याची सेवा करण्यासाठी खर्च केला. याकाळातच त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्नही केलं. तीही राज्याची सेवाच होती की काय असा प्रश्न कुणीही विचारू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *