वर्ण, जात, वंश, धर्म यांचा वापर करून राजकीय सत्तासंपादन आणि सत्ता टिकवण्याची फॅसिस्ट पद्धत जगाच्या राजकारणात हिटलरने रुजवली. ज्यू समजाला आर्यवंशीय युरोपीयन (जर्मन) समाजाचे शत्रू म्हणून उभं करण्यात हिटलर यशस्वी झाला. एका बाजूला लोकशाही समाजवादाचं तत्त्वज्ञान (सोशल डेमोक्रॅटस्) मांडत, दुसर्या बाजूला प्रखर ज्यू-विरोध, ज्यू वंशाचं निर्दालन अशी दुहेरी नीती अवलंबत हिटलरने अखेरीस जर्मनीत स्वतःची हुकूमशाही स्थापली. सर्व जगावर दुसरं महायुद्ध लादलं. जगाची भौगोलिक आणि ऐतिहासिक रचना पूर्णपणे बदलून टाकली. यातून तयार झालेल्या परिस्थितीचे परिणाम आजही जगाच्या राजकारणात दिसत आहेत.

मात्र हिटलरच्या वांशिक श्रेष्ठत्वाच्या तत्त्वज्ञानाची आणि फॅसिस्ट प्रवृत्तीची जगभर छीःथू झाली. आजही वर्ण-धर्म—वंशवादी तत्त्वज्ञानाला जगात थारा नाही. हिटलरच्या आणि नाझींच्या अमानुष कृत्यांवर अनेक प्रकारचं साहित्य, चित्रपट निर्माण झाले. नाझींच्या क्रौर्याचे अनुभव आज सत्तर वर्षांनंतरही नव्याने उजेडात येत आहेत.

याच क्रमातील अगदी अलीकडे म्हणजे १६ सप्टेंबर २०१४ रोजी पुढे आलेली ही कहाणी.मार्गॉट वोक (Margot Woelk) या ९५ वर्षीय महिलेने १६ सप्टेंबर रोजी जर्मनीच्या ‘आर बी बी’ दूरचित्रवाहिनीवरून पहिल्यांदा दुसर्या महायुद्धात तिने घेतलेले भयानक अनुभव जगासमोर मांडले. विशेषतः हिटलरच्या आयुष्याशी अतिशय जवळून जोडल्या गेलेल्या मार्गॉटचे अनुभव अंगावर शहारे आणणारे आहेत.

कोण होती ही मार्गॉट वोक? सुमारे ७० वर्षं ही महिला गप्प का बसली?आज, ९५ वर्षांची असलेली मार्गॉट वोक ही हिटलरच्या बंकरमध्ये ‘फूड- टेस्टर’ म्हणून काम करत होती. तेही हिटलरच्या अखेरच्या काळात, १९४५ जानेवारीपर्यंत. खरंतर तिने स्वतःहून काही हे काम स्वीकारलं नव्हतं. तर मार्गॉट आणि अन्य १५ तरुण स्त्रियांना पकडून सक्तिने त्यांच्यावर हे काम लादलं गेलं होतं.

मार्गॉट वोकचा जन्म १९१७ सालचा. ती काही ज्यू वंशीय नाही. तिचे वडील जर्मन रेल्वे कर्मचारी होते. १९३३ साली नाझींची सत्ता जर्मनीवर प्रस्थापित होण्यापूर्वी तिचं आयुष्य मुक्त होतं. तिच्यावर कसलीच बंधनं नव्हती. मार्गॉट वोकला अनेक ज्यू मित्रमैत्रिणी होते. मार्गॉट आणि तिचं कुटुंब बर्लिनमध्ये रहात होतं. आपला पती कार्लसोबत मार्गॉट लग्नानंतरही बर्लिनमध्येच होती. १९४१ साली बर्लिनवर झालेल्या बॉम्बहल्ल्यात त्यांचं घर उद्ध्वस्त झालं आणि ते उघड्यावर आले. कार्लला नाझींनी सक्तिने सैन्यात भरती केलं. (तोही ज्यू वंशीय नव्हता.) बॉम्बहल्ल्यात उद्ध्वस्त झालेलं घर आणि युद्धावर धाडला गेलेला नवरा यामुळे मार्गॉटला आसरा शोधणं भाग होतं. अर्थात फारसे पर्याय नसल्यामुळे ती पोलंडमधील पूर्व प्रूशियातील पार्टस्च या गावात राहत असलेल्या कार्लच्या आईकडे रहायला गेली. हे गाव बर्लिनपासून ४०० मैलांवर आहे. या ठिकाणी आपण सुरक्षित राहू शकू अशी मार्गॉटची अपेक्षा होती. पण दुर्दैव असं की, या पार्टस् गावच्या जवळच हिटलरचा मुक्काम असलेलं ‘वुल्फ लायर’ हे मुख्य ठाणं होतं. ‘वुल्फ लायर’मध्ये कडेकोट बंदोबस्त होता. दुसर्या महायुद्धाचा तो अखेरचा काळ होता. नाझी जर्मनीचा पराभव जवळ आला होता. दोस्त राष्ट्रांच्या फौजा कधीही बर्लिनमध्ये घुसणार अशी चिन्हं होती. हिटलरचा खून होणार अशा अफवा होत्या. त्यामध्ये काही अंशी तथ्यही होतं. खुद्द हिटलरच्या ‘वुल्फ लायर’ या मुख्य ठाण्यातील अनेक लष्करी अधिकारी हिटलरची हत्या घडवून आणण्यास टपून बसले होते. या शिवाय दोस्त राष्ट्रांतर्फे विशेषतः इंग्लंडच्या गुप्तहेरांमार्फत हिटलरला अन्नातून विषप्रयोग केला जाईल अशी भीती त्यांना वाटत होती. याच काळात म्हणजे २० जुलै १९४४ रोजी ‘वुल्फ लायर’मधील काही जर्मन अधिकार्यांनी एक बॉम्बस्फोट घडवून हिटलरला ठार मारण्याचा प्रयत्न केला. अर्थात या स्फोटातून हिटलर बचावला. या स्फोटासाठी ४१ अधिकार्यांना जबाबदार ठरवून त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. परंतु, या घटनांमुळे हिटलरला दिलं जाणारं अन्न पूर्वतपासणीशिवाय कधीही त्याच्या तोंडात जात नसे. यासाठी हिटलरसाठी तयार करण्यात आलेलं अन्न खास नेमणूक केल्या गेलेल्या पंधरा ‘फूड टेस्टर्स’ना प्रथम खाऊ घालण्यात येत असे. त्यांनी हे अन्न खाल्ल्यावर आणि त्यांना त्यापासून काही बाधा झालेली नाही याची खात्री झाल्यावरच ते हिटलरकडे पाठवलं जात असे.

मार्गॉट वोक हिने याबाबतचा अनुभव तब्बल ७० वर्षांनी जगासमोर सांगितला आहे. ‘आर बी बी’ वाहिनीवरील आपल्या मुलाखतीत मार्गॉट वोक म्हणाली, ‘अक्षरशः अपघाताने मी हिटलरच्या फूड टेस्टरच्या कामात ओढली गेले. पार्टस्च या गावचा महापौर नाझींचा एकनिष्ठ पाईक होता. त्याने निवडक मुलींना या कामाला जुंपलं. एस. एस. या नाझींच्या अत्याचारी गटाचे लोक रोज आमच्या घरातून आम्हा मुलींना एका खास बसद्वारे ‘वुल्फ लायर’ ठाण्यावर नेत असत. तिथे एका बंद पडलेल्या शाळेत आम्हाला बसवलं जाई. मग आमच्यासमोर हिटलरला त्या दिवशी देण्यात येणारे सर्व पदार्थ ठेवले जात. प्रत्येकीला समोर ठेवलेल्या सर्व डिश पूर्णपणे संपवाव्या लागत असत. त्यानंतर एक तास आम्हाला तिथेच डांबून ठेवलं जात असे. तासानंतर आम्हाला काही अपाय झालेला नाही याची खात्री झाल्यानंतर रात्री बसमध्ये भरून आम्हाला परत पाठवलं जात असे. १९४१ ते १९४५ अशी चार वर्षं हे काम आमच्याकडून करून घेतलं जात असे.

रोज ‘वुल्फ लायर’मध्ये पहिला घास तोंडात घालताना आम्हा सर्वांच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहत असत. कदाचित हा घास आमच्या आयुष्याच्या शेवटचा घास आहे याची जाणीव अंगात भीतीची लहर पसरवत असे. पण पर्याय काय? चूपचाप घास गळ्याखाली ढकलत असू. कधीही उलटी होऊन अन्न उलटून पडेल अशी भीती वाटत असे. या चार वर्षांच्या काळात मी कधीही अॅडॉल्फ हिटलरला बघितलं नाही. फक्त त्याचा लाडका ऑल्सेशियन कुत्रा ब्लाँडी मी बघत असे. २० जुलै १९४४ रोजी हिटलरला मारण्यासाठी त्याच्याच अधिकार्यांनी बॉम्बस्फोट केला, तेव्हा आम्ही सर्व मुली तिथेच होतो. एक प्रचंड आवाज झाला. आम्ही बसलेलो असलेल्या खोलीलाही हादरा बसला. छताचा काही भाग पडला. आम्ही बसलेल्या बाकड्यावरून उडून जमिनीवर आदळलो. त्यावेळी काही अधिकारी ‘हिटलर मेला, खलास’ असं ओरडत होतं. पण तसं काहीही घडलेलं नव्हतं.’

मार्गॉट वोकने पुढे सांगितलं की, रोजच्या रोज आम्ही विषाची परीक्षा करत होतो. जणू मृत्युची वाट पहात होतो. या काळातच एस. एस. या गुप्तहेर संघटनेचे रक्षक अतिशय क्रूरपणे आमच्याशी वागत. त्यांनी माझ्यावर एकदा बलात्कार केला.

अखेरीस १९४५ मेमध्ये बर्लिनमध्ये लाल फौजा घुसल्या. त्यावेळी, एका सहृदय एस. एस. अधिकार्याने आम्हाला मदत केली आणि नाझी प्रचारप्रमुख जोसेफ गोबेल्स वापरत असलेल्या खास रेल्वेगाडीत आम्हाला कोंबलं आणि बर्लिनला पाठवलं. त्यामुळे आमची सुटका झाली. पण आमचं दुर्दैव संपलं नव्हतं. बर्लिन शहर संपूर्ण उद्ध्वस्त झालं होतं.

स्वतःला वाचवण्यासाठी आम्ही मुलींनी म्हातार्या स्त्रिचा वेष करून लपून बसण्याचा प्रयत्न केला. पण रशियन सैनिकांनी आमचा शोध घेतलाच. त्यांनी आमचे कपडे फाडले. आम्हाला बर्लिनमधील एका डॉक्टरच्या फ्लॅटमध्ये डांबून ठेवलं. पुढे चौदा दिवस त्या सैनिकांनी आमच्यावर सामूहिक बलात्कार केले. आयुष्यातील तो अतिशय घाणेरडा, कायमचा उद्ध्वस्त करणारा काळ आणि अनुभव होता. त्यामुळे माझी गर्भधारणेची क्षमताच कायमची नष्ट झाली. मला खरंतर एक मुलगी हवी होती.

पण तरीही मी सुदैवीच ठरले. माझ्याबरोबरच्या सर्व फूड टेस्टर्स मुलींना रशियन सैनिकांनी गोळ्या घालून ठार मारलं. मला एका ब्रिटिश अधिकार्याने त्यातून वाचवलं. त्याचं नाव नॉर्मन. युद्ध संपल्यावर त्याने मला इंग्लंडला येण्याचं आमंत्रण दिलं. पण मला कार्लचा शोध घ्यायचा होता. मला मनोमन वाटत होतं की तो येणार आणि खरंच १९४६ साली अचानक कार्ल दारात उभा राहिला. सोव्हिएत वॉर कॅम्पमधून त्याची सुटका केली गेली.

पण त्याचं आयुष्य कधीच परत ‘नॉर्मल’ झालं नाही. कार्ल पुढे २४ वर्षं जगला. तर मार्गॉट वोक आज वयाच्या ९५व्या वर्षी एकाकी जीवन जगत आहे. कदाचित दुसर्या महायुद्धातील अखेरच्या साक्षीदारांपैकी ती एक! आजवर ती गप्प बसली, कारण लाज आणि शरम. स्वतःच्या जगण्याची तीव्र शरम वाटणारी मार्गॉट आजही त्यातून बाहेर आलेली नाही.

सत्तापिपासू, वंश/धर्म वर्चस्ववादी माणसांच्या क्रौर्याची जीतीजागती खूण म्हणजे मार्गॉट वोक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *