’रांडच्याचं काय डोलं फुटलं व्हतं? त्या आयझवार्याला या डोंगरघाट्या, रान काय दिसलं नाय? मेल्याच्या काटी पडली मुस्काटावर ती,‘ अशा मस्त खुसखुशीत कोकणी गावरान संवादाने नाटकाची सुरुवात होते आणि प्रेक्षकांच्या नजरा मंचावरच्या सहज वावरणार्या तीन पात्रांवर खिळून बसतात. जीव कानात येतो आणि त्यांचे प्रत्येक संवाद मेंदूवर धडधड धडके देतात. नाटकाची वीण घट्ट, सुबक आणि देखणी करण्यात ’आयदान‘ नाटकाच्या दिग्दर्शिका सुषमा देशपांडे यांना यश आलंय. ’आयदान‘ हे ख्यातनाम साहित्यिका आणि शब्दांना जिवंत करणार्या उर्मिला पवार यांचं स्वतःच्या आयुष्यातील उतारचढाव चित्रित करणारं ११ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं आत्मकथनात्मक पुस्तक… सलग दोन वर्षं या पुस्तकावरून नाटकाची संहिता तयार करण्याचं काम केलं गेलं. संवाद, वाक्यं आणि लेखन बरंचसं तसंच ठेवून दिग्दर्शिका सुषमा देशापांडे यांनी केवळ या पुस्तकाला नाट्यरूप दिलंय. पण असं जरी दिग्दर्शिकेचं म्हणणं असलं तरी एखाद्या आत्मचरित्रपर पुस्तकावरून नाटक तयार करणं तितकंसं सोपं काम नाही. सुषमा देशपांडे यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिकेने मात्र या कामाला अतिशय समर्पकरित्या हाताळलंय…

उर्मिला पवार यांची एकंदर दलित समाजात आणि तेही एक स्त्री म्हणून झालेली वाढ, संगोपन, दुःख, हालअपेष्टा, कौटुंबिक कलह, जातीयतेचे वेदनामय चटके, शिक्षण, धर्मांतर, कार्यकर्ती, संघटन, लिखाण, नोकरी, साहित्यिक हा सर्व प्रवास नाट्यरूपाने समाजासमोर मांडणं तसं कठीणच. मर्यादित वेळेत लहानपणापासूनचे सर्व प्रसंग संवादाच्या माध्यमातून मांडणं म्हणजे तारेवरची कसरत असते. मात्र जितक्या जमतील तितक्या महत्त्वाच्या घटना सुषमा देशपांडे यांनी ’आयदान‘ या दोन अंकी नाटकात मांडल्या आहेत. खरंतर हा बराच मोठा लेखन प्रपंच असल्याने नाटकाची पटकथासुद्धा मोठी झाली आहे. सुषमा देशपांडे यांनी निवडलेले तीनही कलाकार उर्मिला पवार यांच्या व्यक्तिरेखेसोबत इतर पात्रांची ठळक छाप सोडून जातात. केवळ तीन पात्र आणि मोजकंच नेपथ्य घेऊन रत्नागिरीतील दुर्गम भागातील, महार वस्तीतील घर, शाळा, अंगण आणि इतर बरेच प्रसंग सादर करणं हा अफलातून प्रयोग सुषमा देशपांडे यांनी केला आहे. नाटकातील तीन पात्रं (शुभांगी सावरकर, शिल्पा साने, नंदिता धुरी) सतत वेगवेगळ्या भूमिका साकारतात. प्रत्येक प्रसंगात या तिघींचा समन्वय इतका चपखल आहे की, प्रेक्षकांना समजून घेण्यास जास्त ताण द्यावा लागत नाही, ते सहज कथेत आणि प्रसंगात गुरफटत जातात. तिघींपैकी एक सूत्रधार होते, तर कधी उर्मिला, तर कधी त्यांची आई, बाबा, शिक्षक, शेजारी, नवरा, गावकरी, सासू, सासरे… असे सर्व कथेतील पात्रं वेगवेगळ्या मुद्राभिनय, देहबोली आणि संवाद फेकीतील बदलाने मांडले आहेत. त्यामुळे प्रत्येक पात्र हे लीलया विविध भूमिका साकारतात. एकमेकींना नियोजनपद्धतीने, समन्वय साधून संपूर्ण रंगमंचाचा वापर आणि प्रचंड ताकदीचं पाठांतर ही या नाटकातील उल्लेखनीय बाब आहे.

नेपथ्य म्हणजे बांबूंपासून बनवलेली दाराची एक चौकट, त्यातून घराच्या आत बाहेर किंवा दुसर्या खोलीत जाण्याचे संकेत मिळतात, तसंच बांबूंच्याच पट्ट्यांपासून बनवलेल्या तीन बैठका, त्यांचा वेळोवेळी प्रसंगानुरूप होणारा वापर सुयोग्य जमवला गेलाय. रंगमंचाच्या कोपर्यावर ठेवलेल्या बांबूंपासून बनवलेल्या टोपल्या, सूप नाटकाच्या विषयाला धरून राहतात आणि पार्श्वभूमी तयार करतात. नाटकात प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीताची कमी जाणवते. रेकॉर्ड केलेलं पार्श्वसंगीत फारच कमी वाटतं. महत्त्वाचे आणि लक्षात राहणारे प्रसंग ध्वनिविरहित असल्याने त्याचा हवा तितका प्रभाव पडत नाही. शाळेतील गोंधळ, मच्छी मार्केटचा आवाज आणि सर्वात महत्त्वाचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा अंश पार्श्वसंगीतात टाकून प्रसंग जिवंत करण्याचा प्रयत्न केला गेलाय. हाच अभाव प्रकाशयोजनेबद्दल जाणवतो, बरेचसे प्रसंग फुल लाईट्सवर आहेत. काही ठिकाणी उगाच कॉर्नर झोत वापरले आहेत. स्पॉट लाईट्सचा उत्कृष्ट वापर करून कमी नेपथ्यात भारदस्त अभिनय खुलवता आला असता. कलाकारांचा उपजत आणि सर्वोच्च प्रतिभेचा अभिनय या सर्वांवर मात करून जातो ही जमेची बाजू, मात्र ध्वनी आणि प्रकाशयोजनेच्या लयबद्ध आणि प्रभावी वापराने नाटक अजून खुलवता आलं असतं. लहानपणापासून उर्मिला पवार यांना आलेले जातीयतेचे घाणेरडे अनुभव ते आंबेडकरांनी घोषणा केलेली धर्मांतराची लाट इथपर्यंत पहिला अंक बांधला आहे. तर दुसर्या अंकात त्यांचं वैवाहिक आयुष्य, सामाजिक, स्त्रीवादी संघटनाबांधणी, सततचं आणि प्रदीर्घ लिखाण ते आतापर्यंतचा कालखंड अशी सुंदर रचना केली आहे. योग्य ठिकाणी मध्यांतर घेतल्याने प्रेक्षकांच्या मनात असलेली उत्कंठा पकडून ठेवली आहे.

नाटकाच्या संहितेची नायिका अर्थातच उर्मिला पवार या आहेत. या नायिकेची नाटकात रंगवलेली प्रत्येक व्यक्तिरेखा निरनिराळ्या स्वभावाचं दर्शन घडवते. नायिकेला शिक्षक शाळेच्या आवारातील शेण उचललं नाही म्हणून मारतात हे जेव्हा नायिकेच्या आईला समजतं तेव्हा त्याच वाटेने येणार्या मास्तरला ती चांगलीच फैलावर घेते आणि आपल्या गावरान, ठसकेबाज भाषेत धमकीवजा ताकीद देते, ’पुन्हा मारशाल माझ्या पोरीला तर याद ठेवा, या वाटेने कसं जाताय तेच पाहतंय,‘ यावरून गरिबीत असूनही त्या काळच्या बायका कशा निडर आणि खमक्या होत्या हे दिसून येतं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा अतिशय उद्वेगाने आपल्यासमोर येतो तो म्हणजे नायिकेच्या खाण्यापिण्याच्या आबाळाचा प्रसंग.

नाटकाची नायिका अत्यंत हलाखीच्या आयुष्यातून, स्वप्रेरणेने, जिद्दीने आपलं शिक्षण पूर्ण करते आणि नावारूपाला येते. महाविद्यालयात असताना तरुण मुलं इतर मुलींकडे पाहतात तसं आपल्याकडे पाहत नाहीत. त्यामुळे आपल्यात काही कमी आहे, आपण दिसायला सुंदर नाही, स्थूल आहोत, फटकळ आहोत किंवा मग जात आडवी येत असेल अशा विचारांचं काहूर नायिकेच्या मनात येत असतं. त्यामुळे नायिका कित्येकदा निराश होते, खट्टू होते. शेजारच्या हरिश्चंद्र नावाच्या युवकाच्या नायिका प्रेमात पडते आणि मग या दोन प्रेमीजीवांची नजरानजर, भेटीगाठी या तिन्ही कलाकारांनी उत्तमरितीने दर्शवल्या आहेत. पुरुष पात्रांची अजिबातच गरज अशा प्रसंगात दिग्दर्शकाने भासू दिलेली नाही. हीच बाब नायिकेचे वडील, मास्तर, नवरा, भाऊ आणि इतर पुरुषी व्यक्तिरेखांच्या बाबतीत जाणवते.

नाटकाच्या संवादातील शिवराळ भाषा अजिबात अंगावर येत नाही. ती उत्स्फूर्त वाटते, सहज वाटते. प्रसंगाला अनुसरून वाटते, स्त्रियांच्या मासिक पाळी आणि त्या काळातील याबद्दलचे चुकीचे समज, होणारी अवहेलना आणि कुचंबणा प्रभावीपणे मांडली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्यभंग होऊन पडणारे रक्ताचे डाग नायिकेला मासिक पाळी सुरू झाल्याचं लक्षण वाटतं. मात्र पुन्हा सहा दिवसांनी जेव्हा खरी पाळी येते तेव्हा मात्र तिची उडालेली त्रेधातिरपीट आणि सासू समोर केलेली सारवासारव नाट्यगृहात मिश्कीलता पेरून जाते. नायिका लहानपणापासूनच विद्रोही किंवा बंडखोर अशी दाखवली आहे, नवरा मर्जीचा, प्रेमाचा असला तरी लग्नानंतर त्याच्यातला पुरुषीपणा तिला त्रासदायक वाटू लागतो. सुरुवातीला सहकार्य करणारा प्रेमळ नवरा बायको एम.ए.ला प्रवेश घेते हे समजल्यावर चिडतो आणि ’घराकडे लक्ष द्या आता, काय करणार पुढे शिकून,‘ असं सुनावतो तेव्हा नायिकेचं अवसान गळून पडतं. तिचा आत्मविश्वास डळमळतो. तरीही जिद्दीने ती एम.ए. पूर्ण करते. आईच्या दुःखाची छटा तिला तिच्या आयदान विणण्यात दिसून यायची, अगदी तसंच तिच्याबाबतीत घडतं आहे, अशी जाणीव तिला होते. आई आयदान विणायची तर नायिका तिचं दुःख लिखाणातून प्रकट करायची. नायिकेला आई आणि तिच्यातील हे साधर्म्य जवळचं वाटतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेनंतर गाव पातळीवरसुद्धा त्याबाबतीत हालचाली होऊ लागल्या आणि त्याचे पडसाद हा नाटकातील दुसरा महत्त्वाचा भाग आहे. आंबेडकरी चळवळीतील महिलांनी, कार्यकर्त्यांनीच नव्हे तर इतर समाजातील लोकांनीसुद्धा समजून घ्यावा असा हा भाग आहे. नाटकाचा दुसरा अंक उर्मिला पवार यांचं चळवळीतील योगदान, संघटनाबांधणी यावर प्रकाशझोत टाकतो. धर्मांतराच्या घोषणेनंतर लोकांनी घरातील देव कसे पाण्यात सोडले. ’हे देवानु तुमी आता जावा, तुमी आमच्यासाठी काय बी केला नाय,‘ असं गार्हाणं घालून रत्नागिरीत लोकांनी देव पाण्यात सोडले आणि शुभ्र वस्त्र, पंचशील आणि बुद्धाला आत्मसात केलं. घरातील देव्हार्यात आता बुद्धमूर्ती आणि बाबासाहेबांची तसबीर दिसू लागली. हिंदू धर्मातील जातिच्या उतरंडीत पिचत पडलेल्या असंख्य दलितांच्या आयुष्यात एकदम सोनेरी पहाट झाली. आत्मविश्वास वाढला होता आणि या सर्व घटनांच्या उर्मिला पवार साक्षीदार होत्या. मुंबईला स्थलांतरित झाल्यावर त्यांचं लिखाण कसं वाढलं, घरची जबाबदारी पार पाडून तसंच सरकारी कचेरीत काम करून त्यांनी शिक्षण आणि लिखाण सुरू ठेवलं याचं उत्तम सिंहावलोकन सुषमा देशपांडे यांनी केलं आणि कलाकारांकडून त्याची मांडणी करून घेतली आहे. स्वतःच्या मुलाचा ट्रेनमधून पडून झालेला मृत्यू आणि त्या धक्क्याने एका आईच्या मनाची झालेली स्थिती अत्यंत जिवंतपणे रंगमंचावर सादर केली गेली आहे. हे पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. या घटनेला सर्वस्वी नायिकेला जबाबदार ठरवणारा नायिकेचा पती नंतर दारूच्या नशेत राहतो. नायिका आपलं दुःख आपल्या लिखाणातून प्रकट करते. लिखाण वाढत जातं. रात्रीच्या अंधारातसुद्धा लेखिका जे आठवेल ते लिहून ठेवते. उच्चशिक्षित असल्या तरी पदोपदी जातिमुळे त्यांना अवहेलना सहन करावी लागत होती. हे सर्व जितक्या दाहकपणे उर्मिला पवार यांच्या आयुष्यात घडलं आहे तितक्या ताकदीने अभिनयातून ते नाटकात मांडण्यात आलं आहे. उर्मिला पवारांनी कलाकारांच्या संवादाकडे स्वतः लक्ष दिलं आहे.

थोडक्यात नेपथ्यात नाटकाचं सादरीकरण उत्कृष्ट झालंय. संहिता आणि अभिनय जर उच्चप्रतीचा असेल तर नेपथ्य आणि इतर भौतिक बाबी लक्षात येत नाहीत. अगदी असंच या नाटकाच्याबाबतीत म्हणावं लागेल. अत्यंत जिवंत अभिनय आणि रंगमंचावरील सहज वावर नाटकाची उंची वाढवतो. मनाला थेट भिडणारे संवाद आणि स्वगतं कलाकारांनी बेमालूमपणे सादर केले आहेत. काही गंभीर आणि भावूक प्रसंगांना तर टचकन डोळ्यांत पाणी काढून त्या प्रसंगांना हुबेहूब उभं केलं आहे. लहान मुलांच्या अभिनयात बालिशपणाचे बारकावे उत्तमरित्या टिपले आहेत. काही ठिकाणी संवादफेकीत शब्द चुकतात पण इतक्या मोठ्या संहितेत असं होणं स्वाभाविक आहे.

’मी अशी आज इथपर्यंत आली आहे, आयुष्याने खूप काही शिकवलं तसं रक्त येईपर्यंत झोडपूनसुद्धा घेतलं आहे, हेच मला उर्वरित आयुष्य जगण्यास बळ देत राहील,‘ अशा सकारात्मक संवादाने नाटकाचा शेवट होतो.

अमोल गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *