पूर्वार्ध

आंबेडकरी राजकारणाची नेहमी चर्चा होते. पण आंबेडकरी राजकारण म्हणजे काय हे स्पष्ट होत नाही. प्रस्थापित आंबेडकरी पक्षांचं राजकारण, देशातील प्रचलित राजकारणावर आंबेडकरी विचारधारेचा प्रभाव, की पर्याय देणारा आंबेडकरी विचारांचा सशक्त देशव्यापी पक्ष.

आंबेडकरी राजकारण दलित समूहापर्यंत मर्यादित झालं आहे. त्यामुळे आंबेडकरी राजकारणाची चर्चाही दलित समूहापर्यंत सीमित झाली आहे. दुसरं म्हणजे आंबेडकरी राजकारणाचा प्रभाव दलितांचे किती प्रतिनिधी निवडून आले, यावरून ठरवला जातो. त्यातही दलित राजकारणाचा पेच असा की ते एकत्र आले तर त्याला जातीआधारित राजकारण समजलं जातं आणि वेगवेगळे झाल्यास त्याला दलित समाजात फूट पडली, असं संबोधलं जातं. अन्य जाती आणि समाज समूह वेगवेगळ्या पक्षांत विभागले आहेत. पण त्याला त्या समाजातील फूट मानली जात नाही. उलट त्यांच्या स्वतंत्र वैचारिक भूमिकेचं कौतुकच होतं. पण दलित समाजातही स्वतंत्र वैचारिक भूमिका असलेल्या व्यक्ती आणि समूह असू शकतात, हे मान्य केलं जात नाही. साधारणपणे आंबेडकरी राजकारणाची चर्चा करताना सर्व दलित समाजाने एकाच राजकीय झेंड्याखाली संघटित व्हावं अशी अपेक्षा केली जाते.

स्वतंत्रपणे निवडून येण्यावर असलेल्या मर्यादा हा दुसरा पेच आहे. अशा

परिस्थितीत प्रस्थापित राजकीय प्रवाहापैकी एकाची निवड करणं अथवा दलितेतरांना सामावून घेणारी राजकीय शक्ती उभी करणं हे दोन पर्याय उभे रहातात. दुसरा पर्याय हा वैचारिकदृष्ट्या कितीही योग्य वाटला तरी तो व्यावहारिकदृष्ट्या उभा रहाणं कठीण असतं आणि पहिला पर्याय निवडल्याने राजकीय हानी होते. तेच झाल्याचं आपण पहातो. याच संदर्भात दलित ऐक्याची चर्चा होते. असं ऐक्य केव्हाही स्वागतार्ह आहे पण त्यातून स्वतंत्रपणे शासनव्यवस्था हातात घेऊ शकेल अशी राजकीय शक्ती उभी राहील की सत्तेमध्ये योग्य तो वाटा मिळवण्यापुरता त्याचा उपयोग होईल हा प्रश्न शिल्लक रहातोच.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे राजकारण केलं त्याचा परिघ प्रचंड मोठा होता. मानवमुक्ती हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. मानवमुक्तिच्या विचाराला वैश्विकतेचा आयाम आहे. म्हणूनच त्यांनी दलितांच्या प्रश्नाला प्राथमिकता दिली होती तरी राजकारणासाठी सर्व समाजाला सामावून घेईल असे राजकीय पक्ष उभारण्याचे प्रयत्न केले. मग तो स्वतंत्र मजूर पक्ष असो की रिपब्लिकन पक्ष असो. देशाच्या जडणघडणीचा, देश उभारणीचा, देशाच्या व्यवस्थापनाचा, लोकशाहीच्या यशस्वी अंमलबजावणीचा, जाती, धर्म, विषमतेवर मात करण्याचं स्वप्न, संकल्प आणि कृतिकार्यक्रम घटनेच्या माध्यमातून ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले त्यांना त्याची पूर्तता करण्यासाठी, सत्यात उतरवण्यासाठी व्यापक विचारांचा पक्ष उभारता आला नसता असं म्हणता येत नाही. परंतु बाबासाहेबांच्यासमोर तात्कालिक आव्हानं होती. दलित समाजाला सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देण्याच्या, हिंदू समाजातील जातिव्यवस्थेचा अंत करण्याच्या संघर्षाला त्यांची प्राथमिकता होती. त्या संघर्षातच त्यांचं उभं जीवन व्यतित झालं. चवदार तळ्याचा लढा, काळाराम मंदिर प्रवेशाचा लढा, खोतीविरुद्धचा लढा असे लढ्यामागून लढे करावे लागले. त्याचबरोबर राजकीय संघर्षही ते करत होते. त्यासाठी दलितांचं प्रतिनिधित्व आणि प्रवक्तेपण स्वीकारून त्यांना झगडावं लागलं. दलित समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी, राखीव जागांसाठी संघर्ष करावा लागला. हिंदू धर्माशी तर आयुष्यभर संघर्ष केला. त्यासाठी प्रदीर्घ अभ्यास करून प्रचंड बौद्धिक तयारी केली. अनेक वर्षं त्यांनी हिंदुधर्माने जातिव्यवस्था नाकारावी यासाठी प्रयत्न केले. हिंदू धर्म सुधारावा यासाठी प्रयत्न केले आणि शेवटी धर्मांतर या अपरिहार्यतेपर्यंत येऊन पोचले. धर्मांतराचा निर्णय हा डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय होता. कारण तो व्यक्तिपातळीवर घ्यायचा निर्णय नव्हता, तो समाजासाठी घ्यायचा निर्णय होता. व्यक्तिगत निर्णयाच्या बर्यावाईट परिणामांची जबाबदारी व्यक्तिपुरती मर्यादित असते. पण समाजासाठी निर्णय करायचा, ज्या समाजाने त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला होता, त्याच्या परिणामांची जबाबदारी घेणं सोपं नव्हतं. कोट्यवधींच्या आयुष्याचा तो प्रश्न होता. त्यासाठी डॉ. आंबेडकरांना स्वतःशी कराव्या लागलेल्या संघर्षाची कल्पना करणंही अशक्य आहे. म्हणूनच हा निर्णय करून अंतिम कृतिपर्यंत तब्बल २१ वर्षं त्यांना लागली. १९३५ साली ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही,’ असं त्यांनी जाहीर केलं आणि १९५६ साली त्यांनी आपल्या बांधवांसह धर्मांतराचं अभूतपूर्व पाऊल टाकलं. हा सर्व काळ ते देशाच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांवर चिंतन करत होते, आपले विचार मांडत होते, लेखन करत होते. राज्यघटना लिहिण्यासाठी अपार श्रम करत होते, पक्षउभारणी करत होते. शेवटपर्यंत दलित प्रश्नाशी त्यांचं आयुष्य बांधलं होतं. अन्यथा डॉ. आंबेडकरांनी परिवर्तनवादी व्यापक पक्षाची उभारणी केली असती आणि आज जे आंबेडकरी राजकारण आपल्यासमोर उभं आहे त्यापेक्षा वेगळं राजकारण उभं राहिलं असतं हे निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *