ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, पद्मभूषण यू. आर. अनंतमूर्ती यांचं २२ ऑगस्ट २०१४ रोजी बंगळुरूमध्ये निधन झालं. यू. आर. अनंतमूर्ती यांची सार्या जगाला ओळख एक बंडखोर आणि विचारवंत साहित्यिक म्हणून आहे. त्यांचं साहित्य जगातील अनेक भाषांमधून भाषांतरित झालेलं आहे. आठ कथासंग्रह, पाच कादंबर्या, तीन कवितासंग्रह, आठ साहित्य समीक्षाग्रंथ अशी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर जमा आहे. याशिवाय पत्रकारिता आणि सिनेकथा लेखन इत्यादी क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला आहे. पण या सगळ्यापलीकडे यू. आर. अनंतमूर्ती हे एक निर्भिड, विचारवंत म्हणून सतत गाजले.

यू. आर. अनंतमूर्ती यांचा जन्म १९३२ साली कर्नाटकातील शिगोमा जिल्ह्यातील तीर्थहळ्ळी तालुक्यातील मलिगे या लहानशा खेड्यात झाला. पारंपरिक ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या उडुपी राजगोपालाचार्य अनंतमूर्ती यांचं शालेय शिक्षण स्थानिक संस्कृत शाळेत झालं. पुढे म्हैसूर इथे त्यांनी इंग्रजी विषयात एम. ए. करून म्हैसूर विद्यापीठातच प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आणि ते इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम विद्यापीठात शिक्षणासाठी गेले. १९६६ साली त्यांना पीएच. डी. प्रदान करण्यात आली. बर्मिंगहॅम इथे डॉक्टरेट करत असतानाच त्यांनी त्यांची सर्वात गाजलेली ‘संस्कारा’ ही कादंबरी लिहून गिरीश कर्नाड यांच्याकडे पाठवली. गिरीश कर्नाड यांनी या कथेचं मोल ओळखून प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री रामा रेड्डी यांना ही कथा दिली आणि त्याच नावाचा चित्रपट निर्माण झाला. या चित्रपटावर सुरुवातीला बंदी घालण्यात आली. कारण या चित्रपटामुळे जातीय तणाव निर्माण होईल अशी सरकारला भीती वाटत होती. परंतु पुढे याच चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. हा चित्रपट आजही एक अभिजात कलाकृती म्हणून अभ्यासला जातो. यूआरए यांचं सर्व साहित्य आणि कलाकृती म्हणजे कन्नड साहित्याला नवं वळण देणारा प्रवाह ठरला. त्यांना कन्नड साहित्यातील ‘नव्य प्रवाहाचे’ उद्गाते म्हटलं जातं. त्यांच्या अनेक साहित्यकृतींचा मराठीतही अनुवाद झाला आहे.

भारतातील पुरोगामी साहित्य सांस्कृतिक प्रवाहाचं सशक्त प्रतिनिधित्व यू. आर. अनंतमूर्ती करतात हे निर्विवाद! कारण यूआरए हे केवळ दिवाणखानी साहित्यिक नव्हते. तर कृतिशील विचारवंत होते. त्यांनी वेळोवेळी स्पष्ट राजकीय भूमिका घेतल्या. आपली मतं ठामपणे मांडली होती. मग साहित्यातील अवमूल्यनाचा प्रश्न असो वा सहित्यिकांच्या लोकशाही स्वातंत्र्याचा प्रश्न असो, यूआरएनी आपली भूमिका स्वच्छपणे मांडली. पण केवळ साहित्याच्या परिघातच नव्हे तर जागतिकीकरण, बाजारीकरण, स्थानिक सामान्य नागरिकांचं वंचितीकरण या विषयावरही ते कडाडून टीका करत असत. किंबहुना प्रस्थापित प्रवाहाविरुद्ध बेदरकार आवाज उठवण्यात ते कधीही कचरले नाहीत. त्याचवेळी एक अत्यंत लोकशाहीवादी विचारवंत अशी त्यांची ख्याती होती. अगदी आपल्या विरोधी विचारांच्या व्यक्तिशीही ते उत्तम संवाद ठेवत असत.

यूआरए यांच्याविषयीअनेक वाद वेळोवेळी निर्माण झाले होते. पुरोगामी विचारांचा ठाम पुरस्कार करणारे यूआरए हे संपूर्ण आयुष्यभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी विचारांचे कट्टर विरोधक राहिले. २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या मुस्लीम वंशसंहाराचा त्यांनी सतत कडक निषेध केला. धर्मनिरपेक्ष राजकीय भूमिकेचा त्यांनी जोरदार पुरस्कार केला होता. दुसर्या बाजूला काँग्रेसने आणलेल्या नव्या आर्थिक धोरणांनाही त्यांनी कडक विरोध केला. म्हणूनच सन २००४ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. ही निवडणूक लढवण्यामागे त्यांची भूमिका होती ती भारतीय जनता पक्षाचा पराभव करणं! त्यांचं असं ठाम म्हणणं होतं की भाजप आणि हिंदुत्ववादी राजकारणामुळे भारताच्या सांस्कृतिक उदारमतवादी, बहुआयामी रचनेला गंभीर धोका आहे. त्यांना जनता दल (से) या देवेगौडांच्या पक्षाने आपल्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. मात्र, या पक्षाने भाजपबरोबर सत्तेत भागीदारी केली होती आणि भाजपला कर्नाटकात मोठं करण्यास हातभार लावला म्हणून त्यांना नकार दिला.

पुढे २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या काळातही यूआरएनी नरेंद्र मोदींच्या आणि हिंदुत्ववादी शक्तिंच्या भपकेबाज प्रचाराविरुद्ध विरोधी भूमिका ठामपणे मांडली होती. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होणं हा मोठा धोका आहे हे त्यांचं वक्तव्य वादग्रस्त ठरलं. रास्वसं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी यूआरए विरुद्ध प्रचंड टीकेची झोड उठवली. त्यांच्या घरावर पोस्टर्स लावली. परंतु यूआरए अजिबात डगमगले नाहीत. ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर आपण या देशात रहाणार नाही’ अशी काहीशी टोकाची भूमिका त्यांनी मांडली. परंतु नंतर भावनेच्या भरात आपण तसं बोललो, ते चुकीचं होतं, अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली. जागतिक पातळीवर साहित्यिक म्हणून प्रचंड प्रतिष्ठा असलेल्या एका साहित्यिकाने ‘आपली भूमिका चुकली’ अशी कबुली देणं हे धाडसाचं तर होतंच. पण त्यांच्या वैचारिक पारदर्शकतेचंही लक्षण होतं. मात्र कडव्या हिंदुत्ववादी भूमिकेने आणि विचारांनी बेभान झालेल्या शक्तिंना त्यांचा वैचारिक उदारमतवाद कसा पचावा? उलट कर्नाटकातील हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्याविरुद्ध प्रचाराची राळ उठवली.

भारतात लोकशाही समाजरचना आहे. विविध विचारांचे प्रवाह या देशात गौतम बुद्धांच्या काळापासून आणि त्यापूर्वी इस्लामच्या आगमनापासून विकसित झाले, रुजले. भारतातील सामान्य माणसांनी आपल्याला पटलं ते स्वीकारलं, अंगीकारलं. कर्नाटकातही महाराष्ट्राप्रमाणेच बंडखोर, पुरोगामी विचारपरंपरा रुजल्या, बसवेश्वरांचा लिंगायत पंथ याच कर्नाटकात उगम पावला. पारंपरिक जातिबद्ध हिंदुधर्माला छेद देणारी चळवळ त्यातून उभी राहिली. आजही कर्नाटकात लिंगायत आणि इस्लामी सुफी परंपरांची एकत्रित केंदं्र टिकून आहेत. याचं कारण भारतातील सामान्य माणूस उदारमतवादी, सहिष्णुतेवर विश्वास ठेवतो. त्यांच्या जीवनाचं ते एक सर्वमान्य मूल्य आहे. परंतु भारतातील हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांना ही बहुरंगी परंपरा मान्य नाही. त्यांना हिंदुधर्माला ‘एकसंस्थात्मक’ केंद्रित रूप द्यायचं आहे. त्यासाठी इस्लाम, बौद्ध, ख्रिश्चन धर्मिय समाजाला वगळून हिंदुधर्माची कट्टर अशी व्यवस्था निर्माण करायची आहे. देशातील बहुजन, दलित समाजावर हिंदुंची धार्मिक हुकूमत बसवायची आहे हे निश्चितच धोकादायक आहे. या विकृत हिंदुत्ववादी विचारांचं कट्टर विरोधाचं वैचारिक नेतृत्व यू. आर. अनंतमूर्ती यांनी कर्नाटकात केलं. म्हणूनच यू. आर. अनंतमूर्ती कर्नाटकातील हिंदुत्ववादी शक्तिंना ते आपले शत्रू वाटत होते.

या विकृत हिंदुत्ववादी विचारांच्या मंडळींना लोकशाही विचारांचं वावडं असतं. किंबहुना कोणत्याही मूलतत्त्ववादी विचारांच्या मंडळींना लोकशाहीप्रणाली ही त्यांच्या राजकीय कामातील सर्वात मोठा अडथळा वाटत असतो. यू. आर. अनंतमूर्ती यांना भाजपप्रणित संघटनांचा असलेला तीव्र विरोध त्यातूनच जन्माला आलेला आहे. या संघटनांना वेगळे विचारच नव्हते. तर वेगळ्या विचारांची माणसंही सहन होत नाहीत. अशा विकृत कट्टर हिंदुत्ववादी संघटना कोणत्याही थराला जाऊ शकतात. गुजरातमधील २००२च्या मुस्लीम विरोधी दंगलींमध्ये हे आपण बघितलंच आहे. त्याच्याच नवनव्या आवृत्या आपण यापुढेही अनुभवणार आहोत.

उडुपी राजगोपालाचार्य अनंतमूर्ती या महान साहित्यिक विचारवंताच्या दुःखद मृत्युनंतर कडव्या असहिष्णू विचारांच्या हिंदुत्ववादी संघटनानी याच विकृत मानसिकतेचं प्रदर्शन कर्नाटकात केलं. अनंतमूर्ती यांचं २२ ऑगस्ट रोजी निधन झालं. तर २३ ऑगस्टला मंगलुरू येथील हिंदुत्ववादी संघटनांनी फटाके वाजवून त्यांच्या ‘निधनाबद्दल आनंद’ व्यक्त केला. ही घटना स्थानिक बजरंग दलाच्या नेत्याच्या घरासमोर घडली. यातील विनोदाचा भाग असा की, या विकृत मंडळींना आपण चुकीचं, विकृत कृत्य करत आहोत हे मान्यच होतं. म्हणून त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त करताना तोंडावर काळे मास्क घातले होते!

तर ही आहे नवी विकृत हिंदू संस्कृती!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *