भारत श्री सुहास खामकरला लाच घेताना पकडलं. लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. ही बातमी येताच अवघं शरीरसौष्ठव जगत हादरलं.

हिंदुस्थानी शरीरसौष्ठवाची शान, महाराष्ट्राच्या खेळाडूंचा मान असलेल्या भारत श्री आणि पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकरने शरीरसौष्ठवाची लाजच काढली. देशाचा गौरव असलेल्या सुहासने ५० हजारांच्या लाचेखातर आपल्या देदीप्यमान कारकिर्दीलाच काळिमा फासला. रायगड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करताना सुहासला सापळा रचून रंगेहाथ पकडलं. या कारवाईने सुहासची लाचखोरी उघडकीस आली आणि अवघं शरीरसौष्ठव विश्व हादरलं. शरीरसौष्ठवाचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असलेला सुहास लाचखोर म्हणून गोत्यात सापडल्यामुळे त्याच्या लाखो चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. शरीरसौष्ठवाची शान आणि मान असलेल्या सुहासची कारकीर्द लाच प्रकरणाने डागाळली गेली असून कोण होतास तू … काय झालास तू… अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू… असा सवाल लाखो शरीरसौष्ठवप्रेमी आणि शरीरसौष्ठवपटू करत आहेत.

हिंदुस्थानी शरीरसौष्ठवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळवून देणार्या सुहासने आपल्या दीड दशकाच्या कारकिर्दीत नऊवेळा भारत श्री, सलग तीनदा महाराष्ट्र श्री आणि दोनदा आशिया श्रीचा बहुमान मिळवला होता. त्याच्या या देदीप्यमान कामगिरीचा गौरव करताना महाराष्ट्र शासनाने पनवेलच्या नायब तहसीलदारपदी त्याची नेमणूक केली होती. शरीरसौष्ठवपटूंसाठी प्रेरणास्थान असलेला सुहास या पदाचा गैरवापर करत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. गेली काही महिने सुहासची लाचखोरी वाढल्यामुळे त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्याचं सुत्रांनी सांगितलं. यावेळी त्याने तक्रारदार बाजीराव जाधव यांच्याकडे सातबार्यावर नाव नोंदवण्यासाठी लाच मागत असल्याचं कळताच पनवेल तहसील कार्यालयातच सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडलं. सुहाससह त्याचा मदतनीस गणेश बोंगाडेला पथकाने ताब्यात घेतलं.

सुहासला रंगेहाथ पकडल्यामुळे शासनाने दिलेला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार काढून घेण्याची शक्यता आहे. तसंच नायब तहसीलदाराच्या नोकरीवर गदा येऊ शकते. एवढंच नव्हे तर त्याची कारकिर्दच संपुष्टात येण्याची शक्यता शरीरसौष्ठव वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर शरीरसौष्ठव वर्तुळातील अनेकांनी या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस अॅड. विक्रम रोठे यांचं असं म्हणणं आहे की, ‘सुहास हा आमच्या संघटनेचा खेळाडू नाही. पण त्याच्याकडून हा प्रकार घडला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी. शासनाने याची गंभीर दखल घ्यावी. परंतु एका खेळाडूकडून झालेल्या गुन्ह्याची शिक्षा पूर्ण खेळाला देऊ नये. या प्रकाराने खेळाची प्रतिमा मलिन झाली आहे. याचे दूरगामी परिणाम खेळावर पडू नयेत हेच आमचे प्रयत्न असतील. तर ‘सुहास हा आमचा अत्यंत मेहनती आणि गुणवान खेळाडू आहे. नक्की काय घडलं ते कळेलच. या लाचखोरी प्रकरणात तो दोषी आढळल्यास त्याला माफी मिळणार नाही. मात्र त्याच्यावर बंदी लादायची की निलंबन करायचं याचा अंतिम निर्णय आम्ही संघटनेच्या बैठकीतच घेऊ. तूर्तास आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत’, अशी प्रतिक्रिया इंडियन बॉडीबिल्डिंग फिटनेस फेडरेशनचे सरचिटणीस संजय मोरे यांनी दिली.

इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनीदेखील या घटनेवर आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘हे वृत्त कळताच आम्हाला धक्का बसला. आताच या प्रकारावर कोणतंही भाष्य करणं चुकीचं ठरेल. पण अशा घटनांमुळे फक्त खेळ आणि खेळाडूंचंच प्रचंड नुकसान होतं. सुहासचं लाचप्रकरण आमच्या खेळासाठी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याचं कुणीही समर्थन करू शकत नाही. खेळाडू हा देशाचा असतो आणि त्याचं त्याला भान असायलाच हवं. त्याची एखादी चूकही खेळासाठी घातक ठरू शकते.’

सुहासला जामीन मिळाला असला तरी त्याने केलेल्या कृत्याबद्दल शरीरसौष्ठवप्रेमी आणि शरीरसौष्ठवपटू यांच्यात चिंतेचं वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *