पूछते है वो कि ‘गालिब’ कौन है?

कोई बतलाओ कि हम बतलाए क्या…

गालिब… उर्दू आणि फारसी भाषेतील मातब्बर शायर. कोणताही मुशायरा असो, गालिबचे शेर असल्याशिवाय उसमे जान नही आती… नव्यानेच प्रेमात पडलेला कवीदिलाचा तरुण ए दिले नादान तुझे हुअ क्या है, आखिर इस दर्द कि दवा क्या है… हा गालिबचा शेर अक्षरशः जगत असतो. वाद्यसंगीतासोबत असलेला गझल गायनाचा कार्यक्रम तर गालिब का कलाम और गायकों का अंदाज अशा पद्धतीने सजवला जातो. आणखी पाच वर्षांनी मिर्झा गालिब को गुजरे १५० वर्षं होतील. या दीडशे वर्षांत एकही नवीन शायर असा जन्माला आला नाही ज्याने गालिबचं बोट पकडून शेरोशायरी शिकली नाही. मराठी आणि उर्दू यांचं सख्य पाहता गालिब यांची शायरी महाराष्ट्रात फारशी झिरपलेली नाही. मग एवढ्या वर्षांनी आताच गालिब का आठवतोय? दिल्लीच्या रोमँटिसिझममध्ये भर घालणार्या गालिब या अस्सल कलाकाराच्या आयुष्याने पुण्यातील तरुणांच्या नाटक कंपनीला आकर्षित केलं आणि ‘मी गालिब’ या नाटकाचा जन्म झाला… उर्दूतील ज्या शायराचं आपण केवळ नावच ऐकलं त्या गालिबचा जीवनपट मांडण्याचा घाट लेखक आणि मिर्झा गालिब हे मुख्य पात्र साकारणार्या ओम भूतकर यांनी घातला. आलोक राजवाडे यांचं अप्रतिम दिग्दर्शन आणि गालिब यांचे शेर यांच्यामुळे प्रेक्षकांना खिळवून टाकणारा आणि गालिबच्या दिल्लीत घेऊन जाणारा नाट्यप्रयोग साकारला आहे… ‘मी गालिब’…

गालिबला आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर प्रश्न पडत गेले आणि त्या त्या प्रश्नाचं उत्तर शोधत त्याने शेर लिहिले. गालिबचे शेर आपल्याला चार ओळीत जीवनाचं तत्त्वज्ञान सांगून जातात. गालिबने ज्या प्रकारचे शेर लिहिले तसं काव्य करणारे संत आपल्यालाही माहीत आहेत. पण संत हे स्वतः भौतिकतेच्या पलीकडे गेलेले होते आणि म्हणूनच ते तसं लिहू शकले. मात्र मोठा कवी, महान शायर असला तरी गालिब तुमच्या माझ्यासारखा कधी घाबरणारा, कधी धीट तर कधी लोभी वागणारा होता. त्यामुळे गालिब मला आपल्यातला वाटतो. लेखक ओम भूतकरने ‘मी गालिब’चं इंटरप्रिटेशन आजच्या तरुणाईच्या दृष्टिकोनातून केलेलं आहे. त्यामुळे दिल्ली के फनकारों के बीच स्वतः रचलेले शेर ऐकवून वाहवा मिळवत स्वतःचा अहं कुरवाळणारा गालिब यात दिसतो. त्याच्या फारसी भाषेवर आक्षेप घेणार्यावर प्रचंड संतापून त्याला चुतिया म्हणून शिवी देणारा गालिब यात दिसतो. आपल्याला महान शायर म्हणून दुनियेने ओळखावं अशी आकांक्षा बाळगणारा गालिब… गालिबने ये कहा, गालिबने वो कहा… गालिब… गालिब… गालिब… ह्लशश द्दशशस्र 4ड्डह्म्! असं म्हणतो. हे वाक्य गालिबच्या तोंडी घालणार्या लेखकाने एक प्रकारे गालिबची महत्त्वाकांक्षा अधोरेखित केली आहे. गालिबच्या पत्नीने अनेक अपत्यांना जन्म दिला. मात्र त्याचं एकही अपत्य जगत नव्हतं. तेव्हा माणसाच्या काही सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाहीत हे उमजून असलेला गालिब लिहितो…

हजारों ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले

बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले…

या पातळीचं सत्य लिहिल्यानंतरही गालिब स्वतःच्या आयुष्यातून पुत्राच्या इच्छेला बाहेर काढत नाही आणि तो सतत मूल जगण्याची वाट पाहत राहतो. पाचवीला पूजलेली आर्थिक चणचण, एकही अपत्य न जगणं, प्रेयसीचं निधन अशा नैराश्याच्या फेर्यात अडकलेला गालिब…

कैदे हयात, बन्देगम, अस्ल में दोनों एक हैं

मौत से पहले आदमी गम से नजात पाए क्यों?…

असं लिहितो तेव्हा मनातल्या भावना मांडणारे अचूक शब्द आणि त्या शब्दांत भरून राहिलेला अर्थ जाणवून ऐकणारा स्तिमित होतो.

गालिब एक विलक्षण आयुष्य जगला. एकाचवेळी भौतिक सुखापासून अलिप्त राहण्याचा शेर लिहिणारा गालिब स्वतः मात्र त्याच भौतिकतेत चाचपडत राहिला. राग, लोभ, मद, मत्सर, इर्ष्या, लालसा या सगळ्या मानवी भावना त्याने येथेच्छ भोगल्या. अंतिम सत्य सांगणारे शेर लिहिणारा आणि बरोबर विरोधाभासी आयुष्य जगलेला असा कलंदर, मिश्कील आणि जिंदादिल गालिब ओम भूतकर यांनी उभा केला आहे. गालिबचं आयुष्य आजच्या प्रेक्षकांशी जोडताना दिग्दर्शक आलोक राजवाडे यांनी त्यात लेखकाचं एक पात्र आणि त्याच्या आयुष्यातल्या गोष्टी मिसळल्या. एकेका प्रसंगात गालिबला वाटलेला राग, प्रेम, मत्सर, लोभ वेगळ्या संदर्भात नाटकातल्या त्या लेखकाच्याही आयुष्यात दाखवले गेले आहेत. त्यामुळे कलाकार म्हणून अल्लाह के दरवाजे तक पोहोचलेला गालिब जसा षड्रिपूंपासून मोकळा होत नाहीत तसाच वैचारिक पातळीवर मोठा झालेला तो लेखकही प्रसिद्धीच्या इच्छेपासून मुक्त होत नाही. मानवी भावनांची गुंतागुंत, मनात उठलेलं विचारांचं काहूर दाखवताना दिग्दर्शकाने गालिब आणि नाटकातला लेखक यांची बेमालूम सरमिसळ केली आहे. त्यामुळे गालिब कोणत्याही एका काळात बंदिस्त राहत नाही. हे या नाटकाचं यश आहे.

कधी उर्दू, कधी हिंदी तर कधी चक्क इंग्रजी वापरत ओम भूतकर यांनी एकोणिसाव्या शतकातला गालिब आणि विसाव्या शतकातले प्रेक्षक यांच्यात अदृश्य पूल बांधला आहे. दिग्दर्शक आलोक राजवाडे यांनी एकेका प्रसंगाची योग्य मांडणी करत हे नाटक खळाळत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आहे. तर नाटकात संगीतबद्ध केलेल्या गालिबच्या कव्वाल्या आणि शेर नाट्यगृहात खुर्चीत बसलेल्या प्रेक्षकाला थेट गालिबच्या मुशायर्यात पोहोचवतात. साकेत कानिटकर आणि जयदीप वैद्य यांनी नाटकाला दिलेल्या संगीतामुळे संपूर्ण नाटकभर सुफी संगीताचा दरवळ जाणवत राहतो. गालिबने लिहिलेल्या शेरोशायरीवर पुढच्या पिढ्या पोसल्या. अनेक कव्वाल आले… गेले पण गालिब कालातीत राहिला…

हुई मुद्दत कि ‘गालिब’ मर गया पर याद आता है…

नम्रता भिंगार्डे वाघमारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *