राम कुमारी या ३८ वर्षीय महिलेला पाठीच्या कण्याचं फ्रॅक्चर होतं. त्याची योग्य तपासणी करण्याकरता छत्तीसगडमधील रायपूर येथील डॉ. बी. आर. आंबेडकर स्मृती चिकित्सालयात दाखल करण्यात आलं होतं. राम कुमारीची एम.आर.आय. तपासणी करण्यात आली. अनेकांनी एम.आर.आय. चाचणी कधी ना कधी बघितली असेल. हल्ली अनेकदा कॅन्सर, डोक्याशी (मेंदूशी) संबंधित विकार, हाड मोडणं, इत्यादी गंभीर आजारात डॉक्टर एम.आर.आय. करवून घेतात. रोगाचं/आजाराचं नेमकं निदान करण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो. (प्रत्येक वेळेस एम.आर.आय. करणं आवश्यक असतं का? हा चर्चेचा मुद्दा आहे.) एम.आर.आय. या संक्षिप्त इंग्रजी अद्याक्षरांचा अर्थ आहे. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. या तपासणीमध्ये रुग्ण व्यक्तिला एम.आर.आय. मशिनमध्ये स्टे्रचरवर झोपवून ती सरकवली जाते. या मशिनमध्ये उच्चदाबाचं चुंबकीय क्षेत्र (मॅग्नेटिक फिल्ड) तयार केलं जातं. या चुंबकीय क्षेत्राच्या आधारे रुग्णाच्या शरीरातील प्रोटॉन कृतिशील केले जातात आणि त्यांची प्रतिमा पडद्यावर तपासली जाते. ही सर्व प्रक्रिया अतिशय सुरक्षित असते. त्यापासून रुग्णाला कसलाही धोका नसतो किंवा अपाय होत नाही. उलट या तपासणीचं वैशिष्ट्य असं की, शरीरातील अगदी प्रत्येक मिलिमीटरची प्रतिमा घेता येते. तपासणी करता येते. त्यामुळे अचूक निदान करणं शक्य असतं. म्हणजेच वैद्यकीय तंत्रज्ञानाने दिलेलं हे एक वरदान आहे.

तर याच प्रकारची एम.आर.आय. चाचणी राम कुमारी या महिलेची केली गेली. चाचणी उत्तमप्रकारे पार पडली. एम.आर.आय. मशिन मधून रुग्ण महिलेला बाहेर ओढण्यात आलं. संबंधित डॉक्टर आणि त्यांना मदत करणारे टेक्निशिअन्स रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णाला हॉस्पिटलमधील त्याच्या वॉर्डमध्ये घेऊन जाण्याची सूचना देऊन निघून गेले. इकडे नातेवाईकांनी बाहेरचं धातुचं स्ट्रेचर आणलं आणि रुग्ण महिलेला हलवण्यास सुरुवात केली. पण क्षणार्धात ती रुग्ण महिला स्ट्रेचरसहित अत्यंत वेगाने एम.आर.आय. मशिनकडे ओढली गेली. दाणकन ती रुग्ण महिला मशिनच्या आत आदळली. नुसतीच आदळली नाही तर राम कुमारीचं डोकं आणि तोंड एम.आर.आय. मशिनला चिकटून बसलं. रुग्ण महिला मशिनपासून सुटूच शकत नव्हती. रुग्णाचे नातेवाईक गोंधळून गेले. हा विचित्र अपघात घडला कारण एम.आर.आय. मशिनमध्ये प्रचंड मोठ्या दाबाचं चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं होतं. त्या चुंबकीय आकर्षणाने महिला रुग्ण असलेलं धातुचं स्ट्रेचर आत ओढलं गेलं. या अपघातामुळे आधीच पाठीचा कणा फ्रॅक्चर असलेल्या राज कुमारीचा जबडा आणि डोक्याला आणखी फ्रॅक्चर्स झाली. राम कुमारीचा जीव वाचला. परंतु तिची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात का घडला? तर, एम.आर.आय. मशिनमध्ये प्रचंड दाबाचं चुंबकीय क्षेत्र निर्माण केलं जातं. याची तीव्रता किती असते तर सामान्यतः पृथ्वीची चुंबकीय शक्ती ०.५ टेसला इतकी असते. (टेसला – हे चुंबकीय शक्ती मोजण्याचं परिमाण) तर एम.आर.आय. मशिनमध्ये हीच शक्ती ५००० ते १०,००० टेसला इतकी असते. त्यामुळे या क्षेत्रात येणारी कोणतीही धातुची वस्तू झटकन मशिनकडे ओढली जाते. म्हणूनच एम.आर.आय. चाचणी करताना रुग्णाच्या शरीरावरील कोणतीही धातुची वस्तू उदाहरणार्थ, घड्याळ, गळ्यातली चेन, अंगठी आदी दागिने, हातातील कडं, नाणी सर्व काढून ठेवा अशी सूचना डॉक्टर्स देतात. अर्थात, त्यामागील कारणं रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना दिली जात नाहीत. त्यामुळे अनेकदा रुग्ण आणि नातेवाईकांना या सूचनेचं गांभीर्य लक्षात येत नाही. परंतु सर्वांनी हे ठामपणे लक्षात घ्यायला हवं की, एम.आर.आय. मशिनच्या आसपास, कोणतीही धातुची वस्तू नेणं जीवावर बेतू शकतं. राम कुमारीच्या नातेवाईकांना या गोष्टीची कल्पना नसल्यामुळे त्यांनी राम कुमारीला नेण्यासाठी धातुचं स्ट्रेचर आणलं. त्यामुळे हा दुर्दैवी अपघात घडला. हे असं का घडलं हे सुद्धा त्यांना कळलं नाही.

पण राम कुमारीच्या अपघातला तिचे नातेवाईक अजिबात जबाबदार नाहीत. उलट एम.आर.आय. चाचणी करणारे डॉक्टर्स आनंद जयस्वाल आणि दोघे टेक्निशिअन्स देवेश पटेल आणि अब्दुल खालिद हे तिघे सर्वस्वी जबाबदार आहेत. एकतर त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना ग्लासफायबरचं स्ट्रेचरच वापरा, धातुचं स्ट्रेचर अजिबात वापरू नका याची स्पष्ट सूचना देणं आवश्यक होतं. खरंतर, रुग्णाला एम.आर.आय. चाचणीनंतर वॉर्डपर्यंत सुरक्षित पोहचवणं ही जबाबदारी मशिनचे टेक्निशिअन्स आणि रुग्णालयाच्या कर्मचार्यांचीच असते. मात्र सार्वजनिक रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी सर्वांचा रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत बेजबाबदारपणाचा असतो. एकतर सार्वजनिक रुग्णालयातील रुग्ण हे गरीब वर्गातील असतात. त्यांना सरकारी रुग्णालयात मिळणारी वैद्यकीय सेवा हा एकमेव आधार असतो. त्यामुळे या रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी आपण रुग्णांवर उपकारच करतो असाच त्यांचा अमानुष दृष्टिकोन असतो. त्यांच्याच परिणामी राम कुमारीवर ही घातक परिस्थिती ओढवली हे निर्विवाद आहे. असा अपघात कोणत्याही सार्वजनिक रुग्णालयात घडू शकतो. धक्कादायक भाग म्हणजे रायपुरच्या या बी. आर. आंबेडकर रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक चौधरी यांनी पत्रकार परिषदेत असं विधान केलं की, ‘या अपघातात संबंधित डॉक्टर आणि टेक्निशिअन्सचा हलगर्जीपणा होता हे आम्ही मान्य करतो. त्या सर्वांना निलंबित करण्यात आलं आहे. संबंधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. पण या अपघातामुळे रुग्णालयाचं फार मोठं नुकसान झालं आहे. हे एम.आर.आय. मशिन बारा कोटी रुपयांचं आहे. ते आता पार बिघडलं आहे! हे मशिन आणण्यासाठी आम्ही सात वेळा टेंडर्स मागवली होती.’

सरकारी अधिकारी किती यांत्रिकपणे विचार करतात. अशा अपघातामुळे रुग्णाचा जीव गेला असता याविषयी त्यांना फारसं दुःख वाटत नव्हतं. तर एम.आर.आय. मशिनची काळजी अधिक वाटत होती! (ही घटना रायपुरमध्ये आठ सप्टेंबर रोजी घडली.)

पण या रुग्णालयातील अनागोंदी प्रसिद्धच आहे असं आता पुढे येत आहे.  याच रुग्णालयात आणखी एक अत्यंत मनोरंजक प्रकार जुलै महिन्यात घडला होता. या रुग्णालयाच्या सुपरिन्टेंडण्टना पोस्टाने सर्वोच्च न्यायालयाचा एक आदेश प्राप्त झाला. या आदेशात ‘छत्तीसगड सरकारने केलेल्या ४१ डॉक्टरांच्या बदल्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला असल्याचं म्हटलं होतं.’ या बदल्यांविरोधात रुग्णालयातील तीन डॉक्टर्सनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला असल्याचं दिसत होतं. प्रत्यक्षात या तिन्ही डॉक्टर्सनी आपण असा अर्जच न्यायालयात केला नसल्याचं सांगितलं. आरोग्य खात्याने या प्रकाराची चौकशी केली असता प्रत्यक्षात असा कोणताच दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल झाला नव्हता. म्हणजे कुणा हितसंबंधी डॉक्टरने स्वतः किंवा कोणाला तरी हाताशी धरून सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने नकली आदेश तयार करून आरोग्य खात्याकडे पाठवून दिला. या नकली आदेशामुळे आरोग्य खात्याच्या अधिकार्यांची गडबड उडाली. अखेर कोणीतरी या आदेशाचं नीट परीक्षण केलं, तेव्हा त्यात अनेक स्पेलिंगच्या चुका आढळल्या. Supreme court चं स्पेलिंग ‘Suprim Kort’ असं केलेलं आढळलं. आता म्हणे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

एकूण सर्वच विनोदी प्रकार आहे. असे प्रकार बघितले की प्रश्न पडतो आपला महान भारत देश चालतो कसा? इथे काहीही घडू शकतं. आपला देश आणि समाज म्हणजे एक विलक्षण रसायन आहे.

पण हा मनोरंजक प्रकार बाजूला ठेवला तर राम कुमारीच्या अपघातामुळे एक महत्त्वाचा धडा आपण सर्वांनी शिकायला हवा. तो म्हणजे एम.आर.आय. चाचणी ही जरी संपूर्णपणे सुरक्षित असली तरी, मशिन हाताळणी करणं ही जोखीम आहे. मशिनची सुयोग्य काळजी घेऊन हाताळणी केली नाही तर असे अपघात घडू शकतात. खरंतर एम.आर.आय. कक्षात कोणतीही धातुची वस्तू आणण्यास संपूर्ण मज्जाव हवा तशा स्पष्ट सूचना रुग्णांना आणि नातेवाईकांना समजतील अशा भाषेत ठळकपणे नोंदल्या जायला हव्यात. इथे महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा उपयोग करताना या तंत्रज्ञानामुळे (विशेषतः गुंतागुंतीच्या मशिनसमुळे) रुग्ण, डॉक्टर्स आणि तंत्रज्ञांना कोणती जोखीम स्वीकारावी लागते. सुरक्षाविषयक काय काळजी घ्यायला हवी याचा सविस्तर अभ्यास होणं आवश्यक आहे. हा एक नवाच विषय पुढे येत आहे. मात्र त्याची फारशी नोंद घेतली गेलेली नाही. तेव्हा प्रत्येकाने सावध राहाणं आवश्यक आहे! कारण आमचा देशच अजब आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *