सर्वसाधारणपणे भारतीय जेवणात कर्बोदकं मोठ्या प्रमाणात असतात. उदाहरणार्थ, पांढरा ब्रेड आणि साखरेचे पदार्थ तसंच शीतपेयंही मोठ्या प्रमाणात असतात. गोड किंवा स्टार्चयुक्त कर्बोदकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. मात्र त्यांच्या अतिरिक्त सेवनामुळे हृदयविकार, लठ्ठपणा, मधुमेह, दातांचं किडणं, मेटाबॉलिक अडथळे, पोषणातील कमतरता आणि कर्करोगही होण्याची शक्यता असते.

आपण गरजेपेक्षा खूप जास्त प्रमाणात सेवन करत असलेले सर्वात धोकादायक कर्बोदक म्हणजे साखर आहे. गेल्या पाच दशकांमध्ये भारतातील साखरेचं सेवन जागतिक ५ टक्के उत्पादनावरून १३ टक्क्यांवर गेलं आहे. भारत जगातील सर्वात मोठा साखरेचं सेवन करणारा देश ठरला आहे. आपण संपूर्ण युरोपीयन युनियनच्या तुलनेने एक तृतीयांश आणि चीनपेक्षा ६० टक्के साखरेचं जास्त सेवन करतो. आपलं दरडोई साखरेचं सेवन २० किलो म्हणजे २५ किलो या जागतिक सरासरीच्या तुलनेने कमी आहे. मात्र ते अत्यंत वेगाने वाढतं आहे.

पाश्चिमात्य अन्नाची संस्कृती आपल्याकडे रुजू लागली, तसा प्रक्रिया केलेल्या आणि गरज नसलेल्या पदार्थांचा आणि ज्यात साखर अतिरिक्त प्रमाणात आहे अशा पदार्थांचा वापर वाढू लागला. कोला, एनर्जी ड्रिंक्स, बेकरी उत्पादनं, ब्रेकफास्ट सीरिअल्स, कन्फेक्शनरी, चॉकलेट्स आणि सरबताऐवजी कोल्ड्रिंक्सचं सेवन यांच्यामुळे आपल्या रोजच्या साखरेच्या सेवनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढू लागलं आहे.

पांढर्या साखरेत केवळ रिकाम्या कॅलरीज् असतात. त्यात कोणत्याही प्रकारचे व्हिटॅमिन्स किंवा खनिजं नसतात. त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते. चहाच्या प्रत्येक चमच्यातून सुमारे २० कॅलरीज् मिळतात, पण शरीराला आवश्यक असलेले पोषण मिळत नाही. याचा परिणाम म्हणून साखरेचं व्यसन लागलेले लोक छुप्या भुकेला सामोरं जातात. ते पुरेशा प्रमाणात अन्नाचं सेवन करतात. मात्र त्यांच्या शरीरात आवश्यक ती पोषणमूल्यं राहत नाहीत. त्यामुळे नंतरच्या काळात आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. एकट्या अमेरिकेत साखरेच्या अतिरिक्त सेवनामुळे निर्माण झालेल्या अनारोग्यामुळे दरवर्षी ३५ दशलक्ष लोकांचे मृत्यू होतात.

हा अहवाल लक्षात घेऊन काही आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ आता साखरेवर तंबाखू आणि दारूप्रमाणेच निर्बंध घालायला हवेत अशी मागणी करू लागले आहेत. साखर आपल्या यकृतासाठी दारूप्रमाणेच व्यसन निर्माण करणारी आहे. ते आपण समजू शकतो कारण साखर आंबवूनच दारूची निर्मिती केली जाते. सार्वजनिक आरोग्याला साखरेच्या वाढत्या वापरामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. ही गोष्ट शास्त्रज्ञांनी ‘जर्नल नेचर’च्या २०१२च्या अंकात स्पष्ट केलीय.

मेटाबॉलिक सिंड्रोमशी संबंधित अनेक आजारांना साखर जबाबदार आहे. जसं उच्च रक्तदाब, मधुमेह, इन्सुलिनला प्रतिबंध, अतिरिक्त बॉडी फॅट आणि कोलेस्ट्रॉलच्या उच्च पातळ्या अशा आजारांचा समावेश असून त्यामुळे वयवाढीची प्रक्रियाही वेगवान होते.

पांढर्या साखरेचं मोठं प्रमाण असलेल्या आणि इतर रिफाइन्ड कर्बोदाकांच्या सेवनाने शरीरात इन्सुलिनची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. त्यामुळे शरीराच्या पेशी नंतरच्या काळात अतिरिक्त कर्बोदकं पचवण्यासाठी अतिरिक्त इन्सुलिन घेतात. त्यामुळे इन्सुलिनला प्रतिबंध निर्माण होतो. याद्वारे शरीरात रक्तशर्करेचं प्रमाण वाढतं. अशाप्रकारच्या अनेक लोकांना टाइप २ मधुमेह होतो. उच्च रक्तशर्करा पातळ्यांमुळे रक्तवाहिन्यांवर ताण पडतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्या जाड आणि कठीण होतात.

साखरेसारख्या रिफाइन्ड कर्बोदाकांनी पुरवलेल्या अतिरिक्त कॅलरीज् ज्या शरीराला ताबडतोब गरजेच्या नसतात त्या फॅट सेल्समध्ये रुपांतरित होतात. हा लठ्ठपणात भर टाकणारा एक महत्त्वाचा घटक आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, कर्करोग, फॅटी लिव्हर डिसीज, डिमेन्शिया आणि हृदयविकार असे आजार होतात.

तज्ज्ञ लोकांच्या मते, साखर पूर्णपणे टाळणंही योग्य होणार नाही. मात्र त्याचं सेवन नियंत्रणात ठेवायला हवं. अन्यथा ते आपल्या शरीरासाठी विषारी ठरू शकतं. दि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रीशन हैदराबादने सर्वसाधारण प्रौढांसाठी दररोज २० ते २५ ग्रॅमपेक्षा जादा साखर खाऊ नये असा सल्ला दिला आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्याला प्रक्रियायुक्त अन्न ज्यात साखर आहे, उदाहरणार्थ, शीतपेयं, कॉफीसारखी साखर असलेली पेयं आणि टेबलावरील साखरेचा वापर टाळणं आवश्यक आहे. खरंतर एका शीतपेयाच्या कॅनमध्ये आठ चमचे साखर किंवा १३० कॅलरीज् असतात.

साखरेचं व्यसन लागतं आणि तिची चवही उत्तम असते. तणावाच्या काळात मानसिक आधार देणारा तो घटक आहे. अनेक लोक चहा किंवा कॉफीत साखर घेत नाहीत. मात्र प्रक्रियायुक्त अन्न आणि शीतपेयांचं सेवन करून अतिरिक्त प्रमाणात साखरेचं सेवन करतात. त्यामुळे दीर्घकालीन स्वरूपात त्यांच्या हृदयाला धोका पोहोचतो.

आपलं रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्सचं रोजचं सेवन कमी करण्याची वेळ आता आली असून साखरेचं सेवन कमी करणं आवश्यक आहे. लठ्ठपणा आणि इतर आजार भारतात वाढू लागले आहेत. त्याचवेळी गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयांमधील एकूण दरडोई कॅलरी सेवनाचं प्रमाण कमी झालेलं दिसतं. याचा अर्थ असा की लठ्ठपणा हा केवळ पोषक घटकांच्या असंतुलनामुळे नसून तर बैठ्या जीवनशैलीमुळे आलेला आहे. आपलं उद्दिष्ट हे संपूर्ण जीवनशैली व्यवस्थापन करण्याचं असायला हवं. त्याबरोबर नियमित शारीरिक व्यायाम आणि सकस आहार आवश्यक आहे.

– गीता देसाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *