मला चित्रपटसृष्टीत येऊन आता जवळपास दहा वर्षं झाली आहेत. या दहा वर्षांत मी अनेक चांगल्या भूमिका केल्या. यातील काही भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रसिसाददेखील दिला. या सगळ्या भूमिकांमध्ये मी ‘रंग दे बसंती’ या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना अधिक आवडली. या चित्रपटात माझ्या प्रियकराच्या मृत्युची बातमी कळल्यावर माझी जी अवस्था होते, माझे त्या दृश्यातील हावभाव हे सारं प्रेक्षकांना खूप आवडलं होतं. माझा भाऊ सैफ अली खान याने तर हे दृश्य पाहून माझी पाठ थोपटली होती. पण आतापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीत मला एखादा स्त्रीप्रधान चित्रपट साकारण्याची संधी मला मिळाली नव्हती याची मला नेहमीच खंत होती. पण आता ‘चारफुटिया छोकरे’ या चित्रपटात मी अशीच एक स्त्रीप्रधान भूमिका साकारणार आहे.

‘चारफुटिया छोकरे’ या चित्रपटातून प्रेक्षकांना आपल्यातील आत्मविश्वास वाढवण्याचा आणि जीवनात कोणत्याही गोष्टीत हार न मानण्याचा संदेश नक्कीच मिळेल. मी या चित्रपटात नेहा ही व्यक्तिरेखा साकारत आहे. नेहा ही भारतात राहणारी नाहीय. तिच्या आईवडिलांच्या गावात एखादी शाळा बांधता यावी हे स्वप्न घेऊन ती भारतात आली आहे. पण इथे आल्यावर आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे याची तिला काहीच कल्पना नाहीय. या गावात आल्यावर ती अवधेश, हरी आणि गोरख या तीन मुलांना भेटते. ते तिघंही तिच्याशी खूपच चांगले वागतात. पण हे तिघंही अट्टल गुन्हेगार आहेत हे तिला माहीतच नसतं. अवधेशच्या आईला भेटल्यावर तिला कळतं की या गावात वाईट लोकांचं साम्राज्य आहे आणि त्यांच्या इच्छेशिवाय इथे कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही. इथल्या सगळ्या लहान मुलांना ते चुकीच्या मार्गाने जाण्यास भाग पाडत असतात. हे सगळं ऐकल्यावर तिथल्या मुलांना या सगळ्यांतून बाहेर काढायचं असं ती ठरवते. समाजात लहान मुलांच्या होणार्या शोषणाविरुद्ध लढणार्या एका महिलेची कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

‘चारफुटिया छोकरे’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना नेहा आणि माझ्यात खूप सारं साम्य असल्याचं मला जाणवलं. माझ्या खर्या आयुष्यातही मी लहान मुलांच्या शिक्षणाच्या अभियानाशी जोडलेली आहे. त्यामुळे हा चित्रपट करताना मीदेखील या व्यक्तिरेखेसारखी आहे असं मला सारखं वाटत होतं. हा चित्रपट करत असताना मला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी कळल्या. अनेक ठिकाणी लहान मुलांना शिक्षण न देता त्यांना वाईट मार्गाला लावण्यात येतं हे सगळं मला या चित्रपटाच्या माध्यमातून जवळून जाणता आलं. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातील नेहा ही भूमिका खास माझ्यासाठी लिहिण्यात आली आहे. तसंच या चित्रपटाचा विषय हा आजच्या काळातील असल्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाशी नक्कीच जोडला जाईल असा मला विश्वास आहे. या चित्रपटाचे निर्माते सुनिल खोसला आणि विभा दत्ता खोसला यांना चित्रपटातील या विषयामुळे समाजात नक्कीच काही बदल घडेल असा विश्वास आहे. या चित्रपटाचं शीर्षक ‘चारफुटिया छोकरे’ ठेवण्यामागेदेखील एक कारण आहे. या चित्रपटात लहान मुलांना पैशाचं आमिष दाखवून खुनासारखी वाईट कृत्यं त्यांच्याकडून करून घेतली जातात. या लहान मुलांची उंची चार फूट किंवा त्याच्या आसपासच असते आणि त्यामुळे या चित्रपटाचं नाव ‘चारफुटिया छोकरे’ असं ठेवण्यात आलं आहे.

या चित्रपटात जाकीर हुसेन, मुकेश तिवारी, लेख टंडन, सीमा बिस्वास यांसारखी कलाकारांची तगडी टीम आहे. सीमा बिस्वास या तर राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या अभिनेत्री आहेत. तसंच हर्ष मायर हा बालकलाकारही या चित्रपटात आहे. या सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. या चित्रपटाचं चित्रीकरण उत्तर प्रदेशमध्ये करायचं असं आम्ही ठरवलं होतं. पण काही कारणास्तव ते होऊ शकलं नाही. म्हणून या चित्रपटाचं चित्रीकरण आम्ही महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे केलं आहे.

आपल्या देशात अनेक ठिकाणी लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येतं. लहान वयात त्यांच्या हाती खेळणी देण्याऐवजी त्यांच्या हातात बंदुका दिल्या जातात. लहान मुलांचं बालपण हिरावून घेण्याचा कोणालाही काहीही अधिकार नाहीय. त्यामुळे एक चांगला संदेश आम्ही ‘चारफुटिया छोकरे’ या चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

सोहा अली खान  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *