मराठी रंगभूमीची विवाहसंस्था, लग्न या विषयांसोबत जन्मोजन्मीची गाठ बांधली गेलीय. मराठी रंगभूमीच्या उदयापासून हे विषय इथे मांडले जाताहेत. ते कधी विनोदाच्या बाजाने रंगमंचावर अवतरतात तर कधी गंभीर अशा चर्चा नाटकांतून प्रेक्षकांसमोर आणले जातात. विषय एकच पण सादरीकरण वेगळं अशा क्लृप्त्या करूनही हा विषय सातत्याने रंगभूमीवर आणला जातो. विशेष म्हणजे प्रेक्षकही हा विषय मोठ्या उत्सुकतेने पाहतात. पण इतक्यांदा विवाहसंस्था, लग्न यांच्यासंबंधी नाटकं सादर करूनही या विषयाच्या अनुषंगाने येणार्या समस्यांचं मात्र निरसन होताना दिसत नाहीय. खरं तर आपल्याकडे लग्न या प्रकाराला/पद्धतीला लाभलेलं महत्त्वच यामागाचं खरं कारण असावं. लग्न न होणं, झालेलं लग्न न टिकणं, लग्न ठरत असतानाच ते मोडणं, लग्न ठरतानाची गोष्ट असे अनेक पदर घेऊन लग्न या एका विषयावर नाटकं सादर होत आली आहेत. यातील अनेक नाटकांनी तर मराठी रंगभूमी गाजवलेली आहे. आता काळ पुढे सरकला आहे. पण मराठी रंगभूमीवरील हा विषय मात्र अद्यापही तिथेच रेंगाळतो आहे. निर्माता मनिष दळवी आणि लेखक, दिग्दर्शक वैभव चिंचाळकर यांचं नवं ‘लुका छुपी’ हे नाटकही हाच विषय घेऊन रंगभूमीवर आलंय…

नाटकाचा नायक श्रीरंग भिडे (अभिजित केळकर) हा ३६ वर्षीय तरुण अद्यापही बिनलग्नाचा आहे. श्रीरंग बँकेत चांगल्या पदावर कामाला आहे. दादरसारख्या परिसरात त्याचं घरं आहे. घरात एकमेव आई आहे. तो दिसायलाही चांगला आहे. मात्र तरीही त्याचं लग्न ठरत नाहीये. मुलाचं लग्न ठरत नसल्यामुळे कुठल्याही आईची जी अवस्था होईल तीच अवस्था श्रीरंगची आई वत्सला भिडे (उज्वला जोग) यांची झालीय. श्रीरंगने आतापर्यंत जवळपास ८४ मुलींना लग्नासाठी पाहिलंय. पण तरीही त्याचं लग्न जमत नाही. श्रीरंगचं लग्न का जमत नाही? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ‘लुका छुपी’ हे नाटक… इतक्या मुली पाहिल्यानंतरही लग्न जमत नसेल तर नक्कीच श्रीरंगमध्ये काहीतरी कमतरता असावी… किंवा मग श्रीरंगला लग्नच करायचं नसेल, अशा काही शक्यता प्रेक्षक म्हणून आपल्या मनात उत्पन्न होतात. पण नाटक जसं जसं पुढे सरकतं तसं तसं आपल्याला कळत जातं की नेमकं श्रीरंगचं लग्न का जमत नाही. दरम्यान नाटकात श्रीरंगची बँकेतील सहकारी शुभ्रा खानविलकर (पूर्वा गोखले) हिची एन्ट्री होते. दिग्दर्शकाने शुभ्राला स्वप्नातून एन्ट्री देऊन नाटकाच्या कथानकाची एक सूचक अशी झलक दाखवलीय. ही शुभ्रा श्रीरंगला फार आवडत असते. त्याला तिच्याशीच लग्न करायचं असतं. पण तिला प्रपोज करण्याचं धाडसच श्रीरंगमध्ये नसतं. अशातच वत्सलाबाईंच्या वर्गमित्राची मुलगी अक्षता आगाशे (सुपर्णा श्याम) रंगमंचावर येते. अक्षता आणि श्रीरंग बालपणापासून एकमेकांना ओळखताहेत. त्यामुळे अक्षता लहानपणापासूनच श्रीरंगवर प्रेम करतेय. आणि मग शुभ्रा-श्रीरंग-अक्षता असा प्रेमाचा त्रिकोण रंगमंचावर तयार होतो. यानंतर नेहमीप्रमाणे प्रेम पटकवण्याचा खेळ सुरू होतो. या सर्व खेळात श्रीरंगचं लग्न जमवण्याचे वत्सलाबाईंचे प्रयत्न अविरत सुरू असतात. देवाला साकडं घालण्यापासून वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदवण्यापर्यंतचे सारे प्रयत्न वत्सलाबाईंचे करून झालेले असतात. पण त्यांना यश काही मिळत नाही. इकडे हा प्रेमाचा त्रिकोण अचानकच दोन कोनी होऊन जातो आणि मग नाटक एका उत्कटतेवरून धाडकन जमिनीवर कोसळतं.

नाटककाराने लग्न हा विषय घेऊन प्रेम या शब्दाचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न म्हणून ते चांगलंच आहे. मात्र लग्न न जमण्याचं ठोस असं कारण नाटककाराने दिलेलं नाही. त्यामुळे इतक्या मुली पाहूनही श्रीरंगचं लग्न का ठरत नाही, असा प्रश्न निर्माण होतो. श्रीरंगच्या मनात दुसरीच कुणीतरी असते तर मग तो ८४ मुली पहायला जाण्याचं नाटक तरी का करतो? आजच्या जमान्यातला श्रीरंग किमान आईला तरी सांगू शकेलच ना की, त्याला अॅरेंज मॅरेज नाही करायचं. तो एका मुलीवर प्रेम करतोय आणि लग्न करेन त्याच मुलीशी अन्यथा नाही… पण श्रीरंग असं काहीच त्याच्या आईला सांगत नाही. त्यामुळे नाटक उगाचंच रेंगाळत रेंगाळत पुढे सरकतं… ‘लुका छुपी’ हे संपूर्ण नाटक व्यावसायिक रंगभूमीचा विचार करूनच सादर केलेलं असल्यामुळे खरं तर अशा नाटकांच्या बाबतीत गंभीरपणे प्रश्न निर्माण करण्यात काहीच मतलब नसतो. प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हाच एकमेव उद्देश या नि अशा नाटकांमागे असतो… म्हणूनच ही ‘लुका छुपी’ फुकाची वाटते…

नाटकाचं नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी केलंय. नेहमीप्रमाणेच त्यांनी या नाटकाचंही नेपथ्य उत्तम केलंय. राजन ताम्हाणे यांची प्रकाश योजनाही लक्षवेधक आहे. समीर सामंतच्या गीतांना मिलिंद जोशी याचं संगीत लाभलंय. तर एका गीतावर दिपाली विचारे हिने खूप सुंदर असं नृत्य बसवलंय… हर्षदा  खानविलकर हिने वेशभूषेवर चांगलीच मेहनत घेतलीय. खासकरून शुभ्रा खानविलकर या पात्राच्या वेशभूषेवर…

अभिजित केळकरचा श्रीरंग टिपिकल भिडे कुटुंबातील वाटतो. अतिशय लक्षपूर्वक अभिजितने हे पात्र रंगवलंय. पूर्वा आणि सुपर्णा यांनीही आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका चोख बजावल्यात. पण या सर्वांमध्ये उज्वला जोग यांनी मात्र प्रेक्षकांची मनं जिंकलीत… आजवर अभिनयाच्या जोरावर उज्वलाताईंनी वत्सलाबाई वठवल्यात. विनोदाची उत्तम जाण असलेल्या उज्वलाताईंनी आपलं पात्र प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिलं अशाप्रकारे साकारलंय. त्यांच्यामुळे नाटकाला गती मिळते आणि प्रेक्षकाचं मनोरंजन होतं. बाकी ‘लुका छुपी’देखील आजवरच्या लग्ननाटकांसारखंच आहे. त्यामुळे मनोरंजनासाठी हे नाटक पहायला काहीच हरकत नाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *