सण, उत्सव हे आनंद देणारे, माणसांना एकत्र आणणारे असं आजवर समीकरण मांडलं जात होतं. या उत्सवांमागील सामाजिक आशयही सांगितला जात होता. मात्र उत्सवांच्या नावाखाली जे बीभत्स प्रकार सुरू झालेत त्याने सामाजिक वातावरण बिघडत आहेच पण त्यातील धांगडधिंगा जीवघेणाही ठरतोय. सातार्यात घडलेली घटना ही पुढचा धोका अधोरेखित करणारी आहे. डॉल्बीच्या ढणढणाढाने लोक हैराण झाले आहेतच. पण या आवाजाने एक भिंतच जमीनदोस्त झाली. या भिंतीखाली चिरडून तीन जणांचा बळी गेलाय. डॉल्बीमुळे भिंत कोसळली याचा अर्थ या डॉल्बीचा आवाज किती भयाण असेल याची कल्पना केलेली बरी. गेल्या अनेक दिवसांत याबाबत लोकांच्या तक्रारी होत्या. मात्र उत्सावांतील डॉल्बीच्या आवाजाला धार्मिक वलंय असल्याने या तक्रारी ऐकू येत नव्हत्या आणि ऐकू आल्या तरी त्यावर काही कारवाई करण्याची धमक इथल्या पोलीस यंत्रणेने कधी दाखवली नाही. ही बेपर्वाई आता लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. म्हणूनच धर्म, जात, उत्सव या पलीकडे जाऊन याकडे सामाजिक प्रश्न म्हणूनच पाहिलं पाहिजे. या घटनांसाठी या उत्सवी मंडळांना जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे.

डॉल्बी शिवाय कोणताही उत्सव साजरा होत नाही, अशी परिस्थिती आज आहे. राजकीय सभाच नव्हे तर शिवजयंती, आंबेडकरजयंतीही यातून सुटलेली नाही. दहिहंडी आणि गणपतीत तर हा उन्माद टीपेला पोचतो. धार्मिक ज्वर अंगात येतो. त्यापुढे कशाचंच भान राहत नाही. जवळ शाळा असो, मुलांच्या परीक्षा असो की इस्पितळ असो काय कोणाला त्रास झाला तरी तो धार्मिकतेसाठी सहन करायला हवा असाच एक दंडक झालाय. असह्य वातावरण यातून तयार झालंय. गणेशोत्सव तर मोठ्या आवाजाशिवाय साजराच होत नाहीये. यातून बहिरेपणा वाढतोय याची आकडेवारीही आहे. हृदयविकाराच्या लोकांना तर या आवाजाने प्रचंड त्रास होतो. उग्र आवाजामुळे आरोग्याचा प्रश्न कसा भयानक होतोय याचा शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. यापेक्षाही ज्यावेळी मिरवणुका जातात तेव्हा घराच्या खिडक्यांच्या काचा खडखडू लागतात. भिंती दणदणू लागतात. हा अनुभव सार्वत्रिक आहे.

ध्वनीप्रदुषणाचं हे प्रकरण कोर्टात गेलं. या सुनावणीत अनेक गंभीर गोष्टी कोर्टाच्या समोर आल्या. त्यामुळे आवाजाचा हा धोका रोखण्याबाबत हायकोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत. या आदेशाचं पालन मात्र होत नाहीये. याचीच परिणती सातार्यात घडली आहे. कोणत्याही कार्यक्रमात वा मिरवणुकीत ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी ५५ डेसिबल्स एवढी आवाजाची मर्यादा स्पष्ट करण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त आवाज झाला तर तो पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्याला हानीकारक असतो. म्हणूनच या कार्यक्रमांना परवानगी देताना तशी हमी लिहून द्यावी लागते. यावर पोलिसांनी देखरेख करायला हवी. आवाजाच्या क्षमतेचं उल्लंघन होत नाही ना हे पहाण्यासाठी पोलीस ठाण्यांना यंत्र दिलीत. मात्र पोलिसांनी नीट प्रशिक्षण नाही, असं म्हणत या सगळ्या कायदाद्रोही घटनांवर पांघरूण घातलं जातं. त्यामुळे यात पोलीस दलाचा बेजबाबदारपणाही पुढे आला आहे.

परवाच्या मिरवणुकीत या आवाजाची तीव्रता एवढी होती की सातार्यात ती भयानक घटना घडली. एक अख्खी भिंत कोसळली. माणसं चेंगरली, अनेक लोक जखमी झाले. मिरवणुकीतील जमाव एवढा बेभान होता की या जखमींना मदत मिळवून देण्यातही अडचणी येत होत्या. अॅम्ब्युलन्स पोचू शकत नव्हती. हा कुठला धर्म? इतके हे कार्यकर्ते म्हणवणारे बधीर झालेत का? या सगळ्यात समाज म्हणून काहीच जबाबदारी कुणी घेणार नाही? आणि म्हणूनच ज्या मंडळांच्या डॉल्बीमुळे ही घटना घडली त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. पोलिसांनी वेळीच हा आवाज रोखला नसल्याने तेथील पोलीस अधिकार्यांनाही त्वरित निलंबित करायला हवं. समाजाने यासाठी आग्रही भूमिका घ्यायला हवीय. भान असणार्यांनी आता बेभान झालेल्यांना वठणीवर आणायला हवं…

 

ते ?हणाले…

आप सर्व पक्षांच्या संपर्कात आहे. यांमध्ये भाजपच्या काही आमदारांचाही समावेश आहे. मात्र आमचा प्रयत्न इथे सरकार स्थापन करण्याचा नाही; तर गैरमार्गापासून सत्ता मिळवण्यापासून भाजपला रोखण्याचा आहे. दिल्लीमध्ये आता निवडणुका व्हाव्यात. लवकरच भाजपला लोकांसमोर उघडं पाडण्यासाठी एक आंदोलन करणार आहोत. भाजपास निवडणुकांची भीती का आहे? त्यांचं सरकार आहे, त्यांचे राज्यपाल आहेत, शिवाय सातही खासदार त्यांचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना दिल्लीमध्ये निवडणूक का नको आहे?

 – अरविंद केजरीवाल, नेते, आम आदमी पार्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *