जग किती वेगात आणि कसं बदलत आहे याचं भान येणं मोठं कठीण आहे. आपल्या डोळ्याला दिसणारे बदल कळतात. मोबाइल क्रांती, लॅपटॉप ते टॅब, आता थ्रीडी टिव्ही, मोटारगाड्यांची नवीन मॉडेल्स, सिंगल स्क्रीन ते मल्टीप्लेक्सपर्यंतचा प्रवास, इमेल, ब्लॉग, व्हॉटस्अप आणि कितीतरी, आपण जणू क्षणक्षणाला कॅलिडोस्कोपमध्येच जगतो आहोत.

तरीही अशा कितीतरी गोष्टी घडत आहेत ज्या आपल्यापर्यंत पोचत नाहीत. थ्रीडी प्रिंटरच्या माध्यमातून उत्पादन व्यवस्थेतच क्रांती होऊ घातली आहे. पण त्याचा आवाका किती आहे याचं आपल्याला आकलन नाही. असाच प्रकार आता ‘स्मार्ट कम्युनिटी’च्या प्रकल्पातून होऊ घातला आहे.

जपानने, अमेरिकेच्या मेक्सिको, लॉस अलमॉस या काऊंटीमध्ये स्मार्ट कम्युनिटीचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीय प्रकल्प उभारला आहे. अपारंपरिक उर्जेचा वापर करून, श्वठ्ठद्गह्म्द्द4 श्वद्घद्घद्बष्द्बद्गठ्ठह्ल स्मार्ट कम्युनिटी उभारण्याचा हा प्रकल्प आता पूर्णत्वाला पोचला आहे. भविष्यातल्या वाढत्या लोकसंख्येसाठी आणि शहरीकरणासाठी हा प्रकल्प पथदर्शक ठरणार आहे. एवढंच नव्हे तर भविष्यातल्या नगररचनेचा आणि मानवी जीवनाचा तो आराखडाही ठरणार आहे. २०११ साली जगाची लोकसंख्या सातशे कोटी होती. ती २०५० मध्ये ९२० कोटींवर जाणार आहे. आणि अर्थातच ती मोठ्या प्रमाणात नागरी असणार आहे. जेवढं नागरीकरण वाढत जातं, उत्पन्न वाढत जातं तेवढ्या प्रमाणात उर्जेचा वापर वाढत जातो. प्रचलित उर्जास्रोतांच्या मर्यादा, उर्जेच्या वापर आणि उत्पादनातून होणारं प्रदूषण लक्षात घेता, भविष्यातल्या वाढत्या नागरीकरणातून, ऊर्जा निर्मितीतून आणि वापरातून किती बिकट समस्या उभ्या रहातील याचा अंदाज येतो.

विकासाच्या प्रक्रियेत मानव समाज आज ज्या व्यस्थेपर्यंत पोचला आहे त्यामध्ये जशी वित्तव्यवस्था आणि भांडवल हे अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आले आहे तसं आधुनिक समाजव्यवस्थेच्या आणि दैनंदिन व्यवहाराच्या केंद्रस्थानी उर्जानिर्मिती आणि वापर आला आहे का? एकेकाळी ग्रामीण व्यवस्थेत प्राणी हाच उर्जास्रोत होता. शेतीपासून, वाहतुकीपर्यंत, उत्पादन व्यवस्थेपर्यंत प्राण्यांचाच वापर होता. दूरवरच्या व्यापारउदीमाला त्याचाच आधार होता. इतकंच काय संपत्तीची साठवण आणि मोजमापही हत्ती, घोडे, उंट, गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या यांच्या संख्येत होत होतं. त्याकाळी अन्य उर्जेचा वापर फारच कमी होता.

औद्योगिक व्यवस्थेत उर्जेचा वापर वाढला तरी तो उत्पादनासाठी होता. हा सर्व काळ घरगुती वापराची, प्रवास आणि व्यापारसाठी लागणारी उर्जेची गरज मर्यादित होती. औद्योगिक शहरातील प्रामुख्याने चाळीत राहणार्या वस्तीत घरगुती वापराची वीज एक बल्बपुरती मर्यादित होती. पुढे त्यात फ्रिज, पंख्याची भर पडली तरी वीजवापर फारसा वाढला नाही. रस्त्यावर विजेचा चकचकाट करण्याची पद्धत नव्हती. दुकानं आणि कार्यालयातही गरजेपुरता विजेचा वापर होता. त्यातही काटकसरीवर कटाक्ष होता.

परंतु गेल्या २५-३० वर्षांत उर्जेचा वापर प्रचंड वाढला आहे. घरात वाढला आहे आणि घराबाहेरही वाढला आहे. शहरात चाळींची जागा ब्लॉक्सनी घेतली आणि एका बल्बऐवजी किचन, बेडरूम, हॉल, संडास, बाथरूम, वॉश बेसिन, डोअरबेल, एक्सॉस्ट, मिक्सर, गिझर, फॅन, टेबल फॅन, फ्रिज, टिव्ही, मायक्रोओव्हन एवढ्यांचीच बेरीज १४-१५ इलेक्ट्रीक पॉईंटस्वर गेली. त्यात एकाऐवजी दोन किंवा तीन बेडरूम होतात, हॉलची लांबी-रूंदी वाढते, बाथरूम वाढतात. म्हणजे किती पटीने वीज वापर वाढला त्याची गणतीच नाही. रस्त्यावरची रोषणाई, एसी दुकानं आणि मॉल्स, एअरकन्डिशन्ड ऑफिसेस आणि बँका, जाहिरातींचे बोर्ड आलेत. ऊर्जा वापरात मोठी भर पडली आहे ती वाहतुकीची; इतकी की वाहतूक साधनांची निर्मिती हाच मुळी अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख भाग झाला आहे. मोटारगाड्या, ट्रक, टू व्हीलरची मागणी घटली तर अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते. त्यांची मागणी वाढत रहावी म्हणून शासनकर्ते रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल, हायवे, एक्सप्रेस वे अशा एकावर एक योजना करत आहेत. परिणामी सगळी समाजव्यवस्थाच उर्जाकेंद्री बनली आहे; इतकी की पाश्चात्य देशातल्या दरडोई उर्जेचा वापर आणि भारतातला दरडोई वापर यांची तुलना करून दरडोई ऊर्जा कमी असणं म्हणजे देशाचं मागासलेपणाचं गमक आहे असं सांगितलं जात आहे.

सध्या भारतातली ऊर्जा हा आर्थिक उलाढालीतला प्रमुख घटक झाला आहे. एकेकाळी वीज निर्मिती आणि वितरण शासन करत होतं. पेट्रोल, डिझेल, तेलाच्या व्यवहारात ब्रिटिश काळात खाजगी ब्रिटिश कंपन्या होत्या पण नंतर तो व्यवहारही शासन सांभाळत होतं, कोळसा खाणी तर सरकारीच आहेत आणि अणुऊर्जा प्रकल्पही शासनाचेच आहेत. पण आतापर्यंत विजेची हमी मागणारे भांडवलदार आता स्वतःच ऊर्जा निर्मिती आणि वितरणात उतरले आहेत, तेलविहिरी खरेदी करत आहेत, पेट्रोलपंपही काढत आहेत आणि कोळसा खाणीही घेत आहेत. त्यामुळेच हे क्षेत्र भ्रष्टाचारामुळे गाजू लागलं आहे. उर्जाक्षेत्रात भांडवलदार शासकांचे नवे हितसंबंध आणि हातमिळवणी झाली आहे. या सगळ्यातून पुढे काय घडणार, याचा शेवट काय असं वाटत असताना स्मार्ट कम्युनिटीचा प्रकार समोर येत आहे. कदाचित स्मार्ट सिटीच्या दिशेने ते पहिलं पाऊल असेल. यातून प्रचलित उर्जाव्यवस्थेचं काय होईल?

परंतु हा केवळ पारंपरिक ऊर्जा निर्मितीचा प्रयोग नाही. त्या उर्जेशी जोडलेली घरगुती वापराची साधनं निर्माण करण्यात येत आहेत. विजेवरची खाजगी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, प्रदुषणविरहित हरित परिसर, सर्व सेवासुविधांपर्यंत पोचण्याची सुलभता अशा वस्ती आणि शहररचनेचा तो आराखडा आहे.

युरोपमध्ये शास्त्रीय शोध लागत होते, तेव्हा भारतीय समाज आत्मा अमर आहे का याच्या चर्चेत गुंतला होता. आता पाश्चिमात्य देश थ्रीडी प्रिंटर, स्मार्ट कम्युनिटीचे प्रयोग करून भविष्यातली समाजव्यवस्थेचा पाया घालत असताना आम्ही काय करत आहोत?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *