चंद्रावर पहिलं पाऊल कोणी ठेवलं याचं उत्तर आपण चटकन नील आर्मस्ट्राँग असं देतो… पण चंद्रावर पाऊल ठेवणारा दुसरा अंतराळवीर आपणापैकी किती जणांना माहिती आहे… बहुतांश उत्तर नाही असंच येईल. कारण लक्षात ठेवली जाते ती पहिल्या क्रमांकाची कामगिरी… आणि म्हणूनच फुटबॉलची पंढरी मानली जाणर्या एकूणच लॅटिन अमेरिकेत पहिला वर्ल्डकप कोणत्या युरोपीयन टीमने जिंकला तर त्याचं उत्तर यापुढे चटकन जर्मनी असं देता येईल… आजवर चार वर्ल्डकप लॅटिन अमेरिकेत झाले पण एकदाही युरोपीयन टीमला तो जिंकता आला नव्हता… आणि म्हणूनच ब्राझिलच्या रिओ द जानेरिओतील मराकाना स्टेडिअमवर जर्मनीने इतिहास घडवला… मराकानातील स्टेडियमवर जमलेले जगभरातील ७२ हजार फुटबॉलप्रेमी त्याला साक्षीदार होते आणि त्यापैकीच एक मी… इतिहास घडताना पहायची संधी कितीजणांना मिळते… आणि म्हणूनच जर्मनीच्या विजयानंतर प्रत्येकाच्या तोंडून एकच उद्गार स्टेडिअममध्ये निनादत होता, होय आम्ही तिथे होतो… इतिहास घडताना तिथे होतो…
सुटकेचा निःश्वास…
फायनलसाठी मराकाना स्टेडियममध्ये पाऊल ठेवलं आणि डोळे विस्फारून गेले. जगभरातील फुटबॉल दिवाने चित्रविचित्र पोषाखात आपल्याच नादात दंग होते… एका हाती बिअरचा ग्लास आणि दुसर्या हाती कागदी फलक… सोबतीला स्टेडिअम दणाणून सोडणारी घोषणाबाजी… पण या सगळ्यात एक फलक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. दोन जर्मन फॅन्स तो फलक झळकावत होते. त्यावर लिहिलं होतं, ‘अर्जेंटिनाला आम्ही तुमच्या भूमीवर जिंकू देणार नाही…’ नेमकी हीच भावना तमाम ब्राझिलियन्सची होती. सेमीफायनलमध्ये जर्मनीने ब्राझिलचा ७-१ असा लाजिरवाणा पराभव केला होता. पण त्याबाबत ब्राझिलियन्सची कोणतीच तक्रार दिसली नाही. केवळ त्यांना अर्जेंटिना हरलेली पहायची होती. कारण लॅटिन अमेरिकेतील फुटबॉल वर्चस्वावरून ब्राझिल आणि अर्जेंटिना या दोन देशांमध्ये कट्टर दुश्मनी आहे. त्यामुळे कट्टर प्रतिस्पर्धी अर्जेंटिनाने ब्राझिलमध्ये येऊन वर्ल्डकप जिंकावा यासारखी दुसरी मानहानी ब्राझिलसाठी नव्हती आणि त्यामुळेच स्टेडिअममधील प्रत्येक ब्राझिलियन हा जर्मनीचा पाठीराखा बनला होता… जर्मनीची टीम जणूकाही घरच्या मैदानावरच मॅच खेळतेय इतका सपोर्ट तिला मिळत होता. आणि अखेर तो क्षण आला… बदली खेळाडू म्हणून आलेल्या मारिओने गोल केला आणि तमाम ब्राझिलियन्सनी सुटकेचा निःश्वास सोडला… तुम्हाला मी आता खात्रीने सांगतो, त्या रात्री प्रत्येक ब्राझिलियन निवांतपणे झोपला असेल… एक मोठं बालंट टळलं होतं. आधीच कार्निव्हलप्रेमी असणार्या ब्राझिलियन्ससाठी इतकं कारण पुरेसं होतं. इथे रस्त्यारस्त्यावर दिवाळी साजरी झाली. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजाळून गेला. ब्राझिलच्या संभाव्य विजेतेपदासाठी आणलेले फटाके अखेर तमाम ब्राझिलियन्सनी अर्जेंटिनाच्या पराभवासाठी वापरले…
अन् पेले सापडला…
फुटबॉलची पंढरी ब्राझिल आणि या पंढरीत फुटबॉलचा देव पेले मात्र फारसा कुठे दिसत नव्हता. पण, अखेर पेलेचं दर्शन तमाम फुटबॉलप्रेमींना मराकाना स्टेडिअममध्ये झालं… हे तेच स्टेडिअम आहे जिथे पेलेने त्याचा एक हजारावा विश्वविक्रमी गोल केला होता. पेलेचं दर्शन होताच स्टेडिअममधील तमाम ब्राझिलियन्स प्रेक्षकांत एकच उत्साह शिरला आणि मग सुरू झालं ते पेले गायन… अर्जेंटिनाच्या प्रेक्षकांना डिवचण्यासाठी खास हे गाणं तयार केलं गेलंय… जणू ब्राझिलच्या फुटबॉल टीमचं अँथम… व्हिव्हा व्हीव्हा… सापोरे सापोरे… या गाण्याचा अर्थ असा की, चला नाचू गाऊया, कारण आम्ही पाच वेळा वर्ल्डकप जिंकलाय आणि हो आमच्याकडे १००० गोल करणारा पेले आहे… अर्जेंटिना तुमच्याकडे काय आहे तर गांजा-चरस ओढणारा मॅरेडोना…
या फिफा वर्ल्डकप विजयाची नशा इतकी होती की ब्राझिलियन्सच्या सुरात सूर मिसळून जर्मनीचे चाहतेही हेच गाणं गात होते… अर्जेंटिनाला डिवचण्यासाठी… पण या गाण्यातून एक मात्र सिद्ध झालं की फिफाने कितीही राजकारण केलं, पेलेला डावलण्याचा प्रयत्न केला तरी पेले जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर राज्य करतोय. असं राज्य जे पेलेकडून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही, फिफा आणि मॅराडोना तर नाहीच नाही…