पुरुष (खासकरून नवरा) आणि त्याच्या भानगडी कुणालाच नव्या नाहीत. मराठी रंगभूमीला तर नाहीच नाही. पुरुषाच्या भानगडी आणि त्या भानगडींमुळे निर्माण होणार्या गोंधळावर आतापर्यंत अनेक नाटकं रंगभूमीवर सादर झालेली आहेत. यातील अनेक नाटकं गाजलेली आहेत. तर काही नाटकांनी प्रेक्षकांचे डोळे उघडण्याचंही काम केलंय… असं असतानाही आता पुन्हा एकदा नवर्याच्या भानगडी सांगणारं सुरेश जयराम यांचं ‘कधी घरी कधी शेजारी’ हे नाटक रंगभूमीवर आलंय… राजाराम शिंदे यांची निर्मिती असलेलं हे नाटक मंदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलंय…

श्रीमंत बायकोच्या पैशांवर जीवन कंठत असलेला शेखर (भूषण घाडी) हा आपल्या काही मित्रांसोबत चांदनी डान्सबरमध्ये जातो. पण तिथे पोलिसांची धाड पडते आणि मग सर्वांचीच धांदल उडते. या धांदलीतच त्या डान्सबारमधील चांदनी (मौसमी तोंडळवकर) नावाची बारबाला आपला पाच लाख किमतीचा महागडा हार शेखरच्या कोटाच्या खिशात लपवते… शेखर डान्सबारमधून कसाबसा घरी परततो. पण त्याला घरी यायला सकाळ होते. त्यामुळे शेखरची बायको स्वप्नाली (तेजस्वी पाटील) त्याला उशिरा घरी येण्याबद्दल जाब विचारते. शेखर डान्सबारमध्ये जाऊन आल्याचं लपवण्यासाठी खोटं बोलतो. हे खोटं, एक खोटं बोलल्यानंतर सतत खोटं बोलावं लागतं या उक्तिला सत्यात उतरवणारं असतं. त्यामुळे स्वप्नाली आणि शेखर यांच्यात खरंखोटं करण्याचा खेळ सुरू होतो. यात शेखरला त्याचा शेजारी मित्र हॅरी केसरकर (अनिल शिंदे) मदत करतो. शेखर त्याच्या नावाने अनेक थापा स्वप्नालीला मारतो. अशातच स्वप्नालीच्या हाताला चांदनीचा पाच लाखांचा हार लागतो. तो हार तुझ्यासाठीच शेखरने आणलाय, असं हॅरी चुकून बोलून जातो आणि मग सुरू होतं ‘कधी घरी कधी शेजारी’ हे नाटक…

चांदनी आपला हार परत घेण्यासाठी शेखरच्या घरी येते. पण तो हार तिला मिळत नाही. हार मिळाला नाही तर चांदनीचा बारमालक शेट्टी शेखरचा जीव घेईल असं शेखरला सांगितलं जातं. यातून सुटका करून घेण्यासाठी शेखर आणि हॅरी शक्कल लढवतात… दरम्यान शेखरचा एका खाजगी बसमधून प्रवास करताना अपघात झालेला असतो. या अपघातातील जखमींना बस कंपनीने पाच लाखांची मदत जाहीर केलेली आहे. ती मदत मिळवून चांदनीचा पाच लाखांचा हार परत करायचं असं शेखर आणि हॅरी ठरवतात… आणि मग नवर्याच्या भानगडींना सुरुवात होते… सुरेश जयराम यांचं हे नाटक संपूर्णपणे मनोरंजनाचं उद्दिष्ट समोर ठेवून लिहिलेलं आहे. त्यामुळे मनोरंजनातून प्रबोधन वगैरे असं या नाटकातून काही होत नाही. पण, मनोरंजन होतं आहे हे बाकी खरंय… मदतनिधी मिळवण्यासाठी शेखर, स्वप्नाली, हॅरी आणि चांदनी काय काय उचापत्या करतात, हे पहाणं मनोरंजनात्मकच आहे.

भुषणने भानगडीबाज पण एक पत्नीनिष्ठ नवरा उत्तम साकारलाय… पण अभिनयात मात्र तो कमी पडतो. प्रचंड उत्साहाने भुषण रंगमंचावर वावरतो खरा पण तो वावर कृत्रिम असल्याचं सतत जाणवत राहतं. सहज अभिनयातूनही शेखर उत्तम साकारता येऊ शकतो. तेजस्वीने उभी केलेली टिपिकल बायको प्रेक्षकांना सुखावून जाते. वाट्याला आलेली भूमिका चोख बजावण्यात तेजस्वी यशस्वी झालीय… अनिल शिंदे याचा हॅरी मात्र प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करून जातो. हॅरी या पात्राने खर्या अर्थाने नाटकाला रंगत आलीय… त्यामुळेच नाटक संपल्यानंतरही हॅरी आणि त्याच्या मिशा लक्षात राहतात… तर… मौसमी तोंडळवकर हिने सलग तिसर्या नाटकात बारबाला किंवा वेश्या व्यवसाय करणार्या स्त्रिची भूमिका साकारून जणू हॅट्रिकच मारलीय… पण या नाटकातील मौसमीने साकारलेली बारबाला औरच आहे. ही बारबाला नेहमीप्रमाणे हिंदीमिश्रीत मराठीतून, टपोरी भाषेत बोलत नाही तर ती अस्सल मालवणी भाषेत बोलते. आधीच मालवणी भाषा ही शिवराळ भाषांसाठी ओळखली जाते. त्यात मौसमीसारख्या अभिनेत्रीकडून मालवणीतून शिव्या ऐकणं म्हणजे प्रेक्षकांसाठी

पर्वणीच आहे आणि म्हणूनच मौसमीची चांदनीही प्रेक्षकांचे तिकिटाचे पैसे वसूल करून देते…

प्रदीप पाटील यांचं नेपथ्य उत्तम झालंय… शितल तळपदे यांची अनोखी प्रकाशयोजना आणि त्याला महेश नाईक यांच्या संगीताची साथ मिळालीय. तर शैलजा शिंदे आणि मिताली शिंदे यांनी वेशभूषेची जबाबदारी पार पाडलीय. राजेश परब यांनी रंगभूषा साकारलीय… एकूणात मनोरंजनासाठी हे नाटक पहायला हरकत नाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *