आशियाई क्रीडा स्पर्धेच्या गेल्या ६३ वर्षांच्या इतिहासात सहभागी ४६ देशांपैकी असेही सात देश आहेत ज्यांना आजवर एकही मेडल जिंकता आलेलं नाही. नेपाळ हा त्यापैकीच एक देश. यंदाच्या स्पर्धेतही अद्याप नेपाळला एकही मेडल जिंकता आलेलं नाही, तरीही नेपाळच्या खेळाडूंसह इथे आलेले थोडेबहुत नेपाळी गेले दोन दिवस विजयोत्सव साजरा करत आहेत. देशाची मेडल पाटी जरी कोरी असली तरी त्यांच्या भूमीवर जन्मलेल्या जितू रायने यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तब्बल एक गोल्ड आणि एक ब्राँझ अशी दोन मेडल्स भारतासाठी जिंकलीत. होय, यंदाच्या स्पर्धेत भारताच्या गोल्ड मेडलचं खातं उघडणारा जितू राय हा मुळचा नेपाळचा. २००६ साली त्याने भारताचं नागरिकत्व स्वीकारलं. खेळासाठी नव्हे तर रोजच्या जगण्यासाठी… नेपाळच्या संखुवा जिल्ह्यातील सितालपट्टी या पहाडी भागात जगण्यासाठी संघर्ष करणारा जितू राय आज भारतीयांच्या ‘आँखो का तारा’ बनलाय. आपण काय गमावलंय याची नेपाळला किंमत आताशा कळली असेल…

५० मीटर पिस्तोल प्रकारात गोल्ड मेडल जिंकणार्या जितूकडून आज १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात गोल्ड मेडलची अपेक्षा होती. कारण या प्रकारात तो जागतिक क्रमवारीत नंबर एक आहे. त्याच्याच वैयक्तिक कामागिरीमुळे सांघिक प्रकारात भारताला ब्राँझ मेडल मिळालं. वैयक्तिक प्रकारातही २० पैकी ८ व्या प्रयत्नापर्यंत तो आघाडीवर होता. पण एक नेम चुकला आणि त्याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. वैयक्तिक मेडल हुकलं असलं तरी त्याने इतिहास घडवला. यंदाच्या वर्षात त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ आणि आशियाई अशा सलग तीन स्पर्धांत गोल्ड मेडल पटकावत अनोखी गोल्ड हॅट्ट्रीक केलीय. इतकंच नव्हे तर या वर्षात त्याने तीन गोल्ड, तीन सिल्व्हर आणि एक ब्राँझ अशा एकूण सात मेडल्सची कमाई केलीय. नेपाळचा हा छोरा भारतात आठ वर्षांपूर्वी येतो काय आणि आता पदकांची लयलूट करतो काय, सारंच अविश्वसनीय!…

जितूचे वडील भारताच्या सेनादलात गोरखा रेजिमेंटमध्ये होते. पाच भावंडांत जितू चौथा. वडिलांची परंपरा पुढे चालवण्यासाठी त्याने ब्रिटिश आर्मी आणि भारतीय सैन्यदलाकडे २००६ साली अर्ज केला होता. ब्रिटिश निवडचाचणी आधी एक दिवस भारतीय सैन्यदलाची चाचणी असल्यामुळे हा हिरा भारताला गवसला. तोवर नेमबाजी हा खेळ आपण खेळू असं कधी जितूलाही वाटलं नव्हतं. नेपाळच्या पहाडात वाढलेला हा माणूस बंदूक हाती आली की पहाडासारखा कणखर असतो. पण एकदा का बंदूक बाजूला ठेवली की मग जितू रायचं एक खेळकर रूप पहायला मिळतं. थोडासा लाजराबुजरा असणारा हाच तो जितू ज्याने भारताला दोन मेडल्स मिळवून दिली यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. जन्माने नेपाळी असला तरी त्याच्या श्वासाश्वासात आणि हो, शब्दाशब्दात भारताविषयीचा अभिमान झळकताना दिसतो.

मी दक्षिण कोरियाला जाताना माझ्या विमानात नेपाळची ज्युडो टीम होती. माझ्या बाजूच्या सीट्स त्यांनी व्यापून टाकलेल्या, कपाळावर कुमकुमतिलक मिरवत ते विमानात बसले होते. म्हणून साहजिकच सगळ्यांचं त्यांच्याकडे लक्ष जात होतं. बहुदा आशियाई क्रीडा स्पर्धेला निघताना त्यांचं औक्षण झालं होतं. मी सहज माझ्या बाजूच्या सीटवर बसलेल्या ज्युडोपटूस विचारलं की, ‘आजवर एकही मेडल तुम्ही जिंकलेलं नाही. तू जिंकल्यावर इतिहास घडेल ना!’ त्यावर त्याचं टिपिकल नेपाळी भाषेतील उत्तर मला अंतर्मुख करणारं होतं… ‘साहबजी, इस टुर्नामेंट के लिए केवळ १५ दिन का कॅम्प लगा था, कैसा मेडल लाऐंगा. पर साहबजी, हम जीजाँनसे खेलेंगा… जैसा हमारा जितू खेलता है ना… बस इतनाही हमारे हाथमे है… हम खेलेंगा साबजी…’

मी विमानातील या संभाषणाची जितूला ब्राँझ मेडल जिंकल्यानंतर आठवण करून दिली. क्षणभर तो थबकला. पापण्याआड दडलेले अश्रू त्याने सराईतपणे लपवले आणि छानसं हसला… प्रत्येक हास्यामागे आनंद दडलेलाच असतो असं नाही हे मला त्याच्या त्या हास्याकडे पाहून जाणवलं. मी त्याला विचारलं, ‘तू तुझ्या नेपाळी बांधवांना काय मेसेज देशील?’ तो दोन क्षण थांबला. दीर्घ श्वास घेतला… आणि म्हणाला, ‘मी त्यांना एकच सांगू इच्छितो, संधी एकदाच मिळते ती जीवाची बाजी करून सार्थकी लावा.’ माझा दुसरा प्रश्न होताच, ‘उद्या नेपाळच्या सरकारने तुला त्यांच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमंत्रित केलं तर तू जाशील का?’ माझ्या या प्रश्नावर त्याच्या चेहर्यावरील वेदनेचं जाळं मी स्पष्ट वाचत होतो… ‘सरजी, मुझे मालूम है वौ नही बुलाएंगे.’ कसेबसे हे शब्द तो बोलला आणि मेडल सांभाळत गर्दीत निघून गेला. माझ्या कानात मात्र ती दोन वाक्यं घुमत होती. ‘आमार जितू जैसा खेलनेका है…’ आणि साक्षात जितूचं… ‘नही सरजी, मुझे मालूम है वो नही बुलाएंगे…’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *