पावसासाठी शाळेत ‘येरे येरे पावसा’चं गाणं दुष्काळाची भयानक परिस्थिती अनुभवणार्या आष्टी तालुक्यातील विविध शाळांच्या प्रार्थनेत म्हणण्याची आता वेळ आलीय.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून दुष्काळाचं सावट अजूनही कायम आहे. आष्टीतील १५ हातपंपांपैकी ७०० हातपंप बंद पडले आहेत. पाण्याची पातळी साधारण १४० फूट खालावल्याने ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याबाबत माहिती देताना पाणी पुरवठा विभागातील शाखा अभियंता नारायण आधळे यांनी सांगितलं की, पाणी पातळी १४० फूट खोल गेल्यामुळे हातपंप बंद पडले आहेत पाऊसच आला नाही तर हातपंपदेखील बंद पडतील. अशा परिस्थितीमुळे विविध शाळांच्या परिपाठात ‘येरे येरे पावसा’ हे गाणं सुरू करून प्रार्थना करण्यात येत आहे.

पावसाने पाठ फिरवल्यामुळे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पानाची देवळाली इथल्या भगवान विठोबा पवार (वय ६० वर्षं) या शेतकर्याने विष पिऊन आत्महत्या केली.

नेहमीच पडणारा दुष्काळ त्यातच यंदा जुलै महिना सुरू झाला आहे. तरी पाऊस पडेना या अस्मानी संकटामुळे बळीराजा हताश झाला आहे. आष्टी तालुक्यातील पानाच्या देवळाली गावातील शेतकरी भगवान विठोबा पवार हे गेल्या काही दिवसांपासून पावसानेपाठ फिरवल्यामुळे हैराण होते. पाऊस नसल्याने पोटापाण्यासाठी करावं लागणारं कामच थांबलं होतं. गेल्या वर्षीही शेतीत कोणतंच पीक घेता येत नसल्याने त्यांनी बँकेकडून ८५ हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. यंदा तरी चांगला पाऊस पडला की चांगलं पीक येईल आणि आलेल्या पिकाच्या पैशांतून बँकेकडून घेतलेलं कर्ज फेडू असा पवार यांचा विचार होता. परंतु यंदा पाऊसच पडत नसल्याने भगवान पवार खूपच हताश झाले होते आणि त्याच हताश मनःस्थितीत अखेर मंगळवारी रात्री त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मुत्यू झाला. घरातला करता बाप गेल्याने दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत. आधी आजारपणामुळे आईचा मुत्यू झाला होता. आता वडिलांचंही छत्र हरपल्यामुळे मुलांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. आता घरची सर्व जबाबदारी या मुलांवर आली आहे.

२० गावांचं स्थलांतर

आष्टी तालुक्यात पुन्हा दुष्काळाचं संकट उभं राहिलं असून तालुक्यातील २० गावांतील गावकरी आपलं गाव सोडून पाण्यासाठी वस्त्यांवर स्थलांतरित झाले आहेत. यातल्याच एका मंगरूळ गावातली परिस्थिती भीषण झाली आहे. आष्टी तालुक्यातील मंगरूळ गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास आहे. परंतु पावसाने दांडी मारल्यामुळे नेहमीच पडणार्या दुष्काळामुळे वैतागलेले गावकरी हे गाव सोडून वस्त्यांवर स्थलांतरित झाले आहेत. या गावात पाण्याचा टँकर येतो पण काही ठिकाणीच पाणी मिळतं, काही ठिकाणी हे टँकर जातच नाहीत. गावात फेरफटका मारला असता गावात शुकशुकाट दिसून येतो आणि घरांना कुलूप लागल्याचं पहायला मिळतं. गावाच्या पारावर अबाल वृद्ध आणि शाळकरी मुलं वगळता कोणीच दिसून येत नाही.

या गावात पहिली ते आठवीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. परंतु या शाळेतही मुलांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, असं विद्यार्थी सांगतात. गणेश तोडकर या विद्यार्थ्याने सांगितलं की, शाळेत आम्हाला पाणी मिळत नाही. त्यामुळे वस्तीवरून पाणी आणावं लागतं.

याबाबत महिलांशी चर्चा केली असता त्यांनीदेखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एकंदरीत आष्टी तालुक्यात १०० गावांना ८२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तरीदेखील अनेक गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पिकं करपली शेतकरी हवालदिल

पाऊसच नसल्यामुळे शेतातील पिकं पाण्यावाचून जळून गेली आहेत. मूग, उडीद हातचे गेल्याने आता डाळी विकत घेण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. बीडची आता दुष्काळी जिल्हा अशीच ओळख बनू लागली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भयानक पाणी टंचाईचं संकट या जिल्ह्यावर कोसळल्यामुळे आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई, आंबेजोगाई, वडवणी, माजलगाव, केज, धारूर, परळी, बीड या अकराही तालुक्यांत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून पाण्याअभावी शेतात उभं असणारं मूग आणि उडदाचं पीक जळून गेलं आहे. त्यामुळे डाळीचे बाजारभाव नक्कीच वाढणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. बाबुराव हराळ या शेतकर्याने सांगितलं की, ‘पाण्यासाठी तर आमचे हाल सुरूआहेतच परंतु शेतातलं हाती आलेलं मूग-उडदाचं पीक जळून गेलं आहे. नुकताच कृषिदिन साजरा झाला असला तरी शेतकर्याचे मात्र अजूनही हाल सुरूच आहेत आणि ही खूपच दुर्दैवाची गोष्ट आहे. चंद्रकलाबाई हंबडै या शेतकरी महिलेने सांगितलं की, ‘पाऊस नसल्यामुळे रात्री झोपच येत नाही. पाणीच नसल्याने लेकरा-बाळांना आंघोळी घालण्यासाठी पाणी नाही. या परिस्थित जगावं तरी कसं असा गंभीर प्रश्न आमच्यापुढे उभा राहिला आहे.’

जुलै महिना सुरू झाला तरी पाऊस येत नसल्याने शेतकरी चार्याअभावी आपली जनावरं विक्रीसाठी घेऊन जात आहेत. पाणी टंचाईच्या भयानक अवस्थेमुळे बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यतील १०,२५,००० लिटर दूध संकलन घटलं असल्याचं भयानक चित्र समोर आलं आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक दूध संकलनात अग्रेसर असणारा बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आता दुष्काळी परिस्थितीमुळे पिछाडीवर गेला आहे. काही वर्षांपूर्वी याच तालुक्यात जवळपास २०,२५,००० लिटर दुधाचं संकलन दूध उत्पादक शेतकरी करत होते. परंतु सातत्याने या भागात दुष्काळ पडत असल्यामुळे अनेक शेतकर्यांनी चारा आणि पाणी टंचाईमुळे मातीमोल किमतीत आपली जनावरं बाजारात विकली आहेत. तालुक्यात २,३०,००० एवढी जनावरांची संख्या होती. मात्र दुष्काळामुळे तब्बल १,००,००० जनावरांची विक्री केली आहे. यंदादेखील दुष्काळाची झळ बसू लागल्याने पाणी टंचाई जाणवू लागली आहे. जून गेला आता जुलैदेखील अर्धा सरला आहे. परंतु पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे बळीराजा पुरता हैराण झालाय.

दूध संकलनात मोठी घट

आष्टी तालुका दूध संघात अवघं ५०००० लिटर दूध संकलन होत आहे. तर अन्य ठिकाणी ७५००० लिटर संकलन सुरू आहे, अशी माहिती दूध संघाचे कार्यकारी संचालक मच्छिंद्र धनावडे यांनी दिली आहे. ‘पूर्वी तालुक्याचं दूध संकलन २०,२५,००० होतं. पण २०११ पासून पावसाचं प्रमाण कमी होत चाललं आहे. त्यामुळे शेतकर्यांना उत्पन्नासाठी दूध व्यवसायाचा आधार उरलेला नाहीय.’

या दूध संघाचे अध्यक्ष गोकुळ कोकणे यांनी सांगितलं की, ‘पाऊस नसल्यामुळे शेतकर्यांनी जनावरं विकली आहेत. त्यामुळे दूध संकलन घटलं आहे. माझ्याकडे १५०० लिटर दूध होतं. पण ते आता ९०० लिटरवर आलं आहे. शासनाने चारा डेपो सुरू करावा अशी मागणी आम्ही दूध संघातर्फे केली आहे.

याबाबत अक्रम काझी या शेतकर्याने सांगितलं की, ‘चारा नाही त्यामुळे जनावरांना बाजारात विक्रीसाठी घेऊन जावं लागत आहे. ५००० रुपयांचा चारा विकत आणला होता. मात्र आता चारा संपल्यामुळे ही दुभती जनावरं विकण्याची वेळ आमच्यावर आली आहे.’

एकूणच आष्टी तालुक्यात पावसाच्या अभावी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत, कर्जबाजारी झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून काहीजण आत्महत्याही करत आहेत. तर दुसरीकडे पाण्याअभावी चारा नसल्यामुळे दुभती जनावरंही विकण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. वरूणराजाने लवकरच बीड जिल्ह्यावर आपली कृपादृष्टी दाखवली नाही तर जिल्ह्यात पाणीबाणी येण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

अविशांत कुमकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *