मावळणारा सूर्य उद्याच्या आश्वासक पहाटेची हमी देत असतो… अर्थात त्या पहाटेसाठी आधी अंधाराशी मुकाबला हा करावाच लागतो. यंदाच्या २०१४च्या फुटबॉल वर्ल्ड कपचा अस्त होत असताना यजमान ब्राझिलचा संघ असाच अंधाराच्या खोल गर्तेत ढकलला गेलाय. विजेतेपदाचे दावेदार असणार्या ब्राझिलला सेमीफायनलमध्ये जर्मनीकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आणि हे कमी की काय तिसर्या क्रमांकासाठीच्या मॅचमध्ये नेदरलँडनेही त्यांचा ३-० असा धुव्वा उडवला… १८४० नंतर ब्राझिलने पहिल्यांदाच मायदेशी सलग दोन मॅच हरल्यात. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत कोच लुईस फेलिप स्कॉलरींनी राजीनामा दिला आणि तो तत्काळ मंजूरही झाला. काय चुकलं हे सांगायला हजारोजण पुढे येतील पण ब्राझिलला आता खरी गरज आहे ती चूक कशी सुधारायची हे सांगणार्यांची… रिओतील मराकाना स्टेडिअममधून फायनल बघून बाहेर पडताना एका फलकाने माझं लक्ष वेधून घेतलं. त्यावर लिहिलं होतं… ‘होय, आम्ही हरलोय, आमच्या सन्मानाला धक्का पोहचलाय, तरीही आम्ही नव्याने लढू कारण आमचा आमच्यावरील विश्वास अजून शाबूत आहे, कारण हा पेलेचा देश आहे.’

ब्राझिलच्या अपयशाचं पोस्टमॉर्टेम आता सुरूच राहील पण एक गोष्ट मात्र कबूल करावीच लागेल की, एवढा सगळा विरोध, निदर्शनं होत असतानाही ब्राझिलने फुटबॉलचं आयोजन मात्र वर्ल्डक्लास केलं होतं आणि यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद, त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर… ओब्रीगाडो ब्राझिल!

या वर्ल्ड कपने अनेक संस्मरणीय क्षण फुटबॉलप्रेमींना अनुभवायला दिले… नेदरलँडच्या व्हॅन पर्सीने लाजवाब डाईव्ह मारत स्पेनविरुद्ध केलेला गोल अजरामर झालाय. डेली ब्लिंडने तब्बल मैदानाच्या मध्यावरून दिलेला हवाई पास अचूकपणे हेरून पर्सीने डायव्हिंग करत हेडरद्वारे गोल केला होता… अशक्य एवढ्याच शब्दात त्याचं वर्णन करता येईल. उरुग्वेच्या सुआरेझचा चावा ही बाबही फुटबॉलप्रेमी विसरू शकणार नाहीत. इकडे ब्राझिलमध्ये ‘सुआरेझ बाइट’ नावाने विविध रेस्टॉरण्टमध्ये वर्ल्ड कपदरम्यान विशेष खाद्यपदार्थ विक्रीस ठेवण्यात आले होते. ब्राझिलचा स्टार नेयमारला जखमी करणारा चीलीचा झुनिग हा जणू अवघ्या ब्राझिलियन्सचा राष्ट्रीय दुश्मन बनलाय. स्पेनचा सलामीच्या मॅचमध्ये नेदरलँडने उडवलेला ५-१ असा धुव्वा आणि सेमी फायनलमध्ये जर्मनीने ब्राझिलचा केलेला ७-१ असा खात्मा फुटबॉलजगत कधीच विसरू शकणार नाही.

एकीकडे या कडू आठवणी असतानाच जर्मनीच्या मिरास्लोव्ह क्लोजने केलेला सर्वाधिक १६ वर्ल्ड कप गोल्सचा विक्रम अफलातून असाच होता आणि हो, इंग्लंडच्या वेन रूनीने तिसर्या वर्ल्ड कपमध्ये का होईना पण अखेर आपल्या गोलचं खातं उघडलं… हाही एकप्रकारे विक्रमच झाला. गेल्या २०१०च्या वर्ल्ड कपमध्ये जर्मनीने सर्वाधिक १३ गोल केले होते. यंदा त्यांनी १८ गोल करत स्वतःचाच विक्रम मागे टाकलाय. पण सर्वाधिक मजा आली ती या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये झालेल्या गोल्सच्या बरसातीने. तब्बल १७१ गोल्स या वर्ल्ड कपमध्ये नोंदवले गेले. ब्राझिलने जगाला सांबा डान्सची देणगी दिली. प्रत्येक गोलनंतर ब्राझिलच्या रस्त्यारस्त्यावर सांबा डान्स अनुभवता आला. पण सगळ्यात लक्षात राहिली ती ब्राझिल आणि अर्जेंटिना दरम्यानची मैदानाबाहेरील खुन्नस. पेले असो की मॅराडोना, नेयमार असो की मेस्सी, प्रत्येक फुटबॉलप्रेमी आपापल्या दैवताची दिंडी घेऊन या ब्राझिलच्या पंढरीत आला होता. अर्थात ना ब्राझिल, ना अर्जेंटिना… वर्ल्ड कप नेला तो जर्मनीने. याचं कारण एकच, पोतुर्गालकडे रोनाल्डो होता, ब्राझिलकडे नेयमार होता, अर्जेंटिनाकडे मेस्सी होता तर जर्मनीकेड मॅच जिंकून देणारी एक अख्खी टीम होती… त्यांच्या ११ पैकी तब्बल ८ खेळाडूंनी या वर्ल्ड कपमध्ये गोल केलेत…

फुटबॉल वर्ल्ड कपचा जोश संपत नाही तोच ब्राझिलियन आता २०१६च्या ऑलिम्पिक आयोजनाच्या तयारीला लागलेत आणि म्हणूनच मायदेशी परतणार्या प्रत्येकाला ते ऑलिम्पिकसाठी रिओ द जनेरिओत येण्याचं आग्रहाचं निमंत्रण द्यायला विसरत नाहीत. याच मराका स्टेडिअमवर ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. अर्थात ब्राझिलचा गेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये २२ वा क्रमांक होता. ३ गोल्डसह त्यांनी एकूण १७ मेडल्स पटकावली होती. फुटबॉलच्या वर्ल्डक्लास आयोजनानंतर ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी ब्राझिलकडून अपेक्षा उंचावल्यात. पण एकूणच तमाम ब्राझिलवासीयांनी फुटबॉल वर्ल्ड कपच्या यशस्वी आयोजनासाठी घेतलेल्या कष्टासाठी त्यांना मनःपूर्वकधन्यवाद! ओब्रीगाडो ब्राझिल…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *