राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरजोरात वाजू लागलेत. संपूर्ण जोशामध्ये सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससारखे बडे पक्ष तर उच्चरवात आपल्या विकासकामांचा पाढा वाचू लागलेत. प्रचाराच्या तोफा मोठमोठ्याने गर्जना करू लागल्यात. मात्र विधानसभा निवडणुकीला आता थोडेच दिवस उरले असतानाही प्रचाराच्या या धामधुमीत एक आवाज कुठे तरी हरवल्याचं तीव्रतेने जाणवतंय. हा आवाज अर्थातच राज ठाकरे यांचा आहे.

९ मार्च २००६ रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेचा झेंडा फडकवला. महानगर पालिका निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून मनसे प्रथमच म्हणजे २००९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीला सामोरी गेली. या निवडणुकीत तब्बल १३ मनसे आमदार जिंकले तर मनसेचे अनेक उमेदवार मतमोजणीत दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर होते. राज ठाकरे यांनी ही पहिलीवहिली निवडणूक सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर शिवसेनेला सत्तेपासून दूर नेण्यासाठी लढवली होती. राज यांचा हा उद्देश तेव्हा पूर्णही झाला होता. मात्र दुसरीकडे सामान्य जनतेच्या राज यांच्याकडून आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अपेक्षा प्रचंड वाढल्या होत्या. मुंबईसह, नाशिक, पुणे या भागांतून मनसेचे आमदार निवडून आले. नाशिकमध्ये तर मनसेने पालिकेची सत्ताही काबीज केली. मुंबई, पुण्यातही मनसेचा खूप गाजावाजा झाला. मात्र ही हवा अवघ्या काही वर्षांतच विरली. आज मनसे राज्यात कार्यरत आहे का, असा प्रश्न पडावा अशी पक्षाची एकूण स्थिती आहे. पक्षाच्या पहिल्या निवडणुकीनंतर मनसैनिकांनी खळ्ळ् खट्याकचा धडका लावला होता. पण आता हे मनसैनिकही कमालीचे थंडावलेत. नुसते सैनिकच नाहीत तर मनसेचे वरिष्ठ नेतेही काहीच बोलेनासे झालेत. अन्य पक्षांनी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवातही केली. मात्र मनसेच्या गडावर अजूनही नीरव शांतताच आहे. राज ठाकरे या निवडणुकीत नेमके कोणते डावपेच आखणार आहेत? कार्यकर्त्यांना कशाप्रकारे कामाला लावणार आहेत? पक्षातील कोणत्या नेत्यावर कोणती जबाबदारी दिली जाणार आहे? अनेक प्रश्न मनसैनिकांच्या आणि मनसे नेत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. राज ठाकरे यांच्या या संथगतीमुळे खरं तर मनसैनिक कमालीचे अस्वस्थ झालेत. नेत्यांनाही काय करावं ते सुचेनासं झालंय. नाही म्हणायला लोकसभा निवडणुकीतील पराभव झटकून टाकण्यासाठी मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांनाच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र राज यांनी पक्षातील नेत्यांचा हा प्रयत्न पार धुळीस मिळवून टाकला. राज ठाकरे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार अशा बातम्यांनी काही काळ का होईना पण मनसेत चैतन्य निर्माण झालं होतं. राज ठाकरे यांनीही तेव्हा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करून एकच खळबळ उडवून दिली होती. ‘या मला तुमच्याशी काही बोलायचं…’ अशी साद घालत राज्यभरातील मनसैनिकांना राज यांनी मैदानात उतरवलं खरं. पण नंतर मात्र स्वतःच त्यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली. यामुळे आता पुन्हा एकदा मनसेच्या गोटात शांतता पसरलीय… मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा कुठलाच अंदाज मनसे नेत्यांना बांधता येत नाहीय. यामुळेच ते आगामी विधानसभा निवडणुकीबाबतकोणतीही प्रतिक्रिया देण्यास पुढे येत नाहीयेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील या वातावरणामुळे मनसैनिक कमालीचे अस्वस्थ झालेत. संभ्रमित झालेत. इतर पक्ष निवडणुकीचे आराखडे बांधत असताना आपल्या पक्षात कसलीच हालचाल का होत नाहीय, या विचाराने सामान्य कार्यकर्ते चांगलेच बुचकळ्यात पडलेत. बाकीच्या पक्षांचे कार्यकर्ते, नेते निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला किती जागा मिळतील याची आकडेमोडही ते करू लागलेत. मात्र मनसेमधून अशी कोणतीच चर्चा ऐकू येत नाहीये.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या भावांमधील २००९ आणि २०१४ या दोन्ही विधानसभा निवडणुकीतील चित्र मात्र कमालीचं विरोधाभास निर्माण करणारं आहे.

याचं कारण असं की, २००९च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे चांगलेच चर्चेत होते. इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकी अगोदरच्या निवडणुकांमध्ये मनसे सेना-भाजप युतीला भारी पडत होती. युतीच्या बड्या बड्या नेत्यांना मनसेच्या उमेदवारांनी मतदानात पिछाडीवर टाकलं होतं. मुंबई, पुणे, नाशिकसारख्या भागांतून युतीच्या उमेदवारांना निवडून येणं मनसेने मुश्कील केलं होतं. अर्थातच मनसेचं हे यश काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं बळ वाढवणारच ठरलं होतं. २००९ ते २०१४ या पाच वर्षांच्या कालखंडात मात्र मनसेचं हे चित्र पूर्णपणे बदललं. इतकंच नाही तर सेना-भाजप युती अधिक जोमाने कामाला लागली. लोकसभा निवडणुकीत तर महायुतीच्या पक्षांनी मनसेची पुरती दाणादाण उडवून दिली. खरंतर २०१४ची लोकसभा निवडणूक ही या दोन्ही ठाकरे बंधुसाठी विशेष ठरली. या निवडणुकीत राज ठाकरे पूर्णपणे थंड जाणवले तर याउलट उद्धव ठाकरे अतिशय आत्मविश्वासाने या निवडणुकीला सामोरे गेलेले पहायला मिळाले. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही हा आत्मविश्वास ढेपाळला असल्याचं तीव्रतेने जाणवतंय. लोकसभा निवडणुकीत एक हाती सत्ता जिंकणारा भारतीय जनता पक्ष शिवसेनेवर आता वरचढ होऊ पाहतोय. याचं ताजं उदाहरण म्हणजे, भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर अधिक जागांसाठी टाकण्यात येत असलेला दबाव… भाजप शिवसेना नेत्यांवर केवळ अधिक जागांसाठीच दबाव टाकत नाहीये तर मुख्यमंत्री पदासाठीही ते दावा करताहेत. या दबावाखाली उद्धव ठाकरे दबले जात असल्याचं चित्र पहायला मिळतंय. याचं दुसरं कारण असंही आहे की, केंद्रात पुन्हा भारतीय जनता पक्षाचं बहुमतातलं सरकार आहे. या मोदी सरकारचाही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आहे… यामुळेच शिवसेनेने भाजपच्या या दबावतंत्राच्या विरोधात अजूनपर्यंत मौन पाळणंच उचित मानलंय.

यामुळे आता यंदाच्या विधानसभा निवडणुकींना सामोरं जाताना मनसेने काही वर्षांपूर्वी मिळवलेलं ते मतदारांच्या मनातील उंचीवरचं स्थान कुठे गमावलंय, असा प्रश्न विचारला जातोय आणि म्हणूनच आता मनसेच्या सद्यपरिस्थितीबाबत राजकीय वर्तुळात आणि विश्लेषकांमध्ये चर्चा जोर धरू लागलीय. गेल्या पाच वर्षांत मनसेचं नेमकं काय चुकलं? या प्रश्नाभोवती ही चर्चा सुरू झालीय… कोणत्याही राजकीय पक्षासाठी हाच मुद्दा कायम महत्त्वाचा असतो तो म्हणजे, लोकमत संपादन करणं. तुम्ही जेव्हा अडचणीत असाल तेव्हा आमचाच पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास हरेक राजकीय पक्षाला सामान्य जनतेमध्ये निर्माण करणं आवश्यक असतं. मात्र गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र नवनिर्माण सेना फारच कमी वेळा लोकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवताना पहायला मिळाली. महागाई, दरवाढीचे प्रश्न गंभीर बनलेले असतानाही या प्रश्नांच्या विरोधातदेखील मनसे कुठेच काहीच काम करताना दिसली नाही. शहरी भागांमध्ये आज भ्रष्टाचार आणि खराब रस्ते, रस्त्यांवरील मोठाले खड्डे हे गंभीर प्रश्न आहेत. सामान्यांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम करणार्या या प्रश्नांवरही मनसेने कोणतीच आक्रमक भूमिका घेतलेली पहायला मिळाली नाही. मनसेच्या कार्याचा आढावा घेताना खासकरून शहरांबद्दल बोललं जातं. यातही नाशिक शहराबद्दल अधिक बोललं जातं. कारण नाशिक महानगर पालिकेत मनसेची सत्ता आहे. पण गेल्या पाच वर्षांतील इथली मनसेची कामगिरी पाहता आता खुद्द नाशिककरच विपरीत प्रतिक्रिया देऊ लागलेत. त्यांच्यामते नाशिक महानगर पालिकेत मनसेची सत्ता आहे हे जाणवतच नाही. कारण ते देखील सेना, काँग्र्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसारखाच कारभार करताहेत. या सार्या मागची कारणं स्पष्ट आहेत. राज ठाकरे पक्षबांधणीकडे, पक्षाच्या उभारणीकडे फार गंभीरपणे लक्ष देताना दिसत नाहीयेत. तसंच त्यांनी पक्षाच्या नेत्यांची दुसरी फळीही अद्याप उभी केलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देतानाही त्यांनी मोदी लाटेचं कारण दिलं. खरंतर हा निकाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. कारण त्यांच्या दहाच्या दहा उमेदवारांचं डिपॉझिटसुद्धा जप्त झालं होतं.

काही दिवसांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्यात. इतक्या कमी वेळात पक्षाला निवडणुकीसाठी तयार करण्याचं मोठं आव्हान आता राज ठाकरे यांच्यासमोर आहे. कारण या निवडणुकीत जर राज ठाकरे यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागलं आणि उद्धव ठाकरेंना भाजपच्या सोबतीने यश मिळालं, ते मुख्यमंत्री बनले तर मात्र मग भगव्या राजकारणात ठाकरे बंधुंमध्ये उद्धवची सरशी होईल आणि राज यांचं हसं…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *