देशात सध्या धार्मिक उत्सवांची चलती आहे. सार्वजनिक उत्सवांचीही गर्दी काही कमी नाहीय. श्रावण महिन्यापासून सुरू होणारे हे सण-उत्सव थेट वर्षाअखेरपर्यंत सुरू असतात. काळ आपल्या गतीने पुढे सरकत असतो. मात्र काळाच्या वेगासोबत निसर्गासह अनेक गोष्टींमध्ये कमालीचे बदल घडत असतात. जमान्याच्या या बदलत्या स्वरूपात माणसाचं जगणं वागणंही कमालीचं बदलत चाललंय. २०१४ साल सरत आलं तरीही आपला देश अजूनही विकसनशील देश म्हणूनच जागतिक पातळीवर ओळखला जातोय… देशात आजही अनेक विकासाचे प्रश्न तसेच भिजत पडले आहेत. तरीही इथे मोठ्या जल्लोषात सण आणि उत्सव साजरे केले जाताहेत. खरं तर या देशातील माणूस दिवसेंदिवस अधिकच उत्सवप्रेमी बनत चाललाय. उत्सव हे लोकांमधील एकता अबाधित रहावी, यासाठी साजरे करण्याची मूळ संकल्पना आहे. मात्र आता ही संकल्पना मागे पडत चाललीय. याचं कारण सणांचं आणि उत्सवांचं होत चाललेलं बाजारीकरण… वाढत्या बाजारीकरणाच्या रेट्यामुळे या सार्वजनिक उत्सवांना आता विद्रूप स्वरूपही मिळत चाललंय. उत्सवांच्या साजरीकरणाचं निमित्त करत आपापसातील दुजाभावही अलीकडच्या काळात वाढू लागलाय. आताशा तर हा दुजाभाव धार्मिक तेढ वाढवण्यापर्यंत जाऊन पोचलाय… दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती या सार्वजनिक उत्सवांमुळे आज देशभरात निर्माण झालीय… पोटनिवडणुकांमुळे ‘लव्ह जिहाद’चा प्रयोग पुरता फसल्यानंतर आता हिंदुत्ववादी संघटनांनी ‘गरबा जिहाद’ ही नवीनच शक्कल लढवलीय. त्यांनी आता दांडिया खेळण्यासाठी मुसलमानांवर बंदी आणण्याचा ठराव केलाय… या ठरावामुळे दोन्ही धर्मातील तेढ अधिकच वाढणार आहे, हे स्पष्ट आहे. यामुळेच या बंदीवर आता मोदी यांचं सरकार कोणती भूमिका घेतेय, हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे…

आज सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम आहे. नऊ दिवस देवीची आराधना करून गरबा, दांडिया खेळण्याचा हा उत्सव… खरं तर हा उत्सव सार्वजनिक उत्सव म्हणूनच साजरा केला जातो. मात्र आता या उत्सवावरही धर्ममार्तंडांनी सेन्सॉरशिप आणलीय. नवरात्रोत्सव मंडळांनी हा उत्सव कसा साजरा करायचा यासंदर्भात एक अख्खी सूचीच तयार करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद आणि अन्य काही हिंदू संघटनांनी मिळूनही सार्वजनिक उत्सवाची नियमावली बनवली असून या नियमावलीनुसारच यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करण्याचा फतवा या धार्मिक संघटनांनी काढला आहे. याच फतव्यानुसार आता यंदाच्या नवरात्रोत्सवात देशातील मुस्लिमांना सहभागी होता येणार नाही. तसंच मुस्लीम तरुणांना गरबा खेळण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.

गुजरातमधील गोध्रा हे शहर जगाच्या पाठीवर आजही दंगलीत होरपळलेलं शहर म्हणूनच ओळखलं जातंय. २००२ साली झालेल्या हिंदू मुस्लीम दंगलीमध्ये गोध्रात मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांच्या कत्तली करण्यात आल्या होत्या. या दंगलीच्या खुणा आजही गोध्रात पहायला मिळताहेत. दोन धर्मामधील वितुष्ट कमालीचं टोकाला पोचलेलं असतानाच आता पुन्हा एकदा धार्मिक तेढ वाढवण्याचे प्रयत्न गोध्रात सुरू झालेत… विश्व हिंदू परिषदेने नुकतीच दांडिया आयोजकांची एक बैठक बोलावली होती. ही बैठक केवळ यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणार्या दांडिया-गरबा आयोजकांसाठीच बोलवण्यात आली होती. या बैठकीत विहिंपचे गोध्रामधील नेते आशिष भट्ट यांनी दांडिया आयोजकांशी चर्चा केलीय आणि त्यांना काही सूचना केल्या आहेत. या सूचना अर्थातच विहिंप नेते प्रवीण तोगडिया यांनी मुस्लीम तरुणांना गरबा खेळण्यास बंदी करा, या विधानाच्या अनुषंगानेच होत्या. मध्य प्रदेशच्या आमदार उषा ठाकूर यांनी प्रथम हे विधान केलं होतं. तिथूनच गरब्यात मुस्लिमांना बंदी आणण्यासंदर्भातील चर्चा सुरू झालीय…

प्रवीण तोगडिया आणि आमदार उषा ठाकूर यांनी हे विधान लव्ह जिहादच्या प्रकरणांसंदर्भात केलं होतं… मुस्लीम तरुण हिंदू मुलींना फूस लावतात. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात. त्यांच्याशी लग्न करतात. लग्न करतानाच त्या मुलींचं धर्मांतरही करतात आणि मग मुलं झाली की ते मुस्लीम तरुण हिंदू मुलीला सोडून देतात… अशा प्रकरणांना लव्ह जिहाद म्हटलं जातंय… सध्या या लव्ह जिहादचीच राळ देशभर उठतेय… सर्वसामान्य लोकांमध्येही आता या लव्ह जिहादबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय… गोध्रात पार पडलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीत मुस्लिमांना गरबा खेळण्यास बंदी करण्याबाबत एकमत झालं असून यासाठी विहिंपच्या नेत्यांनी जय्यत तयारीदेखील केली आहे. हिंदू अस्मिता हितरक्षक नावाच्या एका संघटनेने मुस्लिमांना दांडिया खेळण्यास रोखण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज बनवली आहे. हे व्हॉलेंटिअर्स दांडिया खेळण्यासाठी आलेल्यांची नोंद ठेवतील. त्यांच्यात कुणी मुस्लीम तरुण नाही ना यावरही हे व्हॉलेंटिअर्स पाळत ठेवण्याचं काम करणार आहेत. येत्या २५ सप्टेंबरपासून सलग नऊ दिवस चालणार्या या उत्सवात हे कार्यकर्ते कार्यरत असणार आहेत. यासंदर्भात समितीचे सदस्य असलेले जैमिन शहा यांनी दिलेली प्रतिक्रिया आणखीनच आगीत तेल ओतणारी आहे. शहा यांच्यामते, देशातील मुस्लीम हे कायमच देशाच्या राष्ट्रीय घटकांना विरोध करत आले आहेत. इथले मुसलमान आपल्या देशाचं राष्ट्रगीत मानत नाहीत, राष्ट्रध्वजालाही ते विरोध करतात आणि मुख्य म्हणजे या देशातील मुसलमान कायमच हिंदुंच्या सणांना कमी लेखत आले आहेत… आणि म्हणूनच अशा लोकांना आम्ही आमच्या सणांमध्ये, उत्सवांमध्ये सामील होऊ द्यायचं नाही, असा निर्णय घेतला आहे. लव्ह जिहादच्या नावाखाली ते आमच्या हिंदू मुलींना फसवत आहेत. पण आम्हीही आता त्यांना विरोध करायला सज्ज आहोत. आमच्या समितीचे कार्यकर्तेच आता हे काम करतील. आमच्या कार्यकर्त्यांचं गोध्रामधील प्रत्येक दांडियावर बारीक लक्ष असणार आहे, असंही जैमिन शहा यांचं म्हणणं आहे…

दुसरीकडे, विहिंपचे गोध्रामधील नेते आशिष भट्ट यांनी या बंदीचं समर्थन करताना म्हटलंय की, आमच्या माताभगिनी दांडियासारख्या उत्सवात सहभागी होतात कारण हा आमचा धार्मिक उत्सव आहे. हा कोणत्याही प्रकारचा सामाजिक उत्सव नाही. तसंच मुस्लीम तरुणांना या उत्सवात सहभागी होण्याचा कोणाताही अधिकार नाही. कारण ते आमच्या उत्सवात येऊन उपद्रव करतात. गेल्यावर्षी आम्ही अशा तरुणांना दांडियामधून बाहेर काढलेलं होतं. यावर गोध्रामधील दांडिया आयोजकांचंही काहीसं असंच म्हणणं आहे. त्यांच्यामते, दांडिया आयोजक गोध्रा शहारातील काही निवडक मुसलमानांना दरवर्षी दांडियाचं निमंत्रण पाठवतात. मात्र त्यांच्याकडून निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. उलट ते कायमच हा हिंदुंचा सण म्हणूनच दांडियाकडे पाहतात…

गोध्रा शहरात हा गरबा जिहाद रंगत असतानाच मध्य प्रदेशातही याला हवा मिळाली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळचे आमदार रामेश्वर शर्मा यांनीदेखील या दांडियातील बंदीसाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला हिंदू उत्सव समिती आणि आणखी काही हिंदुंच्या धार्मिक संघटनांचे नेते उपस्थित होते. या सर्व संघटनांनीदेखील गरबा जिहादला पाठिंबा दर्शवत मुस्लिमांना गरबा खेळण्यास बंदी आणण्याबाबत एकमत दर्शवलं आहे. या बैठकीत दांडियात मुस्लिमांवरील बंदीचा ठराव संमत केला आणि तो ठराव भोपळच्या जिल्हाधिकारींकडे सुपूर्द केला आहे. यावेळी भाजपा आमदार रामेश्वर शर्मा यांच्यासोबत भाजपच्याच आमदार उषा ठाकूर याही जिल्हाधिकारींना तो ठराव देण्यासाठी गेल्या होत्या. या ठरावात आणखी दोन मागण्या करण्यात आल्या आहेत. त्या म्हणजे, दांडियाच्या सुरुवातीला वंदे मातरम् हे गीत वाजवणं बंधनकारक करावं तसंच दांडिया खेळण्यासाठी येणार्या प्रत्येकाला शासनाने ओळखपत्र द्यावं. ओळखपत्राशिवाय कुणालाच गरबा किंवा दांडिया खेळण्यासाठी परवानगी देऊ नये. इंदौर आणि उज्जेन शहरांमध्ये अशा प्रकारची ओळखपत्रं यापूर्वीच देण्यात आली असल्याचंही आमदार शर्मा यांनी ठरावाच्या निवेदनात सूचित केलंय…

यंदाचा दांडिया किंवा नवरात्रोत्सव अशा विचित्र मागण्यांमुळे चांगलाच गाजणार आहे. ओळखपत्र आणि वंदे मातरम् या गीताच्या वादनाच्या मागणीसोबतच संस्कृती बचाओ मंचचे चंद्रशेखर तिवारी यांनीही सूचना केल्यात… तिवारी यांच्या म्हणण्यानुसार वंदे मातरम् हे गीत गायल्यानंतर आपसूकच हिंदू हे मुस्लिमांपासून वेगळे होतात. तसंच तिवारी यांनी मुस्लीम धर्मगुरूनांही मुसलमानांनी गरबा खेळू नये असा फतवा काढण्यास सुचवलंय… हे चंद्रशेखर तिवारी तेच आहेत ज्यांनी दांडिया आयोजकांना सुचवलंय की, दांडिया खेळण्यास येणार्या प्रत्येकाला पंचगव्य प्राशन करणं बंधनकारक करावं…

मोदी सरकार आल्यापासूनच अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढत होतेय, हे नव्याने सांगायला नकोच. सार्वजनिक उत्सव हे राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी साजरे करायचे असतात. मात्र हिंदुत्ववादाचा अजेंडा असलेल्या या धार्मिक संघटना अशाप्रकारच्या बंदी आणून समाजातील धार्मिक सद्भावनेला धक्का पोचवताहेत हे उघड आहे. यामुळेच आता निवडणुकीच्या प्रचारात लोकशाहीचं गुणगान गाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा बंदी आणण्यावर आणि बंदी आणणार्या संघटनांबाबत काय भूमिका घेताहेत ते पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. अन्यथा हिंदू-मुस्लिमांमधील ही दरी अशीच वाढत जाईल यात शंका नाही.

गरब्यात, दांडियात मुस्लीम तरुणांना बंदी करतानाच काही नियमावलीही बनवण्यात आलीय… ही नियमावली पुढीलप्रमाणे…

१) मुस्लीम तरुणांना गरबा खेळण्यासाठी बंदी आणावी आणि तरीही जर ते खेळण्यास येणार असतील तर त्यांना गोमूत्र किंवा पंचगव्य प्राशन करण्यास सक्ती करावी. (पंचगव्य गायीशी संबंधित असलेल्या पाच पदार्थांचं मिश्रण असतं. यात दूध, तूप, दही, गोमूत्र आणि गोवर्या यांचा समावेश असतो.)

२) जर मुसलमानांना दांडिया खेळायचाच असेल तर त्यांच्या कुटुंबातील केवळ महिलांनाच दांडिया खेळण्यास प्रवेश देण्यात यावा.

३) सर्व गरबा खेळणार्यांनी सक्तिने वंदे मातरम् हे गीत गायलंच पाहिजे. तसंच जीन्स आणि टी-शर्ट घालून गरबा खेळण्यास बंदी घालावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *