डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित समाजात जन्माला आले आणि त्यांना दलित समाजाचं नेतृत्व करावं लागलं, त्यामुळे ज्याप्रमाणे गांधी-नेहरू, जयप्रकाश लोहिया किंवा रणदिवे-डांगे हे विशिष्ट जातिसमूहाचे प्रतिनिधी न होता त्यांचं राजकीय नेतृत्व उभं राहिलं. त्याप्रमाणे डॉ. आंबेडकारांचं झालं नाही. दलित समाजासाठी ते सर्वस्व होणं साहजिक होतं. पण दलितेतर समाजाने त्यांच्याकडे दलित नेते म्हणूनच पाहिलं. डॉ. आंबेडकरांनंतर त्यांची राजकीय चळवळ व्यापक होऊन दलितेतर समाजाला सामावून घेणं गरजेचं होतं. पण तसं झालं नाही. अपवाद म्हणून प्रकाश आंबेडकरांच्या व्यापकतेकडे जाणार्या भूमिकेकडे बोट दाखवता येईल. पण तोपर्यंत उशीर झाला होता. आंबेडकरी राजकारणाचा सशक्त प्रवाह शिल्लक राहिला नव्हता. बसपाचा प्रयोगही सोशल इंजिनिअरिंगमध्येच अडकून पडल्याचं दिसतं.

मुख्य प्रश्न आणखी वेगळा आहे. तो म्हणजे सद्यःस्थितीत आंबेडकरी राजकारण उभं राहू शकतं का? देशामध्ये खुल्या अर्थव्यवस्थेचं समर्थन करणारा, धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारा भांडवली काँग्रेस पक्ष, हिंदू राष्ट्राचं स्वप्न बाळगणारा, भांडवलशाही समर्थक उजवा भारतीय जनता पक्ष, मार्क्सवादी विचारांचे दोन्ही कम्युनिस्ट पक्ष या तीन प्रमुख विचारधारा आहेत. विविध विचारधारेंचे प्रादेशिक पक्ष आणि संविधानातील सरनाम्याला आपलं व्हिजन स्टेटमेंट मानणारी नव्याने उभी राहू पाहणारी आम आदमी पार्टी. या सर्वांपेक्षा वेगळी मांडणी करणारा, देशाच्या भवितव्याचा, जडणघडणीचा वेगळा विचार करणारा, देशापुढील प्रश्न सोडवण्याचे नवे मार्ग सांगणारा आंबेडकरी राजकीय पक्ष शक्य आहे का? जागतिकीकरणानंतर जी नवी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे, तिने शेती आणि उद्योगाधारित आर्थिक मांडणी आणि विचारसारणी कालबाह्य ठरत आहे. उत्तर आधुनिक अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा आणि उद्योगाचा वाटा घसरत आहे आणि सेवा-वित्त-बांधकाम क्षेत्र याच्या पायावर अर्थव्यवस्था उभी रहात आहे. राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगाराच्या प्रमुख वाटा याच क्षेत्राकडे जात आहेत. नव्या वास्तवाची दखल घेत आर्थिक मांडणी करावी लागेल.

डॉ. आंबेडकरांनी ज्या प्रश्नावर संघर्ष केले, ते जरी दलित समाजाचे होते, तरी खर्या अर्थाने ते भारतीय समाजव्यवस्थेचे प्रश्न होते आणि वैश्विक प्रश्नाशी नाळ जोडणारे होते. त्या प्रश्नातून परिवर्तनाची मूलभूत दिशा स्पष्ट होत होती. अस्पृश्यतेविरुद्धचा लढा – महाडच्या चवदार तळ्याचा असो की, मंदिर प्रवेशाचा – हा मानव मुक्तिच्या संघर्षाशी जोडता येतो. या लढ्याचं वैशिष्ट्य असं की त्यामध्ये दलितमुक्तिबरोबर दलितेतरांचीही मुक्ती होती. कारण जातिबद्ध आणि अस्पृश्यता मानणारा समाज स्वतःही बंदिस्त असतो आणि कोषात अडकून पडतो. ज्या समाजात माणसांचं अवमूल्यन होतं, तो समाज खर्या अर्थाने कधीच स्वतंत्र नसतो.

डॉ. आंबेडकारांनी राखीव जागांसाठी केलेल्या संघर्षाचीही नाळ जागतिक पातळीवरील Affirmative Action  सकारात्मक कृतिशी जोडता येते. अमेरिकेतील निग्रोंच्या प्रगतीसाठी Affirmative Action चा आग्रह धरला गेला. मागे पडलेल्या आणि अत्याचाराने पिचलेल्या समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी त्याच्या भौतिक गरजा पूर्ण करणं आणि शासन तसंच समाजव्यवस्थेत बरोबरीची भागीदारी देणं हे त्या समाजाच्या खर्या स्वातंत्र्याची पूर्वअट असते. बाबासाहेबांनी केलेल्या खोतीविरुद्धच्या लढ्यालाही वैश्विक आयाम आहे. कारण जगभर समाज समूहांची गुलामगिरी आणि देशांची गुलामगिरी याला जमिनीवरील मालकीचा इतिहास आहे. त्यामुळे खोतीविरुद्धचा लढा म्हणजे केवळ जमीन मालकीचा लढा नव्हता तर तो गुलामगिरीविरुद्धचा, वर्चस्ववादाविरुद्धचा आणि भांडवलशाही शोषण व्यवस्थेविरुद्धचा लढा होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला बौद्ध धम्माचा स्वीकार हा ‘धर्मांतर’ या संकुचित संकल्पनेत अडकून पडला आणि त्यातील मानवमुक्तिचा विचार बाजूला पडला. प्रचलित धर्मसंस्थांनी मानवी जीवन बंदिस्त आणि संकुचित केलं आहे. त्यातील मानवतेचा व्यापक आशय हरवून गेला आहे. धर्म आणि नीतिमत्तेची फारकत झाली आहे. अशा काळात नीतिवर आधारित, स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर निर्णय करणार्या, लोकशाही जीवनाशी सुसंगत, आधुनिक मूल्यांची पाठराखण करणार्या जीवनपद्धतीचा शोध डॉ. आंबेडकारांनी घेतला आणि बुद्ध धम्माचा पुरस्कार केला. त्यामागेही मानवमुक्तिचा वैश्विक विचार आहे. सर्व भारत बुद्धमय व्हावा असं बाबासाहेबांनी म्हटलं तेव्हा एकाच धर्माचा सर्वांनी स्वीकार करावा असं त्यांना अभिप्रेत नसावं तर बौद्ध जीवनमार्गाचा सर्वांनी स्वीकार करावा असं अपेक्षित असावं.

डॉ. आंबेडकरांच्या विचारातील वैश्विकतेच्या आधारे आंबेडकरी राजकारण उभं करता येईल का असा प्रश्न आहे. वास्तविक अशा राजकारणासाठी वैचारिक आधार त्यांच्या मांडणीत आहे. परंतु आंबेडकरी विचारधारा ही देशातील प्रमुख विचारधारा म्हणून पुढे आली नाही. भविष्यातील आंबेडकरी राजकारण काय असेल याची चर्चा करताना, आंबेडकरी विचारधारेचा सर्व समाजाला सामावून घेणारा सशक्त राजकीय पक्ष उभा करणं किंवा आंबेडकरी राजकीय विचार हा इतका महत्त्वपूर्ण ठरावा की अन्य पक्षांना त्याची दखल घेतल्याशिवाय, स्वीकार केल्यशिवाय पुढे जाता येऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *