मित्रा मंदार,

नुकतीच तुझी ‘गहाण’ ही शॉर्टफिल्म पाहिली… पाहिली म्हणजे तिच्या फर्स्ट लूक स्क्रिनिंगची बातमी कळली आणि लगबगीने मी ती शॉर्टफिल्म पहायला आलो… तोवर आपला तसा प्रत्यक्ष संबंध नव्हता. मात्र ‘गहाण’शी माझा संबंध १९८५-८६ सालापासून आहे. प्रेमानंद गज्वी लिखित ‘गाहान’ ही एकांकिका मी अन्वय या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून दिग्दर्शित केली होती. पुढे गज्वींनी ‘गाहान’चं ‘तनमाजोरी’ हे नाटक लिहिलं… त्या नाटकातही मी अभिनय केला… म्हणून याच नात्याने मी तुझ्या ‘गहाण’ या शॉर्टफिल्मच्या स्क्रिनिंगला आलो…

तर, मित्रा, रविंद्र नाट्यमंदिराच्या पु.ल.देशपांडे अकादमीच्या मिनिथिएटरचा पांढरा शुभ्र पडदा माझ्यासमोर होता… अनेक मान्यवर मंडळींनी हॉल तुडुंब भरला होता. लाईट बंद झाले. अंधार पसरला आणि तुझी शॉर्टफिल्म सुरू झाली आणि काही मिनिटांतच माझी अस्वस्थता वाढली… मी खुर्चीतच चुळबुळ सुरू केली. काही क्षण माझं मलाच कळेना की, माझी अस्वस्थता इतकी का वाढलीय… आणि हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की, समोर दिसणारा वर्तमान पडदा आणि माझ्या डोक्यातला भूतकाळ यांची गफलत व्हायला लागली आहे. या दोघांच्यामध्ये मी खुर्चीला चिकटून चुळबुळ करणारा…

हीच ती तुझी ‘गहाण’ शॉर्टफिल्म होती. जी प्रेमानंद गज्वी यांनी १९८५-८६ साली किमान एक दीड महिना अहोरात्र मेहनत घेऊन बसवलेली… पण तुझी पडद्यावरची फिल्म पाहताना त्यातील दृश्यांशी माझ्या मेंदूपटलावर आजही कोरलेली ती रंगभूमीवरची दृश्यं मॅच होत नव्हती आणि सारखी ठिणगी उडत होती…

तुझ्या फिल्ममधला पुस्तक वाचणारा आडदांड वाशा मनाला पटत नव्हता. माझा वाशा (माझ्या डोक्यातला आणि एकांकिकेतला) गोंडस नव्हता. उन्हातानात रापलेलाच होता पण निरागसता जपणारा होता. सुरुवातीलाच कळून चुकलं की तुझी सगळीच कॅरेक्टरायझेशन चुकलेली आहेत आणि इथेच फिल्मचा अर्धा प्रभाव कमी झालेला होता. गण्या, सारजा, सित्या, देव्या ही सगळीच फाटकी पात्रं आहेत. इथे मात्र ती खाल्यापिल्या घरची दिसत होती. त्यामुळे मला माझ्याच मनाला समजावणं कठीण होत होतं…

गण्याचं घर ते मालकाचा वाडा ही एवढी दोनच लोकेशन दिसत होती पडद्यावर… फाटकी तुटकी माणसं राहणारी काळ्या गोट्याची वस्ती कुठेच दिसत नव्हती… बंधाराही तसाच… उगीच इकडचे दगडधोंडे तिकडे टाकताना तेवढीच खोटी वाटत होती. बंधार्यावर काम करणारे मजूर टोपल्या घेऊन कामावर जातील की घमेली घेऊन जातील, हा प्रश्नही मला ती बंधार्यावरची दृश्यं पाहताना सतावत होता…

एकांकिकेमधलं नाट्य सिनेमात अधिक आगळेपणाने यायला हवं होतं पण ते तसं येत नव्हतं. त्यात नेटकेपणाही दिसत नव्हता… ‘‘वारा प्यालेलं वासरू पुढं कसं निपजनार त्ये आमी त्येच्या खुराच्या ठेवनीवरनं वळखतो. आमी बरूबर वळखलं. आरं, कोन म्हन्तंय आमाला मन न्हाय. एवढंच हाय. आमच्या मनाला ह्यो इटीदांडूचा खेळ सोसवत न्हाय. आमाला एकच खेळ ठाव हाय ह्या दांडूचा, हीच आमची ताकत हाय. मोठमोठी जनावरं सरड व्हत्यात या खेळानं. आमाला ती करावीच लागत्यात…’’ असे गाजलेले संवादच तू फिल्ममधून वळगलेस… त्यामुळे सगळंच सपक झालं रे…

मालकाच्या अस्तित्वाने ती माणसं धोतरात मुतायची पण इथे मात्र मालक हास्यास्पद हातवारे करत आडवातिडवा नाचत होता. त्यामुळे समोरचा पडदा आणखीनच फिक्का दिसत होता.

गज्वींच्या लिखाणातली (संवादातली) बलस्थानं ओळखून तुझा कॅमेरा फिरला असता तर तुझी शॉर्टफिल्म आणखी उंचीवर गेली असती. पण तू मात्र नेमकी तीच चुकवून नको तो फापट पसारा दाखवत बसलास…

काय करतो… इटी दांडू खेळतो… तू वळखतो मालकाला… आपला काय संबंध… गण्या मालकानं तुला लाथ का हानली… का? एक तरी मानूस आमच्या डोर्याला डोरा भिडवतो….? जा… पोराला वाड्यावर पाठवून दे उद्या….. मुकादम आसूड…. म्या शिकनार बा… नू नाय शिकनार… कर्ज… माझ्यावर… व्हय कर्ज हाय तुझ्यावर…

अरे मित्रा, एवढं मेटेरिअल दिलं तरी अख्खी कथा तयार होईल समोरच्याच्या डोक्यात… इतकं बांधीव आहे हे सारं… पण तू मात्र नेमक्या विटा काढून टाकल्यास आणि अख्खं बांधकाम पोकळ करून टाकलंस… जीव जळाला रे हे सारं पाहून…

असो… शॉर्टफिल्म बनवताना काय काय त्रास झाला किंवा संकटं आली हे सगळं तू आम्हाला त्यादिवशी सांगितलंस. तरीही तू फिल्म बनवलीस त्याचं कौतुक आहेच रे… पण कॉम्प्रोमाईज करून केलेल्या कोणत्याही गोष्टीत सच्चेपणाचा अभाव हा जाणवतोच. सो, इथून पुढे कॉम्प्रोमाईज करणं बंद कर आणि फिल्म बनवणं सुरूच ठेव… माझ्या शुभेच्छा तुला!

– शशी आढाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *