वैभवशाली इतिहासाच्या जोरावर युद्ध जिंकता येत नाही. त्यासाठी मनगटीच जोर असावा लागतो… याची प्रचिती क्रिकेटची पंढरी मानल्या जाणार्या लॉर्डसवर पुन्हा एकदा आली… लॉर्डसच्या मैदानावर गेल्या ८२ वर्षांतील भारताचा हा अवघा दुसरा टेस्ट विजय आहे. १९८६ साली म्हणजेच २८ वर्षांपूर्वी कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यावेळी आताच्या भारतीय टीममधील दहा खेळाडूंचा तर जन्मदेखील झाला नव्हता… आणि याच युवा खेळाडूंनी गाजवलेल्या मर्दुमकीमुळे आता धोणीच्या नेतृत्वाखाली दुसर्यांदा भारताने टेस्ट विजय मिळवलाय. योगायोग म्हणजे दोन्ही कॅप्टन्सनी बरोबर त्यापुर्वी ३ वर्षांआधी वन डेचा वर्ल्डकप जिंकला होता. ज्यावेळी कपिलने लॉर्डसवर वर्ल्डकप ंिजंकला तेव्हा अनेक क्रिकेट पंडितांनी हा विजय म्हणजे भारताला लागलेला जॅकपॉट असल्याचं वणर्न केलं होतं. तेव्हा भारतीय टीमवर विश्वास ठेवायला क्रिकेट तज्ज्ञ तयार नव्हते. आणि म्हणूनच १९८६ सालच्या लॉर्डसवरील टेस्ट विजयाने कपिलच्या टीमकडे अदबीने बघितलं जाऊ लागलं.

धोणीच्याबाबतीत नेमकं उलटं घडलं. याच लॉर्ड्सवर २०११ साली धोणी जगातील सर्वोत्तम क्रिकेट टीम घेऊन मैदानात उतरला होता. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हि.व्हि.एस. लक्ष्मण असे मात्तबर बॅट्समन, आणि झहीर सारखा तेजतर्रार बॉलर तरी भारताच्या पदरी पराभव आला होता. पण यावेळी त्या तुलनेने नवखी आणि युवा टीम घेऊन धोणी लॉर्डसवर उतरला आणि ऐतिहासिक विजय मिळवला. थोडक्यात काय तर जिंकण्यासाठी मनात जिगर हवी आणि मनगटात ताकद हवी…

नियती कठोर असते… लॉर्डसला क्रिकेटची पंढरी मानली जाते. या लॉर्डसच्या ड्रेसिंग रुममध्ये एक फलक आहे. फलक कसला क्रिकेटप्रेमींसाठी ती गीताच… त्या फलकावर लॉर्डसवर ज्यांनी ज्यांनी वन डे किंवा टेस्ट सेंच्युरी झळकावली आहे त्यांची नावं अभिमानाने कोरली जातात. त्यावर अनेक दिग्गजांची नावं आहेत. नाव नाहीय ते फक्त सचिन तेंडुलकरचं… यंदाच्या मॅचच्या समालोचन करायला आलेल्या निवृत्त क्रिकेटपटूंपैकी द्रविड, गांगुली आणि कपिलदेव या तिघांचं नाव त्या फलकावर आहे. इतकंच कशाला मुंबईचा बॉलर म्हणून ओळखल्या जाणार्या अजित आगरकरनेही लॉर्डसवर टेस्ट झळकावलं. आणि हो मुंबईच्या अजिंक्य रहाणेनेही या टेस्टमध्ये लॉर्डसवर सेंच्युरी झळकावली. पण सचिनला मात्र क्रिकेटच्या या पंढरीने अखेर हुलकावणीच दिली.

२८ वर्षांपूर्वी लॉर्ड्सवर मुंबईच्याच एका क्रिकेटपटूने शानदार नाबाद सेंच्युरी ठोकत भारताच्या विजयाचा पाया रचला होता. दिलीप वेंगसरकर यांनी ही कामगिरी केली होती. दिलीप वेंगसरकरच्या शानदार नाबाद १२६ रन्सच्या सेंच्युरीच्या जोरावर आणि चेतन शर्माच्या भन्नाट ६ विकेटसच्या स्पेलमुळे भारताने ऐतिहासिक लॉर्डसवर विजय मिळवला होता. अर्थात भारताच्या या विजयाचं श्रेय हे एखाद दुसर्या खेळाडूला देता येणार नाही. कारण खर्या अथार्न भारताचा हा सांघिक विजय आहे. प्रत्येकाने आपला खारीचा वाटा त्यात उचलला. दुसर्या डावात मुरली विजयची सेंच्युरी अवघ्या ५ रन्सने हुकली. त्याच्या ९५ धावा विजयात निर्णायक ठरल्या. रविंद्र जाडेजाने भुवनेश्वर कुमारच्या साथीने केलेली आठव्या क्रमांकासाठीची ९९ रन्सची भागिदारी भारताला विजयाच्या समीप घेऊन गेली आणि सर्वात महत्त्वाचं ईशांत शर्माचा तो स्वप्नवत स्पेल… ७४ रन्समध्ये ७ विकेट. त्यातही ५ विकेट या चक्क ८ ओव्हरमध्ये टीपलेल्या. इंग्लंडच्या बॅटींगचं कंबरडं ईशांतने मोडून काढलं. विशेष म्हणजे याच ईशांतला पहिल्या इनिंगमध्ये एकही विकेट मिळाली नव्हती. मला ईशांतच्या या कामगिरीत आवडलेला भाग म्हणजे चेंडूवरील त्याचं नियत्रण. जरा स्मृतीला ताण द्या आणि आठवायचा प्रयत्न करा, एखादा भारतीय गोलंदाज अंगावर काटा आणणारे बाऊन्सर टाकतोय. विदेशी टीम त्याच्या बाऊन्सरपुढे सैरावैरा पळतेय. मलातरी असं दृष्य नेहमी स्वप्नातच दिसतं… मुळात भारतीय खेळपट्ट्यांचा आणि बाऊन्सचा तसा फारसा संबंध नाही. कधी एकदा फिरकीस पोषक भारतीय पीचवर चेंडूला उसळी मिळाली आणि तो कंबरेच्यावर उसळलाच तर पीचचे आभार मानायचे… अशा या पार्श्वभूमीवर ईशांत शर्माचा स्पेल जादुई असाच होता.

इंग्लंडचा रुट, प्रायर, स्टोक्स आणि ब्रॉड हे चारही बॅटसमन इशांतच्या बाऊन्सरचे शिकार होते. इशांतची ही करिअरमधली बेस्ट कामगिरी होती. इतकंच काय लॉर्डसवरील भारतीय बॉलर्सची आजवरची ही सर्वोत्तम कामगिरी होती. एकूणच लॉर्डसवरली आजवरची विदेशी बॉलरची ही पाचव्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी होती तर आशियाई म्हणजेच ज्यात पाकिस्तान आणि श्रीलंकेचेही बॉलर्स आले त्यातही ईशांतची कामगिरी सर्वोत्तम होती. सहाजिकच या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅच ठरला.

भारतासाठी हा विजय आणखी एका कारणासाठी महत्त्वाचा होता. वन डेचा वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारताला विदेशात टेस्टमध्ये फार समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. गेल्या १५ टेस्टनंतर भारताचा विदेशातील हा पहिला टेस्ट विजय आहे. त्यामुळे या विजयाने भारतीय टीमलाही नवसंजिवनी मिळालीय. मी ज्या सांघिक विजयाचा उल्लेख करतोय त्याला कारणही तसंच आहे. एकवार या आकडेवारीवर नजर टाका… भारताच्या तळाच्या बॅटसमनचा सरासरी अ‍ॅव्हरेज आहे ४२ रन्स. इंग्लंडच्या तळाच्या बॅटसमननी ३०२ बॉलचा सामना केला आणि २५३ रन्स केले. त्यात दोन हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. तर त्या तुलनेत भारताच्या तळाच्या बॅटसमननी तब्बल ८३७ बॉल्सचा सामना करत खेळपट्टीवर तळ ठोकला आणि हो सहा हाफ सेंच्युरीही ठोकल्या. त्यात भुवनेश्वरवर कुमारचं कौतुक करावंच लागेल. लॉर्डसच्या टेस्टमध्ये त्याने पहिल्या इनिंगमध्ये ६ विकेटही घेतल्यात. बॉलिंगमध्ये तो तुफान फॉर्मात असतानाच बॅटींगमध्येही त्याने आपली उपयुक्तता दाखवून दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *