‘बाबरी ते कणेरी’ हिंदू-मुस्लीम ऐक्य संपवणारं राजकारण हे हुमायून मुरसल यांनी लिहिलेलं पुस्तक प्रकाशित होत आहे. हुमायून मुरसल हे कोल्हापूरचे. गेली २५-३० वर्षं डाव्या कष्टकरी चळवळीत सक्रिय आहेत. प्रा. श्रीपाद दाभोळकर यांनी केलेल्या पर्यायी शेती प्रयोगात त्यांनी चार वर्षं सहभाग घेतला होता. के. आर. दाते या पर्यायी, लोकाभिमुख तंत्रज्ञानाचा ध्यास घेतलेल्या आणि जनसंघटनांबरोबर पर्यायी तंत्रज्ञानाचे प्रयोग करणार्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञासोबत त्यांनी काम केलं आहे. अपारंपरिक ऊर्जा, जमीन पाणी इत्यादी विषयांत त्यांनी घेतलेला सहभाग महत्त्वाचा होता.

१९८५ पासून डाव्या चळवळीत आणि लोकवैज्ञानिक चळवळीत प्रत्यक्ष सहभाग असलेल्या हुमायून मुरसल यांनी धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांच्या चळवळीतही दीर्घकाळ सहभाग घेतला आहे. हुमायून मुरसल हे मुस्लीम समाजातील. परंतु ते मुस्लीमधर्मीय आहेत याची जाणीव त्यांच्या कोणत्या सहकारी मित्रांनाही कधी नव्हती आणि खुद्द त्यांना स्वतःलाही नव्हती. समाजातील सर्व दडपलेल्या विभागातील सामान्य कष्टकरींची एकजूट उभारून व्यापक क्रांतिच्या दिशेने काम करण्याचा त्यांचा ध्यास होता आणि आहे.

१९९२ साली भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी अयोध्येमधील बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. या एका राजकीय घटनेने भारतातील संपूर्ण मुस्लीम जनतेचं जीवन कायमचं बदलून गेलं. या घटनेपर्यंत भारतातील मुस्लीम धर्मवेडे, धर्मगुरुंच्या पगड्याखाली आहेत, भारत सरकार विशेषतः काँग्रेस सरकार या मुस्लिमांचे राजकीय हितसंबंधांसाठी, मतांसाठी ‘खूप लाड’ करते असा सर्वाधिक समज रास्वसंघ, हिंदुत्ववादी संघटनांनी जनमानसात घट्ट रुजवला होता. इतका की, बाबरी मशीद उद्ध्वस्तीकरणानंतर उसळलेल्या मुंबई दंगलीत शेकडो गरीब मुस्लिमांचे बळी गेले, जीवन उद्ध्वस्त झालं. संमिश्र संस्कृतीची मुंबईची ओळख पुसली गेली. पण धार्मिक विद्वेषाचं हे विष केवळ मुंबईपर्यंतच राहिलं नाही. १९९२ पासून पुढे सातत्याने हिंदू-मुस्लीम विद्वेषाचं वातावरण देशभर पसरत राहिलं. १९९३चे मुंबईतील बॉम्बस्फोट आणि ठरावीक कालांतराने देशभर घडत राहणार्या बॉम्बस्फोटांनी ही धार्मिक फूट अधिकाधिक वाढत गेली. २००२मध्ये गुजरातमधील नृशंस मुस्लीम नरसंहार आणि मालेगाव बॉम्बस्फोट यासारख्या मुस्लिमविरोधी हल्ल्यांच्या घटनांच्या माध्यामांतून मुस्लीम समाज अधिकाधिक कोंडीत पकडला गेला. अशा प्रत्येक घटनेनंतर मुस्लिमांवर आपलं राष्ट्रीयत्व आणि देशभक्ती सिद्ध करण्याची सक्ती लादली जात राहिली.

या सर्व घडामोडी हुमायून मुरसल यांच्यासारख्या डाव्या चळवळीत वाढलेल्या कार्यकर्त्याला अस्वस्थ करत राहिल्या. हुमायून मुरसल यांना बाबरी मशीद उद्ध्वस्तीकरणानंतर पहिल्यांदा मुस्लीम समाजाच्या प्रश्नांनी अस्वस्थ केलं. सामान्य मुस्लिमांचं जीवन त्यांनी जवळून पाहिलं होतं. नव्हे ते जीवन जगलं होतं. दारिद्र्य, अज्ञान, वंचितता यांचा अनुभव त्यांनी घेतला होता. परंतु व्यापक मानवमुक्तिच्या लढ्यातूनच मुस्लीम समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते अशीच तोपर्यंत त्यांची धारणा होती. मात्र बाबरी मशीद पाडल्यावर भारतभर उसळलेल्या दंगली आणि मुस्लीम समाजाचं खच्चीकरण यामुळे मुस्लीम समाजाला पद्धतशीरपणे एकटं पाडलं जात आहे, सर्व समाजाचे शत्रू म्हणून उभं केलं जात आहे हे वास्तव पुढे आलं. म्हणूनच त्यांनी मुस्लीम प्रश्नावर काम सुरू केलं. आपल्या डाव्या चळवळीतील सहकार्यांसोबत ‘हिंदी हे हम, हिंदोस्ताँ हमारा’ या संघटनेद्वारे मुस्लीम प्रश्नावर काम करायला सुरुवात केली. यामागे एक भूमिका होती. तोपर्यंत मुस्लीम प्रश्नांचा पुरोगामी विचार म्हणजे, तोंडी तलाकपद्धतीमुळे मुस्लीम महिलांना सहन करावा लागणारा त्रास, जाचक बुरखा प्रथा, मुस्लीम समाजाच्या शिक्षणाचे प्रश्न इथपर्यंतच मर्यादित होता. ‘हिंदी है हम…’ संघटनेच्या कामातून प्रथमच मुस्लीम समाजाच्या विकासाचे प्रश्न, मुस्लीम समाजाच्या राजकीय, लोकशाही हक्कांचं होणारं दमन, मुस्लिमांची केली जाणारी कोंडी इत्यादी व्यापक प्रश्न प्रकर्षाने पुढे आणले गेले.

याचा मुख्य परिणाम असा झाला की, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे इत्यादी भागांतील सामान्य मुस्लीम प्रथमच आपल्या राजकीय-सामाजिक हक्कांसाठी संघटनेत आणि चळवळीत सामील झाले. २००४ साली ‘हिंदी है हम…’ संघटनेने महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचं सर्वांगीण सर्वेक्षण व्हावं यासाठी आंदोलन केलं. विकासासाठी मुस्लीम विकास आयोग स्थापन व्हावा यासाठी आंदोलन केलं. म्हणजे सच्चर समितीचा अहवाल येण्यापूर्वीच महाराष्ट्रात मुस्लीम प्रश्नांवर सखोल अभ्यास करून आवाज उठवण्याचं श्रेय ‘हिंदी है हम…’ संघटनेकडे जातं. पण या श्रेयापेक्षाही महत्त्वाचं आहे ते महाराष्ट्रात प्रथमच सामान्य मुस्लीम नागरिक तत्कालिक, स्थानिक प्रश्नांपलीकडे व्यापक दीर्घकालीन राजकीय हक्कांसाठी लढ्यात उतरला!

मात्र याच काळात २००२च्या गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम नरसंहार, देशभरात ठिकठिकाणी मुस्लीम अतिरेक्यांचे बॉम्बस्फोट अशा हिंदू-मुस्लीम समाजातील फूट वाढवणार्या घटना घडत होत्या. त्याचा व्यापक आणि दूरगामी परिणाम संपूर्ण समाजावर घडत होता. मुस्लिमांच्या कोणत्याही प्रश्नाला फक्त धार्मिक रंग दिला जात होता. प्रत्येक मुस्लीम नागरिकाला देशद्रोही ठरवलं जात होतं. ही घातक प्रवृत्ती आणि दृष्टिकोन इतका खोल पसरला की पोलीस दल, प्रसारमाध्यमं, सरकारी कार्यालयं इतकंच काय अगदी धर्मनिरपेक्ष पक्षांचे मंत्रीही मुस्लीम माणसांना संशयाने, दुराव्याने वागवू लागले. अशा अविश्वासाच्या वातावरणात सामान्य मुस्लीम नागरिकांना विश्वास देण्याचं आणि मूलभूत हक्कांच्या प्रश्नांवर जागृत करण्याचं, लढ्यात उतरण्याचं बळ ‘हिंदी है हम हिंदोस्ताँ हमारा’ संघटनेने आणि हुमायून मुरसल यांनी दिलं. या कामाचं मोल फार मोठं आहे!

या सर्व काळात स्थानिक मुस्लिमांचे अनेक प्रश्न पुढे आले. मुस्लिमांविषयी पसरलेल्या व्यापक अविश्वासाच्या वातावरणामुळे मुस्लीम माणूस आणि मुस्लीम धर्म सार्वत्रिकपणे नाकारण्याची पद्धत रूढ होत गेली. मुस्लीम समाजाच्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला फक्त विरोधच करायचा असाच व्यवहार रुजला. त्यामुळेच छोट्या-छोट्या गावातही मुस्लिमांविरुद्ध बहुसंख्य समाज एकवटत गेला. त्यातूनच मुस्लिमांना मशिदीत प्रार्थना करायला विरोध, मोडकळीला आलेल्या जुन्या मशिदींच्या डागडुजीला विरोध करण्याच्या अनेक घटना घडत होत्या.

कणेरी प्रकरण त्यापैकीच एक. कणेरी कोल्हापूर शहराजवळचं छोटंसं गाव. या गावात २५-३० मुस्लीम कुटुंबं. गावात गेली १००-१५० वर्षं हिंदू-मुस्लीम समाज एकोप्याने राहतो. गावात एकच जुनी मशीद. मशीद मोडकळीला आलेली. मशिदीची जागा मुस्लीम समाजाच्या (वक्फच्या) मालकीची. मशीद उतरवून पुन्हा उभारण्यासाठी मुस्लीम समाजाने ग्रामपंचायतीची परवानगी घेतली. मशीद उतरवल्यावर गावातील मुस्लिमविरोधी घटकांनी स्थानिक लिंगायत स्वामींच्या आधारे मशीद पुन्हा बांधून देण्यास आडकाठी केली. एका १५ ऑगस्टला ग्रामसभेत आयत्या वेळचा विषय म्हणून ठराव आणला आणि मशीद परत उभारण्यास विरोध केला. थोडक्यात, एक मशीद आपोआप शहीद झाली. मुस्लीम समाजाने आपला धर्माचरणाचा मूलभूत हक्क गमावला!

‘हिंदी है हम…’ संघटनेने संपूर्ण सनदशीर मार्गाने स्थानिक प्रशासन, कलेक्टर, पोलीस खातं, गृहमंत्रालय सर्वांकडे आपल्या प्रश्नांची तड लावण्यासाठी प्रयत्न केले. शांततेच्या मार्गाने आंदोलनं केली. पण मुस्लिमविरोधी वातावरण इतकं खोल रुजलेलं की, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, गृह सचिव आणि गृहमंत्री सर्वांना त्यांच्या वैधानिक जबाबदारीचंही भान राहिलं नाही. आपण आपली कायदेशीर कर्तव्यं पार पाडत नाही याची जाणिवच त्यांनी गमावली. इकडे गावात लिंगायत स्वामीच्या पुढाकाराने मशिदीच्या जागेवर फरशा टाकण्यात आल्या. पुढे ग्रामपंचायत निवडणुकीत मुस्लीम उमेदवारांनी अर्ज भरले तेव्हा स्वामींनी त्यांच्यावर दबाव आणून उमेदवारी मागे घ्यायला भाग पाडलं. म्हणजे मुस्लीम समाजाला लोकशाही प्रक्रियेतूनही हद्दपार करण्यात आलं. कणेरी मशीद बंदी हा केवळ एका मशिदीचा प्रश्न नसून मुस्लीम समाजाचं अस्तित्व नाकारण्याचं, त्यांना बहिष्कृत करण्याचं प्रकरण आहे.

या सर्व प्रवासाचं शब्दांकन म्हणजे ‘बाबरी ते कणेरी’ हिंदू मुस्लीम ऐक्य संपवणारं राजकारण हे पुस्तक होय. या पुस्तकाचं प्रकाशन राज्यात ठिकठिकाणी केलं जाणार आहे. पुण्यात दहा ऑगस्ट रोजी प्रथम प्रकाशन कुमार केतकर, डॉ. नरेश दधिच आणि नवाब मलिक यांच्या हस्ते होणार आहे.

या पुस्तकाने, ‘हिंदी है हम…’ या संघटनेने आणि हुमायून मुरसल यांच्या अथक प्रयत्नांनी मुस्लीम समाजाचं वास्तव आपल्यापर्यंत पोहचवलं आहे. बहुसंख्य समाजाला संवेदनशील प्रतिसादासाठी उद्युक्त करण्याचं श्रेय त्यांना आहे. त्याची दखल आपण कशी घेणार? हा खरा प्रश्न आहे. त्याविषयी सविस्तर पुढील लेखात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *