आदित्य चोप्रा निर्मित, प्रदीप सरकार दिग्दर्शित नि राणी मुखर्जी अभिनित ‘मर्दानी’ हा सिनेमा आजघडीला चांगलाच चर्चेत आहे. प्रत्यक्षातले सिने-समीक्षक वगळता, नव्या चकचकीत सोशल मीडियावरील सिने-समीक्षकांच्या कथित प्रतिक्रियावादी समीक्षे (?) ला बळी पडलो… नि ‘मर्दानी’ पाहिला. त्याच अतरंगी (की अत्रंगी) प्रतिक्रियांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय…

 

मर्दानी सिनेमा प्रदर्शित झाला नि सोशल मीडियावर (बॉक्स ऑफिसच्याही आधी) एकच गलका झाला. हा सिनेमा म्हणे स्त्रीवादाला पुढे नेणारा सिनेमा आहे, अशा प्रतिक्रिया ढिगाने आल्या. काही कथित (अज्ञानी) स्त्रीवाद्यांनी (?) फेसबुकसारख्या माध्यमाचा वापर करत स्वतःचा चेहरा बदलवला… नि सिनेमातील ‘शिवानी’चा चेहरा स्वतःच्या प्रोफाईलवर डकवला… सिनेमाची नायिका राणी मुखर्जी म्हणून हा चेहरेपालट मंजूर… पण, हा प्रोफाईल पिक्स धारण करून जो बौद्धिक दिवाळखोरीचा प्रकार घडला तो फारच हास्यास्पद होता… सोबतच चिंतातूर करणाराही होता. गुन्हेगारी जगतातील पुरुष गुन्हेगाराला ठेचणारी स्त्री पोलीस अधिकारी, अखिल स्त्री जातिवर होत असलेला अन्याय, अत्याचारावर भाष्य करणारी महिला पोलीस अधिकारी, इतकाच काय तो संदर्भ जोडत हे नेटकरी ‘मर्दानी’वर प्रतिक्रिया देऊ झालेत, याबाबत माझ्या मेंदूत तसूभरही साशंकता नाही.

‘मर्दानी’ सिनेमा बेतलाय तो मानवी तस्करीच्या गुन्ह्यावर… अंमलीपदार्थांच्या तस्करीचा सिनेमातील मुद्दा हा केवळ सिनेमाच्या पटकथेला पुढे रेटण्यासाठी प्रयोजिला गेलाय, हे सुस्पष्ट आहे. पण त्यामुळे सिनेमाच्या मूळ विषयाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता वाढली आणि नेटकरी ड्रग्स नि मानवी तस्करीचा संबंध जोडू लागले. इथेच त्यांची खरी तर गोची झालीय. कारण ड्रग्सची तस्करी आणि मानवी तस्करी या गुन्हेगारी विश्वातल्या कमालीच्या दोन बाजू आहेत. ड्रग्ज सप्लाय करणारे मानवी तस्करीच्या धंद्यात फार रस घेत नाहीत कधीच… पण मानवी तस्करीच्या धंद्यासाठी ड्रग्जच्या तस्करीचा जोडधंदा म्हणून वापर करणारे मात्र या काळ्या दुनियेत खूप आहेत. त्यांचाच एक्स-रे ‘मर्दानी’मध्ये काढला गेलाय. म्हणूनच क्राईम ब्रँचवाले कारवाई करताना पुरेपूर अभ्यास करतात. हा अभ्यास सिनेमात या नेटकरींना सापडेल की नाही हे सांगणं खरंच कठीण आहे.

माझ्या आजवरच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत क्राइम रिपोर्टर म्हणून काम करण्याची मोठीच संधी मला मिळाली. या कार्यालयीन जबाबदारीमुळेच अनेक वरिष्ठ/कनिष्ठ अधिकारी संपर्कात आले. या अधिकारींनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच मला पोलीस खातं नीट समजून घेता आलं. या खात्यातील खासकरून क्राइम ब्रँचचे अधिकारी नि त्यांची कार्यपद्धती अभ्यासता आली. बेफाम काम करतात हे अधिकारी. गुन्ह्याचा छडा लावण्याची यांची रितच भन्नाट असते. गुन्हा घडल्याची बातमी मिळाल्यानंतर या क्राइम ब्रँचवाल्यांचं नेटवर्क त्याच क्षणापासून ऑन होतं. अगदी गुन्हा घडला ते ठिकाण, तो दिवस, तारीख, वेळ सारंच त्यांच्या मनोमेंदूत स्कॅन होऊ लागतं. तात्काळ… गुन्हा तर घडलेला असतो. आता आव्हान असतं ते गुन्ह्याचा छडा लावण्याचं. मग हे क्राइम ब्रँचवाले सुसाट वेगाने सुटतात. काय घडलं नेमकं इथपासून कुणी घडवलं असेल इथपर्यंत त्यांचं विचारचक्र फिरू लागतं. घटनेचं सिक्वेन्स जोडता जोडताच त्यांना क्ल्यू मिळत जातात. असाच क्ल्यू शिवानीला सापडतो. एका सराईताला जेरबंद करायला ती चाळीत पोचते. तो सराईत बंद खोलीत जीवाची मुंबई करत असतो. शिवानी दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेते. इथे शिवानी एक डायलॉग मारते… ‘डर मत रे… तेरा नाम नही रे लिस्ट में… नाम आयेगा तो ठोक दूंगी रे…’ हा मुळचा शिवानीचा डायलॉग नसून वास्तवातील अनेक क्राइम ब्रँचवाल्यांच्या रोजच्या जगण्यातला खराखुरा डायलॉग आहे. (ही बाब कदाचित पोस्टरवाल्या नेटकरींना ठाऊक नसेल. पण वास्तवातील क्राइम ब्रँचवाल्यांना हा डायलॉग ठाऊक आहे…) आणि म्हणूनच हा डायलॉग नि स्त्रीवाद ही दोन टोकं आहेत, असं मला वाटतं… वास्तवातली शिवानी बाईपणाला फाट्यावर मारत काम करत आलीय. तिचं हे काम नि काम करण्याची पद्धतच सिनेमातल्या शिवानीने रेखाटण्याचा प्रयत्न केलाय. त्यात ही शिवानी यशस्वी झालीच आहे. पण तिला फॉलो करणारे नेटकरी मात्र फसले…

तर… त्या सराईत गुन्हेगाराला शिवानी मानवी तस्करीच्या गुन्हेगारांचा तपास करताना पुन्हा एकदा बोलावते. त्याला बिर्याणी खायला देते. तो सराईत तेव्हा तिला माहिती देतो आणि मग सिनेमा वेग धरतो. हा क्ल्यू मिळवणं किंवा त्या क्ल्यूपर्यंत पोचणं हेच खरं कसब असतं क्राइम बँचवाल्याचं. शिवानीने हे कसब अचूक हेरलंय नि ते सिनेमात उत्तमपणे दाखवूनही दिलंय. पण मुद्दा एवढ्यावरच संपत नाही. सिनेमाचं कौतुक करताना सिनेमातील बारीकसारीक तपशिलांचाही विचार केला जाणं आवश्यक असतं. हाच विचार प्रतिक्रियावादी नेटकर्यांनी केला असता तर त्यांना हा सिनेमा ‘बाई’चा सिनेमा वाटला नसता.

एका सशक्त पोलीस अधिकार्याची कहाणी म्हणजे खरंतर हा सिनेमा आहे. असा अधिकारी जो केवळ कर्तव्यदक्ष नाही तर सामाजिक बांधिलकी मानणारा, जपणाराही आहे. असे अधिकारी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच जरी असले तरीही ते आहेत, हे मान्य करावंच लागतं. राणी मुखर्जीने या सिनेमात शिवानी साकारताना वास्तवातल्या मीरा बोरवणकर या वरिष्ठ अधिकारीचा अभ्यास केलाय हे वेगळं सांगायला नकोच. मीरा बोरवणकर या सध्या पुण्यात कार्यरत आहेत. महाराष्ट्राच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक, जिल्हा प्रशासन या महत्त्वाच्या पदावर त्या आज कर्तव्य बजावताहेत. मात्र मीरा बोरवणकर इथपर्यंत सहजसोप्याप्रकारे पोचलेल्या नाहीत. प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे पद मिळवलंय. धाडसी, प्रामाणिक आणि चतुर (बुद्धीने) अशीच आजही मीरा बोरवणकरांची खात्यात आणि समाजातही ओळख आहे. कसाबला फासवार लटकवण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी अतिशय गुप्तता बाळगून यशस्वीरित्या पार पाडणारा अधिकारी दुसरा तिसरा कुणी नसून त्या मीरा बोरवणकरच होत्या. क्राइम बँ्रचमधला आणि क्राइमच्या दुनियेतील मीरा यांचा दबदबा आजही कायम आहे. त्यांच्या सहकार्यांना जी आदरयुक्त भीती वाटते तेवढाच दरदरून घाम नंबरकारींनाही फुटतो, हीच मीरा बोरवणकर यांची खासियत आहे… अशा प्रामाणिक, साहसी अधिकार्याची भूमिका बजावण्याचं राणी मुखर्जीला आव्हान वाटलं नसतं तरच नवल… राणीने मीरा बोरवणकर हे वास्तवातलं व्यक्तिमत्त्व शंभर टक्के पडद्यावर यशस्वीपणे साकारलंय. यासाठी राणीने त्यांचा बारकाईने अभ्यास केलाय. मीरा बोरवणकर यांच्या कामाची पद्धत कशी आहे? त्या बोलतात कशा, चालतात कशा, पाहतात कशा, अशा अनेक बारकाव्यांचा राणीने बारकाईने अभ्यास केल्याचं तिच्या भूमिकेतून जाणवतं. पण एवढं करूनही शिवानी एक महिला अधिकारीच ठरते… ही बाब नेटकरींनी नीट समजून घ्यायला हवी होती. खासकरून ज्यांनी मर्दानीचं पोस्टर डकवलं होतं त्यांनी तरी…

दुसरा त्रासदायी मुद्दा म्हणजे, या सिनेमाचं शीर्षक… ‘मर्दानी’ इतका सुंदर सिनेमा बनवून त्याचं नाव ‘मर्दानी’ ठेवण्यामागची नेमकी मनोभूमिका काय होती? ‘मर्दानी’ या शब्दाचा वेगळा अर्थ इथे सांगण्याची गरज नाही. पण हा शब्द वापरून पुन्हा एकदा साहस, धाडस, पराक्रम, आक्रमकता, शूरता, वीरता हे सारेच गुण केवळ मर्दांमध्येच असतात, हेच सिद्ध केलं गेलं. यावरही एकाही नेटकरीनी पोस्ट लिहिल्याचं वाचनात आलं नाही. पोस्ट नको पण किमान दोन ओळींचा निषेध तर नोंदवायला हवा होता की नाही? एका प्रामाणिक पोलीस अधिकार्याचा सिनेमा बनवताना तिथे स्त्री-पुरुष असा भेद करणं योग्य आहे का? का कुणीच या सिनेमाच्या शीर्षकाला विरोध केला नाही? या प्रश्नांची उत्तरं सोपी आहेत. मुळात हा सिनेमाच महिला पोलीस अधिकारीचा सिनेमा या मानसिकतेतून पाहिला गेला आणि म्हणूनच तो सिनेमा अनेकांना स्त्रीवादी सिनेमा वाटला. यातला स्त्रीवाद नेमकाकोणता ते मात्र कुणीच सांगितलं नाही.

सिनेमा हा लिंग, जाती, धर्म अशा सर्व भेदांच्या पुढचा असतो. सिनेमा बनवण्याचं जसं एक तंत्र आहे तसंच तो पाहण्याचंही एक तंत्र आहे. हे तंत्र जेव्हा इथल्या प्रेक्षकांना अवगत होईल तेव्हाच इथला सिनेमा खर्या अर्थाने सिनेमा म्हणून नावारूपाला येईल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *