नायजेरियातील हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षं मिडवाइफ म्हणून काम करणार्या लॉरा स्टॅचेल यांना वेळीअवेळी जाणार्या विजेमुळे बाळंतपण करताना अडचणी येत होत्या. त्याच्यावर उपाय काय करता येईल याचा त्या विचार करत होत्या. त्यातूनच त्यांना ‘सोलर सुटकेस’ची नावीन्यपूर्ण कल्पना सुचली आणि तशी सोलर सुटकेस त्यांनी बनवली. २००९ मध्ये त्यांनी बनवलेल्या या सुटकेसमुळे ग्रामीण भागातील हॉस्पिटल्स् आणि दवाखान्यांची मोठी अडचण दूर झाली. त्यांनी बनवलेल्या अशा ४०० सोलर सुटकेस आता २० देशांत वापरात आहेत.

२१ फेब्रुवारी २०१४च्या ‘बिझिनेस स्टँडर्ड’च्या अंकात अशा नावीन्यपूर्ण कल्पनांची माहिती दिली आहे. पॉवरकट हा देशातील सार्वत्रिक प्रश्न आहे. विशेषतः ग्रामीण भागात कित्येक तास वीज नसते. उन्हाळा आला की विजेची मागणी वाढते. पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने वीज पुरवठा खंडित होतो. मद्रासच्या आयआयटीतील प्राध्यापक प्रा. अशोक झुनझुनवाला यांनी हा प्रश्न आपल्या टीमसमोर मांडला आणि उपाय शोधायला सांगितलं. त्यातून पुढे आला एक अफलातून उपाय. वीज पुरवठा एसी आणि डिसी अशा दोन पद्धतीने होतो. सर्व वितरणव्यवस्था एसी असते. त्याऐवजी एसी आणि डिसी अशा दोन पुरवठा व्यवस्था ठेवाव्यात आणि सात-आठ टक्के वीजपुरवठा डिसीद्वारा करावा. जेव्हा वीज मागणी वाढून भार वाढेल, तेव्हा एसी पुरवठा बंद पडेल. परंतु कमी क्षमतेचा डिसी पुरवठा सुरू राहील आणि त्यातून डिसीवर चालणारे LED लाईटस्, फॅन इत्यादी चालू रहातील आणि घर काळोखात बुडणार नाही. घरोघरी सौर पॅनेल आणि लहानशी बॅटरी वापरून सौर ऊर्जा डिसी वीज पुरवठा यंत्रणेला जोडता येईल आणि विजेची उपलब्धता वाढवता येईल. अशाप्रकारे लोडशेडिंग संपवता येईल, थोड्याशा गुंतवणुकीत वीज पुरवठा वाढेल आणि त्याचवेळी विकेंद्रित ऊर्जा व्यवस्था निर्माण होईल.

चेन्नईतील वीरा राघवन या शास्त्रज्ञाने आपल्या सहकार्यांसमोर दुर्गम भागात वीज पुरवण्याचं आव्हान ठेवलं. त्याच्यातून सौर उर्जेतून एसी वीज पुरवठ्याची कल्पना पुढे आली. त्यासाठी त्यांच्या Kripya टीमने मायक्रो इनर्व्हटर बनवला आहे. ग्रीडवरील वीज पुरवठा बंद असतानाही ही यंत्रणा कार्यरत रहाते. या कल्पनेवर अजूनही काम सुरू आहे.

अशाचप्रकारे टाटा केमिकल्समध्ये विजेचा खर्च कमी करण्याचा मार्ग शोधला जात आहे. त्यासाठी सौर उर्जेवरील सोलर सेलमधली डिसी वीज, एसी ग्रीडवरील यंत्रणांना कशी वापरता येईल याचं संशोधन केलं जात आहे.

ग्राहकांच्या गरजातून कशाप्रकारे नावीन्यपूर्ण संकल्पना पुढे येतात आणि त्या प्रत्यक्षात उतरवल्या जातात याची ही चार उदाहरणं आहेत. विशेष म्हणजे सौर उर्जेशी निगडित अशी ही उदाहरणं आहेत. सर्वसाधारणपणे सौर उर्जेकडे पर्यायी उर्जास्रोत म्हणून बघितलं जातं आणि प्रचलित विजनिर्मितीला तो यशस्वी पर्याय होऊ शकत नाही असंही सांगितलं जातं. मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी होणारा भांडवली खर्च, सौर ऊर्जा ग्रीडवर आणून पुरवठा करण्यातील अडसर यामुळे सौर उर्जेचा उपयोग मुख्यतः पाणी गरम करण्यापर्यंत मर्यादित राहिला आहे. परंतु पर्याय म्हणून न बघता प्रचलित विजव्यवस्थेला पूरक म्हणून सौर उर्जेकडे पाहिलं तर ते अधिक व्यावहारिक आणि फायद्याचं ठरेल. पुढील काळात सौर ऊर्जा मुख्य उर्जास्रोत होणं शक्य आहे.

पुण्यातील दोन तरुण इंजिनिअर्सनी सौर उर्जेवर चालणारा पंप बनवला आहे. त्यांनी स्थापन केलेल्या विश्वजीत ग्रीनपॉवर टेक्नॉलॉजीतर्फे हा पंप माणगावला ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारका’मध्ये त्यांनी बसवला आहे. त्यामुळे वीज खर्चात बचत झाली. त्याचबरोबर वीज गेल्यावर होणारा खोळंबा आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्नही सुटला. हा पंप शेतकर्यांचा साथी ठरणार आहे. अनेक ग्रामीण भागात दिवसभर लोडशेडिंग असतं. रात्री वीज येते, तेव्हा पंप सुरू करून शेताला पाणी द्यावं लागतं. वेळीअवेळी उठून दूर असलेल्या शेतावर जाणं हे मोठं त्रासदायक काम आहे. अनेकदा पंप चालू केल्यावर तो बंद करेपर्यंत थांबणंही शक्य नसतं आणि पंप आणि पाणी तसंच सुरू ठेवून शेतकरी घराकडे परततो. त्याऐवजी सौर पंपामुळे त्याला दिवसाउजेडी शेताला हवं तेवढं आणि हवं तेव्हा पाणी देता येईल. त्यामुळे पाणी, ऊर्जा आणि श्रम तिन्हींचीही बचत होईल. एक छोटासा प्रयोग किती उपयोगी ठरू शकतो.

भारतात पुरेसं संशोधन होत नाही. संशोधानाला प्रोत्साहन नाही अशी आपली तक्रार असते आणि ती वस्तुस्थितीही आहे. संशोधनासाठी लागणारं उच्च दर्जाचं ज्ञान, लागणारा कालावधी आणि करावी लागणारी गुंतवणूक हा मोठाच प्रश्न आहे. पण मूलभूत संशोधनाचं क्षेत्र सोडलं तरी निर्माण होणार्या गरजांच्या पूर्ततेसाठी आणि दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी अनेक स्तरावर आपापल्यापरिने प्रयत्न सुरू असतात. अशा इनोव्हेशनमधून नावीन्यपूर्ण संकल्पनांतूनही समाजाची प्रगती होत असते. पण या अशा नावीन्यपूर्ण शोधांच्या संकल्पनांना पुरेसं प्रोत्साहन देण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे ना त्याचा संशोधकांना फायदा होत ना समाजाला.

नावीन्यपूर्ण संकल्पनांचं महत्त्व लक्षात घेऊन Innovation Encouragement And Implementation Industry नावाने स्वतंत्र मंत्रालय किंवा यंत्रणा निर्माण करणं गरजेचं आहे. इनार्की कंपनीने डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली Innovation Foundation of India ची स्थापना करून पहिलं पाऊल टाकलं आहे. पुढचं पाऊल शासनाने टाकावं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *