‘आम आदमी पार्टीला कुठलीही राजकीय दृष्टी नसून त्यांची भूमिका अराज्यवादी आहे. हा पक्ष हळूहळू लयाला जाईल आणि जे जनता पक्षाचं झालं तेच थोड्याफार फरकाने आम आदमी पार्टीचं होईल’ असं स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांनी व्यक्त केलं.

केशव गोरे स्मारक ट्रस्टतर्फे केशव ऊर्फ बंडू गोरे यांच्या ५६ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘जनआंदोलन, आम आदमी पार्टी आणि भविष्यातील राजकारण’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. या स्मृतिदिनानिमित्त मृणालताई गोरे यांच्या आठवणींना उजाळा देणार्या आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेणार्या ‘आठवणीतल्या मृणालताई’ या पुस्तकाचं प्रकाशन, अनंत नथोबा साठे समाजसेवा पुरस्काराचं वितरण आणि व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

या परिसंवादात बोलताना आम आदमी पार्टीच्या भविष्यकाळातील राजकारणाविषयी आपलं मत मांडताना प्रकाश बाळ म्हणाले की, ‘जनलोकपाल आंदोलन माध्यमांनी उचलून धरलं. ६२९ कोटींचं जाहिरातींचं नुकसान करून हे आंदोलन प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचवलं. हे आंदोलन यशस्वी होण्यात मीडियाचाही तितकाच हातभार होता.’ तसंच आम आदमी पार्टीचे सोमनाथ भारती यांच्या कंपनीला अमेरिकेने स्पॅम मेल प्रकरणी दोषी ठरवलं असतानाही आम आदमी पार्टीने त्यांना उमेदवारी दिली, हे चुकीचं असल्याचं सांगून त्यांनी आपच्या धोरणावर प्रखर टीका केली. आम आदमी पार्टीचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अतिशय चाणाक्ष आणि महत्त्वाकांक्षी व्यक्ती आहेत. ते पूर्वी प्राप्तिकर अधिकारी असल्यामुळे त्यांना समोरची व्यक्ती कायदा मोडतेय असंच नेहमी वाटतं असं बाळ यांनी सांगितलं. तसंच दिल्लीत एफडीआय नको मात्र इतर राज्यात चालेल ही योगेंद्र यादवांची दुटप्पी भूमिका आहे. सुभाष वारे यांचं स्वप्न म्हणजे मृगजळ आहे असंही ते पुढे म्हणाले. राजकारणातल्या मर्यादा ओळखून राजकारण कसं करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. प्रत्येकवेळी एसएमएसवरून प्रतिक्रिया घेऊन लोकांचे प्रश्न सोडवणार असाल तर मग लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं, असा खडा सवालही प्रकाश बाळ यांनी यावेळी उपस्थित केला.

तर यावेळी आम आदमी पक्षाची भूमिका मांडताना आपचे नेते सुभाष वारे यांनी आम आदमी पार्टीचा उगम आणि भविष्य या संदर्भात काही प्रमुख मुद्दे उपस्थित केले. ‘जनलोकपालच्या देशव्यापी आंदोलनातून लोक रस्त्यावर आले. या आंदोलनादरम्यान केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी कायदे संसदेत तयार होत असतात रस्त्यावर नाही त्यामुळे निवडणूक लढवा आणि संसदेत येऊन कायदे बनवा असं आव्हान आम्हाला दिलं होतं आणि यालाच उत्तर म्हणून आम्ही आम आदमी पार्टी स्थापन करून देशाच्या नागरिकांना आपचा पर्याय उपलब्ध करून दिला. आणि येत्या काळात याचा महत्त्वाचा परिणाम राजकीय वर्तुळात दिसून येणार आहे. आम आदमी पार्टीमुळे अडगळीत पडलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना चांगल्याप्रकारे काम करण्यासाठी पर्याय उपलब्ध झाला आहे. आमच्यासाठी आमचा अजेंडा महत्त्वाचा आहे, संख्याबळ नाही. संसदीय लोकशाही मान्य करून सत्ता प्रस्थापित करून काम करणारा आम आदमी पक्ष आहे त्यामुळे तो अराजकतेकडे जाऊ शकत नाही’, असं ठाम मत वारे यांनी व्यक्त केलं. तसंच पुढे ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रात जातीय अस्मितेचं राजकारण सुरू आहे. विकासाची भाषा करणार्या पक्षाला मतदान करणं हे इथे महत्त्वाचं आहे. सत्तेत आल्यावरही पक्षाचं जनआंदोलनाबरोबरचं नातं तुटता कामा नये. आंदोलनातून आलेले कार्यकर्ते आमच्या पक्षात आहेत, आम्ही खास बाकी सगळे बकवास हे आमचं मत नाही. सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला लोकांचा सहभाग आणि त्यांचं मत महत्त्वाचं वाटतं’, असं परखड मतही सुभाष वारे यांनी यावेळी मांडलं.

या कार्यक्रमादरम्यान जातपंचायती विरोधात लढा देणार्या दुर्गा मल्लू गुडीलू या वैदू समाजातील मुलीला ट्रस्टतर्फे देण्यात येणार्या अनंत नथोबा साठे समाजसेवा पुरस्काराने गौरवण्यात आलं. याप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना, ‘माझ्यासारख्या इतर दुर्गा या जातपंचायतीच्या जंजाळात अडकू नयेत यासाठीच अन्यायाच्या विरोधात मी हा लढा दिला’ असं ती म्हणाली. आपलं मनोगत मांडताना तिला अश्रू आवरत नव्हते.

या कार्यक्रमात मृणालताईंच्या सहकारी कुसुमताई सामंत यांच्या हस्ते ‘आठवणीतल्या मृणालताई’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या प्रसंगी कुसुमताईंनी मृणालताईंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान केशव गोरे स्मारक ट्रस्टचे विश्वस्त जयंत धर्माधिकारी यांनी भुषवलं. तर या कार्यक्रमाला प्रा. पुष्पा भावे, सहकार चळवळीतले ज्येष्ठ नेते गजानन खातू तसंच केशव गोरे ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 निलेश गोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *