६० वर्षं यशाची, ६० वर्षं अभिमानाची, ६० वर्षं महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या अथक प्रवासाची… १४ ऑगस्ट १९५४ला सुरू झालेला महाराष्ट्र कॅरम संघटनेचा हा प्रवास आता ६०व्या वर्षांत अर्थात गोल्डन ज्युबली वर्षात येऊन पोहचलाय. महाराष्ट्राच्या गल्लीबोळात मनोरंजन म्हणून खेळल्या जाणार्या या खेळाने बघता-बघता व्यावसायिक आणि स्पर्धात्मक रूप घेतलं… राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाने आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलंय… आणि यात महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा वाटा अर्थात लाखमोलाचा ठरलाय… वर्ष सरत जातं तसं वय वाढत जातं. पण वयापरत्वे सगळेच धष्टपुष्ट होतात असं नाही. अरुण केदार या कॅरमवेड्या खेळाडूने अन् कॅरम संघटनेने गेल्या ५५ वर्षांत जे संघटनेला जमलं नाही ते त्याने सचिवपदाच्या त्याच्या कार्यकाळात करून दाखवलंय. कॅरमपटू म्हणून एखाद्या खेळाडूला ज्या ज्या अडचणी येतात त्या भावीपिढीतील खेळाडूंच्या वाट्यास येऊ नये एवढी एकच प्रामाणिक इच्छा घेऊन अरुण राज्य संघटनेचा सचिव झाला. त्याला तशाच युवा संघटक शिवकुमार लाडची साथ लाभली आणि मग या दोघांनी मिळून इतिहास घडवला. आजच्या घडीस संघटनेची स्वतःची अद्ययावत वेबसाइट आहे. संघटनेच्या कधी नव्हे इतक्या स्पर्धा होतायत. कॅरमपटूंना लाखो रुपयांची बक्षिसं मिळतायत… सारं काही सुरळीत सुरू आहे. फार कमी क्रीडा संघटनांत असं पहायला मिळतं.

कॅरम संघटनेला खेळाडूंची वैभवशाली परंपरा आहे. १९५५चा तो काळ… पुरुष विभागात पहिलीवहिली राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित केली गेली. पोलीस खात्यात नोकरीला असलेले हजिमुद्दीन शेख या स्पर्धेचे विजेते ठरले. कॅरमच्या उज्ज्वल भवितव्याची ही नांदी होती. यानंतर एकापाठोपाठ एक सरस कॅरमपटूंची पिढी घडत गेली. १९५४ ते १९६०चा काळ अब्दुल जब्बार, मोहम्मद ताहिर, नंदू हळदीपुरकर, ऐश हैद्राबादी, हजिमुद्दीन शेख, दत्तू विजापुरे अशा दिग्गज कॅरमपटूंनी गाजवला… आणि त्यानंतरच्या काळात रमेश चिट्टी, सुहास कांबळी, अरुण देशपांडे, देवजी सुमरा, विजय संगम, कादीर खान या खेळाडूंनी या खेळात रंग भरले.

कॅरममधील पुरुषांच्या मक्तेदारीला १९६५ मध्ये महिलांकडून आव्हान दिलं गेलं. १९६५ च्या महिला राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहिल्या महिला विजेतेपदाचा मान पटकावला तो उषा बाकले यांनी. याच काळात शैला देशपांडे, माधवी कर्वे, नलिनी बोळींजकर यांचा उदय झाला… तीच परंपरा अनुपमा केदार, संगीत चांदोरकर, आयेशा मोहम्मद यांनी जपली.

लोकाश्रय लाभलेल्या कॅरमला १९८२ साली खर्या अर्थाने राजाश्रयही लाभला… पाच वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावणारे सुहास कांबळी महाराष्ट्र शासनाच्या मानाच्या शिवछत्रपती पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले. तर महिलांमध्ये हा सन्मान नलिनी बोळींजकर यांना लाभला. आंतरराष्ट्रीय स्तरारवर आपली छाप उमटवणारे अरुण केदार, नागसेन एटांबे, अनुपमा केदार, महेंद्र तांबे, जगन बेंगळे, संगीता चांदोरकर, संजय मांडे, निरंजन निमकर, आयेशा मोहम्मद, योगेश परदेशी, संदीप देवरुखकर, दिलेश खेडेकर, प्रकाश गायकवाड तर राष्ट्रीय स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी करणारे विजय संगम, कादीर खान, मालती केळकर आणि मोनाझ तंत्रा या खेळाडूंचा महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने गौरव केला.

ही तर फक्त सुरुवात होती… कॅरमला अजून जग जिंकायचं होतं… सुरुवातीला महाराष्ट्रातर्फे आणि आता इंडियन ऑईलचं प्रतिनिधित्व करणार्या योगेश परदेशीने जगज्जेतेपद महाराष्ट्राकडे खेचून आणलं…

आज ६० वर्षांनंतर मागे वळून पाहताना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या भव्यतेची जाणीव होते.

प्रवास कितीही मैलाचा असो, त्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल महत्त्वाचं असतं… आणि म्हणूनच कॅरमला हायटेक करण्याच्या दिशेने संघटनेचा प्रवास सुरू झाला… कॅरममध्ये ब्रेक टू फिनिश करणं हे सार्यांनाच जमतं असं नाही. पण ज्यांना जमतं ते इतिहास घडवतात… महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या ब्रेक टू नव्हे बरं का स्टार्ट टू फिनिशमध्ये योगदान देणार्या ज्ञात-अज्ञात असंख्य कॅरमपटूंच्या योगदानाला खरंच सलाम केला पाहिजे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *