या रावजी, बसा भावजी कशी मी राखू तुमची महर्जी…. अशी साद घालत सुरेखा पुणेकर यांनी रविंद्र नाट्य मंदिरातील उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली…. निमित्त होतं महाराष्ट्राच्या लोककलेचा जागर करण्याचं, महाराष्ट्राच्या महालावणीला सलाम करण्याचं आणि लोककलावंत म्हणून संपूर्ण देशाला माहीत असलेल्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना ‘जीवन गौरव पुरस्कारा’ने गौरवण्याचं…

पायातील चाळ अन् ढोलकीच्या थापेवर अवघ्या महाराष्ट्राला थिरकायला लावणार्या, आपल्या मधाळ आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणार्या आणि आपल्या कलेच्या जोरावर केवळ पुरुषांनाच नव्हे तर स्त्रियांनाही लावणीसाठी थिएटरकडे खेचून आणणार्या सुरेखा पुणेकर यांना नुकतंच महाराष्ट्राच्या महालावणी सोहळ्यात ‘जीवन गौरव पुरस्कारा’ने गौरवण्यात आलंय. महाराष्ट्र कला क्रीडा विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित लोककलेच्या या जागरसाठी अवघ्या मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती.

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र कला क्रीडा विकास प्रतिष्ठान ही संस्था कार्यरत आहे. विविध कला, क्रीडा गुणांचा विकास करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. कलेच्या प्रांतातील असोत किंवा क्रीडाक्षेत्रातील व्यक्ती असोत त्यांच्या कलागुणांना सर्वतोपरी वाव देणं, त्यांच्यातील कलेचा विकास होण्यास सहाय्य करणं आणि अशा कलावंत, क्रीडापटूंच्या गुणांचा गौरव करणं अशा स्वरूपाचं कार्य या संस्थेकडून आजवर केलं जातंय. संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच या कॅरम स्पर्धेचं गोप थ्रो या आधुनिक कॅमेर्याच्या साहाय्याने चित्रीकरण करण्यात आलं होतं. हा कॅमेरा कॅरमबोर्डच्या वरच्या बाजूला टांगण्यात आलेला असतो आणि ३६० डिग्री सेल्सियसच्या तापमानात या कॅमेर्याच्या माध्यमातून चित्रीकरण केलं जातं. इतक्या आधुनिक पद्धतीने ही स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र कला क्रीडा विकास प्रतिष्ठान ही संस्था अशा अभिनव उपक्रमांसाठीही लोकांमध्ये प्रसिद्धी पावलेली आहे. अशा या अभिनव महाराष्ट्र कला क्रीडा विकास प्रतिष्ठानतर्फे सुरेखा पुणेकर यांना २१ हजार रुपये, गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. इंडियन ऑईलचे कार्पोरेट कम्युनिकेशन आणि ब्रँडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्रीकांत बापट यांच्या हस्ते हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवकुमार लाड, आदित्य बिर्ला ग्रुपचे सोलर बिझनेस हेड गजानन जोशी, डीसीपी व्हटकर, मुंबई बिटस्चे अर्जुन मुड्डा, दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त उदय देशपांडे आणि या लावणी महोत्सवाचं संयोजन करणारे राजमुद्राचे शंकर पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. बॉम्बे बिटस्चे अर्जुन मुड्डा यांनी उत्स्फूर्तपणे या जीवन गौरव सोहळ्यात ११ हजार रुपयांची भर घातली तर गजानन जोशी यांनी वादकांच्या गौरवासाठी ५ हजार रुपयांचा निधी दिला. अशा उत्साही वातावरणात हा पुरस्काराचा सोहळा पार पडला… आणि खर्या अर्थाने महाराष्ट्राची लोककला जपणार्या लोककलावंतांचा गौरव करण्यात आला.

सुरेखा पुणेकर यांच्या लावणीतील योगदानाचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्रातील आघाडीच्या लावणीतारकांनी आपली कला यावेळी पेश केली. संजीवनी मुळे नगरकर, वर्षा दर्पे, प्रियांका शेट्टी, कविता घडशी, असावरी तारे यांनी आपल्या लावण्यांनी प्रक्षकांना मंत्रमुग्ध केलं. तर शाहीर अमर शेख यांचे नातू निशांत शेख यांनी ‘माझी मैना गावाकडे राहिलीची…’ व्यथा डफावर थाप देऊन मांडत संयुक्त महाराष्ट्राचा लढा पुन्हा जिवंत केला…

‘हा केवळ माझा सन्मान नाही तर महाराष्ट्रातील तमाम लावणी कलाकारांचा सन्मान आहे… दिवानखान्यात कोंडलेल्या बैठकीच्या लावणीला रंगमंचावर हाऊसफुलचा सन्मान मिळवून देणार्या माझ्या मायबाप चाहत्यांचा हा सन्मान आहे’, अशा शब्दांत सुरेखा पुणेकर यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. ‘टाळ्या शिट्ट्या आणि अश्लीलतेत गुरफटू पाहण्यार्या लावणीला कलेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही सगळेच जीवापाड मेहनत घेतोय. त्याला तुम्हा रसिक मायबाप चाहत्यांची अशीच साथ लाभू दे,’ अशी सादही सुरेखा पुणेकर यांनी यावेळी उपस्थितांना घातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *