जगात कधी कधी असं काही घडतं की आपली पहिली प्रतिक्रिया असते छे! शक्यच नाही… वन डे क्रिकेट जगतातही गेल्या आठवड्यात अशा दोन घटना घडल्या, ज्यावर अद्याप विश्वास ठेवणं कठीण जातंय. वन डे क्रिकेटचा वर्ल्ड कप अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपलाय आणि म्हणून या दोन घटनांकडे अवघ्या क्रिकेट जगताचं लक्ष वेधलं गेलं. या वर्ल्ड कपचं यजमानपद ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संयुक्तपणे भूषवतायत. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेकडून झालेला पराभव धक्कादायक आहे. झिम्बाव्बे, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यात तिरंगी क्रिकेट सीरिज झाली. त्यात झिम्बाब्वेने हा भूकंप घडवून आणलाय. याला भूकंपच म्हटलं पाहिजे कारण गेल्या ३१ वर्षांतला हा ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेविरुद्ध पहिला पराभव आहे. वन डे क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असणार्या झिम्बाब्वेने नंबर एक ऑस्ट्रेलियाचा पार धुव्वा उडवला. एकीकडे ऑस्ट्रेलिया पराभूत होत असतानाच दुसरीकडे भारताने मात्र इंग्लंडच्या भूमीवर वन डेत देदीप्यमान कामगिरी करत जागतिक क्रमवारीत नंबर एकची जागा पुन्हा पटकावलीय. इतकंच नव्हे तर पाच सामन्यांची इंग्लंडविरुद्धची सीरिज ३-१ अशी जिंकत पराभवाची मालिकाही खंडित केलीय.

भारत हा विद्यमान वर्ल्ड कप विजेता आहे. २०१२ साली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताला फक्त एकच वन डे सीरिज जिंकता आली होती, तर मायदेशी चार वन डे सीरिज गमावाव्या लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भारताने मिळवलेला विजय हा वर्ल्ड कपसाठी उमेद वाढवणारा आहे. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडचा वर्ल्ड कप म्हटला की लोकांना आठवते ती इंझमाम उल हकची फटकेबाजी. १९९२च्या त्या वर्ल्ड कपमध्ये इंझमाम आणि सचिन तेंडुलकरने धुमाकूळ घातला होता. न्यूझीलंडच्या शॉर्ट ब्राऊंड्रीजचा या दोघांनी पुरेपूर फायदा उठवला होता. पाकिस्तानने फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत तो वर्ल्ड कप जिंकला होता. इम्रान खान पाकिस्तानचा कॅप्टन होता. २२ वर्षांनंतर चित्र कसं बदललंय बघा… इम्रान खान आता राजकीय नेता झालाय. पाकिस्तानचा संघ रसातळाला पोचलाय. त्या वर्ल्ड कपमध्ये भारतातर्फे खेळलेला रवी शास्त्री आता भारतीय टीमचा संचालक झालाय. ना सचिन आहे ना इंझमाम उल हक… त्याच १९९२च्या क्रिकेट वर्ल्ड कपने वन डे क्रिकेटला नवा लूक दिला होता. वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा रंगीत कपडे वापरले गेले होते. लाल बॉलऐवजी पांढरा बॉल या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा वापरला गेला होता आणि हो, वंशभेदामुळे क्रिकेटवरील बंदी भोगून दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा याच वर्ल्ड कपमध्ये रिएन्ट्री केली होती. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर पुन्हा वर्ल्ड कपचा थरार तब्बल २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये अनुभवता येणार आहे आणि इंग्लंडवरील या विजयाने भारतीय संघ आपलं विजेतेपद कायम राखण्यासाठी सज्ज झालाय असं आपण म्हणू शकतो.

पण इतिहास मात्र वेगळं सांगतोय. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या जमिनीवर आजवर आपण तब्बल ११५ वन डे मॅचेस खेळलोय आणि त्यातील फक्त ४३ मॅचेस जिंकू शकलोय… न्यूझीलंडविरुद्धची शेवटची वन डे सीरिज आपण ०-४ अशी गमावली होती. तर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्धच्या तिरंगी सीरिजमध्ये भारताला फायनल गाठता आली नव्हती. अर्थात, हा आता इतिहास झालाय. त्यानंतर भारताने २०१२चा वर्ल्ड कप जिंकला होता. टी-२०चा वर्ल्ड कप जिंकलाय आणि चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक दिली होती. अर्थात, यावेळी वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदललाय. एकूण १४ टीमची प्रत्येकी दोन गटांत विभागणी केलीय. त्या टीमची रॉबिन राऊंड पद्धतीने प्रत्येकी सहा मॅचेस होतील आणि दोन्ही गटांतून प्रत्येकी चार टीम्स क्वार्टर फायनलसाठी पात्र होतील. भारताच्या गटात पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे ,आयर्लंड आणि यूएई अशा सहा संघांचा समावेश आहे. त्यामुळे स्पर्धेची बाद फेरी गाठणं भारताला फारसं अवघड जाणार नाही. विशेष म्हणजे भारताची सलामीची मॅचच पाकिस्तानविरुद्ध आहे. आजवर भारत कधीही पकिस्तानाकडून वर्ल्ड कपमध्ये हरलेला नाही. अशा स्थितीत भारताचा हा इंग्लंडमधील सीरिज विजय भारताची विजेतेपदासाठीची रंगीत तालीम समजायला हरकत नाही आणि इतिहासाची भीती बाळगायचीही आवश्यकता नाही. कारण पाकिस्ताननेही १९९२ साली इंग्लंडलाच फायनलमध्ये हरवून जगज्जेतेपद पटकावलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *