देवांमधील संघर्ष शिगेला पोहचला आहे. तुमचा देव श्रेष्ठ का आमचा?, तुमचा देव, तुमची भक्ती चांगली का आमची? याचे वाद आता न्यायालयात पोहचतात. त्या त्या देवांचे भक्त आणि त्या त्या देवांच्या भक्तिमार्गावर आधारित रितीरीवाज, संस्था नियमांच्या आधारे तयार झालेले आमचे धर्मच मोठे-किंवा आम्ही म्हणतो तेच खरं असा संघर्ष उकरून काढून वर्षानुवर्षं झगडा करू शकतात. असा संघर्ष-लढाया-वैर टिकवून ठेवू शकतात हे बघून आश्चर्य वाटतं. या वैराच्या आगीत माणसं मारली जातात. अशी मारलेली माणसं पाहून विरुद्ध बाजूच्या माणसांना आनंदाच्या उन्मादी उकळ्या फुटतात. तरीही सर्व विविधरंगी-विविध धर्मी लोक आमचाच धर्म सहिष्णू आहे, शांततावादी आहे, सर्वसमावेशक आहे असं ठासून सांगतात-यापरता विनोद कोणता?

प्रथम त्यांनी देव बाजारात आणला. कधी देवांसाठी नेमकं घर कुठे असावं यावरून भांडण सुरू करून एकच राळ उठवली. अनेक घरंदारं उद्ध्वस्त झाली. सार्वजनिक मालमत्तेचं वाटोळं झालं. दोन्ही-तिन्ही बाजूच्या लोकांनी आपल्या देव-धर्माचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी एकमेकांच्या पक्षातील स्त्रियांना वेठीला धरलं. त्यांच्याशी लैंगिक जबरदस्ती करून स्त्रियांचे खून केल्याने आपला धर्म, आपला देव श्रेष्ठ असल्याचं सिद्ध होतं हे सूत्र ते शतकानुशतकं पाळतात. आमच्या देवाला कोणते प्राणी आवडत नाहीत किंवा कोणते प्राणी आवडतात यावरूनही त्यांना लढाया-भांडणं करून एकमेकांची माणसं मारायला आवडतात. या भांडणात स्त्रिया-मुलांवर अत्याचार करणं त्यांना आवश्यक वाटतं. असं गेल्या २५ वर्षांतील जगाचा इतिहास सांगतो. म्हणजे हाच खेळ गेली शेकडो वर्षं केला जातोच आहे. आताचा हा पुढचा अंक! पण वैराची नशा चढलेले देवभक्त आणि धर्माचे रक्षक आता सामान्य माणसांच्या मूलभूत मानवी भावभावनांचं नियंत्रण करू पाहत आहेत. त्यासाठी प्रसंगी कायदा आणि न्यायालयांचाही आश्रय घेतला जात आहे. मुख्य म्हणजे न्यायालयंही त्याला महत्त्वाचा प्रश्न मानून आश्रय देत आहेत.

तरुण-तरुणींना एकमेकांचं आकर्षण वाटून त्यांनी प्रेमात पडणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. पण त्यांना तसं वाटत नाही. प्रत्येक तरुण-तरुणीने या नैसर्गिक भावनेचं नियमन आणि दमन करावं. आकर्षण वाटून प्रेम वाटलं तरी पटकन किंवा अगदी विचार करूनही प्रेमात पडू नये. अशा प्रेमात पडण्यासाठी काही नवी परवाना पद्धत वगैरे द्यावी काय यावर त्यांचं संशोधन सुरू आहे! कदाचित प्रेमात न पडणंच हाच सर्वोत्तम मार्ग असल्याचा निष्कर्षही या संशोधनातून निघू शकतो.

या संबंधीचे काही प्रायोगिक सामाजिक संशोधन प्रकल्प सध्या सुरू करण्यात आले आहेत. त्याची नोंद घेऊ. उत्तर प्रदेशात, विशेषतः राज्याच्या पश्चिम भागात भाजप राज्य शाखेने राज्यातील तरुणांना-म्हणजे हिंदू तरुणांना असा सावधानतेचा इशारा दिला आहे की त्यांनी ‘लव्ह जिहाद’वर कडक लक्ष ठेवावं. ही ‘लव्ह जिहाद’ काय भानगड आहे? तर राज्य भाजपने असा दावा केला आहे की, अल्पसंख्य समाजातील (म्हणजे मुस्लीम समाजातील) आकर्षक तरुणांनी बहुसंख्य समाजातील हुशार आणि आकर्षक, सुंदर मुलींना प्रेमात पाडून त्यांच्याशी लग्न करण्याची आणि त्या मुलींना धर्मांतर करण्यास भाग पाडण्याची एक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचं नाव ‘लव्ह जिहाद’ असं ठरवण्यात आलं आहे. भाजप राज्यशाखेचे मुख्य लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी असा आरोप केला आहे की, उत्तर प्रदेश सरकार अल्पसंख्य समाजातील या मोहिमेकडे जाणूनबुजून कानाडोळा करत आहे. सबब भाजप राज्यशाखेने आणि एका स्थानिक हिंदू धर्मरक्षक संघटनेने धर्मनिष्ठ कडव्या तरुणांना असं आव्हान केलं आहे की, हिंदू धर्मिय तरुणी भिन्नधर्मिय तरुणांच्या प्रेमात तर पडत नाहीत ना यावर लक्ष ठेवावं. तरुणींच्या मनात असं प्रेम उत्पन्नच होऊ नये याची दक्षता घ्यावी.

असाच दुसरा संशोधन प्रबोधन प्रकल्प देशाच्या दक्षिणेकडील कर्नाटक राज्यात सुरू करण्यात आला आहे. श्रीराम सेना या हिंदू धर्मरक्षणाचा आणि स्त्रियांच्या आणि नैतिक वर्तनाचा एकतर्फी मक्ता घेतलेल्या संघटनेने हा प्रकल्प नव्याने सुरू केला आहे. या श्रीराम सेनेने तरुणींनी भिन्न धर्मियतरुणांच्या प्रेमात पडून त्यांच्याशी विवाह करण्यास कडक विरोध करणारी पोस्टर्स लावली आहेत. समजा असं कुणी केलंच तर त्यांना योग्य धडा शिकवला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

याच प्रकारचा तिसरा प्रयोग भारताच्या पश्चिमेकडील गुजरात नामक राज्यात राबवण्यात येत आहे. इथे २७ जून २००५ रोजी रजिस्ट्रार ऑफ मॅरेजेस एच. बी. वारिया यांनी एक जी.आर. प्रसृत केला असून त्यानुसार विशेष विवाह कायद्याखाली विवाह नोंदणी करू इच्छिणार्या सर्व तरुण-तरुणींनी आपल्या पालकांची लेखी परवानगी आणणं अनिवार्य आहे! गंमतीचा विनोदी भाग म्हणजे गुजरातमध्ये विशेष विवाह कायद्याची अंमलबजावणी राज्याच्या आरोग्य खात्याच्या अखत्यारित आहे. यासंबंधी राज्याच्या मंत्रिमहोदयांकडे पत्रकारांनी चौकशी केली तेव्हा मंत्रिमहोदयांनी हा सरकारचा निर्णय नसून संबंधित मॅरेज रजिस्ट्रारनी स्वतःहून हा जी.आर. काढल्याचं सांगून हात झटकले. तर एच. बी. वारिया यांच्या कनिष्ठ ए. ए. गोमती यांनी या जी.आर.चं समर्थन करत असं सांगितलं की, आमच्याकडे या कायद्याखाली नोंदणी होणार्या विवाहांपैकी १५ ते २० टक्के प्रकरणात मुलींच्या पालकांच्या अशा तक्रारी आहेत की, आमच्या मुली पळून गेल्या आहेत. या जी.आर. नंतर अनेक पालकांनी आम्हाला पत्र लिहून ‘समाधान’ व्यक्त केलं आहे. थोडक्यात, या जी.आर.मुळे आंतरजातीय आणि आंतरधर्मिय विवाहांवर बंदी घालण्यात आली आहे. तरुण-तरुणींनी प्रेमात पडताना स्वजाती, स्वधर्मातच पडण्याची दक्षता घ्यावी हे नोकरशाहीच्या आधारे यशस्वीरित्या राबवण्यात आलं आहे.

याच प्रकारचा चौथा संशोधन प्रकल्प दक्षिणेकडील टोकाच्या केरळ राज्यातही सुरू आहे. सन २००९ मध्ये केरळच्या कॅथॉलिक बिशप काऊन्सिलने अशा तर्हेने ४५०० ख्रिश्चन तरुणी इतर धर्मिय मुलांच्या प्रेमात पडून विवाह करून त्यांनी नवर्याचा धर्म स्वीकारला हे चिंताजनक असल्याचं म्हटलं. त्यामध्ये या मुलींचं जबरदस्ती धर्मांतर झाल्याचाही दावा करण्यात आला. हे प्रकरण केरळ उच्च न्यायालयात गेलं. तेव्हा केरळ उच्च न्यायालयाने याची दखल घेऊन केरळ सरकारला असे निर्देश दिले की, प्रेमाच्या आवरणाखाली मुलींचं जबरदस्तीने धर्मांतर केलं जातं असं दिसतं. तेव्हा या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकारने काही कायदा करण्याचा विचार करावा असं केरळ उच्च न्यायालयाचे तत्कालिन न्यायमूर्ती के. टी. संकरन यांनी सुचवलं.

मध्यंतरी एक तरुण जैन साध्वी एका मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडल्याचं प्रकरण महाराष्ट्रातही बातम्यांत होतं. त्या दोघांचा गुढरित्या मृत्यू झाल्याचं बातम्यांतून म्हटलं होतं.

थोडक्यात धर्म-जातिंच्या चौकटीतच तरुण-तरुणींनी प्रेमबिम करावं, लग्न करावं असा (धार्मिक, शासकीय इत्यादी सर्व) आदेश ही प्रस्थापित व्यवस्था तरुणांना देत आहे. हा आदेश मोडणार्यांना योग्य शिक्षा, म्हणजे मृत्युदंडसुद्धा देण्याचा इशारा यात आहे.

प्रेमाला असं धर्म चौकटीत कोंडण्याच्या मानासिकतेमागे अनेक विसंगती आहेत. आमच्या देवाधर्मांचं आचरण करणार्या ‘सुंदर हुशार मुली’ भिन्न धर्मिय मुलांच्या प्रेमात पडतात हा त्या मुलग्यांचा दोष. मग उरलेल्या मुलींविषयी तुमचं काय म्हणणं आहे?

इतर धर्मिय मुली (तरुण, सुंदर, हुशार) तुमच्या धर्माच्या तरुणांच्या प्रेमात पडल्यास तुम्हाला आनंद होतो का? तर याचा अर्थ तुम्ही सर्व धर्मातील स्त्रियांना त्या त्या धर्मातील प्रजा वाढवणारी यंत्रं म्हणून पाहता का?

सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र बसून असा निर्णय का घेऊ नये की, कोणत्याही तरुण-तरुणीने प्रेमात पडूच नये. केवळ आणि केवळ पालकांच्यामार्फत जाती, धर्म, भाषा, पंथांच्या मर्यादेत विवाह केले जावेत.

सर्व धर्माच्या लोकांना आपला धर्म आणि आपल्या धर्माची लोकसंख्या कमी कमी होत जाते, जाणार आहे अशी भीती का बरं वाटते?

तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आंतरधर्मिय विवाहात धर्मबदल करण्याची आवश्यकताच काय? याचा विचार प्रेमेच्छू तरुण-तरुणी करणार का?

तसा विचार केला नाही तर धर्मचौकटीत प्रेम कोंडण्याची ही मोहीम नक्कीच यशस्वी होणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *