ऑगस्ट महिन्याच्या २४ आणि २५ तारखेला छत्तीसगड राज्यात तथाकथित धर्मसंसदेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्या धर्मसंसदेत पूर्वशूद्र बहुजन हिंदू धर्मियांचं परम श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या देवत्वाबद्दल निर्णय होणार असल्याची बातमी वाचनात आली. बातमी वाचून संताप आला. आपल्या देशात आज २१व्या शतकातही लोकशाही अस्तित्वात असूनही ब्राह्मणी धर्मव्यवस्थेच्या हुकूमशाहीचंच राज्य असल्याचा पुनःप्रत्यय आला. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला साधारणपणे, अन्य नागरिकांना अडथळा न आणता, कोणताही देव मानण्याचा (Right to faith in any name of God) किंवा न मानण्याचा, कोणत्याही रूपात (Any form & figure of God) अथवा स्वरूपात (Any nature of worshiping the God) त्याची पूजाअर्चा करण्याचा, स्वतःच्या व्यक्तिगत विचार आणि श्रद्धेप्रमाणे कोणत्याही धर्मग्रंथाचं अनुसरण करण्याचा (Right to follow any scripture as Religious book) आणि स्वतःच्या व्यक्तिगत विचार आणि श्रद्धेप्रमाणे धर्माचरण करण्याचा (Right to follow any code of Religious conduct) पूर्ण (complete) आणि बरोबरीचा (Equal) अधिकार  देण्यात आला आहे. म्हणून आमच्या हिंदू धर्मियांची श्रद्धा ठरवण्याचा अधिकार या परधर्मी ब्राह्मणी शंकराचार्य आणि त्यांच्या धर्मापीठाला नाही. मग ही बेकायदेशीर ब्राह्मणी अरेरावी आम्ही का सहन करावी?

या प्रकरणी अनेक लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या देवत्वाबद्दल ब्राह्मणी धर्माचे पीठाधीश शंकराचार्य स्वरूपानंद

सरस्वती यांना शंका उपस्थित करण्याचा मुळी अधिकारच नाही. ते तथाकथित शंकराचार्य हिंदू धर्माचे निर्णायक प्रतिनिधी नाहीत; कारण ते हिंदू धर्माचे साधे अनुयायीदेखील नाहीत; ते आहेत ब्राह्मणी धर्माचे शंकराचार्य! ज्याप्रमाणे  ख्रिश्चन धर्मगुरू धर्मप्रसाराचा गैरहेतू ठेवून हिंदू धर्माबद्दल काहीबाही शंका निर्माण करतात; भोळ्याभाबड्या लोकांची दिशाभूल करतात, अगदी तसाच प्रकार हे तथाकथित शंकाराचार्य करत आहेत. तद्वतच, २४ आणि २५ ऑगस्ट रोजी छत्तीसगड राज्यात होऊ घातलेल्या तथाकथित धर्मसंसदेशी हिंदू धर्माचा काहीही संबंध नाही. बहुजनांचे संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचं उपनयन करण्याविषयी आणि संत तुकोबाराय यांच्या धर्मप्रसाराचा अधिकार ठरवण्याबद्दल या ब्राह्मणी धर्मव्यवस्थेने पूर्वी अशीच हुकूमशाही केल्याचं उदाहरण इतिहासात नमूद आहे. परंतु आता आपल्या देशात लोकशाही राज्य प्रस्थापित झालेलं असून राज्यघटनेचा अंमल सुरू आहे. आता देशात कायद्याचं राज्य असून त्याने सर्व नागरिकांचं धार्मिक स्वातंत्र्य अबाधित ठेवलेलं आहे. आता शंकराचार्यांसारख्या या ब्राह्मणी धर्ममार्तंडांची धार्मिक अरेरावी बहुजन हिंदू धर्मियांनी सहन करण्याचे दिवस निघून गेले आहेत. आता या देशातील ८० टक्के बहुजन हिंदू धर्मियांनी साडेतीन टक्क्यांच्या ब्राह्मणी धर्मव्यवस्थेची धार्मिक दादागिरी सहन करण्याची काहीही गरज नाही. म्हणून साईबाबांच्या देवस्थानाने त्या ब्राह्मणी धर्मसंसदेत आपला प्रतिनिधी पाठवू नये; त्या परधर्मीय धर्मपीठाचा निर्णय मान्य करू नये. तो त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे; आपल्या धर्मश्रद्धेचा नव्हे!

मानवी जीवनाच्या स्थैर्याची सुरुवात शेती करण्याच्या प्रक्रियेपासून झाली. भारतीय संस्कृतीही मूलतः कृषी संस्कृतीच आहे. शेती नेहमीच निसर्गावर अवलंबून असल्याने आरंभकाळात नैसर्गिक पंचमहाभूतांना देवत्वाचं रूप दिलं गेलं. पुढे प्रतीक पूजा अस्तित्वात आली. प्रतीकांच्या माध्यमातून देवाचं अस्तित्व डोळ्यांना दिसतं, म्हणून त्यावर पटकन विश्वास बसतो. परिणामी, बहुजन भारतीयांनी प्रतीकांनाच पुढे मूर्तिचं रूप दिलं. मानवाने निर्माण केलेल्या देवाच्या मूर्त्यांचं मानवांच्या रूपाशी साम्य असणं ही एक स्वाभाविक गोष्ट होती. मूर्त्यांच्या मानवी रूपालाच अधिक शक्तिशाली ठरवण्यासाठी जास्तीचे हात, जास्तीचं डोकं असे काही प्रकारही दिसून येतात. अखेर मूर्ती म्हणजे देव आपल्याबरोबर असण्याच्या भावनेचं प्रकटीकरण होय. ती मूर्ती कोणत्याही रूपात किंवा रूपाशिवायदेखील असू शकते. (उदाहरणार्थ, म्हसोबा). देवाची मूर्ती कशी असावी, कोणाची असावी, याचं हिंदू धर्मात काही शास्त्र नाही. मुख्य मान आहे, तो भक्तांच्या श्रद्धेला! हिंदू धर्मव्यवस्थेत मूर्तिरूपात देवपूजा सिंधू संस्कृतीपासून रूढ असल्याचं सर्वमान्य झालं आहे. म्हणून शिर्डीच्या साईबाबांना देव मानणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. ती बाब हिंदू धर्माच्या परंपरेला धरूनच आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि आचारग्रंथांत असं देव मानणं निषिद्ध मानलेलं नाही. हिंदू धर्मियांनी कोणाला देव मानावं याचा निर्णय परधर्मीय ब्राह्मण धर्मगुरू करू शकत नाही. मूलतः चराचरांत देव असल्याची सर्व हिंदू धर्मियांची खरी श्रद्धा आहे. त्यामुळे साईबाबांच्या मूर्तित देव आहे, असं मानणं हे सर्वस्वी ज्याच्या-त्याच्या श्रद्धेवर अवलंबून आहे.

हिंदू धर्म हा खुल्या स्वरूपाचा वैश्विक धर्म आहे. तीच त्याची खरी शक्ती आहे. हिंदू धर्मात ऋग्वेद, उपनिषदं, भगवद्गीता हे धर्मग्रंथ आणि रामायण आणि महाभारत हे आचारग्रंथ आहेत आणि हीच हिंदू धर्मियांची धर्मशास्त्रं आहेत. ही धर्मशास्त्रं बहुजन हिंदुंचे पूर्वज, ऋषिमुनी यांनी रचलेली आहेत. ही धर्मशास्त्रं बहुजन हिंदुंची आहेत. परंतु ब्राह्मणी धर्मव्यवस्थेच्या प्रभावाखाली या हिंदू धर्मग्रंथात आणि आचारग्रंथांत विविध तर्हेचा मजकूर घुसडण्यात आल्याने, त्या ग्रंथांचं शुद्ध स्वरूप हरवलं आहे. याची पूर्ण जाणीव बहुजन हिंदू धर्मियांना असल्यानेच त्यांनी या हिंदू धर्मग्रंथ आणि आचारग्रंथांनाही पूर्ण प्रमाण मानलेलं नाही. खरी गोष्ट ही आहे की, शंकराचार्य पीठानीच ऋग्वेद, उपनिषदं, भगवद्गीता हे धर्मग्रंथ तर रामायण आणि महाभारत हे आचारग्रंथ असल्याचं मानलं असून बहुजन हिंदू धर्मशास्त्रांत त्याला काहीही आधार नाही. म्हणून त्या तथाकथित ब्राह्मणी धर्मपीठालाच आमची मान्यता नाही.

त्यामुळे वैदिक नावाचा धर्म, शंकराचार्य नावाचं धर्मपीठ, देवनागरी संस्कृत भाषा, मनुस्मृती नावाचा ब्राह्मणी धर्मग्रंथ, संस्कृती विध्वंसक परशुराम आणि वामनाला अवतार ठरवणारी दशावतार कल्पना, केवळ ब्राह्मणांनाच अधिकार असलेला उपनयन संस्कार, जन्माधारित चातुर्वर्ण्यव्यवस्था, चतुर्वेद, भन्नाट अंधश्रद्धा सांगणारी भाकड पुराणं या सर्व गोष्टींना धर्मग्रंथ आणि आचारग्रंथात अजिबात आधार नाही. याप्रमाणे बहुजनांच्या हिंदू धर्माच्या धर्मशास्त्रांनुसार मुळात आधारहीन असलेल्या संकल्पनांच्या आधारे आम्हा बहुजन हिंदू धर्मानुयायांवर कुठलंही बंधन लादण्याचा प्रयत्न कोणीही परधर्मियांनी करू नये; त्या आमच्या धर्मशास्त्रांनी निराधार ठरवलेल्या गोष्टींच्या आधारे आमच्या खुल्या हिंदू धर्माबाबत कुठलाही निर्णय करू नये. या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ब्राह्मणी धर्मानुयायी अथवा अन्य कोणीही परधर्मिय आमचा बहुजन हिंदू धर्म, आमचं धर्मशास्त्र, आमचे आचारविचार, ज्ञानेश्वर, तुकाराम अशा आमच्या आदर्शांविषयी विनाकरण शंका, प्रश्न निर्माण करून संभ्रम पसरवण्याचा खोडसाळपणा करू नये आणि असा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांच्याविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करता येईल, हे ध्यानात घ्यावं.

तसंच तमाम बहुजन हिंदू धर्मानुयायांच्या वतीनेही वेरूळ इथे वैश्विक हिंदू धर्म संसदेचं आयोजन करण्याचं ठरवण्यात आलं आहे. त्या वैश्विक हिंदू धर्म संसदेत हिंदू धर्म निर्णय मंडळाची निवड करण्याची लोकसंमत प्रक्रिया सुरू करणं, हिंदू धर्मश्रद्धांचं वैश्विक स्वरूप समजून घेणं, हिंदू धर्मशास्त्रांची व्याख्या करणं, हिंदू धर्मियांचे काळानुरूप आचारविचार निश्चित करणं, पूर्वशूद्र बहुजन हिंदू धर्मियांसाठी संक्षिप्त धर्मग्रंथ संपादित करणं, हिंदू धर्म शिक्षणाची निरंतर प्रक्रिया सुरू करणं, हिंदू धर्माचा एखादा सार्वत्रिक बालसंस्कार प्रचलित करण्याविषयी विचारविनिमय करणं इत्यादी विषयांचा निर्णय केला जाईल. त्या धर्मसंसदेत केवळ ब्राह्मणांनाच अधिकार असलेल्या उपनयन संस्कारावर विश्वास ठेवणार्या धर्मपंडितांना आमंत्रित केलं जाणार नाही; तर लोकशाही लोकजीवन पद्धतीवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवणार्या आणि मानवी समता मान्य असलेल्या हिंदू धर्माच्या अभ्यासकांनाच त्या धर्मसंसदेत भाग घेता येईल.

श्याम सराटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *