रोजची वृत्तपत्रं आणि दूरचित्रवाहिन्यांच्या बातमीपत्रातून ‘एबोला’ या विषाणुजन्य आजाराच्या बातम्या सतत प्रसारित होत आहेत. ‘एबोला’ची साथ भारतात आजच्या घडीला अजिबात आलेली नाही. ‘एबोला’ या व्हायरल फिव्हरचा एकही रुग्ण भारतात नोंदलेला नाही, हे सर्वांनी प्रथम लक्षात घ्यायला हवं. वृत्तपत्र आणि दूरचित्रवाहिन्यांनी हा विषय सतत चर्चेत ठेवल्याचे काही चांगले तर काही नकारात्मक परिणाम घडतात.

उदाहरणार्थ, सार्स, स्वाईनफ्ल्यू, डेंग्यू, इत्यादी तापांचे, आजारांचे प्रकार, त्यामागची कारणं, सामान्य माणसांनी घ्यायची काळजी इत्यादीविषयक माहिती या बातम्या आणि कार्यक्रमांमुळे आपल्यापर्यंत पोहचते. ही एक प्रकारची आरोग्यविषयक जागृती आहे. परंतु, अशा बातम्यांमध्ये अनेकदा सनसनाटी निर्माण करायचाही हेतू असतो, तर कधी रंजकतेसाठी भडक पद्धतीने बातमी तयार केली जाते. त्यामुळे सामान्य माणसांमध्ये घबराट पसरू शकते. काही वर्षांपूर्वी ‘स्वाईनफ्ल्यू’ या आणखी एका विषाणुजन्य इन्फ्ल्यूएन्झ प्रकारातील तापाच्या बातम्या सतत तीव्र पद्धतीने प्रसारमाध्यमात गाजल्या होत्या. त्या विशिष्ट तापाची साथ भारतात पहिल्यांदाच आली होती. त्या तापावरील परिणामकारक औषधंही तेव्हा उपलब्ध नव्हती. तेव्हा तो ताप काही प्रमाणात प्राणघातक ठरू शकेल असा अंदाज होता. परंतु प्रसारमाध्यमातील बातम्यांचा त्यावेळचा रोख असा होता की, भारतभर हाहाकार माजणार. हजारो लोक मरण पावणार. तसं काहीही घडलं नाही. हो, हे खरं आहे की काही वृद्ध, अशक्त, इतर रोगांनी त्रस्त असे काही रुग्ण त्या विषाणू लागणीमुळे मृत्यू पावले. परंतु प्रसारमाध्यमांत गाजला तसा हाहाकार काही वास्तवात घडला नाही हे लक्षात घ्यायला हवं.

त्याप्रमाणेच ‘एबोला’ या विषाणुजन्य तापाच्या साथीचंही होईल अशीच शक्यता आहे. आज तरी भारतात एकही ‘एबोला’बाधित रुग्ण आढळलेला नाही. पण तरीही ‘एबोला’ या विषाणुजन्य आजाराची माहिती घेणं आवश्यक आहे. ‘एबोला’ हा आजार ‘एबोला’ या विषाणुमुळे होतो. हे विषाणू फ्रूट बॅट्स म्हणजे वाघुळांच्यामार्फत प्रथम पसरले. मात्र सगळ्यात महत्त्वाची चांगली गोष्ट म्हणजे हे विषाणू हवा, पाणी किंवा डासांमार्फत पसरत नाहीत. हा आजार संसर्गजन्य आहे हे खरं आहे. परंतु त्यासाठी बाधित रुग्णाच्या शारीरिक द्रवांशी संपर्क आला तरच दुसर्या व्यक्तिला त्याची लागण होऊ शकते. या विषाणुची बाधा झाल्यावर (किंवा हे विषाणू) एक दिवस ते नऊ दिवसांत ‘एबोला’ची लक्षणं दिसू शकतात.

‘एबोला’ बाधा झालेल्या रुग्णास ताप येतो, घसा सुजतो, (दुखतो) अंगदुखी, डोकंदुखी, उलट्या होणं आणि जुलाब यांसारखी लक्षणं दिसतात. ही लक्षणं अनेक तर्हेच्या तापांमध्ये दिसतात. केवळ वरील लक्षणं दिसतात म्हणून ‘एबोला’ बाधा झाली आहे असं ठरवून घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. अर्थात वैद्यकीय सल्ला आणि उपचार त्वरित घेणं हे आपलं कर्तव्यच आहे. ‘एबोला’बाधेच्या बाबतीत काळजी करण्याचा मुद्दा असा आहे की, ही बाधा तीव्र झाल्यास नाक, घशातून किंवा मुत्रावाटे किंवा जुलाबातून रक्तस्राव होतो. तसंच शरीरांतर्गतही रक्तस्राव होऊ शकतो. हे लक्षण घातक ठरू शकतं. रुग्ण दगावण्याची शक्यता असते. या ठिकाणी हे सुद्धा नमूद करायला हवं की, आज रोजी या आजारावर खात्रीने परिणामकारक ठरेल असं औषध उपलब्ध नाही. त्यामुळेच आज ‘एबोला’बाधा झालेल्या रुग्णांमध्ये रोगी दगावण्याचं प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. म्हणजे ‘एबोला’बाधित प्रत्येक रुग्ण मृत्यू पावतोच असं नाही. (अर्थात आजतरी भारतात ‘एबोला’बाधित एकही रुग्ण नाही हे लक्षात घ्या!)

मग प्रश्न असा येतो की, आता ‘एबोला’च्या साथीची एवढी चर्चा का होत आहे. वर म्हटल्याप्रमाणे या विषाणुबाधेवर हमखास परिणाम करणारं औषध आज उपलब्ध नाही. त्यामुळे ‘एबोला’बाधा झाल्यास जीवाला धोका असू शकतो. पण आज अधिक चर्चा होण्याचं कारण आफ्रिका खंडातील पश्चिम भागात या रोगाची साथ पसरलेली आहे. हे देश आहेत गिनिआ, सिरालेनॉन, लायबेरिया आणि नायजेरिया. यापैकी सर्वात मोठा देश आहे नायजेरिया. बाकी देश अगदी छोटे-छोटे देश आहेत. उदाहरणार्थ, सिरालेनॉन या देशाची लोकसंख्या केवळ साठ लाख आहे तर सर्वात मोठा देश असलेल्या नायजेरियाची लोकसंख्या आहे एक कोटी सत्तर लाख. मुख्य म्हणजे हे देश आफ्रिका खंडातील मागास देश आहेत. वैद्यकीय सेवा संसाधानं अत्यंत अपुरी आणि सामान्य जनतेचं आहाराचं पोषणमूल्य अतिशय खालच्या दर्जाचं आहे. परिणामी, सामान्य नागरिकांचं जीवनमान निम्नस्तरीय असल्याने कोणताही साथीचा रोग या देशात वेगाने पसरतो. औषधोपचारांच्या अभावी रुग्णांमध्ये दगावण्याचं प्रमाणही खूप असतं. त्याचाच परिणाम म्हणजे आता पसरलेली ‘एबोला’ची साथ गेले सहा महिने या देशात थैमान घालत आहे. आजवर सुमारे १९०५ लोकांचा यात मृत्यू झाला आहे.

‘एबोला’ विषाणुबाधा हा नव्याने उजेडात आलेला रोग आहे. म्हणजे १९७३ साली पहिल्यांदाच या विषाणुला ओळखण्यात शास्त्रज्ञांना यश आलं. त्यानंतर १९९५ साली, २००३ साली आणि नंतर २०१३ साली या विषाणुज्वराची साथ पश्चिम आफ्रिकेतील याच भागात पसरली. मग यावेळी पसरलेली साथ व्यापक प्रमाणात आणि तीव्र स्वरूपाची आहे. त्यात अधिक माणसं दगावत आहेत. शिवाय दीर्घकाळ ही साथ टिकून आहे. खरंतर कोणत्याही नव्या विषाणुज्वराची साथ सुरुवातीला घातक ठरते. परंतु कालांतराने त्या विषाणुमध्ये जनुकीय बदल होतात. त्यानंतर त्यांची दाहकता आणि घातकता कमी होते. माणसांच्या शरीरातही त्या विषाणुबाधेला तोंड देण्यासाठी आवश्यक प्रतिकारकशक्ती तयार होते. रुग्ण दगावण्याचं प्रमाण कमी होतं. शिवाय दरम्यान अशा विषाणुज्वरांवर परिणामकारक औषधंही शोधली जातात. ‘एबोला’ विषाणुबाधेबाबतही ते घडणारच आहे. मात्र आज ती विषाणुबाधा घातक ठरणारी आहे.

काही वर्षांपूर्वी स्वाईन फ्ल्यू या तापाच्या साथीबाबतही हे घडलं आहे. त्यावेळी ‘टॅमी फ्ल्यू’ हे औषध नव्याने विकसित करण्यात आलं. हजारो टन टॅमी फ्ल्यू विविध देशांनी आयात केलं. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशात बोटीच्या बोटी भरून टॅमी फ्ल्यू आयात केलं गेलं. जागतिक आरोग्य संघटनेने ‘स्वाईन फ्ल्यू’ची साथ फार मोठ्या प्रमाणात जगभरात थैमान घालणार असा धोक्याचा इशारा दिला. (धोक्याची निशाणी क्र.५) त्याचा परिणाम म्हणून भारतासहित अनेक देशातून टॅमी फ्ल्यूची आयात केली गेली. प्रत्यक्षात स्वाईन फ्ल्यूची साथ काही तीव्र झाली नाही. औषध कंपन्यांनी मात्र प्रचंड कमाई करून घेतली.

आता ‘एबोला’च्यावेळीही जागतिक आरोग्य संघटनेने वैद्यकीय आणीबाणी घोषित केलेली आहे. ‘एबोला’वरील औषध लवकरच बाजारात येईल अशी चिन्हं आहेत. तसं ते लवकरच येवो. पण लक्षात घ्यायचा भाग म्हणजे दर काही वर्षांनी अशा नवनवीन विषाणुज्वर साथी येतात. काही काळ त्या साथींमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात दगावतात. हळूहळू त्या विषाणुंमध्ये जनुकीय बदल (म्यूटेशन) घडतं. त्यांची तीव्रता कमी होते. हे निसर्गचक्र आहे, हे मान्य करायला हवं. भारत आणि आशिया उपखंडात गेल्या सहा महिन्यांत म्हणजे ‘एबोला’ साथीला सुरुवात झाल्यापासून एकही रुग्ण आढळला नाही हे एक सुचिन्ह आहे. भारत सरकारने प्रतिबंधक उपाय म्हणून पुरेशी खबरदारी घेतलेली आहे असाच याचा अर्थ आहे.

तेव्हा ‘एबोला’बाधेविषयी पॅनिक होण्याची अजिबात गरज नाही. पावसाळ्यात सर्वसाधारणपणे विविध व्हायरल फिव्हर किंवा विषाणुज्वराच्या साथी येत असतात. तो आता एक निसर्गचक्राचा भाग म्हणून मान्य करूया. वास्तव असं आहे की, अनेक प्रकारच्या साथींचं मूळ विषाणू आजही अज्ञात आहेत. अशा तापांना वैद्यकीय परिभाषेतच पि. यू. ओ., फिव्हर ऑफ अननोन ओरिजिन म्हणतात!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *