विद्रोही लोकशाहीर संभाजी भगत यांचं कला क्षेत्रातील योगदान वाखाणण्यासारखं आहे. त्यांचा पहाडी आवाज तर आजसुद्धा अंगावर शहारे आणतो, त्यांनी लिहिलेली गाणी, शाहिरी प्रस्थापित व्यवस्थेला छेद देणारी आणि वास्तववादी असतात. त्यांच्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाने तर लोकांच्या मनावर गारुड केलं आहे. नाट्यक्षेत्रातील सर्वच पुरस्कार या नाटकाला मिळाले होते. नाटकावर अनेक हल्ले झाले, विरोध झाले मात्र त्यांनी ते लीलया पेलले आणि परतवून लावले आहेत. संवेदनशील विषय हाताळण्याची त्यांची हातोटी आहे. त्यांनी आयोजित केलेला ‘सृजनाचा यल्गार’ किंवा विविध कलाकृतींची रेलचेल असलेला ‘रणहलगी’ हा वाद्यवृंद असो, अशा कार्यक्रमांतून नवनिर्मित कलाकृतीची अफलातून जुगलबंदी आणि नवंनवे आविष्कार अनुभवायला मिळालेत. अशा कलागुणसंपन्न कवी, लेखक, नाटककार कलावंताकडून नेहमीच चांगल्या आणि काहीतरी हटके कलाकृतीची अपेक्षा असते. सध्या त्यांनी लिहिलेलं ‘बॉम्बे- 17’ हे नाटक चर्चेचा भाग झालंय. महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने या नाटकावर हरकत घेऊन काही आक्षेपार्ह भाग वगळण्यास सांगितलेत…

संतोष वेरुळकर दिग्दर्शित आणि अद्वैत थिएटर निर्मित ‘बॉम्बे- 17’ या नाटकाचा पहिला प्रयोग नुकताच ठाण्याच्या गडकरी रंगायतन या नाट्यगृहात भरगच्च प्रतिसादात पार पडला. मुळच्या त्यांच्या प्रायोगिक, एकपात्री दीर्घांक ‘अडगळ’चं त्यांनी केलेलं हे व्यावसायिक रूपांतर आहे. नाटकाच्या संहितेला साजेसं असं नाटकाचं नेपथ्य, प्रकाश संयोजन आणि सुनील तांबट यांचा बेरकी आणि सशक्त अभिनय अप्रतिम आणि देखणा आहे… झोपडपट्टीमधील एका छोट्या पत्रावजा घरातील पोटमाळा आणि त्यावरील एकंदर सामानाची अडगळ दाखवण्यात यश आलं आहे. त्यात सुनील तांबटचा मुद्रा अभिनय आणि देहबोली त्याच्या संवादाला आणखीनच गडद करते.

एका वाक्यात या नाटकाची संहिता सांगायची तर ‘मुंबईमधील झोपडपट्टीतील माळ्यावर राहणार्या सुशिक्षित, बेरोजगार, प्रौढ तरुणाची सर्वच बाबतीत होणारी कुचंबणा आणि त्यातून त्याच्या मनःपटलावर सतत येणार्या नाना प्रकारच्या विचारांचं ‘काहूर’ म्हणजे ‘बॉम्बे- 17’. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात नाटकाला सेन्सॉर बोर्डाने सांगितलेले कट आक्षेपार्ह्य असले तरी आवश्यक आहेत असं प्रयोग पाहिल्यानंतर प्रकर्षाने जाणवतं. काही ठिकाणी विषय उगाच वाढवलेला किंवा ताणलेला वाटतो. काही लोकांच्या प्रतिक्रिया थेट विजय तेंडूलकरांच्या नाटकांचा दाखला देतात. मात्र तेंडूलकरांच्या अशा दाहक नाटकांतील सदाशिव अमरापूरकर किंवा नाना पाटेकरांच्या संवादात आलेली शिवी ही उत्स्फूर्त आणि व्यक्तिरेखेला साजेशी आहे. तसं या नाटकात नाहीय. काही ठिकाणी उगाच असे शब्द आलेले स्पष्ट जाणवतात. नाटकाला दिलेलं शीर्षक आणि सुरुवातीला उपेंद्र लिमयेच्या आवाजात असलेली प्रस्तावना नाटकाशी ताळमेळ राखत नाही. ‘बॉम्बे- 17’ म्हणजे मुंबईमधील धारावी झोपडपट्टीचा विभाग, पराकोटीच्या अस्ताव्यस्त, घाणेरड्या पद्धतीने, बकाल असलेल्या या वस्तीतील एकूण राहणीमान, समस्या, गुन्हेगारी, राजकारण, समाजकारण असं काहीही या नाटकात नसताना केवळ झोपडपट्टीतील एका सुशिक्षित, बेरोजगार आणि वयात आलेल्या तरुणाची मनोव्यथा दाखवताना नाटकाचं हे शीर्षक फार चुकीचं वाटतं. नावावरून बांधलेले सर्वच आशय नाटकाच्या संहितेशी जुळत नाहीत. त्यापेक्षा ‘अडगळ’ हे शीर्षक समर्पक होतं.

मूळ ‘अडगळ’ या प्रायोगिक दीर्घांकातून व्यावसायिक दोन अंकी नाटकाचा प्रवास करताना लेखक संभाजी भगत यांनी मुळच्या नाटकाला बरेच कंगोरे देऊ केले आहेत. त्यातील काही पात्र तर केवळ झोपण्याच्या भूमिकेत आहेत. एकपात्रीतून आता यात २-३ पात्र घुसवण्यात आलेत. संपूर्ण नाटक हे एक रात्र आहे. ज्यात नायकाला विविध कारणांमुळे झोप येत नाही. उदाहरणार्थ, वस्तीत सुरू असलेलं एकतारी भजन, शेजारच्या म्हातारीची खोकल्याची उबळ, माळ्यावरील उंदरांचा सुळसुळाट, मच्छरांची गुणगुण, घाम, जोरात आलेली लघवी इत्यादी इत्यादी… आणि या निद्रानाशामुळे तो त्याच्या मनात येणार्या विचारांना प्रेक्षकांसमोर मांडतो. यात तो खाली उतरून झोपलेल्या सर्वांना त्रास न देता माळ्यावरील पाईपच्या साहाय्याने जोरात लागलेल्या लघवीला वाट करून देतो असं दाखवलंय. हे खूपच विचित्र आहे. नेपथ्याप्रमाणे माळ्याच्या शिडीच्या समोरच मोरी आहे. तरीही तो तिथे का जात नाही? तर लाईट लावावी लागेल आणि सर्वांना जाग येईल म्हणून… पण हे न पटण्यासारखं आहे. लेखकाला यातून नक्की काय अभिप्रेत आहे हे समजत नाही. तसंच एकांतात राहून राहून तो सर्व आवाज ओळखण्यात प्रवीण होतो आणि घराच्या गल्लीत रात्रीच्या शांततेत कुणी मुतत असेल तर त्या आवाजावरून तो ओळखतो की कोणती बाई मुतून गेली असेल? हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे आणि ‘ही शेजारची बाई मुतून गेली म्हणजे पहाट झाली असेल का?’ हे वाक्य सतत २-३ वेळा नायकाच्या तोंडी घालून नाटकाची पातळी घसरवली आहे. शेजारची बाई मुतून जाणं, हातभट्टीच्या दारूच्या पिशव्यांची

ने-आण यावरून नायक वेळ किती झाला असेल याची गृहितकं मांडतो हे मनाला पटत नाही. दोन वेळच्या जेवणाची सोय घरात असताना १०० रुपयांचं घड्याळ घरात नाही असं एकही घर आढळणार नाही. मात्र नको असलेला मसाला भरण्यासाठी लेखकाने अशा काहीही गोष्टींची बजबजपुरी नाटकात केली आहे. जी उत्तरोत्तर नाहक वाटते.

नाटकातील बर्याच गोष्टी चुकीच्या प्रमेयांवर आधारित आहेत. मात्र त्या लेखकाच्या मूळ वैचारिक बैठकीला दर्शवणार्या आहेत. कारण लेखक संभाजी भगत हे डाव्या विचारसरणीचे समर्थक आहेत. नायकाचा मित्र बनसोडे हा डाव्या चळवळीचा कार्यकर्ता म्हणून प्रेक्षकांसमोर येतो. तो पोलिसांचा ससेमिरा मागे घेऊन, नाटकाचा नायक हा चर्मकार समाजातून आलेला आहे हे त्याच्या काही संवादावरून लक्षात येईल (‘चित्रच काढायचं ना मग तुमच्यातल्याच त्या संत रोहिदासाचं काढ ना?’ असा सल्ला नायकाला त्याच्या वस्तीतले लोक देतात) तर हा बनसोडे दलित आणि त्यात कम्युनिस्ट चळवळीत गेलेला. नायक त्याला ‘जयभीम कॉम्रेड’ असं संबोधतो. हाच बनसोडे नायकाशी सत्ता बंदुकीच्या नळीतून कशी प्राप्त होते या मार्क्सवादी विचारांवर चर्चा करतो आणि नायकाला या चळवळीत काम करायला प्रवृत्त करतो असं दाखवलं आहे. पुढे हाच बनसोडे गडचिरोलीला आदिवासींच्या प्रश्नांवर आंदोलन करताना पोलिसांकडून नक्षलवादी म्हणून मारला जातो. तेव्हा नायकाचं स्वगत, ‘साला आपण गांडू, याच्यासोबत गेलो असतो तर बरं झालं असतं. निदान असं या माळ्यावर खितपत पडलो नसतो…’ या प्रसंगातून आणि संवादातून संभाजी भगत यांना काय सूचित करायचं आहे? आंबेडकरी तरुणांना आता कम्युनिस्ट चळवळीशिवाय पर्याय नाही? तरुणांनी व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी कम्युनिस्ट चळवळीत सामील व्हावं काय? असे बरेच अनुत्तरीत प्रश्न नाटकाचा एक भाग आहेत. ज्याने चुकीचा समज समाजामध्ये जात आहे.

आणखी एक विषय जो या नाटकात येतो तो म्हणजे, ‘मुठ्या मारणं.’ अर्थात पुरुषांचं हस्तमैथुन. ‘भारतातील ८० टक्के युवक जर मुठ्या मारत असतील तर झाटा या देशाची प्रगती होणार…’ हा संवाद तरुण प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन जातो. मात्र या एका विषयाला नको तितक्या प्रमाणात पुढे ताणलं गेलंय. त्यामुळे या गंभीर विषयाचं भजं झालं आहे. थोडक्यात पण मार्मिक पद्धतीने मांडणी केली असती तर प्रेक्षकांना त्यात व्यथा दिसली असती. अर्थात पुरुष म्हणून नायक मुठ्या मारू शकतो तर त्याच्या तरुण लग्नाळू बहिणी त्यांची शारीरिक भूक भागवण्यासाठी काय करत असतील? असा प्रश्नसुद्धा नायकाला लगेच पडतो. मात्र बहिणीबद्दल असे विचार मनात येतात हे समजल्यावर तो ते झटकून टाकतो. समाजातील अविवाहित स्त्रियांबद्दलचा हा मुद्दा तसा अत्यंत गंभीर आहे, हा विचार क्षणभर का होईना मनात तरळून जातो. पुढे मग या प्रकारामुळे (मुठ्या मारण्याने) नायकाच्या अंथरुणावर कसे डाग पडले आहेत, वीर्याच्या त्या डागातून त्याला पृथ्वीवरील सर्व देशांचे आकार कसे दिसतात, हे या गंभीर विषयाची तोडमोड करून टाकणारं आहे. हस्तमैथुन हा विवाहित वा अविवाहित पुरुषांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. (तसाच तो स्त्रियांचाही असावा) तसंच ह्यद्ग3ह्वड्डद्य स्रद्गह्यद्बह्म्द्ग साठी सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे. त्यात देशाच्या प्रगतीचा काय संबंध? लेखकाचा या विषयावरील अभ्यास सकारात्मक आहे असं वाटत नाही. मुठ्या मारणारे काम करत नाहीत किंवा काम करणारे मुठ्या मारत नाहीत असं काहीच नाहीये. तेव्हा या गोष्टीने देशाच्या प्रगतीवर कसा काय परिणाम होऊ शकतो? म्हणजे योग्य वयात मुलांना शरीरसुख मिळत नाही म्हणून ते निराश होऊन खचून जातात आणि त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो हा आशय असेल तरी थेट देशाच्या प्रगतीशी त्याचा संबंध नाही जोडता येणार.

शेजारच्या खोलीतील माळ्यावर असलेल्या नवविवाहित जोडप्याच्या प्रणय प्रसंगातील आवाजावरून नायकाच्या मनाची घालमेल, सुशिक्षित असून बेरोजगार आणि त्यामुळे समाजात आणि घरात होत असलेली कुचंबणा, अंगभूत असलेल्या इतर कलागुणांची कुचंबणा, प्रेम प्रकरणात आलेलं नैराश्य आणि एकंदर आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मकदृष्टी उत्कृष्ट रंगवता आली आहे. वडिलांचं तंबाखूमुळे कर्करोग होऊन खंगून झालेला मृत्यू आणि बहिणीचा नवर्याच्या दारूमुळे उद्ध्वस्त झालेला संसार हे प्रसंग पाहताना अंगावर शहारे आणि डोळ्यांत पाणी येतं. अशा प्रसंगात वापरण्यात आलेलं ध्वनी संयोजन आणि प्रकाशयोजना अफलातून आहे.

नायकाला पहाटे झोप लागते आणि बाकीचं जग झोपेतून उठतं आणि नाटकाचा दुसरा अंक संपतो. नाटकाचा हाच विषय घेऊन थोडं प्रगल्भ आणि धारावीच्या सर्वसमावेशक व्यथांवर प्रकाशझोत टाकणारं नाटक तयार होऊ शकतं. या नाटकाकडून अशा अपेक्षा होत्या. मात्र त्या अपेक्षाच राहिल्या… यातही एक प्रश्न अनुत्तरीत राहतो तो म्हणजे, निर्माते आणि लेखक या नाटकातून समाजाला, प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छितात? व्यवस्थेविरुद्ध बंड? की केवळ व्यथा मांडणं? हे अनुत्तरीत प्रश्न डोक्यात तसेच राहतात.

या नाटकावर रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने घेतलेल्या आक्षेपाला या नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यांनी तीव्र विरोध केलाय. तसंच संपूर्ण टीमने काळी फित लावून निषेधसुद्धा केला होता. लेखक संभाजी भगत यांनीसुद्धा रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय. तसंच यासाठी लढा देऊ असंही त्यांचं म्हणणं आहे. आता लेखकाची अभिव्यक्ती की रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचं सामाजिक भान यात कोण जिंकतं याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. तूर्तास आमच्या शुभेच्छा!

– अमोल गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *