वसईच्या अपंग सेवा समितीने केसरी टूर्सच्या सहकार्याने काही अपंग बांधवांसाठी चीनच्या सहलीचं आयोजन केलं होतं. या सहलीत अपंगबांधवांसमवेत सहभागी झालेल्या फादर मायकल जी. यांनी या सहलीचा कथन केलेला हा अनुभव…

केसरीमाईस हा केसरी टूर्सचा एक भाग आहे. विशेष गटांची विशेष सहल ओयोजित करणं हेच त्यांचं खास काम असतं. या संस्थेच्या मदतीने आम्ही यावर्षी चीनची वारी करण्याचं ठरवलं आणि १० अपंगबांधव या ट्रिपसाठी तयार झाले. केसरीने दिलेल्या सुचनांनुसार सारी तयारी करून सहल मुंबई विमानतळावरून निघाली. संस्थेच्या सात व्हिलचेअर बांधून घेतल्या आणि अपंग बांधव कॅथेपॅसिफिकच्या एस्कॉर्टकडून चालवलेल्या खास नऊ व्हिलचेअर्समध्ये बसून विमानाकडे निघाले. एरव्ही अपंगबांधव पैसा असूनही नॉर्मल ग्रूपसोबत विदेशी काय देशी सहलीलासुद्धा जाऊ शकत नाही. त्यांना ही अपंगांच्या खास सोयीसुविधांयुक्त केसरीची सहल म्हणजे एक पर्वणीच होती.

चीनची राजधानी असलेल्या बीजिंग शहराच्या अत्याधुनिक विमानतळावर आम्ही पोहोचलो. चीन हा साम्यवादी देश. पण आता भांडवलवादी बनलाय. याचा अनुभव हॉटेलमध्ये पोहचल्यावर आला. या फोर स्टार हॉटेलमधील सोयी जगातील कोणत्याही सर्वोत्कृष्ट हॉटेलशी स्पर्धा करतील, अशा होत्या.

बीजिंगमध्ये पहिली संध्याकाळ ‘बर्डस् नेस्ट’ इथे घालवली. त्याचसमोर ऑलिम्पिक स्टेडिअम आहे. कित्येक एकरांची प्रशस्त जागा सार्वजनिक वापरासाठी बांधली आहे. भारताला मागे टाकून चीन आज पुढे जात आहे याची जाणीव जागोजागी होत होती. बर्डस् नेस्टमध्ये अपंग भिकारी पाहिले. पण तेही सुधारलेली आवृती! त्या भिकार्याच्या बाजूला मोटरसायकल उभी आहे, त्यावर लाऊडस्पीकर लावला आहे आणि चांगल्या पोषाखातला अपंगबंधू जमिनीवर बसून गायनात तल्लीन झालाय!

दुसर्या दिवशी जगातल्या सर्वात प्रशस्त अशा टियानमेन स्क्वअेरवर तिथे घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटनांची माहिती गाइडने दिली. ‘काही वर्षांपूर्वी चीनी विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन जे चिरडलं गेलं, ते इथेच झालं होतं का?‘ असा मी प्रश्न केला. उत्तर आलं, ‘हो, पण त्या घटनेविषयी आम्हाला अधिक बोलण्यास मनाई आहे.‘ तिथूनच पुढे गेल्यावर ‘फर्बिडन सिटी’ लागते. पूर्वीच्या मिंग आणि किंग घराण्याच्या राजांनी आपल्या राजवाड्यात प्रायव्हसी करून घेण्यासाठी काय विचित्र प्रकार केले होते, त्याची तिथे चिन्हं दिसली.

तीन गेटपैकी राजाच फक्त मधल्या गेटमधून शिरणार! त्याच्या राण्या शेकडोंनी असायच्या पण त्या दुसर्या गेटने, तर आणखीन शेकडोंनी रखेल्या असायच्या त्यांना गेटमधून राजरोस प्रवेश नाही! ती माहिती ऐकून आम्हा सगळ्याच पर्यटकांना आश्चर्य वाटलं.

ऑलिम्पिक भरवून चीनने आपला सर्व बाजूने फायदा करून घेतलेला दिसला. विशेषतः त्यांनी शहरभर टॉवरच्या टॉवर उभारून घेतले. त्यात ऑलिम्पिकसाठी आलेल्या पाहुण्यांची रहाण्याची सोय झाली आणि नंतर स्थानिकांसाठी आवास! तशीच ऑफिसेसची सोय करून ठेवली. उड्डाणपूल भरपूर झाले. काही ठिकाणी तर नऊ पूल एकावर एक क्रॉस होताना दिसतात! तरी रस्त्यावर काही रहदारी मात्र कमी झालेली नाहीय. चीनने देशभर रेल्वेचं जाळं विणलं आहे. रेल्वेलाईन हाँगकाँग आणि युरोपपर्यंत नेण्याची त्यांची तयारी सुरू आहे.

तिथे वॉगफुजियन रस्त्यावर एक ‘खाऊरस्ता’ पाहिला. हा रस्ता खाण्याच्या दुकानांनी लांबच लांब गजबजलेला आहे! चीनच्या वैिशष्ट्यपूर्ण खाद्य पदार्थांच्या शोधात तिथे हजारोंनी स्थानिक आणि परदेशी पर्यटक येतात. इथे तळलेले बेडूक, झुरळं, पाली हे सगळे प्राणी काडीवर लावून खायला मिळतात! खाताना एक टीचभरदेखील तुकडा फेकावा लागत नाही. आम्ही कोलंबी खाल्ली – अगदी त्याच्या पाया आणि सोंडेसकट!

तिसर्या दिवशी आम्ही चीनच्या ऐतिहासिक भिंतीला ‘कान लावण्या‘साठी गेलो. ३००० वर्षं जुनं पण अजूनही उत्तम अवस्थेत राहिलेलं ते एक महाआश्चर्यच आहे. पूर्वीच्या छोट्या छोट्या राजांनी आपापल्या प्रदेशाच्या संरक्षणासाठी भिंती बांधल्या होत्या. नंतरच्या काळात त्या एकमेकांना सांधून आता एकूण १००,००० फूट लांब वसल्या आहेत. त्यांच्या पायथ्यापर्यंत चढण्यासाठी केबल कार आहे. आमच्या ग्रूपमध्ये अपंगच लोक जास्त असल्याने त्यांना एक वेगळा अनुभव मिळाला अशा आशेत आमचा ग्रूप होता. पण अपंगांना केबल कारची तिकिटं दिली जाणार नाहीत असं तेथील लोकांनी आम्हाला सांगितलं. केबल कार ही काही क्षणच थांबते आणि त्यामुळे तेवढ्या वेळात अपंगबांधव कारमध्ये बसू शकत नाही त्यामुळे आम्ही परवानगी देऊ शकत नाही असं ते म्हणाले. मग आम्ही त्या अपंगबांधवांना व्हिलचेअरमधून उठून तिकिटाच्या रांगेत उभं राहण्यासाठी मदत केली. तिथल्या व्यवस्थापकानेदेखील ते पाहिलं आणि केबल कारमध्ये जाण्याची त्यांची प्रबळ इच्छा असल्याने आणि लगेचच त्यांना प्रवेश दिला.

चीन हा भारताप्रमाणे जुन्या परंपरांचा देश आहे. एका मंदिरात एक सहस्र हातांची देवता पाहिली. पारंपरिक धर्माबरोबर बौद्ध धर्मदेखील भारतातून जाऊन तिथे फोफावला. जाडे नावाच्या दगडापासून बनवलेल्या बुद्धाच्या मूर्त्या तिथल्या एका देवळात पहायला मिळाल्या. अशा अनेक मूर्त्या आणि मिथकं चीनमध्ये प्रचलित आहेत त्यात आणि एक उल्लेख केलाच पाहिजे. सर्वत्र एका पिशू नावाच्या जनावराची मूर्ती दिसते. त्याचा विशेष असा की त्याला तोंड आहे पण गुदद्वार नाही! तो खातो पण शौचाला जात नाही. प्रतीकात्मक अर्थ असा की तो कमावतो पण गमावत काही नाही. म्हणून त्याला चीनमध्ये धनाचं दैवत समजलं जातं.

शांघायला बीजिंगहून जाण्यासाठी लागणारी गाडीच बुलेट ट्रेन आहे. ३५० किलोमीटरच्या वेगात ती अवघ्या चार तासात बाराशे-पंधराशे किलोमीटरचं अंतर कापते! ती मॅगनेटवर चालते. तिची चाकंरूळाला स्पर्श न करता चालतात. यलो रिव्हरमुळे शांघाय शहराची नवी आणि जुनी अशी दोन नगरं झाली आहेत. शहरात फिरताना सगळे काचेचे टॉवर आणि आडवेतिडवे जाणारे उड्डाणपूल दिसले. संध्याकाळच्यावेळी रस्ते आणि दुकानं लोकांनी फुललेली! जणू आपण एखाद्या प्रगत देशातच आहोत, असं वाटायचं.

ब्रूस लीचं जन्मस्थान, हाँगकाँग हे चीनच्या दक्षिण कुशीतील अनके बेटांपैकी एक बेट आहे. पर्यटकांना मोहून टाकेल असं हे हाँगकाँग आहे. ओशियन पार्क, चि लीन ननरी, लान्टाऊ हा बुद्धाचा पुतळा अशी एकाहून एक सरस पर्यटनस्थळं इथे आहेत. व्हिक्टोरिया हार्बरवरील सिंफनी ऑफ लाइटस्ची कल्पना सुंदर आहे. किनार्यावरच्या टोलेजंग वित्तसंस्थांच्या इमारतीच्या पार्श्वभूमीवर प्रकाशयोजना करून पलीकडच्या किनार्यावर जमलेल्या हजारो पर्यटकांना लाइट अँड साऊंड शो दाखवले जातात.

तिथलं डिस्नेलँडची सफर संस्मरणीय झाली. संपूर्ण दिवस तिथे अपुरा पडला. इथे वस्तू नि ठिकाणं नुसती पाहायची नाहीत; त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो. खेळण्यातल्या पॅराशूटमधून खाली पडण्याचा, गिझली गल्चमध्ये जमिनीच्या खाली भुयारात प्रवास करण्याचा एकदातरी अनुभव घ्यायलाच पाहिजे. आरसी रेसमध्ये तर पोट ढवळून निघतं, कदाचित मुर्छाही येईल असे आपण वरखाली होतो. तर टार्झनभूमीत सुरक्षित खुर्चीत बसून प्रवास करायला धाडस लागतं. अशाप्रकारचे डिस्नेलँडमध्ये अनके नाट्यमय शो आहेत. अपंग असून आम्ही खूप काही पाहिलं, खूप अनुभवलं. होडीत बसून केलेली जंगलसफारी तर खूप मनोरंजक झाली. जंगल रिव्हर क्रूज पण आहे. पाच खंडातील आणि अनेकदेशांतील अॅडव्हेंचर्स पाहिली. जंगलातील प्राणी नकली पण त्यांचं वागणं खरं होतं. त्यामुळे त्यांच्या अगदी जवळ गेल्याचा अनुभव आला. डिस्नेलँड हा कित्येक किलोमीटरचा भूभाग आहे. त्यात एकूण ७५ खेळ आणि कार्यक्रम आहेत. आम्ही सात दिवसांची सहल यशस्वीरित्या पूर्ण केली. घरून नेलेल्या सात व्हीलचेअर्स परत बसच्या डिकीत घातल्या आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

फादर मायकल जी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *